Wednesday, December 27, 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात 29 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन

 

जिल्हाधिकारी कार्यालयात 29 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन

अमरावती, दि. 27 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शुक्रवार, दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी केंद्र शासनामार्फत ‘कंन्झ्युमर प्रोटेक्शन ईन द इरा ऑफ ई-कॉमर्स डिजीटल ट्रेड ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त ग्राहकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी केले आहे.

00000

अटल भुजल योजना; चांदुर बाजार येथे तालुकास्तरीय प्रशिक्षणात तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

 

अटल भुजल योजना; चांदुर बाजार येथे तालुकास्तरीय प्रशिक्षणात तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

      अमरावती, दि. 27 (जिमाका): भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागामार्फत शुक्रवार दि. 22 डिसेंबर रोजी चांदुर बाजार येथील तहसील सभागृहामध्ये अटल भूजल योजना अंतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.  यावेळी विविध विषय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

          तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आले. यावेळी  उपविभागीय महसूल श्रीकांत उंबरकर, चांदुर बाजार तहसीलदार गीतांजली गरड, गट विकास अधिकारी मोहन शृंगारे आदी उपस्थित होते.

  ‘पाण्याचे मागणी व्यवस्थापन या विषयावर कृषी तज्ञ जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष दिनेश खडसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच योजनेतंर्गत शेतकरी मेळावा व तृणधान्य मेळावा ग्रामपंचायतस्तरावर सुरू असून त्यामध्ये ठिंबक व तुषार सिंचनाचे महत्व सांगितले. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून अनुदानाचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. ‘पाणी बचतीसाठी आंतरव्यक्ती संवाद या विषयावरील उपक्रमाबाबतची माहिती कृषी तज्ज्ञ नारायण फटिंग व अश्वमेघ यांनी दिली.  गावपातळीवर पाणी बचतीच्या उपाययोजना राबविण्यासाठीचे ‘आयसीई उपक्रम या विषयाची माहिती आयईसी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन प्रमोद झगेकर यांनी दिली. तसेच चांदुर बाजार तालुक्यात शालेय उपक्रमाअंतर्गत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व गीत गायन स्पर्धा आयोजित केल्याबाबत माहिती दिली. ग्रामपंचायत स्तरावर चित्ररथाच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येत असून अटल भूजल योजनेंतर्गत भूजल ग्राम समृद्ध स्पर्धा राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.

भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे डॉ. केतकी जाधव यांनी प्रस्तावनेतून अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीची तालुक्यातील सद्यस्थिती, अटल भूजल योजनेअंतर्गत झालेल्या कामाची व नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन प्रमोद झगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविण फुकट यांनी केले.

00000

अभय योजनेंतर्गत थकीत मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना; योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार:योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अभय योजनेंतर्गत थकीत मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना;

 योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार:योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 27 (जिमाका): मालमत्तेचे हस्तांतरण करतांना नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तांसाठी  अभय योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व दंड माफी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला टप्पा  दि. 1 डिसेंबर 2023 ते दि.31 जानेवारी 2024 आणि दुसरा टप्पा दि. 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा  मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल औतकर यांनी केले आहे.

अभय योजनेंतर्गत पहिल्या टप्पात सन 1980 ते 2000 या कालावधीत नोंदणीसाठी दाखल केलेले अथवा न केलेले दस्ताकरीता दि. 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम रूपये 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाची संपुर्ण रक्कम माफ केली आहे. देय होणारी रक्कम 1 लाख रुपयेवरील असल्यास 50 टक्के व दंडाच्या रक्कमेत संपुर्णत: 100 टक्के सुट देण्यात आली आहे. तर योजनेचा दुसऱ्या टप्पा कालावधीत दि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या काळात मुद्रांक शुल्क व दंड भरणा केल्यास देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडात 80 टक्के सवलत दिलेली आहे. देय होणारी रक्कम 1 लाखावरील असल्यास मुद्रांक शुल्कात 40 टक्के व दंडात 70 टक्के सवलत दिलेली आहे.

