Monday, February 20, 2023

उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे

 उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 20: महाराष्ट्र शासनाव्दारे उत्कृष्ट निर्यातदारांना राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येते. यासाठी निर्यात घटक, व्यापारी, निर्यातदार आणि व्यापार निर्यात संस्था यांनी 23 फेब्रुवारीपर्यंत  अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. 

उत्कृष्ट निर्यातदारांना राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार प्रदान करताना सन 2018-19, सन 2019-20, सन 2020-21 तसेच 2021-22 या आर्थिक वर्षांचे पुरस्कार देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी संबंधितांनी विहित मर्यादेत अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना व लागणारी कागदपत्रे यांची तपशीलवार माहिती www.maharashtra.gov.in तसेच https://maitri.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

उत्कृष्ट निर्यात पुरस्करांतर्गत इंजिनिअरींग उत्पादने, इलेक्ट्रीकल व ईलेक्टॉनिक्स उत्पादने, मुलभूत रासायनिक उत्पादने, औषधे व सौंदर्य प्रसाधन उत्पादने, केमिकल व अलाईड उत्पादने, प्लास्टिक लिनोलीयम उत्पादने, लेदर उत्पादने, ताज्या भाज्या व फळे, प्रोसेस फुड अॅण्ड ॲग्रो उत्पादने, सागरी उत्पादने, टेक्सटाईल्स, हस्तकला, जेम्स अॅण्ड ज्वेलरी (व्हर्जिन सिल्वर वगळून) या प्रवर्गात प्रदान करण्यात येतात. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा.

***

Friday, February 17, 2023

‘आपदा मित्रां’नी समाजाचे मित्र म्हणून काम करावे - निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके

 





‘आपदा मित्रांनी समाजाचे मित्र म्हणून काम करावे

- निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके

 

अमरावती, दि. 17: गावस्तरावर एखादी आपत्ती उद्भवल्यास त्या ठिकाणी मदत व जलद प्रतिसादाकरिता कार्य करण्यासाठी तसेच समुदायाला आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी आपदा मित्र यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. आपदा मित्रांनी आपत्ती काळात समाजाचे मित्र म्हणून काम करावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी आज येथे केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात आयोजित आपदा मित्र कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी श्री. घोडके बोलत होते. विद्यापीठात 50 आपदा मित्रांच्या तिस-या बॅचच्या समारोप प्रसंगी सहायक जिल्हा सूचना अधिकारी मनीष फुलझेले, आपत्ती समन्वयक अमरजीत चौरपगार , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यावेळी उपस्थित होते.

आपदा मित्रांची आपत्तीमधील भूमिका याबाबत मार्गदर्शन करताना श्री. घोडके म्हणाले, कोणतीही आपत्ती आल्यास सर्वप्रथम आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आपत्ती काळात जीवित व आर्थिक टाळण्यासाठी स्थानिकांची मदत घेणे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील चमूला सहकार्य करणे तसेच प्रसंगावधान राखणे गरजेचे आहे. आपदा मित्रांनी आपल्या प्रशिक्षणातून इतरांनाही प्रशिक्षित करावे. प्रत्येकाला स्वत:चा बचाव करण्यासाठी प्राथमिक प्रशिक्षण द्यावे. आपत्ती काळात वेळ ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. अशा काळात स्थानिक पातळीवर आपदा मित्रांमार्फत मदत मिळाल्यास जीवित व आर्थिक हानी टाळण्यास निश्चितच मदत होईल. आपदा मित्रांना शासनामार्फत पुढील प्रशिक्षणही लवकरच देण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

आपदा मित्रांनी यावेळी प्रशिक्षणाबाबत मनोगत व्यक्त केले. यामध्ये आपदा मित्रांची आपत्तीमध्ये भूमिका, शोध व बचाव कार्य कसे करावे, व्यवस्थापन, आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, सीपीआर कृत्रिम श्वासोच्छ्वास, पुरातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या पद्धती, यामध्ये उपलब्ध साधनसामुग्रीव्दारे बचावाची साधने तयार करणे, स्थानिकांची घ्यावयाची मदत, रस्ते अपघातात घ्यावयाची काळजी याविषयी योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्याचे सांगितले. या प्रशिक्षणामार्फत इतरांनाही प्रशिक्षित करु, अशी ग्वाही आपदा मित्रांनी यावेळी दिली.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून होत असलेल्या शोध बचाव कार्यात मदतीसाठी पुढाकार घेणा-या 300 आपदा मित्रांची निवड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे करण्यात आली आहे. युवक, विद्यार्थी व माजी सैनिकांचा त्यात समावेश आहे.  आपदा मित्रांचा तीन वर्षांसाठी पाच लाख रूपयांचा विमा शासनाकडून काढला जातो.

