Friday, November 25, 2022

संविधानदिन ते महापरिनिर्वाणदिनादरम्यान साजरे होणार ‘समता पर्व’ समाजकल्याण कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन

संविधानदिन ते महापरिनिर्वाणदिनादरम्यान साजरे होणार ‘समता पर्व’

समाजकल्याण कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती दि. 25: जिल्ह्यात संविधानदिन (दि. 26 नोव्हेंबर) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (दि. 6 डिसेंबर) दरम्यान समता पर्व साजरे करण्यात येणार असून, त्यात समाजकल्याण कार्यालयातर्फे रोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

संविधानदिनी दि. 26 नोव्हेंबरला सामाजिक न्यायभवनात, तसेच सर्व कार्यालये, शाळा-महाविद्यालयात संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन होणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली. त्या म्हणाल्या की, संविधानदिनी प्रभात फेरीही काढण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करुन प्रभात फेरी इर्विन चौक ते पंचवटी येथे जाऊन डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकास अभिवादन करुन सामाजिक न्याय भवनापर्यंत जाईल.

 त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, तसेच डॉ. राजेश मिरगे यांचे संविधान जागृती या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने दीडशे व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येईल.

दुस-या दिवशी अर्थात दि. 27 नोव्हेंबरला महाविद्यालये, शाळा, वसतिगृहे, निवासी शाळा तसेच आश्रमशाळा  येथे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, लेखी परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम होतील. दि. 28 नोव्हेंबरला सामाजिक न्याय भवन येथे संविधानविषयक व्याख्यान होईल. दि. 29 नोव्हेंबरला सामाजिक न्याय भवन येथे (सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा) या विषयावर पत्रकार  कार्यशाळा होईल. दि. 30 नोव्हेंबरला अनुसूचित जाती उत्थान, दशा आणि दिशा या विषयावर भित्तीपत्रक, पोस्टर्स, बॅनर, चित्रकला स्पर्धा होईल. तसेच सामाजिक कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग यांच्यासाठी कार्यशाळा होईल. दि. 1 डिसेंबरला जिल्हा स्तरावर युवा गटांची कार्यशाळा होईल.

उपक्रमात दि. 2 डिसेंबरला अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीला भेटी देण्याचा कार्यक्रम होईल. दि. 3 डिसेंबरला जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर, तसेच सर्व तालुकास्तरावर योजना माहिती कार्यशाळा होईल. दि. 4 डिसेंबरला ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी व वृद्धांसाठी माहिती कार्यशाळा होईल. दि. 5 डिसेंबरला संविधान जागृती सांस्कृतिक कार्यक्रम होईल. महापरिनिर्वाण दिनी दि. 6 डिसेंबरला समारोप कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप, बक्षीस वितरण आदी कार्यक्रम होतील. या पर्वात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीमती केदार यांनी केले.

 ०००

 

संविधानदिनी कार्यालये व शाळांमध्ये उद्देशिकेचे सामूहिक वाचन अधिकाधिक सहभागाबाबत जिल्हाधिका-यांचे आवाहन

 

संविधानदिनी कार्यालये व शाळांमध्ये उद्देशिकेचे सामूहिक वाचन
अधिकाधिक सहभागाबाबत जिल्हाधिका-यांचे आवाहन 
          
          अमरावती, दि. 25 - भारतीय संविधानाबाबत जनजागृतीसाठी संविधान दिनानिमित्त शनिवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सर्व कार्यालये व शाळा-महाविद्यालयांत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. या उपक्रमात अधिकाधिक संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. संविधानदिनानिमित्त समाजकल्याण आयुक्तालय व जिल्हा प्रशासनातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. संविधानबाबत जनजागृती व्हावी यासाठी शाळा व संस्थांनी संविधान यात्रा काढावी. संविधानाची उद्देशिका, मूलभूत हक्क, कर्तव्ये, जबाबदा-या आदी महत्वाची कलमे ठळकरित्या फलकांद्वारे प्रदर्शित करावेत. निबंध, भित्तीपत्रके, मूलभूत तत्वांवर चर्चा, वेबिनार, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले. संविधानातील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व त्यांना जागरूक नागरिक बनवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे, असे समाजकल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी सांगितले. 
00000

क्षयरुग्णांच्या मदतीसाठी बना ‘निक्षय मित्र’

 

क्षयरुग्णांच्या मदतीसाठी बना ‘निक्षय मित्र’

अमरावती, दि. 25 : केंद्र शासनाने प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान हा उपक्रम देशभर सुरु केला आहे. सन 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या उपक्रमाबाबत जनजागृती होण्यासाठी क्षयरुग्णांना वेगवेगळ्या पध्दतीने मदत देऊन त्यांना औषधोपचार मिळून देण्यात येत आहे. क्षयरुग्णांना मदत म्हणून ‘निक्षय मित्र नोंदणी’ करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड यांनी केले आहे.

