Friday, January 5, 2024

प्रजासत्ताक दिन सोहळा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा

 



प्रजासत्ताक दिन सोहळा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा;

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करा

-         निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.विवेक घोडके

 

अमरावती, दि. 05 (जिमाका): भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ 26 जानेवारी 2024 रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सकाळी 9. 15 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी आज येथे दिले.

        प्रजासत्ताक दिनाचा 74 वा वर्धापन सोहळा पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बांधकाम विभागाचे उपअभियंता तुषार काळे, तहसिलदार विजय लोखंडे, प्रशांत पडघम तसेच  महसूल, पोलीस, महापालिका,  सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, माहिती कार्यालय आदी कार्यालयांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. घोडके म्हणाले की, मुख्य ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांच्या हस्ते होईल.  मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळी रंगरंगोटी, कुंड्या ठेवणे, पताका लावणे, अतिथी व उपस्थितांची बैठक व्यवस्था, आवश्यक स्वयंसेवक, ध्वनीयंत्रणा आदी व्यवस्था नियोजनबध्द पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत.  महापालिकेकडून स्वच्छता, पेयजल सुविधा, मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलांना खाऊवाटप आदी व्यवस्था पुरविण्यात यावी. तसेच ध्वजवंदन समितीने ध्वजस्तंभ, राष्ट्रध्वज, ध्वजाला मानवंदना, पोलीस पथक,  बँड पथकाची नियुक्ती आदी कामे लवकर पूर्ण करुन घ्यावीत.

प्रजासत्ताक दिनी अधिकाधिक लोकांना या समारंभास उपस्थित राहाता यावे, यासाठी यादिवशी सकाळी 8.30 ते सकाळी 10 या वेळेत इतर कार्यालय, संस्थांनी ध्वजारोहण किंवा शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करू नये. असे समारंभ सकाळी 8.30 च्या पूर्वी किंवा सकाळी 10 नंतर आयोजित करावेत, अशा सूचना श्री. घोडके यांनी दिल्या.

सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम

प्रजासत्ताक दिनी सायंकाळी 7 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली  आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कार्यक्रम यथोचितरीत्या साजरा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. घोडके यांनी दिले. कार्यक्रमापूर्वी रंगीत तालीम 25 जानेवारीला 2024 रोजी सकाळी 9 वाजता जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल.

00000

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2021-22, 2022-23 करीता अर्ज आमंत्रीत

 जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2021-22, 2022-23 करीता अर्ज आमंत्रीत

 

              अमरावती, दि. 05 (जिमाका):  राज्य शासनाच्या क्रीडा धोरणानुसार सन 2021-22, 2022-23 या वर्षासाठी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू महिला, पुरूष, दिव्यांग खेळाडू यांच्यासाठी असून या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 10 हजार रूपये, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या मार्गदर्शक व खेळाडू यांनी दि. 15 जानेवारी, 2023 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

 

 क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार : सतत दहा वर्ष मार्गदर्शक म्हणून कार्य व 30 वर्ष वय असावे.  गुणांकाकरीता जिल्ह्यातील खेळाडूची कामगिरी ग्राह्य धरल्या जाईल. मागील दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य पदक विजेते तसेच कनिष्ठ राष्ट्रीय, शालेय, ग्रामीण व महिला, खेलो इंडिया मधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केलेले. तसेच सांघिक अथवा व्यक्तीक मान्यता क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ गट, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य, जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळणारे किमान 3 खेळाडू घडविणारा मार्गदर्शक असावा. विहित नमुन्यातील अर्ज संघटने मार्फत अथवा वयक्तीकरित्या विहित मुद्दतीत सादर करणे आवश्यक राहिल. अर्जदाराने मार्गदर्शन केलेल्या खेळाडूचे विहित नमुन्यातील हमीपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

 

गुणवंत खेळाडू (महिला, पुरूष, दिव्यांग खेळाडू)  पुरस्कार : लगतपुर्व पाच वर्षापैकी दोन वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व केलेले असावे. खेळाडूंची मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षाच्या लगतपुर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ, कनिष्ठ शालेय राष्ट्रीय शालेय व केंद्रशासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी लक्षात घेवून उत्कृष्ठ ठरणाऱ्या तीन वर्षातील कामगिरीचा विचार करण्यात येईल.  आशियाई गेम्स, कॉम्वेल्थ गेम्स, जागतिक चषक, क्रीडा स्पर्धा आशियाई गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा सहभागी होणाऱ्या थेट पुरस्कार देण्यात येईल. विहित नमुन्यातील अर्ज संघटेने मार्फत अथवा वयक्तीकरित्या विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. अर्ज सिलबंद लिफाफ्यात सादर करून त्यावर पुरस्काराचे नाव व वर्ष, अर्जदाराचे नाव लिहिणे आवश्यक आहे.

