Thursday, November 24, 2022

आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

 

आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व

प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

अमरावती, दि. 24 (जिमाका) : आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत शासनाव्दारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरीक्षेसाठी विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो. या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील हवा. उमेदवाराचे वय 1 डिसेंबर 2022 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण तसेच दि. 15 मार्च 2023 रोजी 30 वर्ष पूर्ण केलेले असावे. उमेदवार किमान दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. सद्यस्थितीत तो कोणतेही शिक्षण अथवा प्रशिक्षण घेत नसावा. इच्छुक उमेदवारांनी दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, जयस्तंभ चौक, मातोश्री मंगल कार्यालयामागे, लाल पुलाजवळ, अचलपूर, कॅम्प परवाडा ता. अचलपूर येथे संपर्क साधावा. 

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 07223-221205 तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 7709432024 येथे संपर्क साधावा. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दहावी उत्तीर्णची गुणपत्रिका, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ऑनलाईन कार्ड, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास कार्यालयात नाव नोंदविल्याचे नोंदणी कार्ड इत्यादी आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती व अलीकडच्या काळातील छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करु नये. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अ.सं. ठाकरे यांनी केले आहे. 

00000

Wednesday, November 23, 2022

ग्रंथोत्सवात रंगली काव्य मैफल

 


ग्रंथोत्सवात रंगली काव्य मैफल

अमरावती, दि. 23 (जिमाका) :  वाचन संस्कृती वृध्दिंगत होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर अमरावती शासकीय विभागीय ग्रंथालय येथे नुकतेच ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रंथदिंडीसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, विविध विषयांवर परिसंवाद, एकपात्री प्रयोग तसेच कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या विविधरंगी कार्यक्रमांना वाचक, लेखक, ग्रंथप्रेमी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘जे न देखे रवि, ते देखे कवि’ या उक्तीनुसार कवी संमेलनामध्ये कवींनी बहारदार काव्य सादर केले. प्रतिभाशाली काव्यातून कवि संमेलनाची मैफल रंगली. करुण, वीर, हास्य अशा नऊही रसांनीयुक्त कवितांचे सादरीकरण करुन कवींनी त्यांच्या भावना उलगडल्यात.
कवी संमेलनाचे अध्यक्ष राज यावलीकर यांनी वऱ्हाडी थाटात कविता सादर केल्या. ग्रामीण जीवनाचे हुबेहुब वर्णन त्यांनी काव्यातून मांडले. विष्णू सोळंके यांनी देशभक्तीपर रोमहर्षक गीत सादर केले. अनंत नांदूरकर यांचे मराठीसह हिंदी आणि ऊर्दू भाषेतून बहारदार गजल सादर केल्या. संघमित्रा खंडारे यांनी ‘माऊली’ या विषयावर काव्य सादर केले. भगवान फाळके, प्रा. ज्ञानेश्वर गटकर, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी विविध विषयांवर स्वरचित कविता सादर केल्या. कवी संमेलनाला रसिकांनी भरभरुन दाद दिली. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिध्द निवेदक पवन नालट यांनी केले.
                                           समाज माध्यमे आणि साहित्य : परिसंवाद

ग्रंथोत्सवात आयोजित ‘समाज माध्यमे आणि साहित्य’ या परिसंवादात तपोवन संस्थेचे सचिव तथा प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी मार्गदर्शन केले. आज सर्वत्र समाज माध्यमांव्दारे माहितीचा ओघ सातत्त्याने वाहत आहे. या माहितीच्या प्रवाहात वाहून न जाता यातील नेमके काय घ्यावे, याची समज असायला हवी. प्रत्येक काळातील साहित्य हा त्या समाजाचा आरसा असतो. साहित्याचा प्रसार करण्यासाठी समाज माध्यमाची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रसिध्द चित्रकार सुनील यावलीकर, प्रा. ज्ञानेश्वर गटकर यांनी समाज माध्यमांच्या काळातही पुस्तकांचे महत्त्व अबाधित असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

 वाङ्मय चर्चा, विविध विषयावर परिसंवाद, एकपात्री प्रयोग, पुस्तक प्रदर्शन व विक्री, मुलाखत आणि काव्य मैफल या भरगच्च कार्यक्रमाने ग्रंथोत्सव उत्साहात साजरा झाला.
विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे, अविनाश दुधे, प्रा. हेमंत खडके आदी यावेळी उपस्थित होते.
 
00000

Monday, November 21, 2022

जिल्हाधिकाऱ्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद





 

जिल्हाधिकाऱ्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद


अमरावती, दि. २१ : श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र पदवीच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचनाविज्ञान केंद्राला भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतली.


जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध विषयांवर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे कामकाज, यंत्रणेचे स्वरूप व जबाबदारी आदी विविध विषयांबाबत विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

०००

परिवहन विभागातर्फे बाईक रॅलीद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती



 

परिवहन विभागातर्फे बाईक रॅलीद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती

अमरावती, दि. २१ : जागतिक अपघातग्रस्त स्मृतिदिनानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षाविषयक जनजागृतीसाठी शहरात आज मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्यात ५० परिवहन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  सहभाग घेतला.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविला जातो. यावेळी प्रादेशिक  परिवहन अधिकारी आर. टी. गित्ते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागडी, सहायक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके, निरीक्षक वैभव गुल्हाने यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील इर्विन चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक अशा प्रमुख ठिकाणांना रॅलीने भेट देत रस्ता विषयक  सुरक्षितता व दक्षतेबाबत जनजागृती करण्यात आली.  रॅलीने टोलनाक्यांनाही भेट देऊन रस्ता सुरक्षितता नियमांची पत्रके वाहनचालकांना वाटण्यात आली. रॅलीत परिवहन विभागाचे ५० अधिकारी व कर्मचारी बाईकवर हेल्मेटसह सहभागी झाले होते.

नांदगावपेठ टोल नाक्यावर रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रम झाला. त्यात विविध वाहनचालक, एसटी महामंडळ कर्मचारी व प्रवासी अशा सुमारे दीडशे व्यक्तींनी सहभाग नोंदवला. यावेळी सर्वांनी दक्षता पालनाबाबत प्रतिज्ञाही घेतली. अपघात टाळण्यासाठी सर्वांनी दक्षता नियमांचे संघटितपणे पालन करूया, असे आवाहन यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. गित्ते यांनी केले.

00000

 

Saturday, November 19, 2022

आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा स्पर्धेत यश मिळवितांना…परिसंवादाचा सूर


 





आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा

स्पर्धेत यश मिळवितांना…परिसंवादाचा सूर

 

अमरावती, दि. 19 (विमाका) : अमरावती जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय मराठी ग्रंथालयात आयोजित ‘जिल्हा ग्रंथोत्सवा’त आज ‘स्पर्धेत यश मिळवितांना’ या विषयावर परिसंवादचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपायुक्त विक्रम साळी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तहसीलदार मदन जाधव यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी स्वानुभवातून मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. साळी म्हणाले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना स्वयंप्रेरित असणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धा परिक्षांसाठी तयारी करतांना इतरांशी स्वत:ची तुलना करु नका. कालपेक्षा आज आपली काय प्रगती झाली, याबाबत स्वत:शी  संवाद साधा. परीक्षा देतांना आव्हानांचा स्वीकार आनंदाने आणि सकारात्मकतेने करा. वाचन केवळ परीक्षेच्या यशप्राप्तीपुरतेच न ठेवता ही सवय आयुष्यभर अंगिकारा. ज्या पदावर तुमची नियुक्ती झाली आहे, त्या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी निरपेक्ष वृत्ती स्वत:मध्ये रुजवा. ध्येय निश्चिती आणि सकारात्मकतेमुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविणे कठीण नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून ध्येय निश्चित करावे. समाज माध्यमांचा अगदी जुजबी वापर करावा. आज सर्वत्र स्पर्धेचे युग असल्यामुळे आपले प्रयत्न इतरांपेक्षा सरस ठरतील, यासाठी अविरत प्रयत्नशील रहाणे गरजेचे आहे. स्वत:ची टिपणे काढा. बाजारात तयार साहित्यांवर विसंबून राहू नका. अपयशाने खचून न जाता सकारात्मक वृत्ती बाळगा. प्रबळ इच्छाशक्ती, चौफेर वाचन आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षा अवघड नाहीत, असे मत श्रीमती वर्षा भाकरे यांनी व्यक्त केले.

आपले इच्छित ध्येय गाठेपर्यंत विश्रांती घेऊ नका. समाजमाध्यमांच्या वापराबाबत स्वत:वर निर्बंध लादा. तुम्हीच तुमचे परीक्षक व्हा. ज्यावेळी तुम्ही स्वत:वर नियंत्रण मिळवू शकाल, त्यावेळी स्पर्धेत यश मिळविणे कठीण नाही. बदलांचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवा. अवांतर वाचनासह संदर्भग्रंथांचे वाचन वाढवा. दैनंदिन वृत्तपत्रांच्या नोंदी घ्या. अनावश्यक वेळ कुठेही खर्च होणार नाही, यांची दक्षता घ्या. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी आनंदाने स्वीकारा. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही रोजची आव्हाने संपत नाही. यासाठी केवळ स्पर्धेपुरतेच नाही तर यशस्वी आयुष्य जगण्यासाठी शरीरासह मनाचीही मशागत करा. अपयश आल्यास खचून जावू नका. तर उपलब्ध दुसऱ्या पर्यायाकडे वळण्याचा संदेश मदन जाधव यांनी दिला.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे यांनी केले. विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी तसेच विद्यार्थी, ग्रंथप्रेमी, साहित्यरसिक, नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.  

