Tuesday, January 4, 2022

जिल्ह्यात अधिकाधिक शेतकरी बांधवांनी नोंदणी करावी - पालकमंत्री यशोमती ठाकूर

 


तूर हमीभाव खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

जिल्ह्यात अधिकाधिक शेतकरी बांधवांनी नोंदणी करावी

- पालकमंत्री यशोमती ठाकूर

 

            अमरावती, दि.4: केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत नाफेडच्या वतीने हंगाम 2021-22 साठी तूर खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

 

राज्य सहकारी पणन महासंघाच्या जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयातर्फे 20 डिसेंबरपासून ऑनलाईन पध्दतीने नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यात एकूण सात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्राच्या ठिकाणीही नोंदणी सुरू करण्यात आली असून शेतकरी बांधवांनी केंद्राच्या ठिकाणी संपर्क करून नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

 

अधिकाधिक शेतकरी बांधवांना हमीभावाचा लाभ मिळवून द्यावा

 

पणन कार्यालयाने अधिकाधिक शेतकरी बांधवांची नोंदणी करून घ्यावी. कुठेही शेतकरी बांधवांची अडवणूक होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 

जिल्ह्यात सात केंद्रे

 

जिल्हा विपणन कार्यालयामार्फत चांदूर रेल्वे, दर्यापूर, धारणी,  नांदगाव खंडेश्वर, तिवसा, अचलपूर येथे, तर खरेदी विक्री संघामार्फत तसेच अचलपूर येथे ‘जयसिंग विविध कार्यकारी सहकारी  सोसायटी पथ्रोट’ मार्फत नोंदणी सुरू आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

 

            नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देताना जिल्हा विपणन अधिकारी कल्पना धोपे म्हणाल्या की, नोंदणीसाठी खरीप हंगाम 2021-22 मधील पीक पेरा नोंद असलेला तलाठ्यांच्या सही-शिक्क्यानिशी ऑनलाईन सात बारा,आधारकार्डाची छायांकित प्रत, बॅक पासबुक प्रत सोबत आणावी व बँक पासबुकावर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट नमूद असावा. यामध्ये जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये, असे श्रीमती धोपे यांनी सांगितले. 

 

लसीकरणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मणिबाई गुजराती विद्यालयात 361 विद्यार्थ्यांनी घेतली कोरोनाविरोधी लस

 



लसीकरणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

मणिबाई गुजराती विद्यालयात 361 विद्यार्थ्यांनी घेतली कोरोनाविरोधी लस
देशभरात 3 जानेवारी म्हणजेच सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीनांच्या कोरोना विरोधी लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. या लसीकरण मोहिमेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अंबापेठ येथील मणिबाई गुजराती विद्यालयात आज 361 विद्यार्थ्यांनी लसीकरणाची पहिली मात्रा घेतली. लस घेण्याबाबत यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना लस मिळाल्याने कोरोनाविराधातील लढाई अधिक मजबुत होईल. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांची चिंता ही दूर होणार आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून मणिबाई गुजराती विद्यालयात आज 361 विद्यार्थ्यांचे लसीकरण पार पडले.
लसीकरणासाठी चोख नियोजन
मणिबाई गुजराती शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजली देव यांनी लसीकरणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत माहिती देतांना सांगितले की, प्रथम गुगल वरुन आभासी पद्धतीने लस घेण्यास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांशी त्यांनी स्वत: व संबधीत पर्यवेक्षकांनी संवाद साधला. मुलांसाठी लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर पालकांकडून पाल्याच्या लसीकरणासाठीचे संमतीपत्र मागवून घेण्यात आले. त्यानुसार पात्र 750 विद्यार्थ्यांपैकी 410 विद्यार्थ्यांचे संमती पत्र प्राप्त झाले व लसीकरणाबाबत पालकांनी सकारात्मकता दर्शविली. ज्या विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक अडचणी आहेत त्यांना कोरोना लसीची पहिली मात्रा थोड्या अंतराने देण्यात येणार असल्याचे श्रीमती देव यांनी सांगितले. शाळेला लसीचे 500 डोज उपलब्ध झाले असून आज 361 विद्यार्थ्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली अशी माहिती त्यांनी दिली. शाळेतील दोन सभागृहांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून लस घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना विश्रांती कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. यादरम्यान बिस्कीटे व पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
शाळांमध्ये लसीकरणाला सुरुवात
जिल्ह्यातील अंबापेठ येथील मणिबाई गुजराती हायस्कुलसह ब्रिजलाल बियाणी विद्यालय व रामकृष्ण क्रिडा विद्यालय येथे विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरु आहे. तसेच रविनगर येथील भवरीलाल सामरा व नारायणदास लढ्ढा येथे लसीकरणासाठीचे नियोजन करण्यात येत आहे.
लस घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रीया यावेळी व्यक्त केली.
1. श्रीनिवास कुळकणी – कोरोनाची लस प्रत्येकाने घ्यायला हवी. कोरोनापासून बचाव करायचा तर लस हेच कवच आहे. लसीची कोणतीही भिती न बाळगता लस सर्वांनी घ्यावी. लसीकरणामुळे प्रतिकारशक्तिचा विकास होऊन आपण कोरोनाला बळी पडण्यापासुन स्वत: ला वाचवू शकतो
2. मुक्ताई व्यवहारे- विद्यार्थ्यांची सुरक्षितता खुप महत्वाची आहे. लस घेतल्यामुळे आमच्यातील आत्मविश्वास वाढला आहे. रोजचे व्यवहार, शाळा, अभ्यास, वर्ग, परीक्षा ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण या सर्वांपेक्षा महत्त्वाचे आपले आरोग्य आहे. कोरोनापासून बचाव करायचा तर आपण सर्वांनी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. लसीकरण झाल्यानंतरही कोरोना त्रिसुत्री म्हणजेच मास्क, सॅनीटायझर व भौतिक अंतरांचे पालन आम्ही करणारच आहोत.
3. साहील खोडे- कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यामुळे शालेय शिक्षण व परीक्षा देखील सुरक्षित पार पडतील असा विश्वास वाटतो. लस घेतल्यामुळे शालेय वर्ष सुरळीत पार पडेल असा दिलासा मिळाला आहे. आरोग्य व शिक्षण ह्या दोन्ही बाबी लसीकरणामुळे शक्य होणार आहे.
4. तन्वी नानोटे- कोरोनापासून बचाव करण्यात लसीकरणाची महत्त्वाची भूमिका आहे. लसीकरण करुन घेण्याला आपण आपले कर्तव्य समजून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हायला हवे. लसीकरणासाठी मी माझ्या समवयीन मित्र मैत्रिणींना प्रोत्साहीत करणार आहे. सर्वांचे लसीकरण झालयास कोरोनाला नक्कीच आळा बसेल.
5. विनोद मुंदे पालक – लसीकरण हे कोरोना विरोधी कवच आहे. लसीकरणामुळे आमचे पाल्य कोरोनापासुन सुरक्षित होत आहे. शाळामध्ये लसीकरणासाठी आवश्यक ते नियोजन व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दहावीत शिकणाऱ्या माझ्या मुलींला लसीकरणामुळे मदत होणार आहे असा विश्वास व्यक्त केले.
जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाच्या समन्वयातून मणिबाई गुजराती शाळेत विद्यार्थ्यांच्या लसीच्या पहिल्या मात्रेचा महत्त्वाचा टप्पा पार पडल्याचे मुख्याध्यापीका श्रीमती अंजली देव यांनी सांगितले. गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप पोपट व सचिव परेशभाई राजा तसेच उपमुख्याध्यापक अनिता पंजाबी, पर्यवक्षक उमा झा, प्रवणि सावजी, सरिता गायकवाड, दिनेश मेहता, दया चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचा लसीकरणात सहकार्य केले.

