Tuesday, August 2, 2022

मागासवर्गीय व्यक्तींसाठी असलेल्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे महामंडळाचे आवाहन

 

मागासवर्गीय व्यक्तींसाठी असलेल्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे महामंडळाचे आवाहन

अमरावती, दि.2: मागासवर्गीय व्यक्तींसाठी सुरु केलेली 20 टक्के बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

वैयक्तिक  व्याज परतावा योजना

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या ‘वैयक्तिक  व्याज परतावा योजनें’तर्गत जास्तीत जास्त 10 लक्ष रुपयांपर्यंत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध होऊ शकेल तसेच या कर्जाची नियमित कर्जफेड केल्यास व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या खात्यात दरमहा जमा करण्यात येईल. या योजनेच्या परतफेडीचा कालावधी बँकेच्या नियमावलीनुसार राहील. महामंडळाच्या संगणक प्रणाली www.msobcfdc.org (व्याज परतावा योजना) यावर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

थेट कर्ज योजना

थेट कर्ज योजनेची मर्यादा 1 लक्ष रुपये असून व्याज दर द.सा.द.शे 4 टक्के आहे. तसेच कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्षांचा आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही. ज्यांचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 अंक आहे, अशांना या कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.

20 टक्के बीज भांडवल योजना

20 टक्के बीज भांडवल योजनेंतर्गत 5 लक्ष रुपये मंजूर असून या रकमेपैकी 20 टक्के रक्कम महामंडळ, 75 टक्के बँक तसेच लाभार्थींचा सहभाग 5 टक्के राहील. महामंडळाचा व्याज दर द.सा.द.शे. 6 टक्के असून बँकेचा व्याज दर बँकेच्या प्रचलित दरानुसार राहील. परतफेडीचा कालावधी 5 वर्षांचा आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना

गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) एलएलपी, एफपीओ अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जाईल. त्या कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून केला जाईल. महामंडळाच्या संगणक प्रणाली www.msobcfdc.org               (गट कर्ज व्याज परतावा योजना) यावर नाव नोंदणी अनिवार्य आहे.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत उच्च शिक्षणासाठी राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम प्रवेशासाठी बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करण्यासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी 10 लक्ष रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रुपये एवढे कर्ज देण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्याचे वय 17 ते 30 वर्षे दरम्यानचे असावे. तसेच तो इ.मा.व. प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागासाठी 8 लक्ष रुपयांपर्यंत व शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत असावी.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे अथवा दुरध्वनी क्रमांक 0721-2550339 वर संपर्क साधाण्याचे आवाहन  जिल्हा व्यवस्थापक  एस. एस. तारे यांनी केले आहे.

 0000

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

 

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

अमरावती, दि. 02 :  शहरात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी, यासाठी पोलीस उपायुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून तो दि. 14 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे पोलीस उपायुक्त (अमरावती शहर)  प्रशांत राजे यांनी कळविले आहे.

00000

स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील चार शासकीय निवासी शाळांची निवड

 

स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील चार शासकीय निवासी शाळांची निवड

अमरावती, दि.28 : केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याच्या 75 च्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या अभियानांतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील चार शासकीय निवासी शाळांचे निवड झाली आहे. यामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा तसेच दर्यापूर तालुक्यातील सामदा, कासमपूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

            तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील गोरेगाव खुर्द येथील अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळेची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच या शाळेला राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील भंडारी नाथ येथील अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळेचीही या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

            पुरस्कारासाठी शालेय स्वच्छतेसंबंधी पाच विविध बाबींवर निवड निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षण व समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांनी या पुरस्कारासाठी ऑनलाईन सहभाग नोंदविला होता. त्यानंतर निवड समितीने प्रत्यक्ष भेट देऊन शाळांची तपासणी केली. यामध्ये पाणी, साबणाने हात स्वच्छ करणे, सुयोग्य वर्तणूक , कार्यक्षमता सुधार, स्वच्छता गृहे, देखभाल, दक्षता, कोविड नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे, संबंधित छायाचित्रे या बाबींवर प्रश्नावली व प्रत्यक्ष पाहाणी करण्यात आली. यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी सर्वसाधारण श्रेणीमधून 8 शाळांची तर उपश्रेणीमधून 30 शाळांची निवड करण्यात आली.

