Monday, November 21, 2022

परिवहन विभागातर्फे बाईक रॅलीद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती



 

परिवहन विभागातर्फे बाईक रॅलीद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती

अमरावती, दि. २१ : जागतिक अपघातग्रस्त स्मृतिदिनानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षाविषयक जनजागृतीसाठी शहरात आज मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्यात ५० परिवहन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  सहभाग घेतला.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविला जातो. यावेळी प्रादेशिक  परिवहन अधिकारी आर. टी. गित्ते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागडी, सहायक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके, निरीक्षक वैभव गुल्हाने यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील इर्विन चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक अशा प्रमुख ठिकाणांना रॅलीने भेट देत रस्ता विषयक  सुरक्षितता व दक्षतेबाबत जनजागृती करण्यात आली.  रॅलीने टोलनाक्यांनाही भेट देऊन रस्ता सुरक्षितता नियमांची पत्रके वाहनचालकांना वाटण्यात आली. रॅलीत परिवहन विभागाचे ५० अधिकारी व कर्मचारी बाईकवर हेल्मेटसह सहभागी झाले होते.

नांदगावपेठ टोल नाक्यावर रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रम झाला. त्यात विविध वाहनचालक, एसटी महामंडळ कर्मचारी व प्रवासी अशा सुमारे दीडशे व्यक्तींनी सहभाग नोंदवला. यावेळी सर्वांनी दक्षता पालनाबाबत प्रतिज्ञाही घेतली. अपघात टाळण्यासाठी सर्वांनी दक्षता नियमांचे संघटितपणे पालन करूया, असे आवाहन यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. गित्ते यांनी केले.

00000

 

Saturday, November 19, 2022

आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा स्पर्धेत यश मिळवितांना…परिसंवादाचा सूर


 





आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा

स्पर्धेत यश मिळवितांना…परिसंवादाचा सूर

 

अमरावती, दि. 19 (विमाका) : अमरावती जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय मराठी ग्रंथालयात आयोजित ‘जिल्हा ग्रंथोत्सवा’त आज ‘स्पर्धेत यश मिळवितांना’ या विषयावर परिसंवादचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपायुक्त विक्रम साळी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तहसीलदार मदन जाधव यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी स्वानुभवातून मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. साळी म्हणाले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना स्वयंप्रेरित असणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धा परिक्षांसाठी तयारी करतांना इतरांशी स्वत:ची तुलना करु नका. कालपेक्षा आज आपली काय प्रगती झाली, याबाबत स्वत:शी  संवाद साधा. परीक्षा देतांना आव्हानांचा स्वीकार आनंदाने आणि सकारात्मकतेने करा. वाचन केवळ परीक्षेच्या यशप्राप्तीपुरतेच न ठेवता ही सवय आयुष्यभर अंगिकारा. ज्या पदावर तुमची नियुक्ती झाली आहे, त्या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी निरपेक्ष वृत्ती स्वत:मध्ये रुजवा. ध्येय निश्चिती आणि सकारात्मकतेमुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविणे कठीण नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून ध्येय निश्चित करावे. समाज माध्यमांचा अगदी जुजबी वापर करावा. आज सर्वत्र स्पर्धेचे युग असल्यामुळे आपले प्रयत्न इतरांपेक्षा सरस ठरतील, यासाठी अविरत प्रयत्नशील रहाणे गरजेचे आहे. स्वत:ची टिपणे काढा. बाजारात तयार साहित्यांवर विसंबून राहू नका. अपयशाने खचून न जाता सकारात्मक वृत्ती बाळगा. प्रबळ इच्छाशक्ती, चौफेर वाचन आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षा अवघड नाहीत, असे मत श्रीमती वर्षा भाकरे यांनी व्यक्त केले.

आपले इच्छित ध्येय गाठेपर्यंत विश्रांती घेऊ नका. समाजमाध्यमांच्या वापराबाबत स्वत:वर निर्बंध लादा. तुम्हीच तुमचे परीक्षक व्हा. ज्यावेळी तुम्ही स्वत:वर नियंत्रण मिळवू शकाल, त्यावेळी स्पर्धेत यश मिळविणे कठीण नाही. बदलांचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवा. अवांतर वाचनासह संदर्भग्रंथांचे वाचन वाढवा. दैनंदिन वृत्तपत्रांच्या नोंदी घ्या. अनावश्यक वेळ कुठेही खर्च होणार नाही, यांची दक्षता घ्या. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी आनंदाने स्वीकारा. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही रोजची आव्हाने संपत नाही. यासाठी केवळ स्पर्धेपुरतेच नाही तर यशस्वी आयुष्य जगण्यासाठी शरीरासह मनाचीही मशागत करा. अपयश आल्यास खचून जावू नका. तर उपलब्ध दुसऱ्या पर्यायाकडे वळण्याचा संदेश मदन जाधव यांनी दिला.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे यांनी केले. विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी तसेच विद्यार्थी, ग्रंथप्रेमी, साहित्यरसिक, नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.  

