Saturday, December 11, 2021

सामाजिक सलोखा जपणे प्रत्येकाचे कर्तव्य - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 









सामाजिक सलोखा जपणे प्रत्येकाचे कर्तव्य

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती , दि. ११ : अमरावती शहराने आजवर येथील संतांची संस्कृती जपली आहे. सामाजिक सलोखा जपणे प्रत्येकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. सेवा हा धर्म पाळल्यास आपण समाज एकत्र ठेवू शकतो, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

       लोकनेते व इतिहासकार  कै.भि. दे. उर्फ बापूसाहेब कारंजकर स्मृती भवनाचे भूमिपूजन श्रीमती अँड. ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आले.

   निळकंठ चौक स्थित स्मृती भवनाच्या दुमजली इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान निधी अंतर्गत ६० लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार पुढील निधी मंजूर करण्याचे आश्वासन श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

      निळकंठ व्यायाम मंडळामार्फत शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह तसेच बापूसाहेब कारंजकर लिखित 'अमरावती इतिहासाचे खंड' यावेळी श्रीमती ठाकुर यांना देवून गौरविण्यात आले.

    नगरसेवक विलास इंगोले,नगरसेविका सुनीता भेले, नीलकंठ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गंगात्रे आदी यावेळी उपस्थित होते.

00000

Friday, December 10, 2021

पाणी स्त्रोत विकास व पूरक पाणी स्त्रोत निर्माण करण्यास प्राधान्य द्यावे - पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल

 








'जलजीवन मिशन', 'स्वच्छ भारत मिशन', ‘अटल भूजल’ योजनांचा आढावा

पाणी स्त्रोत विकास व पूरक पाणी स्त्रोत निर्माण करण्यास प्राधान्य द्यावे

-    पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल

 

            अमरावती, दि. १० : जलजीवन मिशनअंतर्गत 'हर घर नल से जल'अंतर्गत प्रतिदिन, प्रतिमाणशी 55 लिटर शुद्ध पाणी पुरवणे हे मुख्य लक्ष्य असून, 2024 पर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी अभियान स्वरूपात काम करावे. त्याचप्रमाणे, पाणी स्त्रोत विकास, साठवण आणि पूरक पाणी स्त्रोत निर्माण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी आज येथे दिले.

            विभागातील पाच जिल्ह्यांतील 'जलजीवन मिशन', 'स्वच्छ भारत मिशन', अटल भूजल या योजनांबाबत आढावा बैठक डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त चिंतामणी जोशी, अवर सचिव अनुष्का दळवी आदी उपस्थित होते.

          त्याचप्रमाणे, अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर, यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुखराजन, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, अकोल्याचे मु, का. अ. सौरभ कटियार,यवतमाळचे मु. का. अ. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वाशिमच्या जि. प. सीईओ वसुमना पंत आदी उपस्थित होते.

जलजीवन अभियान हे ग्रामीण जनतेच्या जीवनात विशेषत: महिलांच्या जीवनात सुलभता निर्माण करणारे असून, या उपक्रमाचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे, असे आवाहन श्री. जयस्वाल यांनी केले.  ते म्हणाले की, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन व अटल भूजल या तिन्ही योजनांतील उद्दिष्टे सर्व जिल्ह्यांत पूर्ण होण्यासाठी मिशन मोडवर कामे करावीत. पाणी स्त्रोत विकास, साठवण आणि पूरक पाणी स्त्रोत निर्माण करण्याबरोबरच स्त्रोतांचे पुनरूज्जीवन व बळकटीकरण करणे आवश्यक आहे. खारपाणपट्ट्यातही तेथील वैशिष्ट्ये व कामाची गरज लक्षात घेऊन कामे राबवावीत. याबाबत प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गावनिहाय परिपूर्ण आराखडे तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले.

