Monday, January 10, 2022

अमरावतीत कोरोनाच्या बुस्टर मात्रेला सुरुवात फ्रंटलाईन वर्कर, हेल्थ केअर वर्कर व जेष्ठांना आजपासुन बुस्टर

 






अमरावतीत कोरोनाच्या बुस्टर मात्रेला सुरुवात

फ्रंटलाईन वर्कर, हेल्थ केअर वर्कर व जेष्ठांना आजपासुन बुस्टर

अमरावती दि. 10 :  सर्व शासकीय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये व खासगी लसीकरण केंद्रावर आजपासून (10 जानेवारी) आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर मात्रा देणे सुरू झाले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसह, फ्रंटलाईन वर्कर, जेष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या नागरिकांनी बुस्टर मात्रा घ्यावी. ज्या नागरिकांनी कोरोना लसीची दुसरी मात्रा अद्याप घेतलेली नाही, त्यांनी लसीकरणाच्या दोनीही मात्रा प्राधान्याने पुर्ण कराव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी नागरिकांना केले.

रुग्णालय प्रशिक्षण केंद्रावर कोरोनाची बुस्टर मात्रा आजपासुन सुरु

             येथील रुग्णालय प्रशिक्षण केंद्रावर आजपासुन कोरोना प्रतिबंधक लसीची बुस्टर मात्रा घेण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करत नागरिकांनी  शिस्तबद्धरित्या रांग लावली. यावेळी लसीकरण केंद्रावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अजय साखरे, वैद्यकिय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. प्रशांत घोडाम, संगणकावर लस घ्यावयास आलेल्या नागरिकांची नोंद घेणारे धीरज बोबडे आणि लस देणारी परिचारीका किरण वाघमारे उपस्थित होते.

नागरिकांनी बुस्टर मात्रा घेऊन कोरानापासून बचाव करावा

            आजपासुन जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर बुस्टर मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली असून रुग्णालयाचे सर्व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागात कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे आज कोरोनाची बुस्टर मात्रा घेऊन लसीकरण पूर्ण केले. लसीच्या दोनीही मात्रा घेऊन झालेल्या नागरिकांनी, जेष्ठांनी, सहव्याधी असलेल्यांनी ही मात्रा अवश्य घ्यावी. बुस्टर डोजला प्रिकॉशन डोज म्हटल्या गेले आहे. लसीकरण प्रकीयेत बुस्टर डोज प्रत्येकाने घेणे अत्यावश्यक आहे. तसेच लसीकरणानंतर कोरोना त्रिसुत्रीचे पालन करावे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शामसुंदर निकम यांनी नागरिकांना केले.

बुस्टर मात्रा घेणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या  प्रतिक्रीया

            नावनोंदणी करुन लसीकरण केंद्रावर बुस्टर मात्रा आजपासून देण्यात येत आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर योग्य प्रमाणात लस साठा उपलब्ध असून लसींच्या दोन मात्रा झालेल्या नागरिकांनी बुस्टर मात्रा घ्यावी. लस घेतल्यानंतर विश्राम कक्षाची सुविधा उपलब्ध आहे. या लसीचे कुठलेही दुष्परिणाम आढळून येत नसून ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने लस, बुस्टर मात्रा घेणे गरजेचे आहे.

                      अजय साखरे

          जिल्हा कार्यक्रम अधिकारी   

                             

 कोरोनाविरोधी दोनीही लसी घेतल्यानंतर 270 दिवसांच्या नंतर आज बुस्टर मात्रा घेतली असून लसीकरणामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. कोरोनापासून बचाव करायचा तर लसीकरणाच्या दोन मात्रेसह बुस्टर मात्रा घेणे गरजेचे आहे.                   

                                                                        प्रफुल निमकर

                                       सहायक अधिक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय,अमरावती

 

आरोग्य विभागात कर्तव्य बजावणारे, सहव्याधी असलेल्यांनी व जेष्ठांनी बुस्टर मात्रा पूर्ण करुन कोरोनापासून आपले रक्षण करावे. नागरिकांनी लसीकरणाचे महत्त्व ओळखून लसीच्या सर्व मात्रा पूर्ण कराव्या.

