Friday, July 29, 2022

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आवश्यक सुविधा द्याव्या - आशिष बिजवल

 





कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आवश्यक सुविधा द्याव्या

-         आशिष बिजवल

जिल्हा कृती दलाच्या बैठकित दिले निर्देश

            अमरावती दि. 28 (विमाका): कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांना कायदेशिर हक्क व आवश्यक न्यायिक मदत मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महिला व बालविकास विभागाने समन्वयाने कार्यवाही  करावी. या बालकांना शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधेचा तात्काळ लाभ द्यावा असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिले. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातुन कोविड-१९ आपत्तीमध्ये अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षण व संगोपनासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा श्री बिजवल यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

महिला व बालकल्याण उपायुक्त नरेंद्र वानखडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उमेश टेकाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) कैलास घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अतुल भडांगे, राजश्री कौलखेडे, मंगल पंचाळ, माविमचे जिल्हा समन्वयक सुनिल सोसे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले, परिविक्षा अधिकारी सुभाष अक्वार, जिल्हा संरक्षण अधिकारी राजेश नांदने, चाईल्ड लाईन समन्वयक अमित कपुर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष किरण पुंशी आदी यावेळी उपस्थित होते.

श्री बिजवल म्हणाले, ज्या बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत त्यांचे बँक खाते तात्काळ उघडण्यात यावे, त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात यावा, या बालकांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच राज्य शासनाकडुन देण्यात येणारी आर्थिक मदत त्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी असे सांगितले. खाजगी शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या बालकांचे शैक्षणिक शुल्क भरतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने संबंधित शाळा, महाविद्यालयांशी संपर्क साधावा. समन्वयातुन या समस्येचे निराकरण करण्याबाबत श्री बिजवल यांनी सांगितले.

दोन्ही पालक गमावलेले सर्व बालके पर्यायी पालकांच्या जवळ त्यांच्या कुटूंबात रहात असुन बालगृहात असलेल्या एका बालिकेची पर्यायी पालकत्वाच्या माध्यमातुन निवासाची व्यवस्था करण्यात यावी असे सांगुन या बालकांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्हास्तरीय कृती दलाने महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या सर्व शासकिय विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सुचना श्री बिजवल यांनी केल्या.

 

लसीकरणाबाबत जनजागृती

कोरोना लसीकरणाबाबत सर्व शासकीय कार्यालये, अशासकीय संस्था, बालकांचे संगोपन व संरक्षण करणाऱ्या सामाजिक संस्थांनी लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करावी. अठरा वर्षे वयोगटातील युवक-युवतींमध्ये लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. आरोग्य विभागाच्या मदतीने बालकांची कोरोना तपासणी, विलगीकरण व त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात यावे. लसीकरणाची बुस्टर मात्रा अद्याप न घेतली नाही त्या नागरिकांसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात यावे, असे श्री बिजवल यांनी सांगितले.

00000

Thursday, July 28, 2022

जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या सोडतीमध्ये 66 जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित

 





जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या सोडतीमध्ये

66 जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित

 

 

अमरावती, दि.28 : अमरावती जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूकीव्दारे गठित होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात आला असून यात 66 जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.

जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभाग (गट-66 साठी) ही आरक्षण सोडत नियोजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, निवडणूक शाखेचे प्रमोद देशमुख तसेच विविध गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली. प्रारंभी गावांची नावे नमूद असलेली प्रत्येक चिठ्ठी उपस्थितांना दर्शवून नंतर पारदर्शी डब्यात सर्वांसमोर त्याची सरमिसळ करुन जय संदीप राहटे व रुचल मिलींद गंधाडे या बालकांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानंतर संबंधित गावाचे नाव  जाहीर करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या सदस्य पदासाठी चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, तिवसा, अमरावती, अचलपूर, धारणी, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, भातकुली, चांदूररेल्वे, धामगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर अशा 14 तालुक्यातील 66 जागांसाठी सोडत करण्यात आली. 66 जागांपैकी महिलांना 33 जागा प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती 12 पैकी महिला 6, अनुसूचित जमाती 13 पैकी महिला 7, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.)  7 पैकी महिला 4, सर्वसाधारण 34 पैकी महिला 16 अशा जागांची सोडत निघाली. निवडणूक शाखेचे अधिकारी तसेच महसुल सहायक अनुपम उईके, प्रकाश माहोरे, किशोर झोंबाडे आदींनी सोडत प्रक्रिया राबविण्यासाठी सहाय्य केले.

