Tuesday, January 4, 2022

जिल्हाधिका-यांकडून आढावा पल्स पोलिओ लसीकरण 23 जानेवारीला

 





जिल्हाधिका-यांकडून आढावा

पल्स पोलिओ लसीकरण 23 जानेवारीला

 

अमरावती, दि. 4 :  जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण 23 जानेवारीला होणार असून जिल्ह्यात बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व विभागांचा समन्वय ठेवून मोहिम यशस्वी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

याबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, शिक्षणाधिकारी एजाज खान, डॉ. सतीश हुमणे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर, महापालिकेचे डॉ. विशाल काळे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, डॉ. प्रशांत घोडाम, जिल्हा होमगार्ड समादेशक आर. एम. बनसोड आदी उपस्थित होते.

पोलिओ लसीकरणात ग्रामीण भागात 1 लाख 33 हजार 493 व नगरपालिका, पंचायत क्षेत्रात 37 हजार 78 अशा एकूण 1 लाख 70 हजार 571 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. लसीकरणासाठी 2060 बुथ असतील. त्यातील 1 हजार 824 ग्रामीणमध्ये व 236 नगरपालिका क्षेत्रात असतील. त्याचप्रमाणे, वीटभट्टीवर काम करणारी कुटुंबे आदींपर्यंत पोहोचण्यासाठी 23 पासून पुढील तीन ते पाच दिवस मोहिम चालविण्यात येईल. सुमारे पाच लाख घरभेटींचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती डॉ. करंजीकर यांनी दिली.

                                     प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा

 प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत अद्यापपर्यंत 68 हजार 277 लाभार्थी आहेत. योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेल्या अधिकाधिक व्यक्तींना लाभ मिळवून द्यावा. प्रलंबित अर्जांचा वेळीच निपटारा करा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती मातेला आहार घेण्यास प्रोत्साहित करून आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणा-या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे यासाठी राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवली जाते.

                                                कोविड सुविधा वेबसाईट अधिक ‘युजर फ्रेंडली’ करा

कोविडकाळात नागरिकांना उपलब्ध उपचार सुविधा, खाटा आदींची माहिती मिळण्यासाठी कोविड सुविधा हे संकेतस्थळ कार्यान्वित झाले. त्याचा लाभही अनेक नागरिकांना झाला. तथापि, हे संकेतस्थळ अधिक युजर फ्रेंडली होणे आवश्यक आहे. यादीमध्ये ‘सर्च’चा पर्याय, आवश्यक तिथे ‘ड्रॉपडाऊन’ची सुविधा असणे आवश्यक आहे. त्यानुसार ते अद्ययावत करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले.

                        000

 

 

 

 

 

 

Monday, January 3, 2022

प्रशिक्षणाबरोबरच रोजगारनिर्मितीसाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 







प्रशिक्षणाबरोबरच रोजगारनिर्मितीसाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 3 : युवक- युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर रोजगार मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘प्लेसमेंट रेशो’ वाढवावा.  कौशल्य विकास व रोजगार केंद्रातर्फे कंपन्यांशी सामंजस्य करार आदी प्रक्रिया राबवून रोजगारनिर्मितीसाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.  

 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे निमित्त साधून प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व पेस हेल्थकेअर प्रशिक्षण केंद्रातर्फे 3 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. कौशल्य उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, जय माता दी नर्सिंग ब्युरोच्या संचालक शिवानी वाघमारे, जगन्नाथ वाघमारे, प्रदीप कोरडे, भोजराज धोटे आदी यावेळी उपस्थित होते.        

 

          संस्थेकडून आरोग्य सेवेचे प्रशिक्षण 104 मुलींनी पूर्ण केले. त्यातील 80 मुलींना रोजगार प्राप्त झाला. विविध आस्थापनांमध्ये नोकरी मिळालेल्या विद्यार्थिनींशी जिल्हाधिका-यांनी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेतर्फे टू व्हीलर ऑटोमोबाईल सेंटर सुरू करण्याचा मनोदय आहे. त्याद्वारे युवतींना रोजगार मिळू शकेल, अशी माहिती श्री. कोरडे यांनी दिली.

 

00000

 

Sunday, January 2, 2022

१५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सोमवारपासून

 


१५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सोमवारपासून

अमरावती, दि. २ : पंधरा ते अठरा वयोगटातील वयोगटातील विद्यार्थ्यांचे  कोविड प्रतिबंधक लसीकरण उद्यापासून (3 जानेवारी) जिल्ह्यात 40 केंद्रांवर सुरू होणार आहे.सुरवातीच्या टप्प्यात सुसज्ज उपचार सुविधा उपलब्ध असलेल्या आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण होणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार विस्तारीकरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

अशी आहेत केंद्रे

अमरावती  तालुक्यात अंजनगाव बारी व यावली शहीद, भातकुली तालुक्यात भातकुली ग्रामीण रुग्णालय व खोलापूर, चांदूरबाजार तालुक्यात तळवेल व करजगाव, चांदुर रेल्वे तालुक्यात निमगव्हाण, पळसखेड व आमला विश्वेश्वर, तसेच धामणगाव रेल्वे तालुक्यात धामणगाव ग्रामीण रुग्णालय, तळेगाव दशासर, अंजनसिंगी, दर्यापूर तालुक्यात दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय व आमला, चिखलदरा तालुक्यात सेमाडोह व चिखलदरा ग्रामीण रुग्णालय,  धारणी तालुक्यात धारणी उपजिल्हा रुग्णालय, कळमखार, वरुड तालुक्यात बेनोडा, आमनेर व वरूड ग्रामीण रुग्णालय, तसेच मोर्शी तालुक्यात नेरपिंगळाई व मोर्शी उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरण होणार आहे.