                                                                                                                  

                                                                         ज्ञानेश्वर काळे

                                 कार्यालयीन अधिक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय,अमरावती

 यांच्यासह भारत नागोसे, डॉ. मनिष तोटे, डॉ. सुजित डांगोरे, शितल गुप्ता यांनीही लसीची बुस्टर मात्रा घेतली.

 

000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Sunday, January 9, 2022

कोविड १९ प्रतिबंधात्मक सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी

 


कोविड १९ प्रतिबंधात्मक सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी

अमरावती, दि. ९ : कोविड१९ प्रतिबंधात्मक सुधारित आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज जारी केला. तो १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील.

सुधारित निर्बंध

नागरीकांचे बाहेर फिरणे   : पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंदी.

पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 पर्यंत ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी.

शासकीय कार्यालये

 महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना आगंतुकांवर बंदी.

कार्यालय प्रमुखांनी नागरीकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी.

बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीची व्यवस्था

 कार्यालय प्रमुखांच्या गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करणे. याकरिता कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळांमध्ये बदलाचाही विचार करू शकतील.

 

कार्यालयप्रमुखांनी कोविडविरोधी वागणुकीचे काटेकोर पालन केले जाईल, याची काळजी घ्यावी.

कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.

खासगी कार्यालये

कार्यालय व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी तसेच कर्मचाऱ्यांसाठी वेळांमध्ये बदल करण्याचाही विचार करतील. तसेच कार्यालये 24 तास सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबतही विचार करावा.

कार्यालयीन कामकाजाच्या वेळा असामान्य असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर अत्यावश्यक कामासाठी ओळखपत्र दाखवून परवानगी मिळवता येऊ शकेल. अशाप्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोयीचा विचार करणे बंधनकारक राहील.

लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायलाच हवे.

कार्यालय व्यवस्थापनाने सर्व कर्मचारी सर्वकाळ कोविडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घ्यावी.

कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.

 

 

लग्न व इतर कार्यक्रम

लग्नसमारंभ कमाल 50 व्यक्ती,अंत्यविधी    कमाल 20 व्यक्ती

सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम कमाल 50 व्यक्ती उपस्थिती मर्यादा.

शाळा आणि कॉलेज,कोचिंग क्लासेस

खालील बाबी वगळता शाळा, महाविद्यालये, क्लासेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.

 विविध शैक्षणिक बोर्डांकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम

प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करायचे कामकाज

शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणांकडून  राबविण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम. या निर्बंधांना अपवादाच्या स्थितीत हे विभाग आणि प्राधिकरणांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल.

 

 

स्वीमिंग पूल,  स्पा, वेलनेस सेंटर्स बंद राहतील.

हेअर कटींग सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहील व रोज रात्री 11 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. मास्क काढण्याची गरज नसेल त्या सेवा सुरू राहतील.

एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील.

हेअर कटींग सलून्सनी कोव्हिडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे तसेच केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे.

खेळांच्या स्पर्धा

 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा वगळून इतर स्पर्धा वगळून खालीलप्रमाणे नियोजन व्हावे.

1. प्रेक्षकांना बंदी

2. सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी बायो-बबल

3. सहभागी होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंसाठी भारत सरकारचे नियम लागू राहतील.

4. सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी दर तीन दिवसांनी आरटीपीसीआर/आरएटी

2. शहर किंवा जिल्हा पातळीवर खेळांच्या शिबिरांना, स्पर्धांना, कार्यक्रमांच्या आयोजनाला बंदी.

करमणूक पार्क, प्राणिसंग्रहालये, वस्तूसंग्रहालये, किल्ले

गाविलगड किल्ला, वडाळी गार्डन, बांबू गार्डन व इतर सार्वजनिक व पर्यटन स्थळे बंद राहतील.

शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्सेसमध्ये बंधनांसह प्रवेश

        1.    50 टक्के क्षमता. सर्व आगंतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक.

2.     सर्व आगंतुक आणि कर्मचारी कोव्हिडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील, याची दक्षता घेण्यासाठी आस्थापनांनी मार्शल्स नेमावेत.

3.     आरएटी चाचणीसाठी बूथ/किऑस्क

4.     फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल

5.     दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.

रेस्टॉरंट्स, उपाहारगृहे

1.  50 टक्के क्षमता.

2. सर्व आगंतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक.

3.     फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल

4.     दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.