            अमरावती विभागात समाज कल्याण विभागाच्या एकूण 26 शाळा कार्यरत आहेत. या सर्व शाळा सुसज्ज शासकीय इमारतीत आहेत. येथील विद्यार्थ्यांना भोजन, निवास तसेच सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येतात. यामध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुम, अत्याधुनिक विज्ञान केंद्रे, निसर्गरम्य व अभ्यासपूरक वातावरण, ग्रंथालय, क्रीडांगण, व्यायामशाळा यासारख्या सुविधा प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोफत पुरविण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचीच परिणती म्हणून स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी या शाळांची निवड झाली आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी केले आहे. यासाठी त्यांनी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले.

00000

मिळकतीच्या मूल्याबाबत मुद्रांक शुल्क ठरविण्याची प्रक्रिया ऑनलाईन

 

मिळकतीच्या मूल्याबाबत मुद्रांक शुल्क ठरविण्याची प्रक्रिया ऑनलाईन

अमरावती, दि. 2 : मिळकतीचा योग्य बाजारभाव ठरवण्याच्या प्रक्रियेत त्याचे मुद्रांक शुल्क निश्चित करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज प्राप्त होतात. ही प्रक्रिया दि. 1 ऑगस्टपासून ऑनलाईन करण्यात आली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागाद्वारे ई-अभिनिर्णय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे अभिनिर्णय प्रकरणे ऑनलाईन अर्जाद्वारे (Online Adjudication Application) दाखल करण्याचे आवाहन सह जिल्हा निबंधक किशोरकुमार मगर यांनी केले आहे.

अशी आहे ऑनलाईन प्रक्रिया

ऑनलाईन प्रणालीची विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यावर त्याची प्रिंट घेऊन सह जिल्हा निबंधक कार्यालयात 30 दिवसांत सादर करावी. अर्जात त्रुटी किंवा इतर नोटीस असल्यास ऑनलाईन माहिती मिळणार आहे.

अडचण आल्यास संपर्क साधा

नागरिकांना ऑनलाईन अर्ज करताना कुठलीही अडचण आल्यास मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. मगर यांनी केले.

 

00000

मेळघाटातील अल्प पाऊस वगळता इतरत्र पावसाची नोंद नाही

 

मेळघाटातील अल्प पाऊस वगळता इतरत्र पावसाची नोंद नाही

            अमरावती, दि. 2 (विमाका) : अमरावती विभागात आज मेळघाट वगळता इतरत्र पावसाची नोंद नाही. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 0.1 पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 501.8 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.

                विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.

अमरावती जिल्हा : धारणी 1.5 (523.9), चिखलदरा 1.5 (791.4), अमरावती 1.5 (420.4), भातकूली 0.0 (341.2), नांदगाव खडेश्वर 0.0 (519.2), चांदूर रेल्वे 0.1 (445.8), तिवसा 0.0 (598.8), मोर्शी 0.0 (515.8), वरुड 0.0 (543.8), दर्यापूर 0.0 (325.3), अंजनगाव 0.0 (385.5), अचलपूर 0.0 (374.3), चांदूरबाजार 0.0 (560.6), धामणगाव रेल्वे 0.4 (637.1) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 0.3 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 488.2 मि.मि. पाऊस झाला.

अकोला जिल्हा :- अकोट 0.0 (260.3), तेल्हारा 0.0 (370.5), बाळापूर 0.0 (472.6), पातूर 0.0 (405.2),  अकोला 0.0 (448.1), बार्शी टाकळी 1.7 (372.1), मुर्तीजापूर 0.0 (353.8), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.2 मि.मि. तर आजवर 386.0 मि.मि पाऊस झाला आहे.

