Monday, October 9, 2023

पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार कायदा महत्त्वपूर्ण - राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे

 







माहिती अधिकार सप्ताह;

पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार कायदा महत्त्वपूर्ण

- राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे

 

         अमरावती, दि. 9 :  माहितीचा अधिकार कायद्यामुळे प्रशासनात पारदर्शकता व विश्वासार्ह वातावरण निर्मितीस मदत होत आहे. प्रशासनाला त्यांच्या कारभारात अधिक उत्तरदायी बनविण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणांवर सनियंत्रण आणि देखरेख ठेवण्यासाठी हा कायदा नागरिकांना अधिक सक्षम बनवितो, असे प्रतिपादन राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज येथे केले.

            राज्य माहिती आयोग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माहितीचा अधिकार अधिनियम कायद्याची व्यापक जनजागृती होण्यासाठी माहिती अधिकार सप्ताहांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त देवीदास पवार, पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, राज्य माहिती आयोगाचे उपसचिव देविसिंग डाबेराव, माहिती अधिकार कायद्याचे राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र पांडे तसेच जनमाहिती अधिकारी, अपीलीय अधिकारी आदी उपस्थित होते.

आयुक्त श्री. पांडे म्हणाले, माहिती अधिकार अधिनियम, दप्तर दिरंगाई व सेवा हमी कायदा हे सुशासनासाठी शासनाने निर्माण केलेले उत्तम कायदे आहेत. सुशासनाच्या या त्रिसुत्री मधील माहितीचा अधिकार हा कायदा नागरिकांना मिळालेले महत्त्वाचा शस्त्र आहे. यामुळे शासन आणि प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होत आहे. परंतु  प्रशासनाच्या मदतीशिवाय हा कायदा यशस्वीरित्या राबविता येणार नाही. शासनाचे निर्णय, योजनांची माहिती, कल्याणकारी उपक्रम, दस्तावेजाची  माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देणे प्रशासनाची जबाबदारी असून ते अधिनियमाने  बंधनकारक आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी स्वयंप्रेरणेने संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिल्यास माहितीच्या अधिकारांतर्गत नागरिकांना अर्ज करण्याची गरजच भासणार नसल्याचे श्री. पांडे यांनी सांगितले.

माहितीचा अधिकार कायदा हा प्रशासनाच्या उत्तरदायित्वासाठी आहे. कोणाच्या उदरनिर्वाहाचे ते साधन होऊ शकत नाही. या कायद्याचा दुरुपयोग करून खंडणी वसूल करणे किंवा यंत्रणेस पिळवणूक करणे, असे प्रकार घडत असेल तर संबंधित व्यक्तीची तक्रार करा. काही व्यक्ती वाईट उद्देशाने वारंवार माहितीची मागणी करीत असल्यास अशा प्रकरणी आयोगाकडे माहिती देण्यात यावी, अशा सूचना आयुक्त श्री. पांडे यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले की, माहितीचा अधिकार कायद्यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्मितीस मदत होत आहे. हा कायदा लोकशाहीस पूरक असून यात प्रशासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांना माहिती देण्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण नियम आहेत. शासनाला त्यांच्या कारभारात अधिक उत्तरदायी बनविण्यासाठी तसेच शासकीय यंत्रणांवर सनियंत्रण आणि देखरेख ठेवण्यासाठी हा कायदा नागरिकांना अधिक सक्षम बनवितो.

 

विषय तज्ज्ञ ॲड. राजेंद्र पांडे यांनी माहितीचा अधिकार याबाबत मार्गदर्शन करताना या कायद्याची महत्त्वाची उद्दिष्टे स्पष्ट केली. प्रशासनाने माहितीच्या अधिकारातील कलम चारची माहिती स्वयंप्रेरणेने दिल्यास माहिती अधिकारांच्या तक्रारींची संख्या कमी होईल. यासाठी शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी त्यांच्या कार्यालयाकडील माहितीचे वर्गीकरण करुन ते सूचीबध्द करावे. कार्यालयाची माहिती वेबसाईटवर अथवा कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावी. या कायद्यामुळे नागरिकांचा शासन कारभारातील सहभाग वाढत आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागण्यासाठी वयाची अट नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. माहितीचा अधिकारांतर्गत आलेल्या अर्जावर वेळेत माहिती देणे, ही संबंधित अधिकाऱ्याची  जबाबदारी आहे. विहित मुदतीत माहिती न देणे, दिशाभुल करणे, अपूर्ण व असत्य माहिती देणे अशा गोष्टी शासकीय यंत्रणांनी टाळाव्यात, असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमामध्ये उपस्थितांच्या शंकाचे निरसरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी केले तर आभार सुप्रिया अरुळकर यांनी मानले.