5.     दररोज होम डिलीव्हरीला परवानगी राहील.

 

 

नाट्यगृह, सिनेमा थिएटर्स

1.  50 टक्के क्षमता. सर्व आगंतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक.

2.     फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल

3.     दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.

आंतरराष्ट्रीय प्रवास

भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार

देशांतर्गत प्रवास

कोविडरोधी दोन लशी किंवा राज्यात प्रवेश करण्याआधी 72 तासांपूर्वीपर्यंत आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक. हे हवाई, रेल्वे आणि रस्ते या तिन्ही मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू राहील. प्रवास करणारे वाहनचालक, वाहक आणि अन्य सहयोगी कर्मचाऱ्यांनाही हे लागू राहील.

कार्गो ट्रान्स्पोर्ट, औद्योगिक कामकाज, इमारतींचे बांधकाम लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींकडून सुरू राहील.

सार्वजनिक वाहतूक पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित वेळांनुसार.

 

 

युपीएससी, एमपीएससी, वैधानिक प्राधिकरणे, सार्वजनिक संस्था इ. द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा

 

1.राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडल्या जातील. अशा परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र यासाठीच्या प्रवासाची अत्यावश्यकता सिद्ध करण्यास पुरेसे असेल.

2. राज्याच्या पातळीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षा, ज्यांच्यासाठीची प्रवेशपत्रे आधीच निर्गमित झालेली आहेत किंवा ज्यांच्या तारखा आधीच निश्चित करण्यात आल्या आहेत त्या अधिसूचनेनुसार पार पडतील. अन्य सर्व परीक्षा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच पार पाडल्या जातील.

3. परीक्षांचे संचालन करताना कोव्हिडरोधी नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्यासाठी निरीक्षक नेमतील.

 

प्रवासासाठी अत्यावश्यक कारणे

वैद्यकीय तातडी

अत्यावश्यक सेवा (अत्यावश्यक सेवांची यादी परिशिष्ट 1 मध्ये दिल्यानुसार राहील.)

विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे जाणे किंवा येण्यासाठी वैध तिकीटासह.

 

24 तास सुरू राहणाऱ्या कार्यालयांसाठी, विविध शिफ्टमध्ये काम करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांचा प्रवास अत्यावश्यक मानला जाईल.

 

कोव्हिडरोधी वागणुकीसाठीचे नियम परिशिष्ट 2 मध्ये नमूद केल्यानुसार राहतील.

 

दुकाने, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स तसेच ई-कॉमर्स किंवा होम डिलीव्हरी करणाऱ्या आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. यासाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल आणि यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याचे आढळल्यास सदर आस्थापना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून बंद करण्यात येईल.

 

00000

Friday, January 7, 2022

नियम न पाळणा-यांवर कारवाई; लसीकरणात आघाडी एसडीओ, तहसीलदारांकडून नियमित आढावा

 




कोरोना प्रतिबंधक उपाययोजना

नियम न पाळणा-यांवर कारवाई;  लसीकरणात आघाडी

एसडीओ, तहसीलदारांकडून नियमित आढावा

 

            अमरावती, दि. 7 : कोरोना साथ, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधक लसीकरणात प्रशासनाने आघाडी घेतली आहे. तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडून नियमित आढावा घेतला जात असून, विद्यार्थ्यांच्या लसीकरणानेही वेग घेतला आहे. दरम्यान, कोरोना नियमांचे पालन न करणा-या व्यक्तींविरुद्ध विविध ठिकाणी पथकांकडून कारवाई केली जात आहे.

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून लसीकरण वाढविण्यासाठी अधिका-यांच्या बैठका व ठिकठिकाणच्या केंद्रांना भेटी देऊन सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. कुमारवयीन विद्यार्थ्यांचेही लसीकरण वाढविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानुसार एसडीओ, तहसीलदार कार्यालयांकडूनही पाठपुरावा होऊन कामांना वेग आला आहे.

  अमरावतीत तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण वाढविण्याचे निर्देश दिले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात तहसीलदार अभिजित जगताप यांनी कोरोना नियंत्रण समितीची ऑनलाईन बैठक घेऊन लसीकरण, मास्क वापर आदींबाबत जनजागृतीच्या सूचना दिल्या.