 

माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र’मधील अपेक्षित कामे विहित काळात पूर्ण करावीत, असे निर्देश डॉ. महाजन यांनी दिले. वैयक्तिक स्वच्छतागृहांचे विभागात 29 हजार 441 चे उद्दिष्ट असून, अकोला जिल्ह्यात 3 हजार 479, अमरावती जिल्ह्यात 4 हजार 421, यवतमाळ जिल्ह्यात 12 हजार 316, वाशिम जिल्ह्यात 5 हजार 225, बुलडाणा जिल्ह्यात 4 हजार असे उद्दिष्ट आहे. योजनेत 30 टक्के उद्दिष्ट 15 जानेवारीपूर्वी, तर 70 टक्के उद्दिष्ट 28 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

उपक्रमाला वेग येण्यासाठी ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांना सूचना द्याव्यात. त्याचप्रमाणे,या उपक्रमाची गरजूंपर्यंत माहिती पोहोचवावी. अधिकाधिक जनजागृती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी जीवन प्राधिकरणातर्फे राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. भूजलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व उपलब्धता वाढविण्यासाठी अटल भूजल योजना राबविण्यात येत असून त्याचीही प्रभावी अंमलबजावणी सर्व जिल्ह्यात व्हावी, असे निर्देश प्रधान सचिवांनी दिले. उपक्रमांची माहिती सर्वदूर पोहोचविण्यासाठी सातत्यपूर्ण जनजागृती करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

00000

'एचआयव्ही'बाबत बाईक रॅलीद्वारे जनजागृती; असमानता नष्ट करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांच्या हस्ते रॅली मार्गस्थ

 

'एचआयव्ही'बाबत बाईक रॅलीद्वारे ज





नजागृती; असमानता नष्ट करण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांच्या हस्ते रॅली मार्गस्थ

 

अमरावती, दि. १० : स्थानिक जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय अमरावती द्वारे जागतिक एड्स दिन २०२१ निमित्त जिल्हा भरामधे विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात आज जनजागृती बाइक रॅली जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे आयोजित करण्यात आली. या जनजागृती बाइक रॅलीला  जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी सर्वाना एचआयव्ही/एड्सबाबत शपथ देण्यात आली.

सदर जनजागृती बाइक रॅलीला कोविड प्रतिबंधात्मक संसाधनांचा उपयोग करत जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय अमरावती येथून रेल्वे स्टेशन चौक ते राजापेठ ते राजकमल चौक ते कॉटन मार्केट ते शेगाव नाका चौक ते पंचवटी चौक ते सामान्य रुग्णालय अमरावती या मार्गावर जनजागृती बाइक रॅली द्वारे एचआयव्ही/एड्स बाबत जनजागृती करण्यात आली.