00000

Friday, November 18, 2022

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा ग्रंथदिंडीने शुभारंभ वाचन संस्कृती रुजविणाऱ्या पोस्टरांच्या माध्यमातून जनजागृती

 







दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा ग्रंथदिंडीने शुभारंभ

वाचन संस्कृती रुजविणाऱ्या पोस्टरांच्या माध्यमातून जनजागृती

 

       अमरावती, दि. १८ : जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याव्दारे दि. १८ व १९ नोव्हेंबरला आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीने आज (दि. 18 नोव्हेंबर) झाला.

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे, तहसीलदार संतोष काकडे, सहायक ग्रंथालय संचालक अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे यांचेसह विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत इर्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते विभागीय ग्रंथालय कार्यालयापर्यंत ग्रंथ व पुस्तकाने सजलेल्या देखन्या पालखीसह ग्रंथदिंडीचे मार्गक्रमण झाले.

या ग्रंथदिंडीत जिल्हा परिषद शासकीय मुलींची शाळेच्या विद्यार्थींनींनी मंगेश पाडगावकर लिखीत

ग्रंथ आमचे हाती, ग्रंथ आमचे साथी ! ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती !

जयाला नसे आवड वाचनाची, कसा गोडी चाखील तो जीवनाची !

ग्रंथालयावीण जो गाव राही, तिथे जीवना अर्थ काहीच नाही !

अशा वाचन संस्कृतीचे महत्व विशद करणाऱ्या विविध पोस्टरांच्या माध्यमातून जनजागृती केली. गणतूसवातील ग्रंथ प्रदर्शन व विक्री उद्या शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर ला रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली आहे ग्रंथप्रेमी आणि नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुरज मडावी यांनी केले आहे.

00000

अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित - खासदार डॉ. अनिल बोंडे

 







अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित

- खासदार डॉ. अनिल बोंडे

 

अमरावती, दि. 18  : ग्रंथदिंडी, कवी, लेखक, रसिक, वाचकांची मांदियाळी, वाङमय चर्चा, परिसंवाद, कवीसंमेलन असा भरगच्च कार्यक्रम असलेल्या अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ आज झाला. अमरावती जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय मराठी ग्रंथालयात आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी पवनीत कौर  यांच्या उपस्थितीत झाला. ग्रंथोत्सवानिमित्त शहरातून उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे, तहसीलदार संतोष काकडे तसेच ग्रंथप्रेमी, साहित्यरसिक, नागरिक यावेळी उपस्थित होते.  खासदार डॉ. बोंडे म्हणाले की, वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी,  ‘ग्रंथोत्सव’ घेतला जातो. लेखक, वाचक आणि प्रकाशक या त्रिवेणी संगमातून संस्कारक्षम विचार करणारी पिढी तयार होते. ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित असल्याचे खासदार डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, वाचन संस्कृतीच्या माध्यमातून माणूस घडत असतो.

वाचनाची गोडी लहानपणापासून लागल्यास त्या व्यक्तीतील वैचारिक प्रगल्भता वाढीस लागते. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण प्रत्येकाने अंगीकारणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून तर तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून आयुष्याचे सार समजावून सांगितले आहे. संत एकनाथ महाराजांनी ‘भारुड’ तर अन्य संतांनीही ओवी तसेच ग्रंथांच्या माध्यमातून जगण्याची मूल्ये सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडली आहेत. वेदकाळापासून ग्रंथांचे महत्त्व अबाधित आहे. संतांची शिकवण आज आपल्याला ग्रंथांच्या माध्यमातून मिळते. यावरुन आपल्या पूर्वजांना असणारे ग्रंथांचे महत्त्व जाणवते.  आज वाचनाची माध्यमे बदलत आहे. ऑडिओ बुकच्या माध्यमातून पुस्तके ऐकता येतात. ई-बुक्स एका क्लिकवर उपलब्ध आहेत. परंतु पुस्तक हातात धरुन केलेल्या वाचनाची अनुभूती हा वेगळा आनंद आहे.

            श्रीमती पवनीत कौर यांनी ग्रंथालयाची पाहणी करून स्पर्धा परीक्षा तसेच महिला कक्षातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. याप्रसंगी प्रकाशक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर बजाज, विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर आदी उपस्थित होते.

ग्रंथोत्सवातील ग्रंथ प्रदर्शन व विक्री उद्या शनिवार दि. 19 नोव्हेंबर 2022 पर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. ग्रंथप्रेमी आणि नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुरज मडावी यांनी केले आहे.

00000

Thursday, November 17, 2022

मूग,उडीद आणि सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

मूग,उडीद आणि सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी

 शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन 


        अमरावती, दि. 17 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडमार्फत हंगाम 2022-23 मध्ये मूग, उडीद आणि सोयाबीनसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी खरेदी सुरू करण्यात आली आहे. यासाठी मूग 7 हजार 755 रूपये, उडीद 6 हजार 600 रूपये व सोयाबीन 4 हजार 300 रूपये प्रती क्विंटल भाव शासनाने निश्चित केले आहेत.  

