Thursday, March 3, 2022

शिधापत्रिकाधारकांना भरडधान्याचे नियोजनानुसार वाटप करा - पुरवठा अधिकाऱ्यांचे निर्देश

 शिधापत्रिकाधारकांना भरडधान्याचे नियोजनानुसार वाटप करा

-   पुरवठा अधिकाऱ्यांचे निर्देश


अमरावती दि. 3 :-  खरीप पणन हंगाम सन 2021-22 मध्ये खरेदी केलेले भरडधान्य मका तसेच ज्वारी यांचे लक्ष निर्धारित करुन मार्च 2022 मध्ये शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अंत्योदय कार्डधारकांना 5 किलो प्रति कार्ड तर प्राधान्य कुटूंब योजनेंतर्गत प्रति माणसाला एक किलो धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हृयातील अंत्योदय तसेच प्राधान्य कुटूंब योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना मार्च ते मे 2022 या कालावधीत शासनस्तरावरुन 3793.50 क्विंटल ज्वारी तर 29768 क्विंटल मका या भरडधान्याचे वितरण करण्यात येणार आहे.


            मार्च 2022 मध्ये गव्हाचे नियतन कमी करुन अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना गव्हासोबतच मका व ज्वारी हे भरडधान्य वितरित करण्यात येत आहे. यासाठी शासकीय धान गोदामात पुरविण्यात आलेला मका, ज्वारी हे भरडधान्य रास्तभाव दुकानदारामार्फत शिधापत्रिकाधारकांना मार्च महिन्यातच देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच वाटपाअभावी मका, ज्वारी हे भरडधान्य गोदामात पडून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. वितरणाअभावी धान्य खराब झाल्यास त्याबाबत जबाबदारी निश्चित करुन सदर रकमेची बाजार भावाने संबंधितांकडून वसूली करण्यात येईल. याची नोंद घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी पत्रकाव्दारे केले आहे.


महाडीबीटी संकेतस्थळावर नुतनीकरणाचे अर्ज सादर करण्यास 7 मार्चपर्यंत मुदतवाढ

 महाडीबीटी संकेतस्थळावर नुतनीकरणाचे अर्ज सादर करण्यास 7 मार्चपर्यंत मुदतवाढ


अमरावती दि. 24:-  माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत सन 2021-22 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी नुतनीकरणाचे अर्ज व नवीन अर्ज भरण्यासाठी दिनांक 7 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


सन 2020-21 साठी री-अप्लाय करण्याकरिता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दिनांक 7 मार्च तर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन नुतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in   महाडीबीटीच्या या संकेतस्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणीकृत करावे. याबाबत महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सूचना फलक लावून विहित मुदतीत नोंदणीकृत अर्ज सादर करण्याची कार्यवाही करावी. तसेच पात्र अर्जदारांनी आपले अर्ज नोंदणीकृत करून ऑनलाईन महाविद्यालयांकडे सादर करावेत. विहित वेळेत अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील.  


महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना नुतनीकाणाचे अर्ज भरुन रि-अप्लाय करण्यासाठी आणि सेंट बॅक केलेल्या अर्जाची त्रृटी पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी पत्रकाव्दारे केले आहे.


                                                               00000

जिल्हाधिका-यांना चांदूर बाजार तालुक्यात विविध ठिकाणी भेट

 






 

जिल्हाधिका-यांना चांदूर बाजार तालुक्यात विविध ठिकाणी भेट

‘पोकरा’च्या माध्यमातून विविध उपक्रमांना चालना द्यावी

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावती, दि. 3 : खराळा येथील बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेला कृषी यांत्रिकी अवजार बँकेचा उपक्रम उत्तम असून, अशा विविध उपक्रमांना पोकराच्या माध्यमातून चालना द्यावी , असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी बुधवारी चांदूर बाजार तालुक्याचा दौरा करून विविध ठिकाणांना भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार धीरज स्थूल यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी खराळा येथे कृषी विभागांतर्गत पोकरा योजनेत बचत गटाने उभारलेल्या कृषी यांत्रिकी अवजार बँकेला भेट देऊन तेथील सदस्यांशी चर्चा केली. ग्रामीण भागात महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी बचत गटांतर्फे विविध उपक्रम अधिकाधिक प्रमाणावर राबविण्याची गरज आहे. असे उपक्रम सर्वदूर राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

चांदूर बाजार येथील ग्रामीण रूग्णालयातील पीएसए ऑक्सिजन प्लान्ट, तसेच नगरपरिषदेतर्फे उर्दू प्राथमिक शाळा व मराठी शाळेत  राबविण्यात आलेल्या वाचनालय व जिमखाना या नाविन्यपूर्ण कामांची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. ग्रामीण रूग्णालयातील रुग्णांशीही त्यांनी संवाद साधून विचारपूस केली.  

