Thursday, December 16, 2021

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागात चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण होणार - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागात चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण होणार

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

       अमरावती, दि. १२ : _मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुस-या टप्प्यात दहा हजार किमी रस्ते बांधणी करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातही ग्रामीण भागात चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन, दळणवळणाची भक्कम सुविधा निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. प्रशासनानेही या योजनेतून जिल्ह्यात अधिकाधिक ग्रामीण रस्ते निर्माण होण्याच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत._

 

         ग्रामीण भागात मजबूत रस्ते निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुस-या टप्प्याला शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातही ग्रामीण रस्त्यांची कामे वेग घेणार आहेत. यापूर्वी याबाबत बैठकीद्वारे आढावा घेऊन व आवश्यक तिथे रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, यानंतरही आवश्यक रस्त्यांबाबत प्रशासनाने प्रस्ताव द्यावेत. त्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

 

      प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत समावेश नसलेल्या आणि दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या धर्तीवर दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. रस्त्यांची दर्जोन्नती करताना कोअर नेटवर्कमधील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाचाही सुधारण्याच्या विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे या संपूर्ण बाबींचा विचार करून प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

      मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच रस्त्यांची निवड जिल्हा स्तरावर गठित करण्यात आलेल्या पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत करण्यात येणार आहे. दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची एकूण लांबी व त्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांची लांबीच्या प्रमाणात त्या-त्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील कामांचा विचार केला जाणार आहे. वर्दळ जास्त असलेल्या ग्रामीण रस्त्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.  

 

 ०००

जिल्हाधिका-यांकडून लसीकरण, समृद्धी महामार्ग, कौंडण्यपूर विकासकामांची पाहणी लसीकरण पूर्णत्वास न्यावे जिल्हाधिका-यांचे आरोग्य पथकांना निर्देश

















 जिल्हाधिका-यांकडून लसीकरण, समृद्धी महामार्ग, कौंडण्यपूर विकासकामांची पाहणी

लसीकरण पूर्णत्वास न्यावे

जिल्हाधिका-यांचे आरोग्य पथकांना निर्देश

अमरावती, दि. १४ : विशेष मोहिमेदरम्यान आरोग्य पथकांनी प्रयत्नपूर्वक लसीकरणाचे प्रमाण वाढविले. मात्र, संपूर्ण लसीकरण होणे अत्यावश्यक असून पथकांनी जोरदार प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज धामणगाव रेल्वे येथे दिले.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी आज धामणगाव रेल्वे, तसेच कौंडण्यपूर येथे भेट देऊन लसीकरण मोहिम, महसूल यंत्रणेची कामे, समृद्धी महामार्गाची कामे आदींचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार प्रदीप शेलार यांच्यासह गटविकास अधिकारी, महसूल अधिकारी, कर्मचारी, तालुका आरोग्य यंत्रणेचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

            जिल्हाधिका-यांनी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयाला भेट देऊन महसूलविषयक कामांचा आढावा घेतला. त्यांनी अशोकनगर येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन आरोग्य पथकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मोहिमेत पथकांनी हिरीरीने लसीकरणाचा टक्का वाढवला, हे निश्चितच प्रशंसनीय आहे. अद्यापही कोविडचे रूग्ण आढळणे, ओमायक्रॉनचा राज्यातील प्रादुर्भाव आदी बाबी पाहता संपूर्ण लसीकरण ही काळाची गरज आहे. त्यामुळे मोहिमेचा जोम कमी होता कामा नये.

                        समृद्धी महामार्गाची पाहणी

जिल्हाधिका-यांनी धामणगाव तालुक्यातील आसेगाव येथे भेट देऊन समृद्धी महामार्गाच्या कामांची पाहणी केली. संरक्षित भिंतीमुळे पारंपरिक वाटांमध्ये अडथळे आल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुषंगाने शेतकरी बांधवांच्या वहिवाटीसाठी निर्माण करण्यात येत असलेल्या अंडरपासेस व पर्यायी रस्त्यांच्या कामांची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली.  

           कौंडण्यपूर विकासकामांची पाहणी

जिल्हाधिका-यांनी कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देऊन दर्शन केले. त्यानंतर त्यांनी विकास आराखड्यातील कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशीही संवाद साधून विविध बाबींची माहिती घेतली.