00000

Friday, October 6, 2023

मातोश्री वृद्धाश्रम भानखेडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

 मातोश्री वृद्धाश्रम भानखेडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

            अमरावती, दि. 6 (जिमाका): जेष्ठ नागरिक दिनानिमित्त समाज कल्याण विभागामार्फत रविवार दि. 1 ऑक्टोंबर रोजी मातोश्री वृद्धाश्रम, भानखेडा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व विविध योजनांची माहिती देण्यात आली.

            अमरावती विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, आकाशवाणी केंद्राचे वरिष्ठ उदघोषक संजय ठाकरे यांनी आश्रमातील जेष्ठ नागरिकांसोबत संवाद साधला. त्यानंतर समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळावा यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय दि. 9 जुलै 2008 नुसार राज्याचे सर्वसमावेशक धोरण जाहिर केले आहे. याबाबत जेष्ठ नागरिकांना माहिती देण्यात आली. तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे, योजना, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

00000

वन्यजीव सप्ताह निमित्य अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाव्दारे विविध उपक्रम

वन्यजीव सप्ताह निमित्य अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाव्दारे विविध उपक्रम

            अमरावती, दि. 6 : मुख्य वनसंरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती कार्यालयामार्फत दि. 1 ते 7 ऑक्टोबर 2023 दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. वन व वन्यजीव संरक्षण जनजागृती सप्ताहामध्ये विविध स्पर्धेव्दारे जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एस.भड यांनी दिली.

सोमवार दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादुरशास्त्री यांच्या जयंती निमित्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य  वनसंरक्षण तथा क्षेत्रसंचालक ज्योती बॅनर्जी यांनी प्रतिमेला हार अर्पण अभिवादन केले. यावेळी विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार, दस्ताऐवज अधिकारी योगेश तापस, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप भड, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकारी मुकेश जावरकर, अशोक सोनोने, संदीप खंडारे, आकाश सारडा,  रेखा कोकरे, विक्रम रॉय, उमेश सिरसाबंदे, स्वप्नील बांगळे, आनंद बिबट प्रज्ञा मोहोड आदी उपस्थित होते. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती यांचे संयुक्त विद्यामाने कुलाढाप सभागृह येथे ‘इको व्हॉलेंटीअर कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी कार्यशाळेत उपस्थित होते.

मंगळवार दि. 3 ऑक्टोबर 2023 रोजी निसर्ग निर्वाचन संकुल येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. बुधवार दि. 4 ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांकरीता वने व वन्यजीव संदर्भात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गुरुवार दि. 5 ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांकरीता वने व वन्यजीव संदर्भात फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी वन वनवा व मानव वन्यजीव संघर्ष या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन कुलाढाप सभागृह, अमरावती येथे करण्यात आले. 

000000

शासकीय विदर्भ महाविद्यालय येथे युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियान संपन्न

                                 



शासकीय विदर्भ महाविद्यालय येथे युवा मतदार नोंदणी

व मतदार जनजागृती अभियान संपन्न

अमरावती, दि. 6 (जिमाका):  मतदार नोंदणी अधिकारी, 38-अमरावती विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, अमरावती यांच्या कार्यालयामार्फत शासकीय विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे युवा मतदार नोंदणी व मतदार जानजागृती अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते.

            आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने युवा मतदार नोंदणी करुन मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी भारत निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून महाविद्यालयीन शिबिर ते तळागाळातील दुर्लक्षित वस्त्या, तांडे, वाड्या, पाल अशा ठिकाणी वास्तव्यास असलेल्या लोकांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणीचे काम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांच्या नियंत्रणात निवडणूक विभागाने सुरु केले.

             शासकीय विदर्भ महाविद्यालय येथे युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियानांतर्गत विशेष शिबिराचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, शासकीय विदर्भ महाविद्यालयाच्या संचालक डॉ. अंजली देशमुख यावेळी उपस्थित होत्या.

            जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही, निवडणूका व मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून मतदार नोंदणीचे आवाहन केले. मार्गदर्शनानंतर अंदाजे तीनशेच्यावर विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीसाठी फॉर्म नं 6 ची उचल केली. डॉ. अंजली देशमुख यांनी मतदानाविषयी शहरी उदासिनता घालविणे आवश्यक असल्याचे सांगितले.

