Tuesday, March 8, 2022

देशातील नामवंत संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

 देशातील नामवंत संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज

शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

अमरावती,दि.7: 03 मार्च 2022 देशातील ऐ आय आय एम एस, आय आय एम, आय आय टी एस, एन आय टी, आय आय एस सी, आणि आय आय एस ई आर या शैक्षणिक संस्थासह भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या (नवबौध्दांसहीत) विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडुन राबविली जाते. सदर योजनेसाठी सन- 2021-2022 या वर्षाकरीता अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

            राज्यातील अनुसूचित जातीच्या नवबौध्द विद्यार्थ्यांसह 100 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देण्याचा उद्येशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निहाय 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ व संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवुन दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक तसेच वसतिगृह व भेजन शुल्क इत्यादी शुल्क रक्कम विद्यार्थ्यांचा आधार संलंग्न बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता 12 वी किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांने पदवीत किमान 55 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच कुंटूबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख आहे. सदर शिष्यवृती करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. सदर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला शिकत असला पाहिजे तथापि पुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. परंतू त्यांचा विचार प्रथम वर्षाचे विद्यार्थी न मिळाल्यास करण्यात येईल. सदर योजने विषयी अधिक माहिती, जाहीरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जलद दुवे रोजगार या मथळयाखाली  प्रसिध्द झालेली आहे. सदर वेबसाईट वरून अर्ज डाऊनलोड करून परिपुर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 11 मार्च 2022 रोजी सांयकाळी 6.15 वाजेपर्यंत swcedn.nationalscholar@gmail.com या ईमेल वर पाठवून त्याची हार्डकॉपी पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड पुणे – 411001 येथे सादर करण्यात यावा असे आवाहन डॉ. प्रशांत नारनवरे आयुक्त समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले असल्याचे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे यांनी कळविले आहे.

0000

जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर अमरावतीत महिला हॉकी अकॅडमी स्थापन



जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर अमरावतीत महिला हॉकी अकॅडमी स्थापन

अमरावती, दि. ८ : जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर अमरावती जिल्हा महिला हॉकी अकॅडमीची स्थापना क्रीडा उपसंचालक विजय संतान यांच्या   अध्यक्षतेखालील कार्यक्रमात आज झाली.

        क्रीडाप्रेमी इरफान अथर अली, . अनिलराव भुईभार, बास्केटबॉल कोच जयंतराव देशमुख, महिला हॉकी खेळाडू नम्रता भुयार, संध्या किल्लेकर, अर्चना कडू, सुरेखा दुबे, प्रिया वानखडे, प्रीती शेंडे, स्नेहल राऊत, उज्वला परांजपे, मिना यावले उपस्थित होते.

अमरावती जिल्हा महिला अकॅडमी महिला हॉकीच्या प्रसारासाठी व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करेल.  याद्वारे विविध उपक्रमांचे आयोजनही सातत्याने करण्यात येईल,असे नम्रता भुयार यांनी यावेळी सांगितले.

00000 

पोषण अभियान कार्यक्रमात अमरावती जिल्ह्याची प्रभावी कामगिरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिका-यांचा गौरव

 









पोषण अभियान कार्यक्रमात अमरावती जिल्ह्याची प्रभावी कामगिरी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिका-यांचा गौरव

 

अमरावती, दि. 8 : पोषण माह अभियानात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल अमरावती जिल्ह्याला राज्यपातळीवरील सर्वोत्कृष्ट कार्यकृतीसर्वोत्कृष्ट लोकसहभागहे दोन पुरस्कार प्राप्त झाले. मुंबई येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 महिला व बाल विकास विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला व बालविकास सचिव श्रीमती आय ए कुंदन, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना रुबल अग्रवाल, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील आदि उपस्थित होते. अमरावती येथून जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महिला व बालविकास अधिकारी डॉ. कैलास घोडके, तसेच  प्रातिनिधिक स्वरूपात काही अंगणवाडी सेविका, मदतनीस , पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह विस्तार अधिकारी उपस्थित होते.