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 0.0 (299.8), संग्रामपूर 0.0 (368.6), चिखली 0.0 (439.0), बुलडाणा 0.0 (547.3), देऊळगाव राजा 0.0 (419.4), मेहकर 0.0 (454.2), सिंदखेड राजा 0.0 (463.9), लोणार 0.0 (385.8), खामगाव 0.0 (328.3), शेगाव 0.0 (404.9), मलकापूर 0.0 (287.6), मोताळा 0.0 (320.8), नांदूरा 0.0 (317.2), जिल्ह्यात दिवसभरात 0.0 तर यंदाच्या हंगामात आजवर 393.7 मि.मि. पाऊस झाला.

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 0.0 (610.7), बाभूळगाव 0.0 (620.8), कळंब 0.0 (631.1), दारव्हा 0.0 (501.5), दिग्रस 0.0 (598.6), आर्णी 0.0 (781.6), नेर 0.0 (537.8), पुसद 0.0 (483.0), उमरखेड 0.0 (615.5), महागाव 0.0 (674.9), वणी 1.1 (845.7), मारेगाव 0.0 (798.8), झरीजामणी 0.0 (744.7), केळापूर 0.0 (742.2), घाटंजी 0.0 (630.7), राळेगाव 0.4 (799.0), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.1 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 659.6 मि.मि पाऊस झालाआहे.

वाशिम जिल्हा : - वाशिम 0.0 (480.4), रिसोड 0.0 (510.4), मालेगाव 0.0 (523.8), मंगरुळपिर 0.0 (519.9), मानोरा 0.0 (590.3), कारंजा 0.0 (376.0), जिल्ह्यात 24 तासात 0.0 तर 1 जूनपासून आजवर 495.4 मि.मि. पाऊस झाला.

 

00000

Monday, August 1, 2022

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव प्रत्येक काम पूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असावे - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे



















महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव

प्रत्येक काम पूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असावे

-  विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 

अमरावती, दि. 1 : महसुली कामांबरोबरच इतर सर्व कामे पूर्ण होण्यासाठी महसूल विभागाला जबाबदारी पार पाडावी लागते. शासनाची प्रतिमा आपल्या कामांवर निर्भर असते. महसूल सेवेच्या माध्यमातून लोकसेवेची संधी आपल्याला मिळते. त्यामुळे ‘हे काम माझे नाही अशी भावना न बाळगता सर्व विभागांशी समन्वय ठेवून नागरिकांचे प्रत्येक काम पूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

महसूल दिनानिमित्त बचतभवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, रणजीत भोसले, विवेक घोडके, मनीष गायकवाड, तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी, प्रज्ञा महांडुळे, अधिक्षक उमेश खोडके यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

महसूल विभागातील उत्कृष्ट कार्याबद्दल यावेळी उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी, नायब तहसीलदार अक्षय मंडवे, अव्वल कारकून विजय भगत, मंडळ अधिकारी प्रकाश बमनोटे, महसूल सहायक पंकज खानझोडे,  तलाठी भूषण बोरोडे, वाहनचालक राजेश भांडे, शिपाई विजय ढोके, कोतवाल मनोहर नागपुरे, पोलीस पाटील सुधीर जामुनकर यांना यावेळी गौरविण्यात आले.  

 

विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. नागरिकांच्या हितासाठी शासनाचे काम पार पाडण्याची जबाबदारी मुख्यत्वे महसूल प्रशासनाला पार पाडावी लागते. कुठलीही नवीन योजना तयार होताना महसूल विभागाला गृहित धरून कार्यवाही होते. हा विश्वास कायम ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.