तिवसा तालुक्यात मार्डी, तळेगाव ठाकूर, कुऱ्हा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पापळ व नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयात लसीकरण होणार आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात सातेगाव, कापुसतळणी, अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय, तसेच अचलपूर तालुक्यात अचलपूर सुतिकागृह उपजिल्हा रुग्णालय धामणगाव गढी ही लसीकरण केंद्र असतील.

 

महापालिकेच्या क्षेत्रात पालिकेच्या सबनीस प्लॉट, विलास नगर, बिच्छू टेकडी येथील रुग्णालये, हरिभाऊ वाठ रुग्णालय व दसरा मैदान येथील आयसोलेशन केंद्र येथे लसीकरण केंद्र असतील.

 

 

शिक्षण विभागाशी समन्वय साधा

 

ग्रामीण भागात कुमारवयीन विद्यार्थ्यांचे अधिकाधिक लसीकरण होण्यासाठी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील तालुका शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), तसेच शहरात शिक्षण प्रशासन अधिकारी यांच्याशी सहकार्य साधून कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

#AmaravatiVaccinationबूस्टर डोस १० जानेवारीपासून

 

हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही मात्रा घेतल्या असतील तर त्यांना १० जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. अशा व्यक्तीने दुसरी मात्रा घेतल्यानंतर नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.60 वर्षे किंवा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना प्रिकॉशन डोस घेताना लसीकरण केंद्रावर प्रमाणपत्र दाखविण्याची गरज नाही. मात्र, त्यांनी तिस-या मात्रेचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेण्याचे आवाहन आहे.

खासगी लसीकरण पूर्वीच्याच दरात

शासकीय लसीकरण केंद्रांवर ही लस विनामूल्य असेल. ज्यांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची आहे, त्यांना केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या किमतीतच लसीकरण करता येईल. त्यात कुठलाही बदल नाही.

 

 

 

 

कोविन ॲपमध्ये नोंदणीच्या सुविधा आहेत

·  हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक

हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाऊंटवरून प्रिकॉशन डोससाठी नोंदणी करता येईल. दुस-या डोसनंतर 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण होणे आवश्यक आहे. यातील व्यक्तींनी कार्यालयाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यांचे लसीकरण केवळ शासकीय केंद्रांवर होईल.

१५ ते १८ वयोगटातील सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले लाभार्थी पात्र राहतील. लाभार्थ्यांना कोविन प्रणालीवर स्वत:च्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येईल. नोंदणी लसीकरण केंद्रांवरही करता येईल.

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आवास योजनांच्या कामांना गती द्यावी प्रत्येक गरजूला घर मिळवून द्या - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 


चांदूर बाजार शहरातील कामकाजाचा आढावा

आवास योजनांच्या कामांना गती द्यावी

प्रत्येक गरजूला घर मिळवून द्या

- जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

अमरावती, दि. २ : प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी आवास योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज चांदुर बाजार येथे दिले.

चांदुर बाजार शहरातील विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह नगरपरिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते.

शहरात सुनियोजनबद्ध विकास कामे राबवावीत. आवास योजनांच्या कामांना गती द्यावी. प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी आवास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले.

अमृत योजना पाणीपुरवठा, रमाई आवास योजना, शहरातील घनकचरा व्यवस्थापन झ नगरोत्थान योजना आदी विविध योजनांच्या कामांचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला.

 

00000

 

 

 

 

Friday, December 31, 2021

नागरिकांनी नियमांचे पालन करावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर




 ‘ओमायक्रॉन’ प्रतिबंधासाठी सुधारित निर्बंध जारी

नागरिकांनी नियमांचे पालन करावे

-        जिल्हाधिकारी पवनीत कौर

            अमरावती, दि. ३१ : मायक्रॉन प्रकाराच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्‍ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या सूचना संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासाठी आजपासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आल्या आहेत. तसे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी निर्गमित केले आहेत.

 

त्यानुसार     लग्‍नसोहळा व लग्‍नसमारंभाच्‍या बाबतीत , बंदिस्त जागा, हॉल, मेजवानी/मॅरेज हॉल इ. तसेच  खुल्‍या जागेकरिता  उपस्थितांची मर्यादा ५० पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही.  इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत, जेथे उपस्थितांची उपस्थिती बंद जागेसाठी आणि खुल्या जागेसाठी ५०  पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही. अंत्यविधीसाठी उपस्थितांची मर्यादा २० व्‍यक्‍ती एवढी मर्यादित आहे.