जनसामान्य एचआयव्ही/एड्स संदर्भात अधिक संवेदनशिल असल्याने यावर्षी संपवूया भेदभाव, संपवूया एड्स, संपूया महामारी या घोषवाक्य द्वारे जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमास  जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांच्यासह डॉ.श्यामसूंदर निकम जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय, डॉक्टर प्रदीप नरवणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय अमरावती, श्री. अजय साखरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डापकू विभाग सामान्य रुग्णालय, श्री. प्रकाश शेगोकर जिल्हा पर्यवेक्षक, डॉक्टर पदमाकर सोमवंशी डॉ.पंजाबराव देशमुख स्मृति वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. ज्योत्सना किटुकले, डॉ. गोविंद कासट, डॉ. मंदा नाणंदुरकर समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना, श्री. राजेश पीद्डी संत गाडगेबाबा अमरावती विध्यापीठ अमरावती, डॉक्टर मीनल देशमुख अध्यक्ष अमरावती स्त्रीरोग तधन्य संघटना, डॉक्टर शलाखा बारी सचिव स्त्रीरोग तधन्य संघटना अमरावती, डॉक्टर सुयोगा देशपांडे स्त्रीरोग तधन्य संघटना अमरावती, डॉक्टर प्रधन्या चौधरी स्त्रीरोग तधन्य संघटना अमरावती, डॉक्टर संदीप दानखडे सचिव आय. एम. ए. अमरावती, प्रा. डॉक्टर कुंदन पाटील शासकीय फार्मसी महाविध्यालय अमरावती, प्रा. गवई नर्सिंग कॉलेज अमरावती, डॉक्टर श्रीरंग ढोले, डॉक्टर प्रीती मोरे, डॉक्टर श्री. राजाभाऊ डांगे, श्री. प्रमोद मिसाळ, श्री. दामोदर गायकवाड, श्री. नरेश मंथापुरवार, श्री. लोकेश पवार, श्री. चंद्रकांत हिरोडे, श्री. अजय खेडकर, श्री. अमित बेलसरे, श्री. प्रवीण मिसाळ, श्री. अजय वरठे, श्री. अमोल मोरे, श्री. गजेंद्र बेलसरे, श्री. सचिन वानखडे, श्री. श्रीकांत गोहाड, श्री. संजीव वर्मा, श्री. प्रवीण पिंजरकर, श्री. विनोद हगवणे श्री. सुरज भोयर, श्री. किशोर पाथरे, श्री. सुनील अघम, श्री. विशाल बोंबे, श्री. अमोल राऊत, श्री. श्याम वाहने, श्री. आशीष अंधारे, श्री. संदीप पाटील, श्रीमती आरती इंगळे, श्रीमती नीता गोगटे, श्रीमती प्रीती आगरकर, श्रीमती सपना ठाकूर, श्री. गणेश पराते कार्यक्रम अधिकारी टेक्निकल सपोर्ट यूनिट आशासकीय संस्था, डॉक्टर रघुनाथ वाडेकर प्रकल्प संचालक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आरोग्य व शिक्षण प्रसारक मंडळ मोझरी, श्री. संत सत्ययदेव बाबा महिला मंडळ मोझरी, श्री. बी. एस. रामटेके प्रकल्प संचालक भाग्योदय बहुउदेशीय संस्था अमरावती, श्री. राजेंद्र साबळे प्रकल्प व्यवस्थापक, श्री. ब्रिजेश दळवी प्रकल्प व्यवस्थापक, श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, श्री. परमेश्वर मेशराम प्रकल्प व्यवस्थापक भाग्योदय बहुउदेशीय संस्था अमरावती तसेच सदर जनजागृती बाइक रॅलीला महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत कार्यरत डापकू, श्री. संत गाडगेबाबा अमरावती विध्यापीठ अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आरोग्य व शिक्षण प्रसारक मंडळ मोझरी, श्री. संत सत्ययदेव बाबा महिला मंडळ मोझरी, श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, भाग्योदय बहुउदेशीय संस्था अमरावती, विहान, आधार संस्था अमरावती, समर्पण ट्रस्ट संस्था, साथी प्रकल्प अमरावती, आय. एम. ए. अमरावती, स्त्रीरोग तधन्य संघटना अमरावती, जॉनटस क्लब अमरावती, शासकीय औषध निर्माण महाविद्यालय अमरावती व विविध महाविध्यालय कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी, प्राचार्य, डॉक्टर उपस्थित होते.

०००

 

 

 

 

 

Thursday, December 9, 2021

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने वाघोलीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला शेतकरी बांधवांना भरपाई अदा





 

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने वाघोलीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला

शेतकरी बांधवांना भरपाई अदा

 

 अमरावती, दि. ९ : अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील वाघोली येथील शेतकऱ्यांना पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांनी न्याय मिळाला. रतन इंडिया पावर प्लांटच्या धुळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेरीस नुकसान भरपाई देण्यात आली.

अमरावती तालुक्यातील नांदगाव पेठ जवळील वाघोली येथील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून त्रस्त होते. रतन इंडिया पावर प्लांट मुळे या शेतकऱ्यांच्या शेतात धुळीचे साम्राज्य पसरले होते. या धुळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. पिके जमीनदोस्त झाली होती. यासंदर्भात जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडे शेतकरी वारंवार तक्रार करीत होते. श्रीमती ठाकूर यांनी रतन इंडिया पावर प्लांट सातत्याने संपर्क साधून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली.