 

सर्वोत्कृष्ट कार्यकृतीसर्वोत्कृष्ट लोकसहभाग

 

             अमरावती जिल्ह्यात तरंग सुपोषित महाराष्ट्राचा अभियान, माझी मुलगी माझा अभिमान, परसबाग निर्मिती , एक दिवस मेळघाटसाठी, वृद्धांचे वाढदिवस, शेवग्याच्या रोपट्यांची लागवड, लोकप्रतिनिधी दिवस आदी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यात वेगळा ठसा निर्माण केला.  यासाठी गावागावातील अंगणवाडी ताई, मदतनीस, पर्यवेक्षिका यांनी समन्वयाने काम केले.  बालविकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात सूक्ष्म नियोजन करून संपूर्ण जिल्हाभर सप्टेंबर महिन्यात कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमांना प्रतिसादही चांगला मिळाला. गावागावातील उपक्रमांमध्ये आबालवृद्ध सहभागी झाले. अनेक उपक्रमांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या सर्व बाबींची केंद्र शासनाच्या पोषण ट्रेकर संकेतस्थळावर नोंदही झाली. त्यामुळे सर्वोत्कृष्ट कार्यकृती’ (Maximum Activities) सर्वोत्कृष्ट लोकसहभाग’ (MaximumPeople Participants) या दोन्ही बाबींसाठी अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

 

000

--

 

भूमी अभिलेखकडे राजापेठेतील 5 हजार 900 मिळकत सनदा तयार मिळकत सनद व पीआर कार्ड उपलब्ध करून घेण्याचे नागरिकांना आवाहन

 भूमी अभिलेखकडे राजापेठेतील 5 हजार 900 मिळकत सनदा तयार

मिळकत सनद व पीआर कार्ड उपलब्ध करून घेण्याचे नागरिकांना आवाहन

            अमरावती, दि. 8 : अमरावती शहरातील मौजे राजापेठ हा परिसर नव्याने परिरक्षणास घेण्यास परवानगी प्राप्त झाली. त्यानुसार विशेष भूमी अभिलेख उपअधिक्षक (शहर मापन) यांनी सदर परिसराचा संपूर्ण नगर भूमापन अभिलेख जसे की, नकाशे, सनदा, पीआर कार्ड व इतर दस्तऐवज भूमी अभिलेख कार्यालयाकडे अभिलेख संधारण करून कार्यवाहीसाठी पाठवला आहे. त्यानुसार राजापेठेतील एकूण 5 हजार 900 मिळकतधारकांच्या मिळकतीच्या सनदा उपलब्ध आहेत. या सनदा व पीआरकार्ड संबंधित नागरिकांनी उपलब्ध करून घेण्याचे आवाहन भूमी अभिलेख उपअधिक्षक अनिल फुलझेले यांनी केले आहे.

         संपर्क येथे करा

राजापेठेतील मिळकतधारकांनी भूमी अभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपीक शिल्पा मेश्राम व संबंधित परिरक्षण भूमापक निलेश कारंजकर यांच्याशी संपर्क करून त्यांच्या मिळकतीची सनद प्राप्त करून घ्यावी. सनद शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे. त्याशिवाय, पीआर कार्ड ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही कार्यालयामार्फत सुरू आहे. सनद प्राप्त करून घेणाऱ्या नागरीकांना लवकरच त्यांच्या मिळकतीचे पीआर कार्ड ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती श्री. फुलझेले यांनी दिली. 