                                   

०००

Wednesday, December 15, 2021

जिल्ह्यातील 14 महत्वपूर्ण पाणीपुरवठा योजनांना उच्चाधिकार समितीकडून मान्यता - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट

जिल्ह्यातील 14 महत्वपूर्ण पाणीपुरवठा योजनांना उच्चाधिकार समितीकडून मान्यता

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 12 : जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 4 व जि. प. पाणीपुरवठा योजनेत 10 अशा 14 महत्वपूर्ण पाणीपुरवठा योजनांच्या कामांना उच्चाधिकार समितीकडून मान्यता देण्यात आली असून, लवकरच ही कामे वेग घेतील. जलजीवन मिशनअंतर्गत शासनाकडून प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून, अभियान स्वरूपात ही कामे पूर्ण करण्याचा निर्धार आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. 

जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना, राज्यातील 858 कोटीच्या कामांना मंत्रालयात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रस्तावित ग्रामीण पाणीपुरवठ्यांच्या कामांना मान्यता मिळावी यासाठी पालकमंत्र्यांकडून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा होत आहे. त्याचप्रमाणे, जिल्हास्तरावरही त्यांनी आढावा बैठका घेऊन गतीने कामे करण्याचे निर्देश दिले.

जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील  प्रत्येक कुटुंबाला सन २०२४ पर्यंत, वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. त्याअंतर्गत  जिल्ह्यातील महत्वाच्या योजनांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेडोपाडी पाणीपुरवठा योजना निर्माण होण्यास वेग मिळणार आहे. आता प्रशासनानेही योजनेनुसार प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी अभियान स्वरूपात काम करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 

‘मजिप्रा’च्या महत्वपूर्ण पाणीपुरवठा योजना

            जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनांमध्ये नांदगाव पेठ व ३२ गावे प्रा. पा.पु. यो. (ता. जि. अमरावती), 19 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता.चांदूरबाजार), तेल्हारा व ६९ गावे प्रादेशिक पा.पु. यो. जि. अमरावती, १०५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना,अमरावती आदी योजनांना मान्यता देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद पाणी पुरवठा १० योजनांना मान्यता

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांमध्ये जलजीवन मिशनमध्ये १० पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मान्यता मिळाली. त्यात मेळघाटातील कामांचाही समावेश आहे. साडेचार कोटी रूपयांहून अधिक रकमेच्या कामांना मान्यता मिळाली आहे. त्यात अमरावती तालुक्यातील मौजे काट आमला, नळ पा. पु. योजना, वरूड तालुक्यातील मौजे वडाळा नळ पा.पु. योजना व मौजे टेंभणी नळ पा.पु. योजना, चांदुर रेल्वे तालुक्यातील मौजे तुळजापूर नळ पा. पु. योजना व मौ.बागापूर नळ पा.पु. योजना, भातकुली तालुक्यातील मौजे बहादरपुर नळ पा. पु. योजना, मौजे खल्लार नळ पा.पु. योजना, अचलपूर तालुक्यातील मौ. भोपापुर नळ पा.पु. योजना, चिखलदरा तालुक्यातील मौजे बगदरी नळ पा.पु. योजना,  धारणी तालुक्यातील बबईढाणा नळ पा.पु. योजना यांचा समावेश आहे.

 जलजीवन अभियान हे ग्रामीण जनतेच्या जीवनात विशेषत: महिलांच्या जीवनात सुलभता निर्माण करणारे  आहे. त्यामुळे अपेक्षित पाणीपुरवठ्याची कामे पूर्णत्वास नेतानाच  पाणी स्त्रोत विकास, पूरक पाणी स्त्रोतांची निर्मिती व बळकटीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसार परिपूर्ण नियोजन व गावनिहाय आराखडे तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 

000000

Tuesday, December 14, 2021

कर्तव्यपूर्ती यात्रेतून नागरिकांच्या प्रलंबित समस्यांचे तत्काळ निवारण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढाकाराने मेळघाटात उपक्रम

 




कर्तव्यपूर्ती यात्रेतून नागरिकांच्या प्रलंबित समस्यांचे तत्काळ निवारण

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढाकाराने मेळघाटात उपक्रम

 

अमरावती, दि. 12 : जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून गेल्या 15 वर्षांपासून राहुटीच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्यांचे निवारण केले जात आहे. त्याच धर्तीवर आता मेळघाटातही राज्यमंत्री श्री. कडू व आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढाकाराने ‘कर्तव्यपूर्ती यात्रा’ या अनोख्या उपक्रमाद्वारे विविध विभागांना एकत्र आणून हजारो नागरिकांच्या विविध समस्या, अडीअडचणींचे निवारण करण्यात आले.