चिखलद-यात शासकीय आश्रमशाळांत लसीकरण

चिखलद-याच्या तहसीलदार माया माने यांनी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाची ऑनलाईन सभा घेऊन साथ नियंत्रणासाठी लसीकरण व चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. चिखलदरा तालुक्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये शनिवार व रविवारी लसीकरण करण्याचे नियोजन असल्याचे श्रीमती माने यांनी सांगितले.

 

 

 

नियमभंग करणा-यांवर बडगा

दरम्यान, कोविड प्रतिबंधक नियम न पाळणा-यांवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विनामास्क फिरणा-या 36 व्यक्तींना आज दंड करण्यात आला. अधीक्षक उमेश खोडके यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.  महापालिकेची पथकेही नियमभंग करणा-यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सरसावली आहेत. नियमभंग करणा-या आस्थापना व व्यक्तींवर पालिकेकडून कारवाई होत आहे.

 

000

 

 

 

जिल्हा नियोजनातून विकासकामांसाठी तत्काळ प्रस्ताव द्या - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 





जिल्हा नियोजनातून विकासकामांसाठी तत्काळ प्रस्ताव द्या

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 7 : विकासकामांसाठी नियोजनानुसार निधी प्राप्त नसलेल्या संबंधित सर्व विभागांनी 15 जानेवारीपूर्वी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. या प्रक्रियेत विलंब होता कामा नये, असे स्पष्ट  निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी  आज येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी विविध विभागांची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे व सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

            जिल्हा नियोजन समितीकडून यंदा 300 कोटी निधीतून विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. ही कामे विहित मुदतीत पूर्ण होणे व निधी खर्ची पडणे आवश्यक आहे. त्यामुळे अद्यापही नियोजनानुसार निधीची मागणी न केलेल्या विभागांनी तत्काळ तसे पत्र द्यावे व पुढील कार्यवाही वेळेत होईल, यासाठी प्रयत्न करावेत.  जो निधी खर्च होणार नाही,  त्याबाबत तातडीने माहिती सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

            त्याचप्रमाणे, 2022-23 च्या आराखड्यासाठी नव्याने काही योजना- उपक्रम राबवावयाचे असतील, तर त्याचीही माहिती तत्काळ सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

            नाविन्यपूर्ण योजनेत अपेक्षित कामांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश श्रीमती भाकरे यांनी दिले.

00000

 

Thursday, January 6, 2022

कोविड प्रतिबंधक उपाययोजना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपचार, लसीकरणावर भर

 




कोविड प्रतिबंधक उपाययोजना

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपचार, लसीकरणावर भर

 

अमरावती, दि. ६ : कोविड प्रतिबंधक उपाययोजनांत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपचार यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच लसीकरण वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत. त्यानुसार तालुका यंत्रणांकडून कार्यवाही होत आहे. तालुका स्तरावरील ऑक्सिजन प्लांटच्या कामाची तपासणी करून दोन दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.

अंजनगाव सुर्जी तालुक्यात तहसीलदार अभिजित जगताप यांनी  कापूसतळणी व सातेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठक घेऊन वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. भातकुलीच्या तहसीलदार नीता लबडे यांनी गाव कोरोना नियंत्रण समितीची ऑनलाईन बैठक घेतली. सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून घेऊन मास्क वापरावर जागृती आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन न करणा-यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी धारणी नगरपंचायत क्षेत्रात स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहेत. तसा आदेश तेथील मुख्याधिका-यांनी काढला. धारणीचे अजिंक्य वानखडे व रोहन राठोड यांना पथक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

                                ऑनलाईन शिक्षणावर भर

कोविड साथ प्रतिबंधासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांतून प्रत्यक्ष अध्ययन बंद केल्याने ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी  संयुक्तपणे पत्र सर्व शाळा मुख्याध्यापकांना जारी केले आहे.

त्यानुसार व्हाटस ॲप, गुगल, झूम ॲप, व्हिडीओ आदी विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवावे. शाळा बंद असलेल्या कालावधीत शिक्षकांनी शाळेत शंभर टक्के उपस्थित राहणे अनिवार्य आहे. नववी ते बारावीचे वर्ग नियमित सुरू राहतील. शाळेत दक्षता नियम पाळावेत. वय 15 ते 18 गटातील विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, असे निर्देश शिक्षणाधिका-यांनी शाळा मुख्याध्यापकांना दिले आहेत.