 सहा शेतकऱ्यांना सुमारे तीन लाख आठ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. जया ठेले यांना 90 हजार रुपये, ओमकार ठेले यांना 87 हजार 840 रुपये, सुरेश कांबळे यांना चाळीस हजार पाचशे रुपये, सुखंलाल चव्हाण यांना 34 हजार दोनशे रुपये, छबुलाल चव्हाण यांना 44 हजार 300 रुपये आणि ज्ञानेश्वर इंगोले यांना 14 हजार 400 रुपये मदत देण्यात आली आहे शेतकऱ्यांना मदत मिळाल्याबद्दल पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

00000

 

Wednesday, December 8, 2021

यादीतून वगळलेल्या लाभार्थ्यांनाही घरकुले मिळण्यासाठी प्रयत्न करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 








सर्वांसाठी घरे

एकही गरजू व्यक्ती बेघर राहता कामा नये

यादीतून वगळलेल्या लाभार्थ्यांनाही घरकुले मिळण्यासाठी प्रयत्न करा

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती,  दि. 8 : प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यातील गरीब आणि वंचित घटकांना घरकुल मिळवून दिले जाते. जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या यादीतून काही तांत्रिक कारणांस्तव वगळण्यात आलेल्या गरजूंनाही घर कसे मिळवून देता येईल, असा प्रयत्न जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने करावा. एकही गरजू व्यक्ती बेघर राहता कामा नये, से निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

 

आवास योजनेबाबत ग्रामीण विकास यंत्रणेच्या कामांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जयंतराव देशमुख यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

   

            प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यात नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एक लाख 74 हजार 143 इतकी आहे. यापैकी सुमारे 31 हजार 401 लाभार्थ्यांचे अर्ज विविध कारणांनी नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे आता पात्र लाभार्थ्यांची संख्या 1 लाख 40 हजार 893 इतकी आहे. मात्र ज्या लाभार्थ्यांना काही कारणासाठी नाकारण्यात आले आहे तेही गरीब आणि गरजू असून त्यांना घरकुल मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. 

 प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत यादीतून वगळलेल्या लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतनिहाय यादी तयार करण्याबाबतही सूचना देण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंडा यांनी दिली.

 

000

सौर खादी उत्पादनांच्या विपणनासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी - जिल्हाधिकारी पवनीत कौर





 


सौर खादी उत्पादनांच्या विपणनासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी

-  जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 8 : सौर खादी उत्पादनांच्या विपणनासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी. जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी येथे केले.

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या औद्योगिक वसाहतीतील विकेंद्रित सौर चरखा समूह प्रकल्पाला काल जिल्हाधिका-यांनी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. भेटीदरम्यान जिल्हाधिका-यांनी प्रथम महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हातचरख्यावर सूतकताई केली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उदय पुरी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुठले, कार्यकारी अभियंता राहूल बन्सोड, नेत्रदीप चौधरी, श्यामल रोडे, शरद कोलटेके, सुमित नागपुरे आदी उपस्थित होते.

  मांडू येथे सुताचे कापड होते

सौर चरखा समूहांतर्गत 300 महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतक-यांकडून कापूस खरेदी करून पेळू तयार केला जातो. पेळूपासून चरख्यावर सूतकताई करून धारणी तालुक्यातील मांडू येथे विणकाम केंद्रात सूतापासून कापड तयार केले जाते. या कापडावर अमरावती एमआयडीसी सामूहिक सुविधा केंद्रात प्रक्रिया करून विविध दर्जेदार खादी उत्पादने तयार केली जातात व त्यांची देशभर विक्री होते. कस्तुरबा सौर खादी महिला समितीकडून या प्रकल्पाचे संनियंत्रण होते.

 या उत्पादनांच्या भक्कम विपणनासाठी मध्यवर्ती व कायमस्वरूपी यंत्रणा उभी राहावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.

 

कस्तुरबा समितीच्या अध्यक्षा रूपाली खडसे, सदस्य वर्षा चौधरी, वर्षा जाधव यांनी जिल्हाधिका-यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. सौर चरखा सामूहिक सुविधा केंद्रातील प्रि-स्पिनिंग, प्रि-व्हिविंग, पोस्ट-व्हिविंग आदी प्रक्रियेची इत्थंभूत माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी जाणून घेतली व गत पाच वर्षांपासून प्रकल्प यशस्वीपणे चालवत असल्याबद्दल समिती सदस्यांचे कौतुक केले.