     

जिल्ह्याच्‍या कोणत्याही भागात जी पर्यटन स्थळे आहेत किंवा गर्दी होणा-या सार्वजनिक स्‍थळी अतिरिक्त निर्बंध लागू करण्यासाठी सक्षम अधिकारी आवश्यकतेनुसार कलम १४४ लागू करतील. मास्क, स्वच्छता व  सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती त्यांचेमध्ये कमीत कमी सहा फुटाचे  सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.     

नववर्षाचे स्वागत दक्षता पाळून करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 


नववर्षाचे स्वागत दक्षता पाळून करा

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 31: ओमायक्रॉन  व्हेरिएंट व कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर, नववर्षाचे स्वागत करताना दक्षतेचेही पालन व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

 

शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. नागरिकांनी नववर्षाचे स्वागत घरीच साजरे करावे. रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी लागू आहे. त्याचे काटेकोर पालन व्हावे.

 

नववर्ष स्वागत विशेष कार्यक्रमासाठी बंदिस्त सभागृहात क्षमतेच्या 50 टक्के व खुल्या जागेत 25 टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी आहे. ज्येष्ठ व बालकांनी घराबाहेर पडणे टाळावे. आतषबाजी टाळावी. मास्क, सोशल डिस्टन्स व स्वच्छता आदी नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले आहे.

 

00000

Thursday, December 30, 2021

जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील दीड लाख मुलांचे होणार लसीकरण नोंदणी शनिवारपासून, लसीकरण 3 जानेवारीपासून - जिल्हाधिकारी पवनीत कौर


 

जिल्हाधिका-यांनी घेतला लसीकरणाचा आढावा

जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील दीड लाख मुलांचे होणार लसीकरण

नोंदणी शनिवारपासून, लसीकरण 3 जानेवारीपासून

 

-          जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावती, दि. 30 : शासनाच्या निर्देशानुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण, तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, 60 वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. त्यानुसार कुमारवयीन वयोगटातील अमरावती जिल्ह्यात 1 लाख 49 हजार 956 आणि 60 वर्षांवरील व सहव्याधी असलेल्या 71 हजार 963 व्यक्तींचे लसीकरण दि. 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कुमार वयोगटासाठीची कोविन ॲपद्वारे नोंदणी 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. याबाबत जिल्ह्यातील ग्रामीण भागात व महापालिका क्षेत्रात परिपूर्ण नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

 

            जिल्हाधिका-यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणाचा आढावा घेतला, तसेच नव्याने करावयाच्या लसीकरणाचे परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश दिले. आरोग्य विभागासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड- 19 लसीकरण, तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार नोंदणी व लसीकरण सुरु करण्यात येत आहे. कुमार वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लसच देण्याचा आदेश असल्याने ती लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. 15 ते 18 वयोगटाच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने नियोजन होत असल्याचे डॉ. रणमले यांनी सांगितले.

                                फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण 10 जानेवारीपासून

हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही मात्रा घेतल्या असतील तर त्यांना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. अशा व्यक्तीने दुसरी मात्रा घेतल्यानंतर नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

ज्येष्ठ व्यक्तींना प्रमाणपत्राची गरज नाही

60 वर्षे किंवा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना प्रिकॉशन डोस घेताना लसीकरण केंद्रावर प्रमाणपत्र दाखविण्याची गरज नाही. मात्र, त्यांनी तिस-या मात्रेचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेण्याचे आवाहन आहे.

खासगी लसीकरण पूर्वीच्याच दरात

शासकीय लसीकरण केंद्रांवर ही लस विनामूल्य असेल. ज्यांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची आहे, त्यांना केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या किमतीतच लसीकरण करता येईल. त्यात कुठलाही बदल नाही.

कोविन ॲपमध्ये नोंदणीच्या सुविधा आहेत

·         हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक

हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाऊंटवरून प्रिकॉशन डोससाठी नोंदणी करता येईल. दुस-या डोसनंतर 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण होणे आवश्यक आहे. यातील व्यक्तींनी कार्यालयाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यांचे लसीकरण केवळ शासकीय केंद्रांवर होईल.

 

·         15 ते 18 वयोगटातील नवीन लाभार्थींची नोंदणी 1 जानेवारीपासून

सन 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेले लाभार्थी पात्र राहतील. लाभार्थ्यांना कोविन प्रणालीवर स्वत:च्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येईल. ही सुविधा 1 जानेवारीपासून सुरू होईल. नोंदणी लसीकरण केंद्रांवरही करता येईल. या वयोगटातील लाभार्थ्यांना स्वतंत्र लसीकरण केंद्रे असतील किंवा जिथे स्वतंत्र केंद्रे सुरु करणे शक्य नसेल तिथे स्वतंत्र रांगांची सोय असेल.  

०००


अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...