Tuesday, December 26, 2023

कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 28 डिसेंबर रोजी 91 रिक्तपदांवर होणार भरती; युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

 

कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 28 डिसेंबर रोजी

91 रिक्तपदांवर होणार भरती; युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

 

              अमरावती, दि. 26 (जिमाका): अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’चे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ गुरुवार दि. 28 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योग समूहामध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

           जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्यात "जागेवरच निवड" (On Spot Selection) मोहीम आयोजित करण्यात येत आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेच नोकरीची संधी मिळेल.

91 रिक्तपदांसाठी राबविणार भरती प्रक्रिया

         या मेळाव्यामध्ये 91 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 1) क्रेडिट ॲक्सेस ग्रा. लि. अमरावती येथे ट्रेनी केंद्र मॅनजरची 60 पदे(स्त्री/पुरुष), 2) करियर पॉईट कोटा अमरावती येथे लेक्चररचे 4 (स्त्री/पुरुष), 3) स्थापत्य कंसल्टंसी  अमरावती येथे सर्वेअरचे 10 (पुरुष), 4) टेंडर मित्रा प्रा. लि. अमरावती येथे असोसिएटचे 2 (स्त्री/पुरुष), 5) रेडीयंट सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल अमरावती येथे परिचारीका, आर. एम. ओ., फिजीओथेरपिस्ट, अटेंडंटची (स्त्री/पुरुष)  15  पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.  अशा एकूण 91 पदांची ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

            या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी  https://rojgar.mahaswayam.gov.in/#/searchresult   या लिंकवर  जाऊन निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. अथवा विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी.             यापूर्वी नोंदणी केली असल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून Employment वर क्लिक करावे. Job Seeker (Find a Job ) या ऑप्शनवर क्लिक करावे. JOB SEEKER LOGIN हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक,आधार क्रमांक आणि पासवर्ड क्रमांकाचा वापर करुन LOGIN व्हावे. त्यांनतर Pandit Dindayal Upadhyay Job Fair हा पर्याय निवडावा. अमरावती जिल्हा निवडून फिल्टर द्यावे. त्यानंतर आपल्याला अमरावती जिल्ह्यातील रोजगार मेळाव्यांची यादी दिसून येते. त्यातील ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह, पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा -8, दि. 28/12/2023 मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर Vaccancy List या टॅबवर क्लिक करावे. ‘I Agree’ हा पर्याय निवडून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदे दिसून येतील. त्यानंतर Apply बटणावर क्लिक करावे. शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल.

 

         याबाबत काही अडचण असल्यास अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. तसेच 28 डिसेंबर रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिदजवळ, बस स्टँड रोड, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रासंह कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

00000

 

 

 

 

Thursday, December 21, 2023

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

 

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

 

            अमरावती, दि. 21 (जिमाका):  शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

              सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात  लागू  करण्यात आला असून तो दि. 23 डिसेंबरचे मध्यरात्रीपासून ते दि. 6 जानेवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे.

000000

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करा

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करा

 

        अमरावती, दि. 21 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारी भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2023-24 या वर्षातील नवीन प्रवेशित व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज घेणे सुरू झाले आहे. तरी सर्व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या विद्यार्थ्यांनी swadharyojana.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. विद्यार्थांनी अर्जाची हार्डकॉपी सर्व हार्डकॉपी सर्व कागदपत्रासह दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयात सादर करावे, असे आवाहन  सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.

*****

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

 

अमरावती, दि. 21 (जिमाका): भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक, नवयुवतीसाठी     दि. 8 ते 17 जानेवारी, 2024 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 56 आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

 

अमरावती जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे दि. 3 डिसेंबर 2024 मुलाखतीस हजर रहावेत. मुलाखतीस येते वेळी सैनिक कल्याण विभाग, पूणे (Department of Sainik Welfare, Pune) या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील एसएसबी-56 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

 

केंद्रामध्ये एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेऊन यावेत. अ) कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन(CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. ब) एनसीसी सी सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. क) टेक्निकल ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. ड) युनिर्व्हसिटी एन्ट्री स्कीम (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

 

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आयडी- training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवल यांनी केले आहे.