आपदा मित्रांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र व लाईफ गार्ड किट (लाईफ जॅकेट, फर्स्ट एड बॉक्स, सर्च लाईट, कटर, रोप आदी साहित्य) असलेले किट देण्यात आले. प्रशिक्षक म्हणून सोलापूर पथक तसेच  जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर, होमगार्ड, दिशा फाउंडेशन, अग्निशामक विभाग, सामान्य रुग्णालय व तज्ज्ञांची मदत झाली.

आतापर्यंत तीन बॅचेसमध्ये एकूण 110 आपदा मित्रांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित आपदा मित्रांनी आपले प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा शोध व बचाव पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षकांचे कार्य केले आहे. कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र रामेकर यांनी तर आभार गजानन वाढेकर यांनी मानले.

00000

 

 

 

 

उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलनात मूल्यसाखळीबाबत चर्चा

 

उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलनात मूल्यसाखळीबाबत चर्चा

 

अमरावती, दि. १६ : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत विभागीय अंमलबजावणी कक्षातर्फे विभागीय उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन (टेक मार्केट मीट) नुकतेच येथे झाले. त्यात मूल्यसाखळीबाबत चर्चा करण्यात आली.

           मूल्यसाखळी, तिच्या विकासाच्या शक्यता व आवश्यकता याबाबत कार्यशाळेत सादरीकरण करण्यात आले. सोयाबीन पिकाच्या मूल्यसाखळीबाबत गटचर्चा होऊन खरेदीदार, निर्यातदारांच्या अडचणी व अपेक्षांवर विचारमंथन करण्यात आले.  

विभागीय कृषी सहसंचालक अध्यक्षस्थानी किसन मुळे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  अनिल खर्चान, दुर्गापूरच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ पी. एस. जायले, नोडल अधिकारी   राहुल सातपुते आदी उपस्थित होते.

             प्रथम सत्रात स्मार्ट प्रकल्प व मूल्य साखळीच्या अनुषंगाने सादरीकरण राहूल ठाकरे यांनी केले. प्रशांत गिरी यांनी निंजा मार्केटिंग ॲपबाबत माहिती दिली. डॉ. किशोर दुबे यांनी पतंजली समूहाच्या फळ प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनचे हेमंत चिमूरकर यांनी उत्पादन प्रक्रियेसंदर्भात सविस्तर सांगितले.

                दुपारच्या सत्रात ई-नाम या कंपनीचे स्टेट हेड  योगेश कातकडे यांनी कृषी माल व बाजारभावाबाबत माहिती दिली. उमेश दहिकर यांनी आवेष्टन रचनेबाबत, तर जयंत नालगे यांनी बेसिक फायनान्ससंदर्भात माहिती दिली.

समारोपप्रसंगी श्री. मुळे, श्री. खर्चान, श्री. जायले यांची भाषणे झाली. हिवरा येथील नानाजी देशमुख फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे संचालकांनी मनोगत व्यक्त केले. विभागीय अंमलबजावणी कक्षाचे समाज विकास तज्ज्ञ   आर.आर. पठाण यांनी सूत्रसंचालन केले. सनियंत्रण मूल्यमापन तज्ज्ञ   मिलिंद वानखडे यांनी आभार मानले.

कार्यशाळेला नोडल अधिकारी, पुरवठा व मूल्य साखळीतज्ज्ञ उमेद, माविम यांचे अधिकारी, कर्मचारी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, खरेदीदार आदी  सर्वांचा मोठा प्रतिसाद होता.

 

00000

 

 

 

Thursday, February 16, 2023

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारीला 63 रिक्तपदांवर होणार भरती

 

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह येत्या 21 फेब्रुवारीला

63 रिक्तपदांवर होणार भरती

 

            अमरावती, दि. 16 : अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दर महिन्याच्या, तिसऱ्या मंगळवारी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पहिली ‘प्लेसमेंट ड्राईव्ह येत्या 21 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योग समूहामध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

          जिल्हयातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या तिस-या मंगळवारी "जागेवरच निवड" (On Spot Selection) मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणा-या उमेदवारांना लगेच नोकरीची संधी मिळेल.