      नोंदणीसाठी हंगाम 2022-23 मधील पीक पेरा नोंद असलेल्या तलाठ्याचे सही, शिक्क्यानिशी ऑनलाइन सात-बारा, आधारकार्डची छायांकित प्रत, बँक पासबुक छायांकित प्रत सोबत आणावी. बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे पूर्ण नाव, खाते क्रमांक, आय. एफ. एस. सी. कोड स्पष्ट नमुद असावा. यामध्ये जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये. जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत चांदुररेल्वे, दर्यापूर, धारणी, तिवसा, अचलपूर येथे खरेदी विक्री संघामार्फत तसेच अचलपूर येथे जयसिंग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पथ्रोट व नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नेरपिंगळाई मार्फत नोंदणी सुरू आहे. 

      वरील केंद्राच्या ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीन हमी भावाने खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 

000000

‘बालविवाहमुक्त जिल्हा’ अभियान प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी पवनीत कौर








 ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ अभियान प्रभावीपणे राबवा

 

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

       अमरावती, दि. 17 : ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय यंत्रणांनी एकत्रित येऊन काम करावे. जिल्हा, तालुका तसेच सर्व ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासनाने या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपले गाव ‘बालविवाहमुक्त गाव’ म्हणून घोषित व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्हा महिला व बाल विकास विभाग तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा आढावा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी उमेश टेकाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

            बालविवाहमुक्त जिल्हा अभियान राबविण्यासाठी जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावरील प्रशासकीय यंत्रणांना प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये शिक्षण विभाग, महिला बाल विकास विभाग, पोलीस विभाग, ग्राम विकास विभाग तसेच आरोग्य विभाग या विभागांना प्रशिक्षण देण्यात येईल. गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविकायांनी गावात होणारे बालविवाह टाळण्यासाठी गावकऱ्यांना समुपदेशन करावे. ‘आमच्या गावात एकही बालविवाह होणार नाही’, असा ठराव ग्रामसभेमध्ये सर्वानुमते मंजूर करुन घेण्यात यावा, जेणेकरुन कोणत्याही गावात बालविवाह होणार असल्यास त्याची माहिती तात्काळ प्रशासनाला कळेल आणि प्रशासन यावर कारवाई करु शकेल, अशी माहिती श्रीमती कौर यांनी यावेळी दिली.

            टास्क फोर्स बैठकींतर्गत कोविड काळामध्ये पालक गमावलेल्या बालकांच्या सद्य:स्थितीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. कोविडमध्ये एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 477, तर दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 19 आहे. या 19 पैकी 15 बालकांना केंद्र शासनामार्फत 10 लक्ष रुपये तर राज्य शासनामार्फत 5 लक्ष रुपये अशी एकूण 15 लक्ष रुपयांची मदत करण्यात आलेली आहे. या मुलांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती अजय डबले यांनी यावेळी दिली.

            बालकांच्या संरक्षणासाठी 1098 या हेल्पलाईन क्रमांकाला सर्वत्र प्रसिद्धी देण्यात यावी. पोलीस विभागांच्या गाड्यांवर हा हेल्पलाईन क्रमांक लावण्यात यावा तसेच प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात या क्रमांकाची प्रसिद्धी करण्यात यावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांना गरजेच्यावेळी हा क्रमांक लक्षात राहील.

            बाल कल्याण समितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. अल्पवयीन अविवाहित गरोदर मुलींचा निवाऱ्याचा प्रश्न उपस्थित होतो, अशावेळी या मुलींना प्रसुती होईपर्यंत वन स्टॉप सेंटरला ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले.

            जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत दि. 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दत्तक विधान सप्ताह राबविण्यात येत आहे. यासाठी www.cara.nic.in (टोल फ्रि क्रमांक 1800111311) या संकेतस्थळावर नोंदणी करुन इच्छुक पालक कायदेशीररित्या मुल दत्तक घेऊ शकतात. अवैध पद्धतीने मुल दत्तक घेतल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. याबाबतच्या भित्तीपत्रकाचे यावेळी जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

00000

Wednesday, November 9, 2022

विधी सेवा प्राधिकरणामार्फत रविवारी नियोजनभवनात महाशिबिर

विधी सेवा प्राधिकरणामार्फत  रविवारी नियोजनभवनात महाशिबिर

 

अमरावती, दि. 9 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने

 ‘विधी सेवा महाशिबिर’  रविवार, दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे उपस्थित असतील. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. पाटकर अध्यक्षस्थानी असतील.

            ‘कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाव्दारे नागरिकांचे सशक्तीकरण आणि हक हमारा भी तो है 75’ या विषयावर हे महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. इच्छुकांनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. शोएब  खान यांनी केले आहे.

00000 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...