000000

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; प्रशासकीय विभागांनी समन्वयाने उपक्रम यशस्वी करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार







‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा;

प्रशासकीय विभागांनी समन्वयाने उपक्रम यशस्वी करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 21 (जिमाका): शासकीय योजनाची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान शासनामार्फत राबविण्यात येत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचून त्यांना सहाय्य व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अनुषंगाने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय आयोजन अमरावती येथे लवकरच करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासकीय विभागांनी समन्वय साधून जिल्हास्तरावरील ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी.एम. मिनू, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, प्रदीप पवार, मनोज लोणारकर, रविंद्र जोंगी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती चोखपणे सांभाळावी. उपक्रमामध्ये लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी आणणे हा महत्त्वाचा भाग आहे. त्याअनुषंगाने वाहतूक आराखडा तयार करावा. लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या दिवशी आणतांना त्यांची काळजी घेण्यात यावी. बसमध्ये प्राथमिक उपचारासोबतच आरोग्य सेवक, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रमस्थळी स्वच्छता विषयक व्यवस्था, शौचालय सुविधा, वीज, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य, खाद्यान्ने तसेच पाणी, आसन व्यवस्था याबाबत नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक येणार असल्याने आरोग्य व्यवस्था उभारण्यात यावी. फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच परिसरात स्वच्छता राहील या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरेकेट्सची व्यवस्था तसेच आगीच्या स्थितीबाबत योग्य ती काळजी घेण्यात यावी. कार्यक्रमाच्या दिवशी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या स्तरावर नियोजन करावे, असे आवाहन श्री. कटियार यांनी केले.

00000 

‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट’ प्रात्यक्षिक केंद्राचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते शुभारंभ

 





‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट’ प्रात्यक्षिक केंद्राचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते शुभारंभ

 

अमरावती, दि. 21 (जिमाका): लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणा मतदारांना अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ईव्हीएम प्रात्यक्षिक सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आज करण्यात आले. मतदारांनी या यंत्रणेची प्रात्यक्षिके पाहून शंकानिरसन करून घ्यावे, असे आवाहन श्री. कटियार यांनी यावेळी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अमरावती येथे ‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट’ प्रात्यक्षिक केंद्राचे शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी.एम. मिनू, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, प्रदीप पवार, मनोज लोणारकर, रविंद्र जोंगी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह गटविकास अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातील सर्व आठ मतदार संघामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पुरविण्यात आलेल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मतदार संघाचे मुख्यालयी ईव्हीएम डेमॉन्स्ट्रेशन सेंटर उघडण्यात आले असून ईव्हीएम मशीन्स प्रात्याक्षिक करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच प्रत्येक मतदार संघामध्ये प्रसिध्दीसाठी दोन मोबाईल  डेमॉन्स्ट्रेशन व्हॅन देण्यात आल्या आहेत.

 

मतदारांना मतदान यंत्रांची प्रक्रिया स्वत: बघावी  प्रारूप मतदान करून त्यांनी केलेले मतदान   व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे पडताळून बघता यावे, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत सर्व शंकाचे निरसन करता यावे, या उद्देशाने मतदान यंत्र मोबाईल डेमॉन्स्ट्रेशन व्हॅन गावोगावी फिरून जनजागृती करणार आहे.
नागरिकानी जनजागृती मोबाईल डेमॉन्स्ट्रेशन व्हॅनच्या
 माध्यमातुन प्रारूप मतदान तसेच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत असणाऱ्या सर्व शंकाचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

00000

Wednesday, December 20, 2023

कृषी पुरस्कारःप्रस्ताव मागविले

कृषी पुरस्कारःप्रस्ताव मागविले

 

            अमरावती, दि. 20 (जिमाका): कृषी विभागामार्फत कृषी व कृषी पूरक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शेतकरी,व्यक्ती, संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषी भूषण, जिजामाता कृषी भूषण, कृषी भूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक  शेतीमित्र, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेती निष्ठ शेतकरी पुरस्कार व युवा शेतकरी पुरस्कार देऊन दरवर्षी  गौरविले जाते.

 

सन 2023 या वर्षासाठी पुरस्काराचे प्रस्ताव कृषी विभागाने मागविले असून प्रस्ताव दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत पाठवावयाचे आहेत. शेतकऱ्यांनी पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याकरिता व अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक ,कृषी पर्यवेक्षक किवा नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा  अधीक्षक  कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

०००००

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...