63 रिक्तपदांसाठी राबविणर भरती प्रक्रिया

        या मेळाव्यामध्ये 63 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती जाधव स्टील अलॉयज या उद्योगात क्वालिटी इंजिनिअर, सुपरवायझर तसेच अप्रेन्टीस अशा एकूण 28 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तसेच अमरावती जाधव गिअर लि. या उद्योगात क्वालिटी इंजिनिअर, आ.टी.आय., ॲडमिनीस्ट्रेटीव्ह अशा एकूण 35 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. अशा एकूण 63 पदांची ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

 या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी https://forms.gle/DBCrQo५rM९११HgGg९ या लिंकवर  जाऊन निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. अथवा विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी.

           यापूर्वी नोंदणी केली असल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून Employment वर क्लिक करावे. Job Seeker (Find a Job ) या ऑप्शनवर क्लिक करावे. JOB SEEKER LOGIN हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक,आधार क्रमांक आणि पासवर्ड क्रमांकाचा वापर करुन LOGIN व्हावे. त्यांनतर Pandit Dindayal Upadhyay Job Fair हा पर्याय निवडावा. Amravati जिल्हा निवडून Filter द्यावे. त्यानंतर आपल्याला अमरावती जिल्हयातील रोजगार मेळाव्यांची यादी दिसून येते. त्यातील ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह, पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा -१, दिनांक-२१/२/२०२३ मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर Vaccancy List या टॅबवर क्लिक करावे. ‘I Agree’ हा पर्याय निवडून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदे दिसून येतील. त्यानंतर Apply बटणावर क्लिक करावे. शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल.

         याबाबत काही अडचण असल्यास अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक ०७२१-२५६६०६६ किंवा amravatirojgar@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. तसेच २१ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिदजवळ, बस स्टैंड रोड, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रासंह कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल एस. शेळके यांनी केले आहे.

0000000

 

 

 

 

 

 

बाल सुरक्षा अभियानात जिल्ह्यात होणार 4 लाख बालकांची आरोग्य तपासणी - जिल्हाधिकारी पवनीत कौर


 

बाल सुरक्षा अभियानात जिल्ह्यात होणार 4 लाख बालकांची आरोग्य तपासणी

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 15 : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे बाल सुरक्षा अभियान अर्थात जागरूक पालक-सुदृढ बालक मोहिमेत जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालके, तसेच किशोरवयीन मुलामुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. विविध विभागांच्या समन्वयाने ही मोहिम यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

 बाल सुरक्षा अभियान, नियामक रुग्ण कल्याण समिती, एड्स नियंत्रण समिती व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक समिती आदी विविध विषयांवरील बैठका आज महसूलभवनात जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, अभियानात जिल्ह्यातील ४ लक्ष २ हजार ९५८ बालके, किशोरवयीन मुलांची प्राथमिक आरोग्य तपासणी, आजारी आढळल्यास उपचार, गरजूंना संदर्भ सेवा देऊन उपचार, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे व सुरक्षित सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात येईल. तपासणी पथकात समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका आदी मनुष्यबळासह आवश्यक सर्व साधने उपलब्ध असावीत. जिल्ह्यातील शहरे व ग्रामीण भागातील एकही बालक तपासणीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचाही आढावा जिल्हाधिका-यांनी घेतला. या कार्यक्रमात जिल्ह्यात एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत 66 लक्ष 59 हजार 888 रू. रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे, तपासणी पथकांनी 230 व्यक्तींवर केलेल्या कारवाईत 45 हजार 69 रू. दंड वसूल करण्यात आला. तथापि, शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत तक्रारी प्राप्त होतात. त्यासाठी संपूर्ण तपासणी करून वेळोवेळी काटेकोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. मौखिक आरोग्य नियंत्रण कार्यक्रम व स्वच्छ मुख अभियान प्रभावीपणे राबविण्याची सूचना त्यांनी केली.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिटच्या कामकाजाचाही आढावा यावेळी झाला. तपासण्यात आढळलेल्या रूग्णांना नियमित औषधोपचार दिला जात आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी दिली. आवश्यक ठिकाणी तपासणी मोहिम नियमितपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. बनावट डॉक्टर शोध व कारवाईचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

बैठकीला डॉ. विशाल काळे, डॉ. विद्या वाठोडकर, डॉ. प्रशांत घोडाम, पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, डॉ. नीलेश पाचबुद्धे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

Wednesday, February 15, 2023

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांर्तगत ‘मॅरेथॉन स्पर्धा’ संपन्न

 

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांर्तगत

मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

 

      अमरावती, दि. 14: कुष्ठरोगाविषयी जनजागृती होण्यासाठी ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कुष्ठरोगाविषयी जनजागृती होण्यासाठी विविध कार्यक्रम तसेच कुष्ठरुग्णांबाबत समाजात असलेली भिती व गैरसमज दूर होण्यास मदत मिळावी, यासाठी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग), आय. एम. ए. व आर.डी. आय. के. आणि के. डी. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले.

