Friday, October 6, 2023

मंगळवारी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन; पीडित महिलांनी जनसुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन

 मंगळवारी ‘महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन; पीडित महिलांनी जनसुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन

अमरावती, दि.6:  महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर म्हणणे मांडण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाव्दारे जनसुनावणीचे आयोजन मंगळवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे करण्यात आले आहे. शासकीय विभागाकडील किंवा कौटुंबिक हिंसाचार संदर्भातील प्रलंबित तक्रारीबाबत किंवा नवीन तक्रार लेखी नोंदवून सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

महिला संदर्भातील तक्रारीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्यामुळे महिलांना तेथे पोहोचणे अडचणीचे होते. महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जनसुनावणीसाठी अमरावती येथे उपस्थित राहणार आहेत. तक्रारदार पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी, कोणतीही पीडित महिला कोणतीही पूर्व सूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकणार आहे. तरी सुनावणीसाठी महिलांनी उपस्थित राहण्याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.  उमेश टेकाडे  यांनी कळविले आहे.

0000000

‘महिला आयोग आपल्या दारी’ मंगळवारी जिल्ह्यात महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या - रुपाली चाकणकर

                                  


‘महिला आयोग आपल्या दारी’ मंगळवारी जिल्ह्यात

महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या

- रुपाली चाकणकर

 

अमरावती, दि. 6 (जिमाका): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी मंगळवार दि. 10 ऑक्टोबर 2023 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे सकाळी 11 वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. अमरावती जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणीस अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर दि. 10 ऑक्टोबर रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी आयोगाकडून महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणीनंतर महिला व बालकांच्या विषयांच्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्याची आढावा बैठक होईल. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच कामगार आयुक्त, आरोग्य, परिवहन, शिक्षण आदी विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती असणार आहेत.

‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत करित आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हा स्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलीस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपल्या समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे.

*****

Thursday, October 5, 2023

राज्यस्तर शालेय धनुर्विद्या व वुशू क्रीडा स्पर्धा; स्पर्धेकरीता उत्तम सुविधा उपलब्ध करुन द्या- जिल्हाधिकारी

                                         




 राज्यस्तर शालेय धनुर्विद्या व वुशू क्रीडा स्पर्धा;

स्पर्धेकरीता उत्तम सुविधा उपलब्ध करुन द्या- जिल्हाधिकारी

 

अमरावती, दि. 5: राज्यस्तर शालेय धनुर्विद्या व वुशू क्रीडा स्पर्धेचे आयोजन अमरावती येथे होणार आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्ह्यात येणाऱ्या खेळाडूंना उत्तम सुविधा मिळावी याकरीता संबधित विभागाशी समन्वय साधून पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

 

राज्यस्तर शालेय धनुर्विद्या व वुशू क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजनासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक महाबुध्दभुषन सोनवणे, प्र.जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, अमरावती महानगर पालिका प्रतिनिधी श्री. ठाकरे, पोलिस निरीक्षक जी. एस. उबंरकर,  जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी वैशाली इंगळे आदी उपस्थित होते.

 

            जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, राज्यस्तर शालेय स्पर्धेकरीता निवास, भोजन, क्रीडांगण, वैद्यकीय समिती, वाहतुक, तांत्रिक समिती, प्रसिध्दी समिती, सुरक्षा समिती गठीत करण्यात यावी. स्पर्धेच्या उद्घाटन व समारोपासाठी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ सनदी अधिकारी यांना निमंत्रीत करावे. तसेच  स्पर्धेच्या अनुषंगाने शासकीय विभागांशी समन्वय साधून खेळाडूकरीता उत्तम सुविधा पुरवावे, असेही निर्देश दिले.

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अमरावती,  महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व महाराष्ट्र वुशू संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय धनुर्विद्या व वुशू क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल, अमरावती येथे धनुर्विद्या स्पर्धा दि. 21 ते 23 ऑक्टोंबर 2023 व वुशू क्रीडा स्पर्धा दि. 27 ते 29 ऑक्टोंबर 2023 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील आठ विभागातील 17 व 19  वर्ष मुले व मुलीचे संघ सहभागी होणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातुर, नागपूर व अमरावती विभागातील एकुण 700 खेळाडू, मार्गदर्शक,  पंच अधिकारी सहभागी होणार आहे. खेळाडूंच्या निवास, भोजन व क्रीडांगण व्यवस्था विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरातच करण्यात आली आहे. राज्यस्तरीय शालेय स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्राचा संघ व  खेळाडू निवडण्यात येईल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली. बैठकीचे सुत्रसंचालन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी तर आभार क्रीडा अधिकारी वैशाली इंगळे यांनी मानले.

