Thursday, June 2, 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

 


जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

     अमरावती, दि. 2 : जिल्हाधिकारी कार्यालयात महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज अधीक्षक उमेश खोडके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

     तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही यावेळी महाराणा प्रतापसिंह   यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

00000

Wednesday, June 1, 2022

जिल्हा लोकशाही दिन 6 जूनला

 

जिल्हा लोकशाही दिन 6 जूनला

 

अमरावती, दि. 1: जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जून महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, सोमवार, दिनांक 6 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


तिवसा कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन

 तिवसा कृषी अधिकारी कार्यालयामार्फत

तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन

       अमरावती, दि.1: तालुका स्तरावरील निविष्ठा तक्रारीबाबत धडक मोहिम राबविण्यासाठी तिवसा तालुक्यातील खरीप हंगाम 2022 साठी तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली असून पदाधिकारी व त्यांचे दूरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

            तालुका स्तरावरील नियुक्त केलेल्या तक्रार निवारण समितीने प्राप्त तक्रारीबाबत प्रत्यक्ष भेटी देवून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करावे. धडक मोहिम राबवून तालुक्यातील निविष्ठाबाबत दक्ष राहून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

            मोर्शी उपविभागीय कृषी अधिकारी तथा अध्यक्ष राहुल सातपुते (7788084749), तिवसा पंचायत समिती कृषी अधिकारी तथा सदस्य सचिव  उध्दव बाहेकर (8275283001), तिवसा तालुका कृषी अधिकारी तथा सदस्य अनिल कांबळे (9404611414), अमरावती प्रादेशिक संशोधन केंद्राचे डॉ. व्ही. व्ही. टापरे (9890093610), घातखेड कृषी विज्ञान केंद्राचे पी. एन. मेंढे (9423109071), अमरावती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एस. पी. देशमुख (9422029299) अशी पदाधिकाऱ्यांची नाव असून यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन  तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.

0000

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) योजना सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 



                     प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) योजना

                         सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 

अमरावती, दि.1: प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यात 50 हजार पारेषण विरहित सौर कृषी  पंपाच्या आस्थापनेचे उद्दिष्ट या योजनेत दिले आहे . या सौर कषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार  आहे. शेतकऱ्यांच्या कृषीधारक क्षमतेनुसार अश्वशक्ती सौर पंप उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यामध्ये सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% हिस्सा राहणार आहे.

 

                          सौर कृषी पंप योजना लाभार्थी निवडीचे निकष

विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी तसेच शाश्वत पाण्याच्या स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी तसेच  पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी यांना या योजनेचा फायदा होणार आहे.  अटल सौर कृषी पंप योजना टप्पा  1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतंर्गत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेले अर्जदार  शेतकरीही या योजनेचा लाभ घेवू शकतात.

शेतजमीन धारकाजवळ किती एकर जमीन आहे, त्यानुसार सौर कृषी पंप देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) योजना राज्य शासनाच्या महाऊर्जा या विभागामार्फत राबविण्यात येत  आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन

नोंदणीसाठी  http://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/ Kusum-Yojana-Componenet-B    www.mahaurja.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय, अमरावती, दुरध्वनी क्र. 0721-2661610, ई-मेल

आयडी  domedaamravati@mahaurja.com वर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे  अमरावती जिल्ह्यासाठी 990 इतक्या पंपाचे उद्दिष्टे शिल्लक असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.


विभागीय माहिती कार्यालयाचे वाहनचालक रविंद्र तिडके यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

 





विभागीय माहिती कार्यालयाचे वाहनचालक

रविंद्र तिडके यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

 

अमरावती दि. 01 : अमरावती येथील विभागीय माहिती कार्यालयातील वाहन चालक रविंद्र तिडके  यांना सेवानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सेवानिवृत्ती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रभारी उपसंचालक (माहिती) हर्षवर्धन पवार अध्यक्षस्थानी होते. सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त श्री तिडके यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला सहाय्यक संचालक अपर्णा यावलकर, माहिती सहाय्यक पल्लवी धारव, लेखापाल विजया लोळगे, प्रदर्शन सहाय्यक विश्वनाथ धुमाळ, मनोज थोरात, सुनील काळे, लिपिक दिनेश धकाते, योगेश गावंडे, रुपेश सवाई, वैशाली ठाकरे, कोमल भगत, गजानन परटके, कॅमेरामन नितीन खंडारकर, चंद्रकांत पाटील, छायाचित्रकार मनीष झिमटे, सागर राणे, वाहनचालक विजय आठवले, गणेश वानखेडे, हर्षल हाडे, संदेश वाहक दिपाली ढोमणे, गजानन पवार, राजश्री चोरपगार, प्रतिक वानखेडे आदी उपस्थित होते.

श्री तिडके यांच्या निरोप समारंभानिमित्त कार्यालयातील सहकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या, तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्री तिडके यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. पल्लवी धारव यांनी सूत्रसंचालन केले. विश्वनाथ धुमाळ यांनी आभार मानले.

00000

 

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या घरगुती, उत्कृष्ठ उगवणक्षमता असलेल्या बियाण्यांचा वापर करावा - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 













शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या

घरगुती, उत्कृष्ठ उगवणक्षमता असलेल्या बियाण्यांचा वापर करावा

-       राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

चांदुर बाजार येथे आज बियाणे महोत्सव

70 शेतकऱ्यांनी केली बियाणे विक्री साठी नोंद

 

अमरावती, दि. 1 (विमाका) :  शेतकऱ्यांनी  उगवण क्षमतेची खात्रीशीररित्या तपासणी केलेले घरचे बियाणे वापरावे. बियाणे महोत्सवाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना खात्रीशीर व उत्कृष्ठ उगवणक्षमता असलेले बियाणे उपलब्ध होणार असून शासन खंबिररित्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले.