  0000

Saturday, March 5, 2022

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीतील विकासकामांना मिळेल चालना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेत जिल्ह्याला निधी वितरीत

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीतील विकासकामांना मिळेल चालना

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा

 

अमरावती, दि. 5 : नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेत जिल्ह्याला साडेचार कोटी रूपयांहून अधिक निधी मंजूर असून, सव्वादोन कोटी रूपये निधी वितरीत करण्यात आला आहे. या वस्त्यांतील मूलभूत सुविधांच्या अनेक कामांना चालना मिळणार असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

          जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी गावोगाव, विविध वाड्यावस्त्यांत अनेक विकासकामांना चालना मिळावी व त्यासाठी शासनाकडून वेळेत निधी प्राप्त व्हावा, यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये विविध विकासकामांना चालना मिळण्यासाठी शासनाने साडेचार कोटी रूपयांहून मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात सव्वादोन कोटी रूपये अधिक निधी वितरीत केला आहे. काँक्रिट रस्ते, चौक व परिसर सौंदर्यीकरण, स्मशानभूमी शेड बांधकाम, आवश्यक तिथे कुंपण भिंती, नाली बांधकाम अशा अनेकविध कामांना याद्वारे चालना मिळणार आहे. प्रशासनाने या कामांना तत्काळ चालना देऊन विहित वेळेत गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करावीत. उर्वरित निधीही लवकरच मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी दिली.   

दर्यापूर तालुक्यात सासन रामापूर येथे रस्ता बांधकाम, इतबारपूर येथे रस्ता बांधकाम, तिवसा तालुक्यात भारवाडी येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौंदर्यीकरण, ठाणाठुणी येथे काँक्रिट रस्ता, शेंदुरजना बाजार येथे काँक्रिट रस्ता, घोटा, शिवणगाव, अनकवाडी, पालवाडी, सालोरा, हसनापूर व कु-हा येथे काँक्रिट रस्ता, व-हा येथे समाजमंदिर बांधकाम, वाठोडा (ख) सभामंडप कुंपण भिंत, भांबोरा येथे बौद्धविहाराला कुंपण भिंत व सभागृह दुरुस्ती, भातकुली तालुक्यात जळका हिरापूर, निरुळ गंगामाई, रामा येथे रस्ता बांधकाम, पूर्णानगर येथे स्मशानभूमी सौंदर्यीकरण, मलकापूर येथे समाजमंदिराचे सौंदर्यीकरण, टाकरखेडा संभू येथे रस्ता बांधकाम, वायगाव, ढंगारखेड येथे स्मशानभूमी शेड बांधकाम, दगडागड येथे काँक्रिट रस्ता, अमरावती तालुक्यात केकतपूर येथे नाली व पेव्हिंग ब्लाँक, कठोरा गांधी येथे रस्ता, ओझरखेड, नांदुरा पिंगळाई, देवरी, माहुली जहाँगीर येथे रस्ता बांधकाम, नांदुरा लष्करपूर येथे चौक सौंदर्यीकरण, धारणी तालुक्यात खा-याटेंभू येथे रस्ता बांधकाम, चांदूर बाजार तालुक्यात जसापूर येथे सभागृह बांधकाम, जावरा येथे काँक्रिट रस्ता, अमरावती तालुक्यात वनारसी येथे समाजमंदिराची कम्पाऊंड वॉल बांधणे आदी अनेक कामांचा समावेश आहे.

 

धारणी तालुक्यात गंभेरी व गोंडेवाडी येथे मागासवर्गीय वस्तीत सिमेंट काँक्रिटीकरण पेव्हर ब्लॉक बसविणे, अचलपूर तालुक्यात भूगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते आदर्श विद्यालयापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, बुंदेलपुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसराचे सौंदर्यीकरण व सभामंडप बांधकाम, जीवनपुरा येथे बौद्ध झेंडा परिसरात समाजमंदिर व सभामंडप बांधकाम, माळवेशपुरा येथे सभामंडप व सौंदर्यीकरण, सावळी येथे अंतर्गत रस्ते बांधकाम, देवमाळी येथे रस्ता काँक्रिट बांधकाम, जानोरी येथे सभागृह, घोडगाव पुनर्वसन वस्तीत सभागृह बांधणे, कविठा येथे रस्ता काँक्रिटीकरण, तुळजापूर येथे काँक्रिट रस्ता, जवळा शहापूरला सभागृहाचे बांधकाम, ब-हाणपूर येथे मागासवर्गीय वस्तीत सभागृहाचे बांधकाम, बेलोरा येथे सभागृहाचे बांधकाम, चिखलदरा तालुक्यात चुरणी व लाखेवाडा येथे सभागृह आदी कामांना निधी मिळाला आहे.