      मॅरेथॉन उद्घाटन प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्री. पाटील, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. अकुंश सिरसाट, पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. देशमुख, आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. राठी, डॉ. देशमुख, डॉ. मुरके, आर. डी. आय. के. तसेच के. डी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख आदी मान्यवर यावेळी  उपस्थित होते.

      कार्यक्रमाच्या प्रारंभी नूतन कन्या शाळेच्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनींनी बॅंड पथकाचे सादरीकरण केले. तसेच प्रथम, व्दितीय, व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्यांना बॅंड पथकाव्दारे स्वागत करण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महिला व पुरूष सहभागी झाले होते. प्रथम, व्दितीय, व तृतीय क्रमांक पटकविणाऱ्यांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह तसेच प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

      समारोप प्रसंगी आय. एम.ए.चे सचिव डॉ. देशमुख, आर. डी. आय. के. व के. डी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख, व कुष्ठरोग मुक्त राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित  सुरेश धोडगे आदी मान्यवर उपस्थित होते. अवैद्यकीय पर्यवेक्षक गजानन पन्हाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालन राजू डांगे यांनी तर अवैद्यकीय पर्यवेक्षक एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.

***

 

 

 

 

 

 

 

Tuesday, February 14, 2023

भित्तीचित्रकला व व्हिडीओ मेकिंग स्पर्धेचे बक्षीसवितरण मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 









भित्तीचित्रकला व व्हिडीओ मेकिंग स्पर्धेचे बक्षीसवितरण

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा

-        विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावती, दि. १३ : लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक असते. मतदानाविषयीची उदासीनता दूर करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे आयोजित भित्तीचित्रकला व व्हिडीओ मेकिंग स्पर्धेचा बक्षीसवितरण कार्यक्रम बचतभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार श्याम देशमुख आदी उपस्थित होते.

लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार अनेकांकडून बजावला जात नाही. जागरूक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदानाविषयी उदासीन राहून चालणार नाही. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले.

मतदार यादीत नाव नसलेल्या १८ वर्षांवरील युवक, तसेच प्रत्येकाने मतदार नोंदणी पूर्ण करावी. तसेच प्रत्येक निवड़णूकीत स्वत: मतदान करून आपल्या कुटुंबियांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.

अमरावती जिल्हा निवडणूक कार्यालयाने घेतलेली स्पर्धा राज्यात अभिनव ठरली, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. व्यवहारे यांनी प्रास्ताविकात सांगितले. करण पारिख यांनी सूत्रसंचालन केले. श्री. देशमुख यांनी आभार मानले.

भित्तीचित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ४ हजार रू. चे पारितोषिक सुनीत निसगुडे, विशाल वानखडे, निखिल लिंगाटे, प्रशिक  तायडे यांना, तसेच ३ हजार रु. चे दुसरे बक्षीस आकांक्षा मोटघरे, रोहिणी नेवारे, प्रगती चौरे, समीक्षा मालसाने, ऐश्वर्या विभूते यांना आणि २ हजार रू. चे तिसरे बक्षीस परीक्षित भेले, दर्शन खेसे व अमर कदम यांना मिळाले. गणेश सावंत, अस्मिता सावंत, सार्थक धवल, पूर्वा खुशादे, सानिका बुधाले यांना १ हजार रू. चे व संकेत ताभणे, दीपक खंडागळे, ओम इंगळे, प्रणाली दातिर, पायल गणोरकर व सौरभ इंगोले यांना साडेसातशे रू. चे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले.

व्हिडीओ मेकिंग स्पर्धेत रवींद्र वानखडे यांना प्रथम क्रमांकांचे ३ हजार रू. चे, तर रूचा काटकर व नेहा सराफ यांना २ हजार रु. चे दुसरे बक्षीस मिळाले. निशिगंधा कांबळे, दिप्ती टेंभुर्णे, अश्विनी खडसे यांना १ हजार रु. चे तिसरे, तसेच प्रियंका भटेजा व अतुल चव्हाण यांना साडेसातशे रु. चे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले. सर्वाधिक व्ह्युज मिळवल्याबद्दल सार्थक मुंडवाईक यांना २ हजार रू. चे विशेष पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेला आय- क्लीन संस्थेचे सहकार्य मिळाले.

०००

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...