 

इयत्ता पहिली ते आठवी 31 जानेवारीपर्यंत केवळ ऑनलाईन

 


कोविड प्रतिबंधासाठी खबरदारी

इयत्ता पहिली ते आठवी 31 जानेवारीपर्यंत केवळ ऑनलाईन

प्रत्यक्ष अध्ययन वर्ग बंद

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून आदेश जारी

 

 

अमरावती, दि. ६ : कोविड प्रतिबंधक उपाययोजनेत जिल्ह्यातील शाळांत इयत्ता पहिली ते आठवा वर्ग दि. 31 जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष अध्ययन बंद ठेवून, केवळ ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज जारी केला.

कोविड साथ व ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर साथ नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आला. अमरावती महापालिका क्षेत्रातील, तसेच ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय व खासगी शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत केवळ ऑनलाईन भरतील.

नववी ते बारावी सुरू; पण नियम बंधनकारक

इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष अध्ययन वर्ग चालू ठेवण्यास परवानगी आहे, तथापि, तिथे कोविड प्रतिबंधक उपायांची काटेकोर अंमलबजावणी होणे बंधनकारक आहे.संपूर्ण अमरावती शहर व जिल्ह्यात हे आदेश दि. 31 जानेवारीपर्यंत लागू आहेत.

Wednesday, January 5, 2022

जिल्हाधिका-यांकडून अंजनगाव सुर्जी, दर्यापूर येथे लसीकरणाचा आढावा







जिल्हाधिका-यांकडून अंजनगाव सुर्जी, दर्यापूर येथे लसीकरणाचा आढावा

लसीकरणाला वेग द्यावा, आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 5 : कोविड प्रतिबंधक उपाययोजनांत लसीकरण ही अत्याधिक महत्वाची बाब आहे. त्यामुळे ते पूर्ण होण्याकडे अधिकाधिक लक्ष द्यावे, तसेच आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज अंजनगाव सुर्जी-दर्यापूर दौ-यादरम्यान दिले.

          कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिका-यांनी अंजनगाव सुर्जी, दर्यापूर येथे भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार योगेश देशमुख, तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. अंजनगाव सुर्जी व दर्यापूर येथे आरोग्य यंत्रणेचा बैठकीद्वारे आढावा घेतानाच तेथील रूग्णालये, ऑक्सिजन प्लान्टची पाहणी त्यांनी केली, तसेच पांढरी येथील कोविड केअर सेंटरलाही भेट देऊन पाहणी केली.

वैद्यकीय अधिका-यांच्या नियमित बैठका घ्या

दुस-या मात्रेचे लसीकरण न केलेल्या पात्र व्यक्तींबाबत याद्या वैद्यकीय अधिका-यांकडे असणे अपेक्षित आहे. त्यानुसार पात्र व्यक्तींना प्रोत्साहित करून लसीकरण करून घ्यावे.  वैद्यकीय अधिका-यांच्या तहसील स्तरावर नियमित बैठका घ्याव्यात. लसीकरणाचा वेग कमी होता कामा नये. वैद्यकीय अधिका-यांकडून कामात कुचराई होत असेल तर कारवाईचे प्रस्ताव द्यावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.  

कोविड प्रतिबंधासाठी दर्यापूर येथील यंत्रणेचे नियोजन व कामकाज चांगले असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रहाटे व रामतीर्थ येथे १०० टक्के लसीकरण झाल्याबद्दल डॉ. अर्चना गोळे यांचा गौरव जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाला.

                             नाला खोलीकरणाच्या कामांची पाहणी

अंजनगाव सुर्जी तालुक्यात लोकजागर व आर्ट  ऑफ लिव्हिंग संस्थेच्या सहकार्याने नागरिकांचा सहभाग मिळवून नाला खोलीकरणाची कामे होत आहेत. त्याची पाहणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केली. जलसंवर्धनासाठी हे महत्वाचे काम असून, अशी कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येतील. याबाबत जिल्हा स्तरावर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले. अंजनगाव सुर्जी येथे नाविण्यपूर्ण योजनेद्वारे निर्मित अभ्यासिकेलाही त्यांनी भेट दिली.
                   ०००

 

 

 


अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...