प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांना जलसंपदा राज्यमंत्र्यांनी मिळवून दिला न्याय

 


प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांना जलसंपदा राज्यमंत्र्यांनी मिळवून दिला न्याय

प्रलंबित दाखले मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांचा सेवाप्रवेशाचा मार्ग मोकळा

-   जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

·         संपूर्ण महाराष्ट्रात सरळ खरेदीने संपादित जमीनधारकांनाही होणार  लाभ

 

 

अमरावती, दि. 4 : सिंचन प्रकल्पासाठी शासनाने सरळ खरेदीने जमीनी घेतल्या; पण प्रकल्पग्रस्ताचे दाखले मिळण्यापासून चांदुर बाजार तालुक्यातील बेलज येथील शेतकरी बांधव वंचित होते. त्याचा पाठपुरावा करून जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी हा प्रश्न निकाली काढला व बेलज येथील संबंधित शेतकरी बांधवांना प्रकल्पग्रस्ताचे दाखले मिळवून दिले. दाखले मिळाल्यामुळे संबंधितांना नोकरीत प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे, सरळ खरेदीने संपादित केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील जमीनधारकांना त्याचा लाभ होणार आहे.

 

सिंचन प्रकल्पासाठी शासनाने  चांदुर बाजार तालुक्यातील बेलज येथील शेतकरी बांधवांकडून खासगी वाटाघाटीने सरळ खरेदीने जमीनी खरेदी केल्या. मात्र.जमीनधारकांना प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते. प्रकल्पग्रस्तांना शासकीय, निमशासकीय सेवेत गट क व ड मध्ये सरळ सेवेतील पाच टक्के जागांतून भरतीसाठी प्राधान्य असताना प्रमाणपत्र मिळत नसल्याने ते नोकरीपासून वंचित होते. 

 

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राअभावी शेतक-यांची मुले शासकीय व निमशासकीय नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी राज्यमंत्री श्री. कडू यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला. त्यामुळे संबंधित शेतकरी बांधवांना प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे संबंधितांना नोकरीचा मार्ग सुकर झाला. 

 

शेतकरी बांधवांकडून आनंद व्यक्त

 

सन २०१९ पासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे बेलज येथील शेतकरी बांधवांनी आभार मानत आनंद व्यक्त केला. तीन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. राज्यमंत्री महोदयांनी स्वत: लक्ष घालून आम्हा प्रकल्पग्रस्त शेतक-यांचा महत्वाचा प्रश्न सोडविला, अशी प्रतिक्रिया अखिलेश अनिल मामनकर यांनी व्यक्त केली.  जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांच्या पाठपुर्ळे सरळ खरेदीने संपादित जमीनीच्या मालक असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनाही प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळण्याचा लाभ मिळणार आहे.

00000

 

 

 

 

 

जिल्हाधिका-यांकडून आढावा पल्स पोलिओ लसीकरण 23 जानेवारीला

 





जिल्हाधिका-यांकडून आढावा

पल्स पोलिओ लसीकरण 23 जानेवारीला

 

अमरावती, दि. 4 :  जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण 23 जानेवारीला होणार असून जिल्ह्यात बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व विभागांचा समन्वय ठेवून मोहिम यशस्वी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

याबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, शिक्षणाधिकारी एजाज खान, डॉ. सतीश हुमणे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर, महापालिकेचे डॉ. विशाल काळे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, डॉ. प्रशांत घोडाम, जिल्हा होमगार्ड समादेशक आर. एम. बनसोड आदी उपस्थित होते.

पोलिओ लसीकरणात ग्रामीण भागात 1 लाख 33 हजार 493 व नगरपालिका, पंचायत क्षेत्रात 37 हजार 78 अशा एकूण 1 लाख 70 हजार 571 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. लसीकरणासाठी 2060 बुथ असतील. त्यातील 1 हजार 824 ग्रामीणमध्ये व 236 नगरपालिका क्षेत्रात असतील. त्याचप्रमाणे, वीटभट्टीवर काम करणारी कुटुंबे आदींपर्यंत पोहोचण्यासाठी 23 पासून पुढील तीन ते पाच दिवस मोहिम चालविण्यात येईल. सुमारे पाच लाख घरभेटींचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती डॉ. करंजीकर यांनी दिली.

