Wednesday, September 27, 2023

ईद-ए-मिलाद उत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

 ईद-ए-मिलाद उत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

            अमरावती, दि. 27 : अमरावती शहरात  28 सप्टेंबर रोजी (एक दिवस मागे-पुढे चंद्र दर्शनानुसार) मुस्लीम बांधवाचे ईद-ए-मिलाद  निमित्त मिरवणुक काढण्यात येतात. या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. ते याप्रमाणे :

वाहतुकीचा पर्यायी मार्ग

            ट्रांसपोर्ट नगर ते नागपुरी गेट चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची एकतर्फा वाहतुक सुरू राहील. चित्रा चौक ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक प्रभात टॉकीज व दिपक चौक मार्गे वळविण्यात येईल. हनुमान नगर पोलीस चौकी ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकाराचा जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक महाजनपुरा मार्गे वळविण्यात येईल.

 

जवाहर गेट ते टांगा पडाव या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक सराफा- गांधी चौक- जयस्तंभ मार्गे वळविण्यात येईल. लालखडी ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक लालखडी रिंगरोड मार्गे वळविण्यात येईल.

 

वाहन चालकांनी या अधिसूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायद्या व महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत करवाई करण्यात येईल. हा आदेश दि. 28 सप्टेंबरच्या (एक दिवस मागे-पुढे चंद्र दर्शनानुसार) मध्यरात्रीपर्यंत लागू राहील, असे आवाहन पोलीस उपायुक्त सागर पाटील  यांनी केले आहे.

00000

गणेशोत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

 गणेशोत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

            अमरावती, दि. 27 : अमरावती शहरातील न्यु आझाद गणेश मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणुक दि.  5 ऑक्टोबर  रोजी खापर्डे बगीचा येथून शहरातील विविध भागातून जाणार आहे. या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. ते याप्रमाणे :

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

न्यु गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणुक खापर्डे बगीचा येथून सुरू होवून मिरवणुक इर्विन चौकात आल्यानंतर गर्ल्स हायस्कुल चौकाकडून इर्विन चौका कडे येणारी वाहतुक पोलीस पेट्रोल पंप मार्गे बस स्टँड कडून व बाबा कॉर्नर कडून इर्विन चौकाकडे येणारी वाहतुक लेखुमल चौकाकडे वळविण्यात येईल. विसर्जन मिरवणुक मर्च्यूरी टी पॉइंट ते रेल्वे स्टेशन मार्गाने असतांना रेल्वे स्टेशन चौकाकडून येणारे व मर्च्यूरी टी पॉइंट कडून रेल्वे स्टेशन कडे जाणारी वाहतुक एकतर्फी मार्गाने सुरू राहील. मिरवणुक रेल्वे स्टेशन चौक ते रेल्वे ब्रिजवर आल्यानंतर एस टी स्टँड कडून येणारी वाहतुक उस्मानिया मस्जिद ते खापर्डे बगीचा मार्गाने वळविण्यात येत आहे. तसेच रूख्मीणी नगर कडून हमालपुरा रोडने रेल्वे ब्रिजवर येणारी वाहतुक श्याम नगर चौक ते पोलीस पेट्रोल पंप मार्गाने वळविण्यात येईल.

 

मिरवणुक रेल्वे ब्रिज ते राजकमल चौक  मार्गावर असतांना एसटी स्टँड कडून येणारी वाहतुक रेल्वे स्टेशन कडून मर्च्युरी टी पॉइंट उड्डानपुल व मालवीय चौक, चित्रा चौक या मार्गाने वळविण्यात येईल. तसेच राजकमल चौकाकडून रेल्वे ब्रिजवर येणारी वाहतुक जयस्तंभ चौक, मालवीय चौक मार्गाने वळविण्यात येईल. मिरवणुक राजकमल चौक ते श्याम चौक मार्ग जयस्तंभ चौक मार्गावर असतांना गद्रे चौकाकडून येणारी वाहतुक उड्डानपुल राजापेठ किंवा गांधी चौक जवाहर गेट मार्गाने वळविण्यात येईल. तसेच हमालपूरा कडून येणारी वाहतुक रेल्वे स्टेशन चौक, मर्च्युरी टी पॉइंट मार्गाने वळविण्यात येईल. सदर मिरवणुक जयस्तंभ चौक-दिपक चौक मार्गावर असतांना राजकमल चौकाकडून येणार व जाणार वाहतुक सरोज चौक मार्गे-चित्रा चौक मार्गे जाईल. तसेच चित्रा चौका कडून येणारी वाहतुक दिपक चौक मार्गाने जयस्तंभ चौक किंवा दिपक चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करतील.  मिरवणुक दिपक चौक ते मोसीकॉल जिन मार्गावर असतांना विलास नगर कडून येणारी वाहतुक ही लेखुमल चौक, बाबा कॉर्नर मार्गाने वळविण्यात येईल. तसेच दिपक चौक कडून विलासनगर कडे जाणारी वाहतुक इर्विन चौक मार्गे वळविण्यात येईल.

 

 वाहन चालकांनी या अधिसूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. हा आदेश दि. 5 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील, असे आवाहन पोलीस उपायुक्त सागर पाटील  यांनी केले आहे.