 

चांदुर बाजार येथील प्रहार कार्यालयाच्या प्रांगणात बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल खर्चान, चांदुर बाजारच्या तालुका कृषी अधिकारी फाल्गुनी ननिर, अचलपूरच्या तालुका कृषि अधिकारी स्नेहल ढेंबरे आदी उपस्थित होते.

 

जास्त शेतकऱ्यांनी बियाणे घरीच तयार करावे. याबाबत शास्त्रीय पद्धतीने बियाणे तयार करण्याच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात येणार असल्याचे श्री. कडू यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी उत्कृष्ठ उगवणक्षमता असलेले बियाणे घरीच तयार करुन बियाणे महोत्सवाच्या माध्यमातुन ही चळवळ राबवावी. बीज उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरविणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री श्री कडू यांनी यावेळी दिली.

 

महोत्सवाचे वैशिष्ट्य

 

बियाणे महोत्सवात वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ बियाणे विक्रीसाठी सहभागी झाले होते. ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे नाही त्यांच्यासाठी घरचे उत्पादीत केलेले दर्जेदार बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. शेतकरी बांधवांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, कांदा, भुईमुंग, भाजीपाला व इतर बियाणे वाजवी दरात उपलब्ध केली होती.

 

महोत्सवात अनेक स्टॉल्सचा समावेश

 

महोत्सवात बेलोरा बीजोत्पादक व शेतकरी उत्पादन कंपनी व कृषी विभागाचे स्टॉल्स लावण्यात आले. कल्चरयंत्र म्हणजेच पेरणीपूर्वी बियाण्यांवर करण्यात येणाऱ्या प्रक्रिया यंत्राच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.  शेतकऱ्यांनी बियाण्यांच्या प्रतवारी प्रक्रियेची यावेळी माहिती घेतली. बीजप्रक्रियेसाठी ड्रमची व्यवस्था व औषध उपलब्ध यावेळी करून देण्यात आले. शेतकऱ्यांना वाजवी दरात बीजप्रक्रिया करून देण्याची सुविधा महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आली. तसेच, जैविक बीजप्रक्रियेसाठी स्टॉल उभारण्यात आले होते. विविध जैविक बीजप्रक्रिया साहित्य विक्रीसाठी येथे उपलब्ध होते. तळवेलचे प्रगतिशील शेतकरी भालचंद्र बोंडे, बेलोराचे शेतकरी विजय कडू आदी उपस्थित होते.

 

उगवण क्षमतेची चाचणी होणार

 

शेतकऱ्यांना आपल्या जवळील बियाणे विक्री करण्यासाठी  त्यांच्या जवळील ट्रेमध्ये उगवणक्षम बियाण्यांची माहिती देण्यासाठी व तपासणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या ट्रे मध्ये विविध पिकांच्या बियाण्यांच्या उगवणीबाबत माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

 

00000

Tuesday, May 31, 2022

जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा

 



जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा

अमरावती, दि.31: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त जनजागृतीपर कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच तंबाखू मुक्तीबाबत शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत महल्ले होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंके, समिती अध्यक्ष डॉ. सविता पाटणकर, वुमन डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ. आशा हरवानी, सचिव डॉ. सानिष्ठा बेले, सहसचिव डॉ. नीरज मुरके,डॉ सुजित डांगोरे, डॉ. गिरीश तापडिया, दंतरोग तज्ज्ञ डॉ. आतिश पवार, जिल्हा सल्लागार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम डॉ. मंगेश गुजर, दंतरोग तज्ज्ञ डॉ. प्रितीश पाडगावकर, अधिसेविका श्रीमती अडळकर, आहार तज्ज्ञॉ श्रीमती देशमुख, निरुत्ती इंदुरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या वर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे घोष वाक्य "तंबाखूमुळे आपल्या पर्यावरणाला धोका हे होते. तंबाखू उत्पादनात होणारा अतिरिक्त रासायनिक खताचा वापर, यामुळे जमिनीचा कस कमी होतो व कालांतराने जमीन नापीक बनते.

राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण 2019-20 नुसार, अमरावती जिल्हयामध्ये 15 वर्षावरील महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण 9 टक्के  तर 15 वर्षावरील पुरुषांमध्ये 40.8 टक्के एवढे होते. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सर्वेक्षणनुसार, 90 टक्के लोकांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे कारण तंबाखू सेवन हे आहे . भारतात दरवर्षी 13.50 लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होतो.

तीनशे सिगारेट बनविण्यासाठी एका झाडाची तोड करावी लागते. त्यामुळे जंगलतोडीचे प्रमाण वाढले आहे. तंबाखूवर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यावधी लीटर पाण्याचा उपयोग करावा लागतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, आजतागायत 8.40 कोटी टन  कार्बन डायऑक्साईड वातावरणात उत्सर्जित केला गेला आहे. तसेच इतर कचरा जसे तंबाखू, गुटखा, खर्ऱ्याची पाकिटे, सिगारेट बड्स यांचे वर्षानुवर्षे विघटन होत नाही. त्यामुळे पाणी व जमीन प्रदूषित होते. तसेच तंबाखू, खर्रा, गुटखा खाणाऱ्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे ते वारंवार आजारीही पडतात.

तंबाखू मुक्तीसाठी समुपदेशनाकरिता जिल्हा सामन्य रुग्णालय येथे तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र चालविल्या जाते . तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावरही समुपदेशन केंद्रे चालवली जातात.कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रक कार्यक्रमाचे जिल्हा समुपदेशक  उध्दव जुकरे तर आभार जिल्हा सामजिक कार्यकर्ता पवन दारोकर यांनी मानले.

0000

 

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...