00000

संकटग्रस्त महिलांना वन स्टॉप क्रायसेस सेंटरचा आधार

 

संकटग्रस्त महिलांना वन स्टॉप क्रायसेस सेंटरचा आधार

          अमरावती, दि.28: संकटात सापडलेल्या महिलांना काळजी व संरक्षणाची गरज असते. अशा गरजू महिला, मुलींनी वन स्टॉप क्रायसेस सेंटरची गरजेच्या वेळी मदत घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

          हुंडाबळी, ऑनर किलींग , ॲसिड हल्ला , लैंगिंक छळ, बाल लैगिंक छळ, लैगिंक व्यापार, बाल विवाह, भ्रूणहत्या, सती प्रथा, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिला अशा संकटात सापडलेल्या महिलांसाठी वन स्टॉप क्रायसेस सेंटर मदतनीस ठरते. या योजनेमध्ये एका छताखाली वैद्यकीय सुविधा, पोलिस मदत केंद्र, समुपदेशन केंद्र, कायदेशीर मदत, अन्न, वस्त्र, निवारा मोफत पुरविण्यात येतो.

         जिल्हा स्त्री रुग्णलाय, येथे दिनांक 1 जून 2017 पासून वन स्टॉप क्रायसेस सेंटर कार्यरत आहे. या केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षेतेखाली या सेंटरची  त्रैमासिक बैठक आयोजित करून आढावा घेण्यात येतो. वन स्टॉप क्रायसेस सेंटरची आढावा बैठक नुकतीच पार पडली. हे सेंटर सुरु झाल्यापासून आजपावतो 122 पिडीत लाभार्थ्यांनी केंद्रातील सोयीसुविधांचा लाभ घेतलेला असल्याची माहिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली आहे.

00000

 

 

 

अग्निपथ योजनेतंर्गत सैन्य भरतीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्टपर्यंत

 

अग्निपथ योजनेतंर्गत सैन्य भरतीसाठी

 अर्ज भरण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्टपर्यंत

 

     अमरावती, दि.28: अग्निपथ योजनेंतर्गत होतकरू सुशिक्षित अविवाहित तरूणांसाठी सैन्य भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्ट 2022पर्यंत आहे. सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022 या कालावधीत करण्यात येणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात (बुलडाणा सोडून) ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. स्टेट रिझर्व पोलिस फोर्स, ग्रुप 4, नागपूर येथे या भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नागपूर भरती कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

          इच्छुक उमेदवारांनी www.joiniindianarmy.nic.in या वेबसाईटवर लॉग-इन करून ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. दिनांक 10 ऑगस्ट 2022 पासून ई-मेलव्दारे प्रवेशपत्र पाठविण्यात येणार आहे. त्या प्रिंट आऊटसह भरतीच्या ठिकाणी दिलेल्या तारखेस व वेळेत संबंधित उमेदवारांनी पोहचणे आवश्यक आहे. तरी या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी केले आहे.

00000

Wednesday, July 27, 2022

कुमाऊ रेजिमेंटचे कमांड अधिकारी कर्नल अक्षय सुरेश भगत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

 

कुमाऊ रेजिमेंटचे कमांड अधिकारी कर्नल अक्षय सुरेश भगत

यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

 

            अमरावती, दि.27: कुमाऊ रेजिमेंटचे कमांड अधिकारी कर्नल अक्षय सुरेश भगत हे जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात कार्यरत असतांना साहसी पराक्रमासाठी त्यांना महामहिम राष्ट्रपती यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी ‘सेना मेडल  प्रदान करून त्यांच्या गौरव केला. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर केला. कर्नल अक्षय सुरेश भगत सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सेवारत असल्यामुळे त्यांचे वडील सुरेश भगत यांना जिल्हा सैनिक अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार, बारा लाख रूपयांचे रोख पारितोषक प्रदान करण्यात आले.

कुमाऊ रेजिमेंटचे कमांड अधिकारी कर्नल अक्षय सुरेश भगत हे जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात कार्यरत असतांना 28 सप्टेंबर 2020 रोजी त्यांना आतंकवादयासंबंधी गुप्त माहिती प्राप्त झाली. ते लगेच आपल्या बरोबर काही निवडक जवान घेवून स्वत: मोहिमेवर निघाले. त्यांनी योग्य योजना आखून ताबोडतोड त्याजागेला घेरले. परंतु आतंकवादयांनी त्यांच्यावर हातगोळांच्या व इतर हत्यांरानी गोळ्यांचा वर्षाव केला. त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी त्याचे प्रतिउत्तर दिले. त्यामध्ये त्यांचा एक जवान जखमी झाला. त्या जवानाला त्यांनी प्रथमोपचार करून सुरक्षित जागेवर ठेवून शोध मोहिम सुरू ठेवली. त्यावेळी खूप रात्र झाली होती. अशातही त्यांनी जेसेबीच्या लाईटचा वापर करून दुसऱ्या आंतकवादयास ठार केले.