00000


महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास दि.30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास दि.30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

           अमरावती दि. 27 :  सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास शनिवार दि. 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.

 सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  शिक्षण फी  परीक्षा फी योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज  गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना या योजना राबविण्यात येतात.

           माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत सन 2022-23 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरणाचे अर्ज व नवीन अर्ज भरण्यासाठी  तसेच सन 2021-22 साठी रि-अप्लाय करण्यासाठी  दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  ऑनलाईन नुतनीकरणाचे  अर्ज  विहित मुदतीत  भरण्यासाठी  https://mahadbtmahait.gov.in  महाडीबीटीच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन नुतनीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांच्या  लॉगिनमधील त्रुटी पुर्ततेसाठी सेंड बँक केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयानी त्वरीत त्रुटिपूर्तता  करुन जिल्हा लॉगीन वर पाठविण्यात यावे. विहित वेळेत अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील.

महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना नुतनीकरणाचे अर्ज भरुन रि-अप्लाय करण्यासाठी आणि सेंड बॅक केलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाव्दारे करण्यात आले आहे.

00000

जिल्हा लोकशाही दिन 3 ऑक्टोंबरला

 जिल्हा लोकशाही दिन 3 ऑक्टोंबरला

            अमरावती, दि. 27 : जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, मंगळवार, दिनांक 3 ऑक्‍टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

 

00000

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना व्यावसायिकांच्या प्रगतीला महामंडळाचे सहाय्य

 

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना

व्यावसायिकांच्या प्रगतीला महामंडळाचे सहाय्य

मराठा समाजातील व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी अणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सहाय्य केले जाते. आजवर महामंडळाच्या सहाय्यातून अनेक व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करुन इतरांच्याही हाताला काम उपलब्ध करुन देत आहे. 

महामंडळामार्फत विविध व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. यात नियमित परतफेड करणाऱ्यांना व्याजाचा परतावा दिला जातो. महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपध्दती ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. ही योजना लाभार्थीभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत आवश्यक सर्व माहिती www.udyog.mahaswayam.gov.in या वेब प्रणालीवर अपलोड करीत नाही, तोपर्यंत पुढील कार्यवाही करता येत नाही.

महामंडळाच्या योजनासाठी सामाईक अटी व शर्ती

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. ही योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गासाठी तथा ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशांसाठी आहे. योजनेसाठी वयोमर्यादेची अट पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी कमाल 60 वर्षे एवढी आहे. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लक्ष रुपयाच्या आत असावे. लाभार्थ्याने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक किंवा कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल. या योजनेंतर्गत फक्त व्यवसायासाठी घेतलेल्या मुदत कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल. दिव्यांग व्यक्तीला योजनेंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) मध्ये वयोमर्यादेच्या अटींचे बंधन नसेल. 

गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एल.एल.पी. कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट व संस्था लाभास पात्र असतील. महामंडळाच्या योजनेंतर्गत फक्त व्यवसाय किंवा उद्योगासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल. व या योजनांची अंमलबजावणी शासनाच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल. 

महामंडळाच्या योजनांची माहिती

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)

या योजनेंतर्गत राज्यातील कोणत्याही बँकेमार्फत 15 लक्ष रुपये मर्यादेत कोणताही व्यवसाय किंवा उद्योगासाठी लाभार्थ्यांनी कर्ज घेतल्यास त्या कर्जावरील व्याज परतावा जास्तीत-जास्त सात वर्षाच्या मर्यादेत व 12 टक्क्याच्या कर्ज दर मर्यादेत अथवा 4.5 लक्ष रकमेच्या मर्यादेत करण्यात येईल. 

गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)

या योजनेंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन दोन व्यक्तींसाठी कमाल 25 लक्ष रुपयाच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी 35 लक्ष रुपयाच्या मर्यादेवर, चार व्यक्तींसाठी 45 लक्ष रुपयांच्या मर्यादेवर व पाच व पाचपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 लक्ष रुपयापर्यंतच्या व्यवसाय व उद्योग कर्जावर 7 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत-जास्त 12 टक्के व्याज किंवा 15 लक्ष रुपयांच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. या योजनेमध्ये एफपीओ गटांनी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायासाठी बँकेमार्फत घेलेल्या कर्जावरील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल. 


                                   योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यपध्दती

पात्रता प्रमाणपत्रासाठी महत्त्वाची कागदपत्रे

अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वत:च्या ई-मेल आयडीसह आधार कार्ड, रहिवासी दाखला, वीज बिल, रेशन कार्ड, गॅस बिल, बँक पास बुक, उत्पन्नाचा दाखला, आयटी रिटर्न, जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, एक पानी प्रकल्प अहवाल (याचा नमुना वेब प्रणालीवर उपलब्ध आहे.)

पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच एलओआय समवेत लाभार्थ्याने त्याला करावयाचा असलेला व्यवसाय, उद्योगाचा प्रकल्प अहवाल आवश्यक ते सर्व कागदपत्र घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करावे. कर्ज मंजूरीची पूर्ण प्रक्रिया बँक त्यांच्या नियमानुसार करीत असते. त्यामध्ये महामंडळ कोणत्याही स्वरुपाचा हस्तक्षेप करीत नाही. कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर पोचपावती बँकेकडून घ्यावी. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर कर्ज मंजूरीबाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने वेब प्रणालीवर अपलोड करावी. ज्या खात्यामध्ये व्याज परतावा पाहिजे आहे त्याचा तपशील, बँक कर्ज मंजूरी पत्र, बँकेमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाचा पुरावा (बँक स्टेटमेंट), बँक इएमआय वेळापत्रकावर वसुलीचा दिनांक असणे अनिवार्य आहे. प्रकल्प अहवाल, हप्ता भरल्याबाबतचा पुरावा, बँक स्टेटमेंट सही व शिक्का असणे आवश्यक आहे.

त्यानंतर बँकेमध्ये पूर्ण इएमआय हप्ता विहित कालमर्यादेत भरल्यानंतरच महामंडळाच्या वेब प्रणालीवर ऑनलाईन क्लेम दाखल करावा. दाखल केलेला क्लेम अचूक असला तरच संबंधिताला व्याज परताव्याचा लाभ देता येईल. यामध्ये हप्ता भरल्याबाबतचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट सही व शिक्क्यानिशी अपलोड करणे अनिवार्य असेल. लाभार्थ्याने दाखल केलेल्या दाव्याची पडताळणी महामंडळामार्फत करण्यात येऊन, लाभार्थ्यास अनुज्ञेय असलेली व्याज परताव्याची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात ऑनलाईन स्वरुपात वितरित करण्यात येईल. या योजनेच्या लाभासाठी कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांना संपर्क क्रमांक वेब प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यासाठी जिल्हा समन्वयक रोहित मोंढे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9730862870 हा आहे. इच्छुकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा.

व्यावसायिक लाभार्थ्याचे मनोगत

मी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा मनापासून आभारी आहे. कारण मागील वर्षी माझ्या महालक्ष्मी सुपर शॉपी या व्यवसायासाठी बँक ऑफ बडोदा, अमरावती या बँकेकडून 10 लक्ष रुपये कर्ज घेतले. त्या कर्जावरील व्याज मला अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून दर महिन्याला परत मिळत आहे. सुरुवातीला महामंडळाविषयी संपूर्ण माहिती नसल्यामुळे मनामध्ये थोडी धास्ती होती. परंतु व्यवसाय करायचाच असल्यामुळे मी महामंडळाच्या अमरावती जिल्हा कार्यालय येथे जिल्हा समन्वयक रोहित मोंढे यांची भेट घेऊन योजनेची सविस्तर माहिती घेतली. आणि त्यानंतर महामंडळाकडे रीतसर ऑनलाईन अर्ज करुन पात्रता प्रमाणपत्र (LOI) मिळवून घेतले. त्यानंतर कर्जासाठी बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करुन कर्ज मंजूर करुन घेतले. आता दर महिन्याला मी माझा हप्ता भरल्यानंतर हप्ता भरल्याचे बँक स्टेटमेंट महामंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करतो. त्यानंतर त्या हप्त्यातील व्याज हे मला महामंडळाकडून परत मिळत आहे. आज मी व्यासायिक म्हणून प्रगती केली आहेच शिवाय इतर बेरोजगार युवकांच्या हातालाही रोजगार उपलब्ध करुन देऊ शकतो, याचे मला समाधान आहे. 

- निलेश अवचार, अमरावती.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हानिहाय जिल्हा समन्वयकांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणताही खाजगी व्यक्ती अथवा संस्थेच्या अमीषाला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा समन्वयक श्री. मोंढे यांनी केले आहे.

 

अपर्णा यावलकर

प्र. जिल्हा माहिती अधिकारी,

अमरावती.

*****

सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार

 सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार

 

अमरावती, दि. 27 (जिमाका): सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत पूर्ण व्हावी आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी राज्यात 17 सप्टेंबरपासून ‘सेवा महिना’ राबविण्याला सुरुवात झाली असून तो 16 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे.

सेवा महिना’ अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना केल्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती प्राप्त करून देणे, नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, यासाठी महिनाभर सेवा महिना हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र,सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येत आहे.

यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी सेवांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

सेवा महिन्यामध्ये सर्व शासकीय विभांगाकडील सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

*****

Tuesday, September 26, 2023

निवडणूक विभाग;जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे शिबीराचे आयोजन

                                        निवडणूक विभाग;जिल्हाधिकारी कार्यालयाच्या

नियोजन भवन येथे शिबीराचे आयोजन

 

              अमरावती, दि. 26:  शासनाव्दारे दि. 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत सेवा महिना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने निवडणूक विभागाव्दारे आज(दि.27) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे विशेष शिबिरोच आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मतदार नोंदणी, आधारकार्ड, पॅन कार्ड दुरुस्ती अशा विविध सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. तरी नवमतदार व पात्र लाभार्थ्यांनी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

00000


अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...