                                     प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा

 प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत अद्यापपर्यंत 68 हजार 277 लाभार्थी आहेत. योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेल्या अधिकाधिक व्यक्तींना लाभ मिळवून द्यावा. प्रलंबित अर्जांचा वेळीच निपटारा करा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती मातेला आहार घेण्यास प्रोत्साहित करून आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणा-या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे यासाठी राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवली जाते.

                                                कोविड सुविधा वेबसाईट अधिक ‘युजर फ्रेंडली’ करा

कोविडकाळात नागरिकांना उपलब्ध उपचार सुविधा, खाटा आदींची माहिती मिळण्यासाठी कोविड सुविधा हे संकेतस्थळ कार्यान्वित झाले. त्याचा लाभही अनेक नागरिकांना झाला. तथापि, हे संकेतस्थळ अधिक युजर फ्रेंडली होणे आवश्यक आहे. यादीमध्ये ‘सर्च’चा पर्याय, आवश्यक तिथे ‘ड्रॉपडाऊन’ची सुविधा असणे आवश्यक आहे. त्यानुसार ते अद्ययावत करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले.

                        000

 

 

 

 

 

 

Monday, January 3, 2022

प्रशिक्षणाबरोबरच रोजगारनिर्मितीसाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 







प्रशिक्षणाबरोबरच रोजगारनिर्मितीसाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 3 : युवक- युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर रोजगार मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘प्लेसमेंट रेशो’ वाढवावा.  कौशल्य विकास व रोजगार केंद्रातर्फे कंपन्यांशी सामंजस्य करार आदी प्रक्रिया राबवून रोजगारनिर्मितीसाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.  

 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे निमित्त साधून प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व पेस हेल्थकेअर प्रशिक्षण केंद्रातर्फे 3 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. कौशल्य उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, जय माता दी नर्सिंग ब्युरोच्या संचालक शिवानी वाघमारे, जगन्नाथ वाघमारे, प्रदीप कोरडे, भोजराज धोटे आदी यावेळी उपस्थित होते.        

 

          संस्थेकडून आरोग्य सेवेचे प्रशिक्षण 104 मुलींनी पूर्ण केले. त्यातील 80 मुलींना रोजगार प्राप्त झाला. विविध आस्थापनांमध्ये नोकरी मिळालेल्या विद्यार्थिनींशी जिल्हाधिका-यांनी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेतर्फे टू व्हीलर ऑटोमोबाईल सेंटर सुरू करण्याचा मनोदय आहे. त्याद्वारे युवतींना रोजगार मिळू शकेल, अशी माहिती श्री. कोरडे यांनी दिली.

 

00000

 

Sunday, January 2, 2022

१५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सोमवारपासून

 


१५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सोमवारपासून

अमरावती, दि. २ : पंधरा ते अठरा वयोगटातील वयोगटातील विद्यार्थ्यांचे  कोविड प्रतिबंधक लसीकरण उद्यापासून (3 जानेवारी) जिल्ह्यात 40 केंद्रांवर सुरू होणार आहे.सुरवातीच्या टप्प्यात सुसज्ज उपचार सुविधा उपलब्ध असलेल्या आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण होणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार विस्तारीकरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

अशी आहेत केंद्रे

अमरावती  तालुक्यात अंजनगाव बारी व यावली शहीद, भातकुली तालुक्यात भातकुली ग्रामीण रुग्णालय व खोलापूर, चांदूरबाजार तालुक्यात तळवेल व करजगाव, चांदुर रेल्वे तालुक्यात निमगव्हाण, पळसखेड व आमला विश्वेश्वर, तसेच धामणगाव रेल्वे तालुक्यात धामणगाव ग्रामीण रुग्णालय, तळेगाव दशासर, अंजनसिंगी, दर्यापूर तालुक्यात दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय व आमला, चिखलदरा तालुक्यात सेमाडोह व चिखलदरा ग्रामीण रुग्णालय,  धारणी तालुक्यात धारणी उपजिल्हा रुग्णालय, कळमखार, वरुड तालुक्यात बेनोडा, आमनेर व वरूड ग्रामीण रुग्णालय, तसेच मोर्शी तालुक्यात नेरपिंगळाई व मोर्शी उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरण होणार आहे.

