Tuesday, March 15, 2022

ग्राहकांनी हक्कांप्रती सजगता राखणे आवश्यक - अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी

 जागतिक ग्राहक दिनानिमित्त बचतभवनात कार्यक्रम












ग्राहकांनी हक्कांप्रती सजगता राखणे आवश्यक

-         अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी

 

अमरावती, दि. 15 : ग्राहक कायद्यान्वये ग्राहकांच्या हक्कांचा संरक्षणासाठी अनेक महत्वपूर्ण तरतूदी करण्यात आल्या आहेत. माहिती तंत्रज्ञानाने बाजारपेठ व व्यवहारात अनेक बदल घडवले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रती सजगता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी आज येथे केले.

वैधमापनशास्त्र विभागातर्फे जागतिक ग्राहक दिनानिमित्त बचतभवनात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुदाम देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा,अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री डॉ. अजय गाडे, वैधमापनशास्त्र उपनियंत्रक रा. पु. जुमळे, सहनियंत्रक शि. के. बागल आदी उपस्थित होते.

ग्राहक कायदे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची तरतूद, प्रक्रिया, आस्थापना, व्यवसाय, उद्योगांसाठीचे नियम आदींबाबत यावेळी श्री. देशमुख, डॉ. गाडे यांनी मार्गदर्शन केले. माहिती तंत्रज्ञानाने घडवलेल्या बदलांमध्ये आजच्या काळात स्मार्ट फोन हे व्यवहाराचे साधन झाले आहे. बँकिंग, खरेदी-विक्रीसारख्या प्रक्रिया मोबाईलच्या माध्यमातून घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी आवश्यक पासवर्ड, त्याची गुप्तता राखणे, अनावश्यक संपर्क टाळणे, जाहिरातींना भूलून बळी न पडणे, सजग राहून व्यवहार करणे आदी बाबींची दक्षता घेतली जाणे गरजेचे असल्याचे डॉ. गाडे यांनी सांगितले.

यावेळी वैधमापन शास्त्र विभागातर्फे बचतभवनाच्या दर्शनी भागात आवेष्टित वस्तू, आवेष्टनावर घोषित करावयाच्या आवश्यक बाबी, तोलन यंत्रांच्या प्रमाणीकरणाची चिन्हे आदींची माहिती देणारे प्रदर्शनही भरविण्यात आले.

000

जिल्ह्यात कलापथकांच्या माध्यमातुन शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहीती

 







बोली भाषेत कलापथक करीत आहेत प्रबोधन

शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर

 

जिल्ह्यात कलापथकांच्या माध्यमातुन शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहीती

 

            अमरावती, दि. 15 :- शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाच्या वतीने जिल्ह्यात कलापथकाच्या माध्यमातुन शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर करण्यात येत आहे. कलापथक सादरीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ अमरावती तहसिल येथुन करण्यात आला. मेळघाटातील कोरकू बोलीसह विविध स्थानिक बोलींमध्ये कलापथके सादरीकरण करत असून, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

आता अचलपुर तालुक्यातील बीलनपुरा, चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, अंजनगाव, तिवसा तालुक्यातील मोझरी, येथील मंदीर परिसर, निवासी परिसर व गर्दीच्या ठिकाणी या कलापथकांच्या माध्यमातुन शासकीय योजनांची माहिती अभिनय, नाटक, पोवाडे, नकला व बोली भाषेच्या माध्यमातुन नागरिकांपर्यत पाहोचविण्यात येत आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या माहीतीचा जागर दिनांक 17 मार्च पर्यंत कलापथकांच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे.

बोली भाषेतुन होणारी संवादफेक, विविध पात्रनिर्मिती व निखळ अभियानामुळे कलापथकांच्या सादरीकरणाला प्रत्येक गावातुन नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 

0000000

Monday, March 14, 2022

विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद अमरावती विभागासाठी 3 हजार 771 कोटींची तरतूद जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा पाठपुरावा

 


विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद

अमरावती विभागासाठी 3 हजार 771 कोटींची तरतूद

जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा पाठपुरावा


      अमरावती, दि. 14 : विदर्भात सिंचनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी शासनाकडून सिंचन प्रकल्पांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे 6 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती विभागासाठी 3 हजार 771 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महत्वाचे सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जाऊन सिंचनक्षमता व कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे, असा विश्वास राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केला.


      विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती मिळावी व सिंचनक्षमतेत वाढ व्हावी या दृष्टीने जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांच्याकडून सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा होत आहे. त्यानुसार विविध सिंचन प्रकल्पांसाठी मोठी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. विदर्भात शेतीला सिंचन वाढण्याच्या दृष्टीने ही भक्कम तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्णत्वास जातील. सिंचनाचे प्रमाण वाढून कृषी उत्पादकतेत भर पडेल व शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्याचा लाभ होईल, असा विश्वास राज्यमंत्री श्री. कडू यांनी व्यक्त केला.


       विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक कामांना गती देण्यात येत आहे. प्रकल्प पूर्णत्वास जाण्याबरोबरच भूसंपादनाची कामेही मार्गी लागणार आहेत.


 अमरावती जिल्ह्यासाठी 862.72 कोटींची तरतूद


       अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या विकासकामांची गरज लक्षात घेऊन अर्थसंकल्पात त्याबाबत तरतूद करण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्र्यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार 862.72 कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामुळे अप्पर वर्धा, बोर्डी नाला, गर्गा, पंढरी, पेढी बॅरेज, सपन, वासणी प्रकल्पातील अविशष्ट प्रदाने, भूसंपादन आदी कामे मार्गी लागणार आहेत. निम्न पेढी प्रकल्पासाठीही 150 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बागलिंगा, चांदी नदी, चंद्रभागा बॅरेज, करजगाव, निम्न चारगड, निम्न साखळी, पाकनदी, रायगड नदी, सामदा, टाकळी कलाण आदी
 प्रकल्पांच्या आवश्यक कामांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. चांदस वाठोडा, पाटिया धारणी, राजुरा येथील पाटबंधारे कामांसाठीही तरतूद करण्यात आली आहे.

  धरण पुनर्स्थापना व सुधारणेसाठी स्वतंत्र तरतूद धरण पुनर्स्थापना व सुधारणेसाठी स्वतंत्र तरतूद आहे. सपन प्रकल्पासाठी 14 कोटी व अप्पर वर्धासाठी 9.40 कोटी तरतूद करण्यात आली आहे. पूरनियंत्रणासाठी देऊरवाडा, करजगाव, शिरजगाव व ब्राम्हणवाडा थडी येथील कामांसाठी 15 कोटी 82 लक्ष रूपये तरतूद आहे.

 

 

 

 


विभागातील पाचही जिल्ह्यांतील प्रकल्पांची कामे लागणार मार्गी



      अमरावती जिल्ह्याबरोबरच अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील प्रकल्पांच्या अनुषंगाने विभागासाठी 3 हजार 771 कोटी एवढी भरीव तरतूद करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यासाठी 1 हजार 133 कोटी 64 लक्ष रूपये निधीची तरतूद आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प, उमा प्रकल्प, घुंगशी बॅरेज, नेरधामणा, बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प, शहापूर प्रकल्प, ज्ञानगंगा प्रकल्प, मन प्रकल्प, अकोल्यातील नया अंदुरा, काटीपाटी बॅरेज, कवठा बॅरेज आदींसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

      वाण प्रकल्प व ज्ञानगंगा प्रकल्पाच्या धरण पुनर्स्थापना व सुधारणेसाठी 11 कोटी 64 लक्ष, तर बाळापूर येथील राज्य संरक्षित स्मारकस्थळी मन नदीच्या काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. विदर्भासाठी मोठी तरतूद झाल्याने सिंचन प्रकल्पांची प्रलंबित कामे पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे


                                  

 

 

Saturday, March 12, 2022

महसूलविषयक कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धोरणात्मक बदलांबाबत प्रस्ताव द्यावेत - अपर मुख्य सचिव (महसूल) नितिन करीर

 









अप्पर मुख्य सचिवांकडून अमरावती विभागाचा आढावा

महसूलविषयक कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धोरणात्मक बदलांबाबत प्रस्ताव द्यावेत

- अपर मुख्य सचिव (महसूल) नितिन करीर

अमरावती, दि. १२ : गौण खनिज, वाळू घाट लिलाव, दंड वसुली, अकृषक आकारणी, नझूल जमिनी फ्रीहोल्ड करणे आदी अनेक महसूलविषयक कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या कामात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन धोरणात्मक बदल आवश्यक असल्यास तसे प्रस्तावित करावे, असे निर्देश अपर मुख्य सचिव (महसूल) नितिन करीर यांनी आज येथे दिले.

 अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाची अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांची बैठक डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनीच्या प्राणहिता सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. करीर यांनी महसुली वर्ष २१-२२ वसुली, गौण खनिज, वाळू घाट, खाणी लिलाव, दंड वसुली, अकृषक आकारणी, रूपांतरण शुल्क वसुली, भोगवटदार वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करणे, नझूल जमिनी फ्री होल्ड करणे, महसुली अधिकाऱ्यांकडील अर्धन्यायिक प्रकरणे, सातबारा संगणकीकरण, इ फेरफार, घरपोच सातबारा वितरण, चावडी  संगणकीकरण, महाराजस्व अभियान आदी कामकाजाचा आढावा घेतला. या कामकाजात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

 

महसूल कामकाज अधिक प्रभावी होण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक असल्यास तसे प्रस्तावित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आस्थापनाविषयक बाबींचा आढावाही त्यांनी घेतला.

बैठकीला महसूल उपायुक्त संजय पवार, उपायुक्त श्यामकांत म्हस्के, सर्व जिल्ह्यांचे अपर जिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी, भूमी अभिलेखचे उपसंचालक व जिल्हा अधीक्षक उपस्थित होते.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

शिराळ्याच्या धर्तीवर गावागावात वाचनालये निर्माण करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 








शिराळ्याच्या धर्तीवर गावागावात वाचनालये निर्माण करा

  -     पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

       मागासवर्गीय वस्तीमधील वाचनालयाचे उद्घाटन

       ग्रामीण भागातील विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

       ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामस्थांचा पुढाकार महत्त्वपूर्ण

अमरावती, दि.12: युवा पिढीत वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिराळ्याच्या धर्तीवर गावागावात वाचनालये निर्माण करा, असे प्रतिपादन पालकमंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी आज शिराळा येथे केले.

समाज कल्याण विभागामार्फत शिराळा येथील मागासवर्गीय वस्तीमधील वाचनालयाचे उद्घाटन पालकमंत्री अँड. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

    स्पर्धा परीक्षांची  तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वाचनालयामध्ये सर्व विषयांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गावातील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

   जिल्हा परिषद सदस्य अलका देशमुख, प्रकाश साबळे, अमरावती पंचायत समितीच्या सभापती संगिता तायडे, उपसभापती रोशनी अळसपुरे ,नांदुरा सरपंच सूर्यकांता बावणे, शिराळा सरपंच अंकिता तायडे तसेच गट विकास अधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत आदी यावेळी उपस्थित होते.

 

                           विविध विकासकामांचे भुमिपूजन

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. ग्रामीण भागाच्या विकासकार्यात ग्रामस्थांचा पुढाकार महत्त्वपूर्ण असल्याचे पालकमंत्री अँड. यशोमती ठाकूर म्हणाल्या. ग्रामिण भागातील विविध विकासकामांचे श्रीमती ठाकुर यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पणही यावेळी करण्यात आले.

  अमरावती तालुक्यातील कठोरा बुद्रुक येथील गजानन टाउनशिपमध्ये आमदार निधीतून वार्ड क्रमांक एकमधील शिवमंदिर परिसरात सार्वजनिक बगीच्यात तारेच्या साखळी दुव्यांचे कुंपण बांधण्यासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजूर केला आहे. या विकासकामाचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत नांदुरा बुद्रुक येथे आयुर्वेदिक दवाखान्याच्या नवीन इमारत

बांधकामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. या कामाची अंदाजे किंमत साठ लाख रुपये एवढी आहे. तसेच मूलभूत सुविधा योजनेतंर्गत कठोरा बुद्रुक येथील श्री. बुरघाटे ते योगेन्द्र गावंडे यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता बांधकामासाठी चार लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. तसेच स्थानिक आमदार निधीअंतर्गत वार्ड क्रमांक एकमध्ये श्री. इंगोले ते श्री. गावंडे यांच्या घरासमोरील रस्त्याच्या खडीकरणाच्या कामासाठी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

        सावंगा येथील सावंगा- अडगाव रस्ता सुधारणा व डांबरीकरण तसेच पुलाच्या कामासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचेही यावेळी भूमिपूजन करण्यात आले. तसेच  चिचखेड, करजगाव, धानोरा कोकाटे, माहुली जहागीर तसेच नांदगाव पेठ येथील विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले.