0000

 

 

 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात

कारगिल विजय दिवस साजरा

 

अमरावती, दि.27 : सैनिकी मुलींचे वसतीगृह येथे कारगिल विजय दिवस (26 जुलै) साजरा करण्यात आला. मेस्को अधिकारी मेजर जोशी, कारगील युद्धामध्ये भाग घेतलेले माजी हवालदार निर्मल कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीसह सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनेचे अध्यक्ष, माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यावेळी उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्ज्वलनानंतर दोन मिनिटे मौन बाळगून शहीद वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वीर पत्नी व वीर माता यांचा साडी, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माजी मेजर जोशी यांनी माजी सैनिक, वीर माता आणि वीर पत्नी यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

00000

 

‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’पॉवर @ 2047 चा शुभारंभ विविध मान्यवरांची उपस्थिती

 






‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्यपॉवर @ 2047 चा शुभारंभ

विविध मान्यवरांची उपस्थिती

 

अमरावती, दि.27 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि जिल्हा प्रशासनामार्फत ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य पॉवर @ 2047 या उर्जा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. गेल्या आठ वर्षात उर्जा क्षेत्रातील देदिप्यमान कामगिरीचा वेध घेण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यात आज मोर्शी येथेही स्वतंत्र कार्यक्रम झाला.

नियोजन भवनात शुभारंभ सोहळा झाला. आमदार सुलभाताई खोडके अध्यक्षस्थानी होत्या. आमदार प्रविण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, सुनील राणा, महावितरण प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता महावितरण पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंता पारेषण जयंत विके, उपव्यवस्थापक दीपक जैन, मयुर मेंढेकर, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, दीपक देवहाते, सुनील शेरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अर्थचक्राला गती देण्यात ऊर्जेची भूमिका महत्त्वाची - आमदार सुलभताई खोडके

तंत्रज्ञानाच्या काळात विकासाच्या अर्थचक्राला गती देण्यात ऊर्जेची भूमिका महत्त्वाची आहे. वीज नसेल तर विकास थांबतो. त्यामुळे विकासाची जननी असलेल्या ऊर्जा विकासात ऊर्जा विभागाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन आमदार सुलभाताई खोडके यांनी केले.

उज्ज्वल भारत उज्ज्वल महोत्सवातून वीज क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा जागर - आमदार प्रविण पोटे पाटील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा एक भाग म्हणून देशाची वाटचाल अपारंपरिक ऊर्जा निर्मितीकडे झाली आहे. ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल महोत्सवात वीज क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा जागर करण्यात आला आहे. ही बाब प्रशंसनीय आहे. याचाच एक भाग म्हणून ऊर्जा विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या घरावर सौर पॅनेल बसवून इतरांनाही प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन आमदार प्रविण पोटी पाटील यांनी केले. वादळ, वारा पावसात अविरत काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे यावेळी त्यांनी कौतुक केले.

मेळघाटातील अती दुर्गम भागातील 7 गावांच्या विद्युतीकरणात उर्जा विभागाला यश - आमदार प्रताप अडसड

      देशातील भौगोलिक परिस्थितीचे आव्हान असतांनाही ऊर्जा विभागाने देशभर वीजेचे जाळे विणले आहे. त्यामुळे 2018 मध्ये 100 टक्के गावांचे विद्युतीकरण आणि 100 टक्के घरांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात ऊर्जा विभागाला यश आले आहे. तसेच मेळघाटातील अती दुर्गम भागातील सात गावांचे विद्युतीकरणही उर्जा विभागाने केले असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले.

उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य हा कार्यक्रम आजादी का अमृत महोत्सवाचा भाग आहे. ऊर्जा क्षेत्रात मागील आठ वर्षात झालेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ऊर्जेच्या बाबतीत तुट असलेला भारत देश आता ऊर्जा पुरवठा करणारा झाला आहे. जिल्ह्यात अतिदुर्गम असलेल्या मेळघाटातील 7 आदिवासी पाड्याचे ऊर्जीकरण करणे ही महावितरणची उल्लेखनीय कामगिरी आहे. या शिवाय 21 कोटींचा निधी हा पारंपरिक पध्दतीने ऊर्जीकरण न झालेल्या 24 गावांसाठी राखून ठेवण्यात आला आहे.

मेळघाटातील ऊर्जा विकासासाठी धारणीत 132 केव्हीचे उपकेंद्र उभारण्यात आले आहे. त्यासाठी मध्यप्रदेश नेपानगर मधून वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच हिवरखेड ते धारणी असा 90 किमी लांबीचे डबल सर्कीट अती दुर्गम भागातून टाकण्यात आले असल्याची माहिती महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिली.

वीज क्षेत्राची यशोगाथा असलेल्या चित्रफिती यावेळी दाखविण्यात आल्या. तसेच नुक्कड नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊर्जा विकासाबाबत माहिती देण्यात आली. जिल्हास्तरावर विविध योजनेतून पूर्ण झालेल्या कामांची माहिती असलेल्या पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. लाभार्थ्यांनी यावेळी मनोगतही व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी केले. संचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांनी तर मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांनी आभार मानले.

00000

 

 

 

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...