000 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Friday, March 4, 2022

 





-          जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावती, दि. 4 : जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी वेगवान पद्धतीचा अवलंब करावा. महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आदी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन मोहिम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

राज्य शासनाने प्रथम मात्रेचे 90 टक्के लसीकरण व दुस-या मात्रेचे 70 टक्के लसीकरण व पॉझिटिविटी रेट दहा टक्क्यांहून कमी झालेल्या जिल्ह्यांना निर्बंधात शिथीलता दिली आहे. त्यात अमरावती जिल्ह्याचा समावेश नाही.  त्यामुळे जिल्ह्यात कोविड अनुरूप वर्तनाबाबतचे पूर्वीचे आदेश लागू आहेत. ही बाब स्पष्ट करणारा स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी आज जारी केला.

पूर्ण लसीकरणाची आवश्यकता

सर्व आस्थापनांच्या सर्व कर्मचा-यांचे पूर्ण  लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. घरपोच सेवा देणा-या कर्मचा-यांचे लसीकरण झालेले आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक वापर करणा-यांचे, तसेच मॉल, चित्रगृहे, नाट्यगृहे, पर्यटनस्थळे, उपाहारगृहे, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणे येथे जाणा-यांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक अथवा खासगी कार्यालयामध्ये किंवा आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी यांचा नागरिकांशी संबंध येतो, त्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. हीच बाब औद्योगिक समूहांनाही लागू राहील.

सामाजिक, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम, ज्यात लग्नसमारंभ व अंत्ययात्रा, तसेच स्नेहसंमेलने यांचा समावेश आहे अशा ठिकाणी उपस्थितांची संख्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के अथवा 200 यापैकी जी कमी असेल तेवढी ठेवता येईल.

इयत्ता पाचवी ते बारावी व पहिली ते चौथीचे वर्ग प्रत्यक्ष अध्ययन पद्धतीने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक व अंगणवाडीचे वर्गही प्रत्यक्ष भरवता येतील. ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे अध्यापन सुरू ठेवण्याचे नमूद आहे.  राज्यांतर्गत प्रवासावर निर्बंध नाहीत. आंतरराज्य प्रवास करावयाचा झाल्यास लसीकरण पूर्ण नसेल तर 72 तासांपूर्वीचे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक आहे.

सर्व प्रकारच्या बाजारपेठा, कॉम्प्लेक्स, चित्रपटगृहे, उपाहारगृहे, मद्यालये, क्रीडा संकुले, जिमखाने, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, पर्यटनस्थळे, करमणूक उद्याने आदी त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. सर्व शासकीय व खासगी कार्यालये, उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहतील, असे आदेशात नमूद आहे.

00000

 

 

 

 

 

 

व्हिलचेअर बास्केटबॉलमुळे दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास वृध्दिंगत होणार - राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू

 








व्हिलचेअर बास्केटबॉलमुळे दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास वृध्दिंगत होणार

- राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू

 

* अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेमार्फत प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

* राज्यमंत्र्यांच्या पुढाकाराने दिव्यांगांना व्हिलचेअर व बास्केटबॉलचे वाटप

 

 

अमरावती दि. 4 :-   अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्यातील सांघिक भावना वाढीस लागेल, असा विश्वास जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे व्यक्त केला.