दौ-यादरम्यान जिल्हाधिकारी यांनी चांदूर बाजार तहसील कार्यालयाला भेट देऊन तेथील कामांचा आढावा घेतला. तहसील कार्यालयातील महसूली ग्रंथालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.

माधान येथील वृक्ष लागवड स्थळाला जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी भेट देऊन विविध प्रजातींच्या वृक्षसंपदेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

 

00000

 

 

 

Wednesday, March 2, 2022

शहरात स्वच्छतेची कामे नियोजनपूर्वक व सातत्याने राबवा राज्‍यमंत्री बच्‍चूभाऊ कडू यांनी घेतला महापालीका कामांचा आढावा

 








शहरात स्वच्छतेची कामे नियोजनपूर्वक व सातत्याने राबवा

राज्‍यमंत्री बच्‍चूभाऊ कडू यांनी घेतला महापालीका कामांचा आढावा

अमरावती, दि. 2 (विमाका) :  शहरात सार्वजनिक स्‍थळे व परिसराची स्वच्छता प्राधान्याने करण्यात यावी. कचरामुक्त परिसराचे महत्त्व पटवुन देण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. शासकीय रुग्णालये व सार्वजनिक परिसर पुर्णपणे कचरामुक्‍त करावा. संपुर्ण शहरात खुल्या जागेत जंतुनाशक फवारणी करण्यात यावी. स्‍वच्‍छतेसंदर्भात जबाबदार सेवांचे आवश्‍यक सर्व संपर्क क्रमांक नागरिकांपर्यंत पोहचविण्‍याची व्‍यवस्‍था करावी. स्वच्छतेबाबतचा नियोजनबध्‍द आराखडा तयार करावा. सफाई कामगारांना आवश्यक ती साधने उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी असे निर्देश राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.

महानगरपालिकेतील सभागृहात आज विविध विषयाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पात्र लाभार्थ्यांना  तात्काळ घरकुल देण्यात यावे

        या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्‍यांच्या प्रस्तावावर तात्‍काळ कार्यवाही करुन त्यांना घरकुलाचा लाभ देण्‍याबाबत श्री. कडू यांनी संबंधितांना निर्देश दिले.

                दिव्यांगांचे बचत गट तयार करण्यात यावे

दिव्‍यांगांचे सर्वेक्षण करुन त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात यावी. दिव्‍यांगाच्या मानधनात आवश्यक ती वाढ करण्यात यावी. दिव्यांग व्यक्तींच्या माध्यमातुन तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांची सहजरित्या विक्री व्हावी व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दिव्‍यांगांचे बचत गट तयार करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले. सुरक्षा रक्षकाचे देयक नियमितपणे अदा करण्‍यात यावे. महिला बाल कल्‍याण विभागाच्‍यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवून त्याबाबत गरजू महिलांनी सहभागी होण्याबाबत  ‍जनजागृती करण्‍यात यावी असे श्री. कडू यांनी यावेळी सांगितले.

        महानगरपालिका क्षेत्रात आरोग्‍य व्‍यवस्‍था सुदृढ करावी. महानगरपालिकेचे  अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असलेले रुग्णालय निर्मिती करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. गणू लेआऊट मधील हॉकर्स झोन बाबत स्‍थानिकांशी चर्चा करुनच निर्णय घ्‍यावा, असे निर्देश श्री. कडू यांनी संबंधितांना यावेळी दिले.

00000

 


Tuesday, March 1, 2022

ग्रामीण भागात दर्जेदार सुविधांच्या उभारणीला वेग - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 




सारसी येथे विविध सुविधांचे भूमिपूजन

ग्रामीण भागात दर्जेदार सुविधांच्या उभारणीला वेग

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. १ : ग्रामीण भागात रस्ते, आवश्यक इमारती, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधांसाठी महाविकास आघाडी शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, दर्जेदार सुविधांची निर्मिती होत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

 