00000

Friday, November 18, 2022

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा ग्रंथदिंडीने शुभारंभ वाचन संस्कृती रुजविणाऱ्या पोस्टरांच्या माध्यमातून जनजागृती

 







दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा ग्रंथदिंडीने शुभारंभ

वाचन संस्कृती रुजविणाऱ्या पोस्टरांच्या माध्यमातून जनजागृती

 

       अमरावती, दि. १८ : जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याव्दारे दि. १८ व १९ नोव्हेंबरला आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीने आज (दि. 18 नोव्हेंबर) झाला.

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे, तहसीलदार संतोष काकडे, सहायक ग्रंथालय संचालक अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे यांचेसह विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत इर्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते विभागीय ग्रंथालय कार्यालयापर्यंत ग्रंथ व पुस्तकाने सजलेल्या देखन्या पालखीसह ग्रंथदिंडीचे मार्गक्रमण झाले.

या ग्रंथदिंडीत जिल्हा परिषद शासकीय मुलींची शाळेच्या विद्यार्थींनींनी मंगेश पाडगावकर लिखीत

ग्रंथ आमचे हाती, ग्रंथ आमचे साथी ! ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती !

जयाला नसे आवड वाचनाची, कसा गोडी चाखील तो जीवनाची !

ग्रंथालयावीण जो गाव राही, तिथे जीवना अर्थ काहीच नाही !

अशा वाचन संस्कृतीचे महत्व विशद करणाऱ्या विविध पोस्टरांच्या माध्यमातून जनजागृती केली. गणतूसवातील ग्रंथ प्रदर्शन व विक्री उद्या शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर ला रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली आहे ग्रंथप्रेमी आणि नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुरज मडावी यांनी केले आहे.

00000

अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित - खासदार डॉ. अनिल बोंडे

 







अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित

- खासदार डॉ. अनिल बोंडे

 

अमरावती, दि. 18  : ग्रंथदिंडी, कवी, लेखक, रसिक, वाचकांची मांदियाळी, वाङमय चर्चा, परिसंवाद, कवीसंमेलन असा भरगच्च कार्यक्रम असलेल्या अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ आज झाला. अमरावती जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय मराठी ग्रंथालयात आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी पवनीत कौर  यांच्या उपस्थितीत झाला. ग्रंथोत्सवानिमित्त शहरातून उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे, तहसीलदार संतोष काकडे तसेच ग्रंथप्रेमी, साहित्यरसिक, नागरिक यावेळी उपस्थित होते.  खासदार डॉ. बोंडे म्हणाले की, वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी,  ‘ग्रंथोत्सव’ घेतला जातो. लेखक, वाचक आणि प्रकाशक या त्रिवेणी संगमातून संस्कारक्षम विचार करणारी पिढी तयार होते. ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित असल्याचे खासदार डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, वाचन संस्कृतीच्या माध्यमातून माणूस घडत असतो.

वाचनाची गोडी लहानपणापासून लागल्यास त्या व्यक्तीतील वैचारिक प्रगल्भता वाढीस लागते. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण प्रत्येकाने अंगीकारणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून तर तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून आयुष्याचे सार समजावून सांगितले आहे. संत एकनाथ महाराजांनी ‘भारुड’ तर अन्य संतांनीही ओवी तसेच ग्रंथांच्या माध्यमातून जगण्याची मूल्ये सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडली आहेत. वेदकाळापासून ग्रंथांचे महत्त्व अबाधित आहे. संतांची शिकवण आज आपल्याला ग्रंथांच्या माध्यमातून मिळते. यावरुन आपल्या पूर्वजांना असणारे ग्रंथांचे महत्त्व जाणवते.  आज वाचनाची माध्यमे बदलत आहे. ऑडिओ बुकच्या माध्यमातून पुस्तके ऐकता येतात. ई-बुक्स एका क्लिकवर उपलब्ध आहेत. परंतु पुस्तक हातात धरुन केलेल्या वाचनाची अनुभूती हा वेगळा आनंद आहे.

            श्रीमती पवनीत कौर यांनी ग्रंथालयाची पाहणी करून स्पर्धा परीक्षा तसेच महिला कक्षातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. याप्रसंगी प्रकाशक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर बजाज, विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर आदी उपस्थित होते.

ग्रंथोत्सवातील ग्रंथ प्रदर्शन व विक्री उद्या शनिवार दि. 19 नोव्हेंबर 2022 पर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. ग्रंथप्रेमी आणि नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुरज मडावी यांनी केले आहे.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...