 

          पहिल्या टप्प्यात दि. 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीतील भरणा केल्यास देय होणारी रक्कम 1 ते 25 कोटी रुपये पर्यंतच्या असल्यास मुद्रांक शुल्कास 25 टक्के माफी व देय होणारी दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा कमी असल्यास दंड रक्कमेस 90 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. मुद्रांक शुल्काची रक्कम ही 25 कोटी पेक्षा अधिक असल्यास मुद्रांक शुल्कास 20 टक्के व दंड रक्कम एक कोटी स्विकारण्यात येईल व उर्वरीत रक्कमेस सुट देण्यात येईल. दुसऱ्या टप्पा दि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत या कालावधीत भरणा केल्यास देय होणारी रक्कम 1 ते 25 कोटी रुपये असल्यास देय होणारी मुद्रांक शुल्कातुन सुट 20 टक्के देय राहील. तसेच दंड रक्कमेस 50 लक्ष पेक्षा कमी असल्यास देय होणाऱ्या मुद्रांक शुल्कातुन सुट 20 टक्के देय राहील. तसेच दंड रक्कम 50 लक्षा पेक्षा कमी असल्यास देय होणाऱ्या दंडामध्ये 80 टक्के सुट देण्यात येईल. दंडाची रक्कमेची पन्नास लाख पेक्षा जास्त असल्यास केवळ 50 लाख दंड म्हणून स्विकारण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात रक्कम 25 कोटीपेक्षा अधिक असल्यास मुद्रांक शुल्कात 10 टक्के सुट व दंडात दोन कोटी रुपये रक्कम दंड म्हणुन स्विकारण्यात येईल व उर्वरीत दंडाच्या रक्कमेत सुट देण्यात येईल.

          अभय योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ज्यांना मुद्रांक शुल्काची नोटीस प्राप्त झाली आहे, तसेच ज्यांनी त्यांचे अनोंदणीकृत दस्तऐवजांवर आवश्यक मुद्रांक शुल्क शासनास अदा केले नसेल अशाना या कालावधीतील सर्व दस्तऐवजांना ही सवलत लागू राहिल. त्यामुळे संबंधित पक्षकार यांनी त्यांचे मुळ दस्तांसह विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावा. तसेच शासनाने जाहीर केलेल्या या सवलत  योजनेचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम;दावे व हरकती दि.12 जानेवारीपर्यंत निकाली काढण्यास मुदतवाढ

 

मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम;दावे व हरकती दि.12 जानेवारीपर्यंत निकाली काढण्यास मुदतवाढ

अमरावती, दि. 27 (जिमाका): राज्य निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमामध्ये निवडणूक आयोगाने अंश:त बदल करुन सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती निकाली काढण्याचे शुक्रवार दि. 12 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.

सुधारीत कार्यक्रम याप्रमाणे : दावे व हरकती शुक्रवार दि. 12 जानेवारीपर्यंत निकालात काढणे.  बुधवार दि. 17 जानेवारी 2024 पर्यंत मतदार यादीचे तपासणे आणि अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे तसेच डेटा बेस अद्यावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करणे.  तर अंतीम मतदार यादी सोमवार दि. 22 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्धी होईल.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

 



जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

 

            अमरावती, दि. 27 (जिमाका): देशाचे माजी कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

         यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही स्व. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

00000


Tuesday, December 26, 2023

रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचा अमरावती जिल्हा दौरा

 


रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचा अमरावती जिल्हा दौरा

अमरावती, दि. 26 (जिमाका): रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे आज,  दि. 27 डिसेंबर 2023 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा  पुढीलप्रमाणे :

बुधवार, दि. 27 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन व  अमरावती विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पाहणी. दुपारी 2.30 वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पंचवटी चौक, अमरावतीकडे प्रयाण व आगमन.  दुपारी 3 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख यांची 125 व्या  जयंती निमित्त शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथील कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळ 4.30 वाजता श्रीकृष्ण पेठकडे प्रयाण. सायंकाळ 4.35 वाजता महिन्द्रा राहटगांवकर यांचा निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 4.50 वाजता अमरावती बेलोरा विमानतळकडे प्रयाण. सायंकाळ 5.15 वाजता अमरावती बेलोरा विमानतळ, अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

सहकारी व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सूरू;30 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

सहकारी व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सूरू;30 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

            अमरावती, दि. 26 (जिमाका) : सहकारी संस्थांमध्ये काम करण्यासाठी सहकारी व्यवस्थापन पदविका अनिवार्य केले आहे. या अभ्यासक्रमासाठी भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे दि. 1 जानेवारी ते 30 जुन 2024 या मुदतीसाठी प्रवेश देणे सुरू आहे. इच्छुकांनी दि. 30 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन  भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांनी केले आहे.

सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम दुरूस्थ शिक्षण पध्दतीने पुर्ण करता यावा. तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये या पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 13 सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातुन हा अभ्यासक्रम पोस्टल पध्दतीने सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुर्ण अंतर्गत भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे दि. 1 जानेवारी 2024 ते 30 जुन 2024 या मुदतीसाठी प्रवेश देणे सुरू आहे. त्यासाठी प्राचार्य भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्याशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी 9881047668 या क्रमांक संपर्क साधावा.

00000

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...