तिवसा तालुक्यात मार्डी, तळेगाव ठाकूर, कुऱ्हा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पापळ व नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयात लसीकरण होणार आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात सातेगाव, कापुसतळणी, अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय, तसेच अचलपूर तालुक्यात अचलपूर सुतिकागृह उपजिल्हा रुग्णालय धामणगाव गढी ही लसीकरण केंद्र असतील.

 

महापालिकेच्या क्षेत्रात पालिकेच्या सबनीस प्लॉट, विलास नगर, बिच्छू टेकडी येथील रुग्णालये, हरिभाऊ वाठ रुग्णालय व दसरा मैदान येथील आयसोलेशन केंद्र येथे लसीकरण केंद्र असतील.

 

 

शिक्षण विभागाशी समन्वय साधा

 

ग्रामीण भागात कुमारवयीन विद्यार्थ्यांचे अधिकाधिक लसीकरण होण्यासाठी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील तालुका शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), तसेच शहरात शिक्षण प्रशासन अधिकारी यांच्याशी सहकार्य साधून कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

#AmaravatiVaccinationबूस्टर डोस १० जानेवारीपासून

 

हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही मात्रा घेतल्या असतील तर त्यांना १० जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. अशा व्यक्तीने दुसरी मात्रा घेतल्यानंतर नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.60 वर्षे किंवा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना प्रिकॉशन डोस घेताना लसीकरण केंद्रावर प्रमाणपत्र दाखविण्याची गरज नाही. मात्र, त्यांनी तिस-या मात्रेचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेण्याचे आवाहन आहे.

खासगी लसीकरण पूर्वीच्याच दरात

शासकीय लसीकरण केंद्रांवर ही लस विनामूल्य असेल. ज्यांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची आहे, त्यांना केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या किमतीतच लसीकरण करता येईल. त्यात कुठलाही बदल नाही.

 

 

 

 

कोविन ॲपमध्ये नोंदणीच्या सुविधा आहेत

·  हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक

हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाऊंटवरून प्रिकॉशन डोससाठी नोंदणी करता येईल. दुस-या डोसनंतर 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण होणे आवश्यक आहे. यातील व्यक्तींनी कार्यालयाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यांचे लसीकरण केवळ शासकीय केंद्रांवर होईल.

१५ ते १८ वयोगटातील सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले लाभार्थी पात्र राहतील. लाभार्थ्यांना कोविन प्रणालीवर स्वत:च्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येईल. नोंदणी लसीकरण केंद्रांवरही करता येईल.

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आवास योजनांच्या कामांना गती द्यावी प्रत्येक गरजूला घर मिळवून द्या - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 


चांदूर बाजार शहरातील कामकाजाचा आढावा

आवास योजनांच्या कामांना गती द्यावी

प्रत्येक गरजूला घर मिळवून द्या

- जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

अमरावती, दि. २ : प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी आवास योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज चांदुर बाजार येथे दिले.

चांदुर बाजार शहरातील विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह नगरपरिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते.

शहरात सुनियोजनबद्ध विकास कामे राबवावीत. आवास योजनांच्या कामांना गती द्यावी. प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी आवास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले.

अमृत योजना पाणीपुरवठा, रमाई आवास योजना, शहरातील घनकचरा व्यवस्थापन झ नगरोत्थान योजना आदी विविध योजनांच्या कामांचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला.

 

00000

 

 

 

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...