00000

Wednesday, October 4, 2023

शासकीय मुलींचे निरिक्षण व बालगृहासाठी भाडेतत्वावर इमारतीची आवश्यकता

                                          शासकीय मुलींचे निरिक्षण व बालगृहासाठी

भाडेतत्वावर इमारतीची आवश्यकता

 

          अमरावती, दि. 4 : शासकीय मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह संस्थेकरीता शहरात नवीन इमारत भाडेतत्वावर 4 हजार चौ.फुटची आवश्यकता आहे. इच्छुक मालमत्ताधारकांनी तीन वर्षाच्या भाडे कराराने इमारत किंवा निवासी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी संस्थेशी संपर्क करावा, असे आवाहन शासकीय मुलींचे निरीक्षणगृह व बालगृहाचे अधिक्षक यांनी केले आहे.

 

          शासकीय मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह संस्था सद्यस्थितीत देसाई लेआउट, गणेश अमरावती येथे भाड्याच्या इमारतीत असून सदर संस्था बाल न्याय अधिनियम काळजी व संरक्षण -2015 अन्वये कार्यरत आहे. या संस्थेचा भाडेकरारनामा मार्च 2024 मध्ये संपुष्टात येत असून अमरावती शहरात नविन इमारत भाडेतत्वावर देण्याकरीता शासकीय मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह येथे संपर्क साधावा.

 

          संस्थेसाठी अंदाजे चार हजार चौरस फुट क्षेत्रफळामध्ये शयनकक्ष 2, वर्गखाली,  प्रथमोपचार, स्वयंपाकघर, भोजनकक्ष, भांडारगृह व ग्रंथालय प्रत्येकी एक, स्नानगृहे व प्रसाधनगृहे प्रत्येकी तीन, कार्यालयासाठी 2 खोल्या, समुपदेशन कक्ष व बालकल्याण समितीकरीता 1 खोली व प्रभारी व्यक्तींच्या निवासाकरिता स्वतंत्र 3 खोल्या तसेच क्रीडांगण करिता पुरेशी जागा इत्यादी बाबी अंतर्भुत असणारी इमारत किंवा निवासी जागा असावी.

00000

शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर द्या - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

                                                 





                          शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी

करण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर द्या

      - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 4 (जिमाका): शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान शासनामार्फत राबविण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी..योजना कल्याणकारी’ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचून त्यांना सहाय्य व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अनुषंगाने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय आयोजन अमरावती येथे लवकरच करण्यात येणार आहे. प्रशासकीय विभागांनी समन्वय साधून जिल्हास्तरावरील ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. पालकमंत्री तसेच मा. मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ प्रदान करण्यात येणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी राहुल देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत म्हेत्रे, पोलीस निरीक्षक अर्जून ठोसरे तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती चोखपणे सांभाळावी. उपक्रमामध्ये लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी आणणे हा महत्त्वाचा भाग आहे. त्याअनुषंगाने वाहतूक आराखडा तयार करावा. लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या दिवशी आणतांना त्यांची काळजी घेण्यात यावी. बसमध्ये प्राथमिक उपचारासोबतच आरोग्य सेवक, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रमस्थळी स्वच्छता विषयक व्यवस्था, शौचालय सुविधा, वीज, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य, खाद्यान्ने तसेच पाणी, आसन व्यवस्था याबाबत नियोजन करण्यात यावे. प्रत्येक लाभार्थ्याला ओळखपत्र देण्यात यावे. यावेळी लाभार्थ्यांना रोपे आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याबाबत नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक येणार असल्याने आरोग्य व्यवस्था उभारण्यात यावी. फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच परिसरात स्वच्छता राहील या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरेकेट्सची व्यवस्था तसेच आगीच्या स्थितीबाबत योग्य ती काळजी घेण्यात यावी. कार्यक्रमाच्या दिवशी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपले नियोजन करावे, असे आवाहन श्री. कटियार यांनी केले.

*****

Tuesday, October 3, 2023

ग्रामीण भागात कलम 37(1) व (3) लागू

 

ग्रामीण भागात  कलम 37(1) व (3) लागू

 

            अमरावती, दि. 03 :  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती  यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 14 ऑक्टोंबर 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी  विवेक घोडके  यांनी कळविले आहे.

00000

Monday, October 2, 2023

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

 



राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

        अमरावती, दि. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

     अधीक्षक निलेश खटके यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...