कोरोनाकाळात विविध नागरिकांची, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची अनेक कामे रखडली. परिणामी गेल्या दीड वर्षांपासून नागरिकांची अनेक कामे प्रलंबित राहिली होती. हे लक्षात घेऊन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढाकाराने मेळघाटात हा उपक्रम राबविण्यात आला. चिखलदरा तालुक्यातील टेंब्रुसोंडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी हा लोकाभिमुख उपक्रम हाती घेण्यात आला, असे राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी सांगितले.

                                    अडचणींचा जागेवरच निपटारा

सर्व शासकीय विभागांचे कक्ष कर्तव्यपूर्ती यात्रेत समाविष्ट होते. सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सहभागी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश राज्यमंत्री व आमदार महोदयांनी दिले. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचा जागेवरच निपटारा झाला.  संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय अर्थसाह्य योजना, श्रावण बाळ योजना या योजनांसह शिधापत्रिका आदी सुविधांसाठीच्या अर्जांचा यात्रेच्या माध्यमातून निपटारा झाला.

                                    हजारो नागरिकांना दिलासा        

उपक्रमातून ‘मिशन मोड’वर कामे केल्याने ती यशस्वी होतात. अनेकदा गरीब, सर्वसामान्य नागरिकांना योजनांची माहिती नसते. अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. मात्र, त्यांची कामे वेळेत होत नाहीत. हे लक्षात घेऊन एकाच ठिकाणी सर्व विभागांच्या उपस्थितीत लोकांच्या अडचणी जाणून तत्काळ निर्णयप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळून त्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया श्री. कडू यांनी व्यक्त केली.

                     अर्ज लिहिण्यापासून सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध

नागरिकांना अर्ज लिहायला मदत करण्यापासून झेरॉक्स, फॉर्म, सेतू कक्ष व इतर सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी असे वेगवेगळे अधिकारी- कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने प्रत्येक ठिकाणी सही-शिक्क्यासाठी स्वतंत्रपणे जाण्याची गरज भासत नाही. या सुलभ प्रक्रियेमुळे नागरिकांची कामे होऊन त्यांना दिलासा मिळतो. आपण ‘नायक’ हा चित्रपट पाहिला होता. तो पाहून मला अशा शिबिराची कल्पना सुचली. पंधरा वर्षांपूर्वी मी हा उपक्रम सुरू केला. आता मेळघाटातही हा उपक्रम सुरु केला आहे. अभियानात मोठी ताकद असते. त्यामुळे पारदर्शकता निर्माण होऊन गैरव्यवहार रोखायला मदत होते, असेही श्री. कडू यांनी सांगितले.

मेळघाटात प्रथमत:च हा कार्यक्रम घेतला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मेळघाटात ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. मेळघाटातील दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला आहे, अशी प्रक्रिया आमदार श्री. पटेल यांनी व्यक्त केली.

00000

 

 

पुनर्वसन प्रक्रियेत नागरी सुविधा निर्मितीची कामे नियोजनबद्ध पध्दतीने व गतीने पूर्ण करावी -जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 







पुनर्वसन प्रक्रियेत नागरी सुविधा निर्मितीची कामे नियोजनबद्ध

पध्दतीने  व गतीने पूर्ण करावी
                                                     -जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती, दि.१4 : जिल्ह्यातील चंद्रभागा बॅरेज प्रकल्पाच्या भूसंपादन आणि पुनर्वसन प्रक्रियेची कार्यवाही  करतांना  मूलभूत नागरी सुविधा तातडीने निर्माण करण्यात याव्या. या परिसरात पुनर्वसन करण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी येत्या जानेवारी पर्यंत  पिण्याच्या व वापराच्या पाण्याची व्यवस्था, नळजोडणी व रस्त्यांची निर्मिती, रस्त्याचे खडीकरण व काँक्रिटीकरण तातडीने करण्यात यावे. प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मदत, घरे मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज दिले.

                   
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत आढावा राज्यमंत्री श्री. कडू यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपजिल्हाधिकारी (महसूल) रणजीत भोसले, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सुभाष दळवी, ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळ अमरावतीच्या अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख, कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत, चांदुर बाजारचे उपविभागीय अभियंता प्रभाकर पालवे, उपअधीक्षक बाळासाहेब मिसाळ, अचलपूरचे उपअधीक्षक देविदास परतेती, मोर्शीचे उपअधीक्षक आर.के. सोनार आदी यावेळी उपस्थित होते.