 

00000

 

 

 

साथरोग रोखण्यासाठी तपासणी, उपचाराच्या अद्ययावत यंत्रणा जिल्ह्यात उभारणार - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 




पालकमंत्र्यांकडून कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

साथरोग रोखण्यासाठी तपासणी, उपचाराच्या अद्ययावत यंत्रणा जिल्ह्यात उभारणार

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

·         ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढवा

·         रँडम चेकिंग करा

·         सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग

·         कोविड अनुरूप शिस्त निर्माण करा

                अमरावती, दि. 8 : ओमायक्रॉन विषाणूचे राज्यात आढळलेले रूग्ण व कोविड साथीच्या नव्याने आढळणा-या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर, साथरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात अधिक जलद व अधिक अचूक तपासणीच्या अद्ययावत यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे. ‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठी अद्ययावत यंत्रणा आरोग्य विभाग, प्रयोगशाळांकडे उपलब्ध असण्याच्या दृष्टीने प्रस्ताव द्यावेत. नागरिकांची सुरक्षितता हेच शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, तपासणी व उपचार यंत्रणेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.

कोविड प्रतिबंधक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त आरती सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. रेवती साबळे, डॉ. दीपक करंजीकर, डॉ. ए. टी. देशमुख, डॉ. ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, साथरोग नियंत्रणासाठी जलद निदान झाल्यास गतीने उपचार करणे शक्य होते. त्यामुळे कोविडकाळात स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळांत जिल्हा नियोजन निधीतून अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली. त्याचा कोविड साथ नियंत्रणासाठी मोठा उपयोग झाला. तथापि, ओमायक्रॉनसारख्या उत्परिवर्तित विषाणूचा राज्यात काही ठिकाणी प्रादुर्भाव व अद्यापही कोविडचे रूग्ण आढळणे या पार्श्वभूमीवर, ‘जिनोम सिक्वेन्सिंग’सारख्या सखोल तपासणी सुविधाही जिल्ह्यातील प्रयोगशाळांकडे असाव्यात. याबाबतचा आवश्यक निधी, व्यवहार्यता आदी बाबी तपासून तसा प्रस्ताव सादर करावा. आरोग्य सुविधांसाठी आवश्यक निधी मिळवून दिला जाईल.

‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढवा

अमरावती महापालिका क्षेत्रात मंगळवारी नव्याने नऊ कोविडबाधित आढळले. तिस-या लाटेचा धोका अजूनही संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. एका रूग्णामागे संपर्कातील किमान 30 व्यक्तींची तपासणी व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.

            व्यापक लसीकरणासाठी राबवलेल्या मोहिमेत साडेसहा लाख नागरिकांचे लसीकरण झाले. याबद्दल पालकमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, मोहिमेचा वेग कमी होऊ न देता संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. बुस्टर डोस न घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण अद्यापही कमी आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन काटेकोरपणे झाले पाहिजे. त्यादृष्टीने भरीव जनजागृती करावी.

कोविड साथ नियंत्रणात आल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. तथापि, मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर या बाबींचा विसर पडता कामा नये. सार्वजनिक ठिकाणी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन न झाल्यास कारवाई व्हावी. बसस्थानके, रेल्वेस्थानक अशा ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग व्हावे. ‘रँडम चेकिंग’ही सुरू करावे. सीमावर्ती भागात नाक्यांवर तपासणी करताना लसीकरण झाले किंवा कसे, हे पाहणेही आवश्यक आहे. गत साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली. तथापि, यापुढेही सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. फेब्रिकेडेट रूग्णालयाचे फायर ऑडिट पूर्ण करून घ्यावे व ते कार्यान्वित करण्यासाठी गतीने प्रक्रिया राबवावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

अमरावती जिल्ह्यात गत दोन साथींच्या काळात सुमारे 8 लक्ष 87 हजार 864 व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यात 96 हजार 797 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. त्यातील 95 हजार 193 व्यक्ती ब-या होऊन घरी परतल्या. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 98.3 आहे, अशी माहिती डॉ. साबळे यांनी यावेळी दिली.

00000

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...