तिवसा तालुक्यातील सारसी येथे जलजीवन मिशनमध्ये ३६ लक्ष ५० हजार रुपये निधीतून नळ पाणी पुरवठा विहीर योजना, १० लक्ष निधीतून गायत्री मंदिर सोयी सुविधा व सौंदर्यीकरण, पार्वतीमाता मंदिर परिसरात १० लक्ष निधीतून सभामंडप आदी कामांचे भूमीपूजन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भैयासाहेब वऱ्हाडे, अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण भागात ठिकठिकाणी अनेक रस्ते, इमारती, पाणीपुरवठा योजना आदी कामे पूर्णत्वास जात आहेत. कामांची आवश्यकता ओळखून शासनाकडून वेळोवेळी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. प्रशासनानेही गुणवत्ता राखून विहित मुदतीत कामे पूर्ण 

करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

 

जिल्हयात विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

०००

 

 

नांदगावपेठेत भूमिहीन बेघरांना जागा मालकी हक्कपत्र वाटप आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 




नांदगावपेठेत भूमिहीन बेघरांना जागा मालकी हक्कपत्र वाटप

आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. १ : जिल्ह्यातील एकही व्यक्ती बेघर राहू नये यासाठी आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

नांदगावपेठ येथे भूमिहीन बेघर लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेत घरकुलासाठी जागा मालकी हक्क वाटप पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले. पं स सभापती संगीताताई तायडे, उपसभापती बाळासाहेब देशमुख, जि. प. सदस्य भारतीताई गेडाम, सरपंच कविताताई डांगे, उपसरपंच मझहर खान, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात ७२ व्यक्तींना पट्टेवाटप करण्यात आले. यापुढेही सर्व पात्र व्यक्तींना घरे मिळवून देण्यात येतील, , असे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, नांदगावपेठ येथे पाणीपुरवठ्यासाठी बोर धरणावरून पुरवठा योजना मंजूर असून, लवकरच कामाला गती मिळेल. नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात आले व होत आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली आहे.

नांदगावपेठेजवळील वनक्षेत्रात लवकरच ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात येणार आहे. संगमेश्वर, शादल बाबा दर्गा आदी ठिकाणी पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला. उर्वरित कामांनाही चालना देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

 

नांदगावपेठ येथील नागरी सुविधांची आवश्यकता लक्षात घेता येथे नगरपंचायत होणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव स्थानिक स्तरावरून द्यावा जेणेकरून नगरविकास विभागाकडून रस्ते, वीज, पाणी सुविधांसाठी मोठा निधी प्राप्त होऊ शकेल, अशीही सूचना पालकमंत्र्यांनी केली.

 

00000

 

 

 

 

 

 

स्मार्ट व बोलकी अंगणवाडी जिल्ह्यात २०० अंगणवाड्यांचे रूप पालटणार नांदगावपेठ व माऊली जहांगीर येथे बाला अंगणवाडीचा शुभारंभ - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 





स्मार्ट व बोलकी अंगणवाडी

जिल्ह्यात २०० अंगणवाड्यांचे रूप पालटणार

नांदगावपेठ व  माऊली जहांगीर येथे बाला अंगणवाडीचा शुभारंभ

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. १ : स्मार्ट व बोलकी अंगणवाडी उपक्रमात अंगणवाडीचे रूप पालटणार असून, मुलांना विविध विषयांची सहज ओळख व शिक्षणाप्रती गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

 

स्मार्ट व बोलकी अंगणवाडी व बाला (बिल्डिंग ॲज लर्निंग एड) उपक्रमात नांदगावपेठ व माऊली जहांगीर येथे बाला अंगणवाडीचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास घोडके व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

        उपक्रमात अंगणवाड्यांची आकर्षक रचना करण्यात आली आहे.  सृष्टीजीवन, अंकलिपी, अक्षरओळख करून देण्यासाठी भिंतीवर आकर्षक चित्रांसह उपयुक्त वनस्पती, आरोग्यदायी भाज्या पोषक आहाराचे महत्व पटवून देणारे 'अक्षयपात्र', छोटे उद्यान, मुलांना सुलभ हालचालींसाठी कक्ष, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली आहे.

 

अंगणवाडीत भिंतीचा मुलांना उपयुक्त माहितीसाठी अधिकाधिक कल्पक पद्धतीने वापर करावा. या अभिनव उपक्रमामुळे अंगणवाड्यांचे रूपडे पालटणार आहे. हा उपक्रम जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

 

 जिल्ह्यात २०० अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे नियोजन असल्याचे श्री. घोडके यांनी सांगितले.

 

00000

 

 

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...