 

शिराळा ग्रामपंचायत समाज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती  पुतळ्यास श्रीमती ठाकुर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले . शिराळा ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नमुना 8 चे वितरण करण्यात आले .यावेळी एकूण 69 ग्रामस्थांना पट्टेवाटप करण्यात आले. यावेळी श्रीमती ठाकूर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्यात.

 

000000

Friday, March 11, 2022

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास आता 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

 महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास आता 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

 अमरावती, दि.11 : माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2021 -2022 वर्षासाठी  महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती,  प्रवर्गासाठी  नुतनीकरणाचे  अर्ज व नवीन अर्ज भरण्यासाठी  दिनांक 15 मार्च 2022  पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व संस्था व सर्व महाविद्यालय, प्राचार्यांना सूचित करण्यात येते की, नुतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे. नुतनीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांच्या सेंड बँक केलेल्या अर्जांची संबधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्याकडून त्वरित त्रुटीपूर्तता करुन जिल्हा लॉगिनवर पाठविण्यात यावे. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची  जबाबदारी संबधित महाविद्यालयांची राहील.


महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्हयातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना नुतनीकरणाचे अर्ज

रिअप्लाय करण्यासाठी आणि सेंड बँक  केलेल्या अर्जांची त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती माया केदार यांनी केले आहे.

0000

गृहनिर्मिती क्षेत्रात पर्यावरणपूरक विकास व्हावा - जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

 


 

गृहनिर्मिती क्षेत्रात पर्यावरणपूरक विकास व्हावा

-         जिल्हाधिकारी पवनीत  कौर यांचे आवाहन

 

            अमरावती, दि. 11 :   शहरात गृहनिर्माणाची प्रक्रिया राबविताना पर्यावरणाची जपणूकही महत्वाची आहे. त्यामुळे ग्रीन बिल्डिंग,सौर ऊर्जेचा वापर या संकल्पना अंमलात आणून पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

 

            क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे हॉटेल ग्रँड महफिल येथील रुबी हॉलमध्ये प्रॉपर्टी एक्स्पो 2022’ चे उद्घाटन श्रीमती कौर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर, क्रेडाईचे अध्यक्ष संजय पर्वतकर, एचडीएफसी बँकेचे पंकज बर्नवाल, क्रेडाईच्या महिला समन्वयक अश्विनी देशपांडे, क्रेडाई संघटनेचे राज्य पदाधिकारी शैलेश वानखेडे, माजी अध्यक्ष राम महाजन उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, अमरावती शहराची स्मार्ट सिटी होण्याकडे वाटचाल होत असताना गृहविकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घातली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यावरणस्नेही इमारती आदी अभिनव संकल्पनांचा बांधकाम व्यावसायिकांनी वापर करावा. या संकल्पना अमरावतीसारख्या महत्वाच्या शहरात निश्चितपणे अंमलात आणल्या पाहिजेत.

 

अडचणींच्या निराकरणासाठी स्वतंत्र बैठक घेऊ

 

जनसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करत असताना गृहनिर्माणाशी संबंधित विविध शासकीय योजनांचाही त्यांना लाभ मिळवून द्यावा. बांधकाम व्यावसायिकांच्या मागण्या व अडचणींच्या निराकरणासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

पालिका आयुक्त श्री. आष्टीकर म्हणाले की, बांधकाम क्षेत्राशी संबंधित प्रक्रियेत सुलभता, सुसूत्रता, व सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येत आहे. प्रक्रियेत शक्य त्या बाबींसाठी सॉफ्टवेअर आदींचा वापर वाढविण्यात येत आहे.  

           

          श्री. पर्वतकर यांनी प्रास्ताविका केले.  निलेश ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. क्रेडाईचे सचिव रविंद्र बोडखे यांनी आभार मानले.  रविंद्र मिसाळ, सचिन वानखेडे, पंकज पाटील, अनिल विखे, रणजित देशमुख, दिलीप जयसिंघाणी, कमल मालवीय, रविंद्र महल्ले, मीनल देशमुख, क्रेडाईच्या महिला कार्यकारिणीच्या सदस्याआदी यावेळी उपस्थित होते.

000

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...