चंद्रभागा प्रकल्पामुळे विस्थापीत झालेल्या गावातील नागरिकांना बुडीत क्षेत्रातील रस्त्याच्या समस्येबाबत बोलतांना श्री कडू म्हणाले की, पर्यायी रस्त्यांची  निर्मिती तातडीने करण्यात यावी. प्रत्यक्ष पाहणी करून पर्यायी  रस्ता तयार करण्यात यावा. धरण परिसरामध्ये असलेल्या लहान मंदिरांच्या व्यवस्थापनासाठी  मंदिर व्यवस्थापन समिती गठीत करण्यात यावी अशी सूचना त्यांनी केली. मंदीराच्या मूल्यांकनाच्या प्राप्त निधीतून  लोकोपयोगी सभागृहाची निर्मिती करण्यात  यावी असे सांगितले. नवीन पुनर्वसन गावठाण निर्मिती करतांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत शबरी व रमाई घरकुल आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्याची प्रक्रिया गतीने करावी. पुनर्वसन प्रक्रिये अंतर्गत नागरिकांना बाजारपेठ, आठवडे बाजाराकरिता मुबलक जागा, शाळा, सभागृह, रस्ते, नाल्या, वीज, पाणी, या सर्व नागरी सुविधांची  नियोजनबद्ध  पध्दतीने व गतीने   निर्मिती करावी. या प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी व मूल्यांकन  नियमानुसार करण्याचे निर्देश श्री.कडू यांनी दिले. असदपूर ते खलार रस्ता बाधित झाला असून त्याची पाहणी करण्यात यावी. गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे  मजबुतीकरण तात्काळ  करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  

जिल्ह्यातील पेढी नदीवर निम्न पेढी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत भोगवटदार वर्ग दोनच्या शेतजमिनी खरेदी करतांना 69 भोगवटदारांची चाळीस टक्के जादा रकम भरणा करण्यात आली. ही जादा असलेली  चाळीस टक्के रकम परत करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहीती संबधित अधिकाऱ्यांनी दिली.

000000

 

 

 

कापडी पालात राहणाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना सुविधा मिळवून द्या दिव्यांगासाठी शेगाव येथे 7 जानेवारीला मेळावा दिव्यांगांना उपस्थित राहण्याचे आवाहन - राज्यमंत्री बच्चू कडू

 



कापडी पालात राहणाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना सुविधा मिळवून द्या

दिव्यांगासाठी शेगाव येथे 7 जानेवारीला मेळावा

दिव्यांगांना उपस्थित राहण्याचे आवाहन

-         राज्यमंत्री बच्चू कडू

 

            अमरावती, दि. 14 :       दिव्यांगांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शेगाव येथे शुक्रवार, दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण तसेच जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे दिली.

            प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालयात राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिव्यांगांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा तसेच कापडी तंबूमध्ये (पालात) राहणाऱ्या नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा याबाबत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

            दिव्यांग बांधवांना कोणत्याही अडी-अडचणी येऊ नयेत तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दिव्यांग दुर होऊ नये यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. परंतु बरेचदा याची माहिती गरजूंपर्यंत पोहचत नाही. हे लक्षात घेऊन दिव्यांग बांधवांसाठी शेगाव येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेली सर्व शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी येथे आरोग्य निदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. कृत्रिम अवयव पुरविणाऱ्या संस्थांनाही यावेळी बोलाविण्यात येणार आहे.

            दिव्यांग मेळाव्यामध्ये जिल्हानिहाय स्टॉल लावण्यात येणार आहे. या स्टॉलवरून दिव्यांगांना विविध योजनांचे अर्ज तर वाटप केले जातीलच शिवाय प्रत्येक स्टॉलवर तक्रार निवारण केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे दिव्यांगांना एका छत्राखाली शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती, त्यासाठी लागणारे आवश्यक कागपत्रे, अर्ज कुठे व कसा सादर करावा याची सविस्तर माहिती मिळणार आहे. जिल्हानिहाय तक्रारी स्विकारण्याचे तसेच विविध योजनांचे अर्ज वाटप एकाच ठिकाणी चालणार आहे. हा मेळावा दिव्यांगांसाठी आनंद मेळावा ठरेल, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            श्री. कडू यांनी विभागीय दिव्यांग मेळाव्यासाठी जातीनिहाय, प्रवर्गनिहाय दिव्यांगाची नोंदणी करण्याबाबतची सूचना  समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिली.