            प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत देशातून क्षयरोग दुरीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. समाजातील विविध घटक जसे दानशूर व्यक्ती, राजकीय व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, इतर कार्यालय व संस्था, औद्योगिक संस्था, राजकीय संस्था अशा नोंदणी केलेल्या निक्षय मित्रांमार्फत आवश्यकतेनुसार क्षयरुग्णांच्या पोषक आहारात सहाय्य दिले जाते. यासाठी जिल्हा क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उपचार मिळणाऱ्या क्षयरुग्णांना ‘निक्षय मित्र’ म्हणून सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

            ‘निक्षय मित्र’ नोंदणी करण्यासाठी http://reports.nikshay.in/FormIO/Donar Registration या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीनंतर स्थानिक जिल्हा क्षयरोग अधिकारी यांना संपर्क करण्यासाठी तपशील उपलब्ध होतो. त्यानंतर त्यांच्या कार्यक्षेत्रातील उपचार घेणाऱ्या क्षय रुग्णांची व मदत घेण्यास इच्छुक असणाऱ्या क्षयरुग्णांची यादी उपलब्ध होते. एक निक्षय मित्र एक किंवा अनेक क्षय रुग्णांना दत्तक घेऊ शकतात व कमीत-कमी सहा महिने व जास्तीत जास्त 3 वर्ष मदत करु शकतात. क्षयरुग्णांना पोषक आहार देण्यासाठी प्रती महिना, प्रती रुग्ण सुमारे 300 रुपये ते 500 रुपये इतका खर्च येतो.

            अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1800-11-6666 तसेच डॉ. रमेश बनसोड यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9881102303 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले आहे.

00000

 

Thursday, November 24, 2022

नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक नामांकन कार्यक्रम

 

नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक नामांकन कार्यक्रम

       अमरावती, दि. 24 : नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय केंद्र शासनाव्दारे तक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालय येथे स्वयंसेवक नामांकन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शैलेश शेकापूरे, प्रमुख मार्गदर्शक सुबोध धुरंदर, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यावेळी उपस्थित होत्या. 

युवकांना राष्ट्र निर्माण प्रक्रियेत भाग घेण्याची संधी स्वयंसेवक नामांकन कार्यक्रमामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच त्यांचे व्यक्तित्व  आणि कौशल्य विकसित करण्यात येणार आहे. स्वयंसेवक म्हणून नामांकन करण्यासाठी स्वयंसेवकाचे वय वर्षे  15-29 या वयोगटातील हवे. तसेच तो नेहरू युवा केंद्राच्या कुठल्याही युवा मंडळाचा सदस्य नसावा. याशिवाय तो कुठल्याही बेकायशीर कामात आरोपी असू नये, असे श्रीमती बासुतकर यांनी कळविले.

या कार्यक्रमाच्या माध्यमांतून युवकांना संगीत, नृत्य, खेळ, चित्रकला आदी कला जोपासण्याची संधी दिली जाईल. नेहरू युवा केंद्राव्दारे आयोजित केले जाणारे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास संधी दिली जाईल. कार्यक्रमासाठी युवा स्वयंसेवक साक्षी केवटी यांनी सहकार्य केले. 

0000

आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

 

आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व

प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

अमरावती, दि. 24 (जिमाका) : आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत शासनाव्दारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरीक्षेसाठी विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो. या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील हवा. उमेदवाराचे वय 1 डिसेंबर 2022 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण तसेच दि. 15 मार्च 2023 रोजी 30 वर्ष पूर्ण केलेले असावे. उमेदवार किमान दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. सद्यस्थितीत तो कोणतेही शिक्षण अथवा प्रशिक्षण घेत नसावा. इच्छुक उमेदवारांनी दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, जयस्तंभ चौक, मातोश्री मंगल कार्यालयामागे, लाल पुलाजवळ, अचलपूर, कॅम्प परवाडा ता. अचलपूर येथे संपर्क साधावा. 