विभागीय क्रीडा संकुलाच्या परिषद सभागृहात अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रशिक्षणाला आजपासून सुरुवात झाली असून ते 6 मार्चपर्यंत चालणार आहे. क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे शारिरीक शिक्षण संचालक सुभाष गावंडे, रुपाली इंगोले, सुगंध बंड, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, शारिरीक शिक्षक संदिप इंगोले, शिव छत्रपती पुरस्कारार्थी डॉ. नितीन चवाडे, व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेच्या पदाधिकारी राजश्री पाटील, प्रशिक्षक शरद नागणे, मार्गदर्शक योगेश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटना, श्री शिवाजी सायंन्स कॉलेज, महाराष्ट्र व्हिलचेअर बास्केटबॉल संघटना तसेच निना फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यमंत्र्यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांना व्हिलचेअर बास्केटबॉलचे वाटप करण्यात आले.

दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना क्रीडा क्षेत्रातही नैपुण्यपूर्ण कामगिरी बजावता यावी, यासाठी प्रोत्साहन दिले जाते.  असे सांगून श्री कडू पुढे म्हणाले की, दिव्यांग बांधवांसाठी व्हिलचेअर बास्केटबॉल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरात असा प्रशिक्षण कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. पुण्यावरुन आलेल्या प्रशिक्षण चमूमार्फत स्थानिक प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मैदानी खेळ खेळण्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. यासाठी क्रीडा क्षेत्राची आवड असलेल्या दिव्यांग बांधवांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कडू यांनी यावेळी केले.

दिव्यांग बांधवांसाठी दरवर्षी एक हजार करोड रुपये खर्च करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. क्रीडा क्षेत्रातील दिव्यांग बांधवांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी दिव्यांग क्रीडा संघटनेची निर्मिर्ती करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली.

क्रीडा क्षेत्रामध्ये कामगिरी बजावणाऱ्या दिव्यांग बांधवांना आहार व पोषणासाठी राज्यमंत्र्यांनी 51 हजार रुपयांची राशी श्रीमती राजश्री पाटील यांच्याकडे यावेळी सुपूर्द केली. व्हिलचेअर बास्केटबॉल प्रशिक्षणाचा लाभ घेऊन प्रशिक्षित चमू तयार करा. यासाठी कोणतेही सहाय्य लागल्यास मी सर्वोतोपरी मदत करेल, असा विश्वास राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

 

 

कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज

 

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये बाह्यस्त्रोत यंत्रणेव्दारे नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज असून एकही कामगार वेतनापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या बाह्यस्त्रोत यंत्रणेव्दारे नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तसेच समस्या सोडवून त्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.  महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अधीक्षक अभियंता डी.व्ही. खानंदे, महावितरणचे व्यवस्थापक सुहास देशपांडे, कामगार उपायुक्त श्री. महल्ले, जिल्हा कामगार अधिकारी राहुल काळे तसेच कंत्राटी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कोविड काळात रक्त संकलनाचे प्रमाण कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्र्यांनी कामगारांना यावेळी रक्तदान करण्याचे आवाहन केले. याला कामगारांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे साठच्या वर कामगारांनी रक्तदान केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. आशिष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा चमूने रक्त संकलनाचे कार्य केले.

कामगार कायद्याच्या तरतूदीप्रमाणे सर्व कामगारांना वेळीच वेतन देण्यात यावे. कामगारांनी आपल्या अडी-अडचणींसाठी कामगार विभागाशी संलग्न राहावे. कामगारांना काम मिळवून देतांना मध्यस्थीसाठी पैशाची मागणी केल्यास त्यांच्यावर कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल होईल, याची संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन श्री. कडू यांनी यावेळी केले.

कामगारांना वेळेवर वेतन, भविष्य निर्वाह निधी, त्यांच्या समस्या तसेच सूचना याबाबत श्री. कडू यांनी यावेळी कामगारांशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या समस्यांचे लवकरच निराकरण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

00000

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...