 

 

कापडी पालात राहणाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना सुविधा मिळवून द्या

 

            शासनामार्फत प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घर मिळावे यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. यासाठी गरजूपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचून गरजूंना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी कापडी पालांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्याची सूचना राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिली.

       गावाच्या बाहेर कापडी पालांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. या नागरिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतांना ते बोलत होते.

            कापडी पालांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करुन यामध्ये स्त्री-पुरुष संख्या तसेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेले आधार कार्ड, रेशन कार्ड , जातीचा दाखला याची माहिती घेण्यात यावी. ज्या नागरिकांकडे अजूनही आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच जातीचा दाखला नाही अशांना ते तात्काळ उपलब्ध व्हावे यासाठी सहाय्य करण्यात यावे. कापडी पालांमध्ये राहणारे नागरिकांची भटकंती सतत सुरु असल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही याचा परिणाम होतो. पालांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, उत्पादनाचे साधन याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. कापडी पालात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होतील यादृष्टीने सर्व गटविकास अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

            वसंतराव नाईक तांडा सुधारणा योजनेंतर्गत रस्त्याचे खडीकरण, तांडा वस्ती सुधार योजना, धनगर समाजाचे सर्वेक्षण आदींबाबत त्यांनी यावेळी संबंधितांशी चर्चा केली.

            समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, अमरावतीच्या सहायक आयुक्त माया केदार, बुलढाण्याच्या अनिता राठोड, यवतमाळचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण, अकोल्याचे ज्ञानोबा पुंड, अमरावतीचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, वाशिमचे सहायक आयुक्त एम.जी.वाटे, यवतमाळचे भाऊराव चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

00000

 

 

 

 

 

 

Saturday, December 11, 2021

ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करा -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 
















ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करा

-पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील 654 कोटी 25 लाख रुपयांच्या विकासकामांचे  भूमीपूजन

अमरावती, दि. ११: जिल्ह्याचा विकास करताना मुख्यतः ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करून ग्रामविकासाला चालना देण्याची सूचना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली .

     जिल्ह्यातील गावागावांना जोडणाऱ्या अनेक ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणा कामांचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या .654 कोटी 25 लाख रुपयांच्या विकासकामांचे  भूमीपूजन यावेळी करण्यात आले .

       शिरजगाव कसबा, थुंगाव, पिंप्री ,वायंगाव ,खारतळेगाव, भातकुली, गणोजादेवी येथील रस्त्यांच्या सुधारणा करण्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या विकास कामाची किंमत 130 लाख रुपये आहे. येथील विर्शी ,वायगाव रस्त्याच्या सुधारणा कामाचेही भूमीपूजन करण्यात आले. या विकास कामासाठी 200 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे .

  टाकरखेडा ,पुसदा ,रोहणखेडा ,माहुली जहांगीर रस्त्याची पुलासह सुधारणा करण्यात येणार आहे. हा रस्ता 69 किलोमीटरचा आहे. या दुरुस्ती कामासाठी 100 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचेही भूमीपूजन यावेळी करण्यात आले .

    तळवेल, साऊर, टाकरखेडा, आष्टी, वायगांव ,खारतळेगाव  या रस्त्याची लांबी 23 किलोमीटर असून यासाठी 150 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रस्त्याच्या सुधारणा कामाचेही भूमीपूजन यावेळी करण्यात आले .

    साऊर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या  बांधकामासाठी 28 .50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे .तसेच येथील मूलभूत सुविधा निधीअंतर्गत काँक्रिट रस्त्याच्या बांधकामाचेही भूमीपूजन करण्यात आले आहे. या कामासाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे .

  त्याचप्रमाणे मौजा गोपाळपूर येथील पेढी नदीवरील पूर संरक्षणाच्या कामाचे भूमीपूजन करून पालकमंत्र्यांनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. या विकास कामासाठी 30.75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विकास कामे त्वरित पूर्ण करण्याचे सूचना श्रीमती ठाकूर यांनी यावेळी संबंधितांना दिल्यात.

        जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख, तहसीलदार नीता लबडे , नायब तहसीलदार विजय मांजरे , उपअभियंता अनिल तसेच सरपंच , उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते .

                     **

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...