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 07223-221205 तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 7709432024 येथे संपर्क साधावा. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दहावी उत्तीर्णची गुणपत्रिका, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ऑनलाईन कार्ड, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास कार्यालयात नाव नोंदविल्याचे नोंदणी कार्ड इत्यादी आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती व अलीकडच्या काळातील छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करु नये. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अ.सं. ठाकरे यांनी केले आहे. 

00000

Wednesday, November 23, 2022

ग्रंथोत्सवात रंगली काव्य मैफल

 


ग्रंथोत्सवात रंगली काव्य मैफल

अमरावती, दि. 23 (जिमाका) :  वाचन संस्कृती वृध्दिंगत होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर अमरावती शासकीय विभागीय ग्रंथालय येथे नुकतेच ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रंथदिंडीसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, विविध विषयांवर परिसंवाद, एकपात्री प्रयोग तसेच कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या विविधरंगी कार्यक्रमांना वाचक, लेखक, ग्रंथप्रेमी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘जे न देखे रवि, ते देखे कवि’ या उक्तीनुसार कवी संमेलनामध्ये कवींनी बहारदार काव्य सादर केले. प्रतिभाशाली काव्यातून कवि संमेलनाची मैफल रंगली. करुण, वीर, हास्य अशा नऊही रसांनीयुक्त कवितांचे सादरीकरण करुन कवींनी त्यांच्या भावना उलगडल्यात.
कवी संमेलनाचे अध्यक्ष राज यावलीकर यांनी वऱ्हाडी थाटात कविता सादर केल्या. ग्रामीण जीवनाचे हुबेहुब वर्णन त्यांनी काव्यातून मांडले. विष्णू सोळंके यांनी देशभक्तीपर रोमहर्षक गीत सादर केले. अनंत नांदूरकर यांचे मराठीसह हिंदी आणि ऊर्दू भाषेतून बहारदार गजल सादर केल्या. संघमित्रा खंडारे यांनी ‘माऊली’ या विषयावर काव्य सादर केले. भगवान फाळके, प्रा. ज्ञानेश्वर गटकर, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी विविध विषयांवर स्वरचित कविता सादर केल्या. कवी संमेलनाला रसिकांनी भरभरुन दाद दिली. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिध्द निवेदक पवन नालट यांनी केले.
                                           समाज माध्यमे आणि साहित्य : परिसंवाद

ग्रंथोत्सवात आयोजित ‘समाज माध्यमे आणि साहित्य’ या परिसंवादात तपोवन संस्थेचे सचिव तथा प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी मार्गदर्शन केले. आज सर्वत्र समाज माध्यमांव्दारे माहितीचा ओघ सातत्त्याने वाहत आहे. या माहितीच्या प्रवाहात वाहून न जाता यातील नेमके काय घ्यावे, याची समज असायला हवी. प्रत्येक काळातील साहित्य हा त्या समाजाचा आरसा असतो. साहित्याचा प्रसार करण्यासाठी समाज माध्यमाची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रसिध्द चित्रकार सुनील यावलीकर, प्रा. ज्ञानेश्वर गटकर यांनी समाज माध्यमांच्या काळातही पुस्तकांचे महत्त्व अबाधित असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

 वाङ्मय चर्चा, विविध विषयावर परिसंवाद, एकपात्री प्रयोग, पुस्तक प्रदर्शन व विक्री, मुलाखत आणि काव्य मैफल या भरगच्च कार्यक्रमाने ग्रंथोत्सव उत्साहात साजरा झाला.
विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे, अविनाश दुधे, प्रा. हेमंत खडके आदी यावेळी उपस्थित होते.
 
00000

Monday, November 21, 2022

जिल्हाधिकाऱ्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद





 

जिल्हाधिकाऱ्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद


अमरावती, दि. २१ : श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र पदवीच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचनाविज्ञान केंद्राला भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतली.


जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध विषयांवर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे कामकाज, यंत्रणेचे स्वरूप व जबाबदारी आदी विविध विषयांबाबत विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

०००

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...