कार्यालयीन जबाबदारी समर्थपणे पूर्ण करतानाच आपल्यातील कलागुण व छंदही जोपासले पाहिजेत. विविध उपक्रमांत सहभाग घेतला पाहिजे. कार्यालयीन कामाचीही गुणवत्ता व गती वाढण्यास त्याचा निश्चित फायदा होता, असेही डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी   श्रीमती कौर म्हणाल्या की, जिल्ह्यात आज महसूलदिनी ‘स्वर्णजयंती महाराजस्व अभियान व ‘ई पीक पाहणीची सुरुवात होत आहे. अचलपूर तालुक्यात ई पीक पाहणीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यात उत्कृष्ट काम झाले. जिल्ह्यात ॲपद्वारे अद्याप 75 टक्के काम झाले. ते पूर्णत्वास न्यावे. मतदार नोंदणीला आधार कार्ड लिंक करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.  स्वर्णजयंती महाराजस्व अभियानात मंडळ स्तरावर नियमितपणे शिबिरे घेऊन नागरिकांची कामे पूर्ण करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले. अपर जिल्हाधिकारी श्री. सिद्धभट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. भोसले यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती महांडुळे यांनी आभार मानले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

00000

 

  

खादी उत्सवाला उत्साहात प्रारंभ खादी उद्योगातून शहरी व ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 





खादी उत्सवाला उत्साहात प्रारंभ

खादी उद्योगातून शहरी व ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. १ (विमाका) : खादी निर्मितीच्या उद्योगातून शहरी व ग्रामीण भागातील गरजू महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होऊ शकतो. खादीचा प्रचार व प्रसार केल्यास, तसेच खादी वापराला प्रोत्साहन दिल्यास या क्षेत्रात उद्योग व रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करता येतील. या माध्यमातून महिला सक्षमीकरण व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

 

स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व कस्तुरबा सौर खादी महिला समितीतर्फे आजपासून बडनेरा रस्त्यावरील तापडिया सिटी सेंटरच्या तिसऱ्या  मजल्यावर खादी उत्सव प्रदर्शन सुरू झाले, त्याचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. हे प्रदर्शन दि. १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुत्तेमवार, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदिप चेचरे,  तापडिया सिटी सेंटरचे कार्यकारी संचालक मधुर लढ्ढा, कस्तुरबा समितीच्या पदाधिकारी रुपाली खडसे, प्रणिता किडीले, कल्पना शेंडोकार, वर्षा चौधरी व वर्षा जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला पुष्प वाहून वंदन केले. 

 

हा संपूर्णतः महिलांनी महिलांसाठी राबविण्यात आलेला देशातील एकमेव प्रकल्प आहे.

 

कस्तुरबा सौर खादी महिला समिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्यापासून कच्चा माल तयार करते. हा कच्चा माल घेऊन विविध गावातील बचत गटातील महिलाभगिनींकडून चरख्यावर सूतकताई करण्यात येते. त्यानंतर त्यापासून सौर खादी कापड व विविध सौर खादी उत्पादनांची निर्मिती होते.

 

या प्रकल्पात अमरावती जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त महिलांना कायमस्वरूपी रोजगार प्राप्त झाला आहे. त्यामध्ये अमरावती जिल्हयातील धारणी तालुक्यातील १०० आदिवासी महिलांचा समावेश आहे. तसेच धारणी तालुक्यातील मांडू या गावी विणकाम केंद्र स्थापन केले असून तेथील १५ पेक्षा जास्त युवक- युवतींना उदरनिर्वाहाकरिता कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती श्री. चेचरे यांनी यावेळी दिली.

 

            या प्रदर्शनात खादीपासून तयार करण्यात आलेली महिला, बालके, ज्येष्ठ, युवक आदी सर्वांसाठीची सर्व प्रकारची वस्त्र प्रावरणे विक्रीस उपलब्ध आहेत. खादी सर्वदूर पोहोचावी यासाठी नवनव्या बाजारपेठांचा  शोध घेऊन ब्रँड डेव्हलप करण्याचा प्रयत्न होत आहे, असे श्रीमती खडसे यांनी यावेळी सांगितले.

 

000000

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...