     कार्यक्रमाचे आभार मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय विदर्भ महाविद्यालय, एनसीसी विभाग प्रमुख श्री. इंगळे, एनएसएस विभाग प्रमुख श्री. काळे, महसूल विभागाचे श्री. रासेकर, नायब तहसीलदार श्रीमती टिना चव्हाण, मंडळ अधिकारी यशवंत चतूर, सत्यजीत थोरात, भारत कांबळे आदींनी सहकार्य केले.

***

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

 शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

 

            अमरावती, दि. 6 :  शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

             सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात  लागू  करण्यात आला असून तो  दि. 9 ऑक्टोंबरचे मध्यरात्रीपासून ते 23 ऑक्टोंबर  2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे.

000000

 

परतवाडा येथील संत्रा फळपिकांचा 12 ऑक्टोंबरला लिलाव

 परतवाडा येथील संत्रा फळपिकांचा 12 ऑक्टोंबरला लिलाव

 

अमरावती, दि.6: उपविभागीय कृषि अधिकारी अचलपूर अधिनस्त तालुका फळरोप वाटीका परतवाडा येथील बागेतील 130 संत्रा फळपिकांची विक्री खुला लिलाव्दारे करावयाची आहे. पिकांचा लिलाव गुरुवार दि. 12 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता तालुका फळरोप वाटीका परतवाडा येथे होणार आहे.

 

लिलावाच्या अटी व शर्ती याप्रमाणे : लिलावात भाग घेणे करीता उपविभागीय कृषी कार्यालयाकडे दोन हजार रुपये सुरक्षा ठेव ऑनलाईन अथवा नगदी जमा करावी. रक्कम लिलाव अंती लिलावात भाग घेतल्यास परत करण्यात येईल. लिलाव मंजुर झाल्यावर लिलावात मान्य झालेल्या खरेदी रक्कमेच्या 1/3 रक्कम कार्यालयाकडे तात्काळ खाते क्रं. -11373766717 आयएफएस कोड SBIN000371 शाखा- अचलपूर या खात्यावर जमा करावी लागेल. लिलावाची प्रक्रीया कोणत्याही वेळी रद्द करण्याचे सर्व अधिकार विक्री समीतीकडे राखुन ठेण्यात आले आहे. लिलाव झाल्याचे दिनांकापासून 30 दिवासांचे आत खरेदी केलेला माल उचल करावा लागेल.

00000

 

जिल्हा स्त्री रुग्णालयातील आरोग्य सोयीसुविधांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्या-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 जिल्हा स्त्री रुग्णालयातील आरोग्य सोयीसुविधांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी;

रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्या-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

         अमरावती, दि. 6 : जिल्हा स्त्री रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्या. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, संबधित विभागाने नियमित रुग्णांना भेट देऊन त्यांना दिल्या जाणाऱ्या उपचार, सेवा-सुविधेबाबत विचारणा करावी. रुग्णांना औषधे व उपचाराअभावी त्रास होणार नाही याची संबधितांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद

 

          जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी आज सकाळी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देऊन येथील आरोग्य सोयीसुविधांची पाहणी केली. तसेच रुग्णालयातील औषधांचा साठा, वैद्यकीय उपचार यंत्र, संसाधन, बाह्य व आंतर रुग्ण कक्षातील(ओपीडी-आयपीडी) रुग्ण संख्या, वैद्यकीय उपकरणांची सद्यस्थिती, डॉक्टर्स व परिचारिकांची संख्या, सुरक्षा रक्षक, वार्डातील रुग्णांची सद्यस्थिती, प्रसुती व शिशू अतिदक्षता व ओपीडी कक्षातील सोयीसुविधेबाबत सविस्तर आढावा घेतला. आयसीयु व ओपीडीतील रुग्णांशी संवाद साधून उपचार व सोयीसुविधेबाबत श्री. कटियार यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी मनपा आयुक्त देवीदास पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. सोळंके, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण साळूंखे आदी उपस्थित होते.

 

          श्री. कटियार म्हणाले की, रुग्णांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनामार्फत सर्तकता बाळगण्यात यावी. यासाठी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय उपकरण-यंत्रे, वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ नियमितपणे सेवेत उपलब्ध ठेवावे. रुग्णालय व रुग्णालयाचा परिसरात नियमितपणे स्वच्छता ठेवावी. रुग्णालयातील ड्रेनेज सिस्टीम तातडीने दुरुस्ती करुन घ्यावी. शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा रुग्णालयात नियमित उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी. तसेच रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी कार्यवाही करावी. मनुष्यबळ कमी असल्यास कंत्राटीपद्धतीने पदे भरुन कामे करावे. उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही. तसेच रुग्णांवर त्वरित उपचार सुरु व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

0000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...