 

पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तिंनी त्यांची कामगिरी दि. 1 जुलै ते 30 जुन याप्रमाणे गृहीत धरावी. तसेच प्रत्येकांनी अर्जासोबत राज्यात गेल्या 15 वर्षापासून सतत वास्तव असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र सोबत जोडावे. एका जिल्ह्यामध्ये क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी अन्य जिल्ह्यात अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. जिल्हा क्रीडा पुरस्कार दोन व्यक्तींना विभागुण दिला जाणार नाही. पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती आढळुन न आल्यास पुरस्कार घोषित केला जाणार नाही. वेळापत्रकामध्ये परिस्थितीनुरूप बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा पुरस्काराचे विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती येथे कार्यालयीन वेळेत प्राप्त करता येईल. परिपुर्णरित्या भरलेला प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार; 22 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार; 22 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

अमरावती, दि. 05 (जिमाका): क्रीडा विभागाव्दारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटुंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2022-23 या वर्षाच्या पुरस्कारासाठी सोमवार दि. 22 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू यांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

 

 क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनिय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षि करीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू, शिवछत्रपती राज्य पुरस्कार साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडू व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार महिला क्रीडा मार्गदर्शक असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासनाने दि. 29 डिसेंबर,2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2022-23 या वर्षाच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https:sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर दि. 22 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

000000

 

Thursday, January 4, 2024

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘शिवसृष्टी’ विकासकामाचे भूमीपूजन; सर्वांना अभिमान वाटेल, असे प्रेरणास्थळ निर्माण करा - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 









पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘शिवसृष्टी’ विकासकामाचे भूमीपूजन;

सर्वांना अभिमान वाटेल, असे प्रेरणास्थळ निर्माण करा

- पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

            अमरावती, दि. 4 (जिमाका):  छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करावा. सर्वांना अभिमान वाटेल, असे जिल्ह्याचे हृदयस्थळ असलेल्या मालटेकडी येथे ‘शिवसृष्टी’च्या रुपाने प्रेरणास्थळ निर्माण करा, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांनी आज येथे केले.

 

महानगरपालिका क्षेत्रातील मालटेकडी येथे पर्यटन विकास योजनेंतर्गत विकास कामाचे भूमीपूजन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, मनपा आयुक्त देवीदास पवार, माजी महापौर चेतन गावंडे, माजी नगरसेवक दिनेश बुब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, शहराच्या मध्यभागी हिरवाळीने आच्छादलेल्या मालटेकडी येथे सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. या निसर्गरम्य ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट व ऐतिहासिक घटनांची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी शिवसृष्टी विकासांतर्गत म्युरल वॉलची निर्मिती करण्यात येत आहे. ते अधिक आकर्षित होण्यासाठी महानगरपालिकाने नियोजन करावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित राज्यातील विविध कामांचा अभ्यास करुन शहरात भव्य व अभिमान वाटेल असे प्रेरणास्थळ निर्माण करावे. शिवसृष्टी विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करु, असेही ते यावेळी म्हणाले.

 

महानगरपालिका क्षेत्रातील मालटेकडी येथे शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी पर्यटन विकास विभागामार्फत 3 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. प्रथम टप्प्यामध्ये 30 लक्ष रुपये प्राप्त झाले असून त्यामधून मालटेकडी येथे संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 35 लाख रूपये प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित 16 म्युरल वॉल तयार करण्यात येणार आहेत. तसेच त्यातील म्युरल वॉल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी लावण्यात येणार आहेत. तसेच आगामी काळात लेझर शो, वॉटर फाऊंटन, विद्युत रोषणाई, पाथ-वे, पाण्याची व्यवस्था, परिसरातील सौंदर्यीकरण इत्यादी कामे करण्यात येतील, अशी माहिती मनपा आयुक्त श्री. पवार यांनी यावेळी दिली.

000000

महिला सशक्तीकरणासाठी अभिनव उपक्रमांना प्रोत्साहन द्या - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 















‘मेळघाट हाट’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण;

महिला सशक्तीकरणासाठी अभिनव उपक्रमांना प्रोत्साहन द्या

- पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

      अमरावती, दि. 4 (जिमाका):  मेळघाट क्षेत्रातील स्वयं सहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनाला ‘मेळघाट हाट’ विक्री केंद्राच्या माध्यमातून उत्पादित वस्तू व साहित्याला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा अभिनव उपक्रमांना सर्व स्तरावरून प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी येथे केले.

            जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सायन्सकोर हायस्कुलच्या प्रांगणात महिला बचत गटांचे उत्पादन विक्री केंद्राचे उद्धाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे आदी यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रातील उत्पादित साहित्याला हक्काचे विक्री केंद्र मिळाले आहे. या मॉलच्या माध्यमातून उत्पादित वस्तू थेट ग्राहकांना विक्री करुन बचत गटातील महिलांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या ठिकाणी ग्राहकांना वनौषधी, बांबूंपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, जंगली मेवा, मध यासारख्या वस्तूंची खरेदी करता येईल. आदिवासी महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन आदिवासी क्षेत्रात जास्तीत-जास्त बचत गटांचे जाळे निर्माण करावे. महिलांची कला-कौशल्ये तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन वाढवून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासनासोबतच स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            विक्रीसाठी आणलेल्या साहित्यांना योग्य भाव मिळण्यासाठी विक्री साहित्याचे उत्तम मार्केटिंग, पॅकिंग व ब्रँडिंग करणे आवश्यक आहे. यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षित करावे. उत्पादित मालांना राज्यसह देशात बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येईल. मेळघाट क्षेत्रातील महिला बचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यकतेनुसार कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिली.

 

            मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंडा यांनी प्रास्ताविकेत मेळघाट हाटबाबत माहिती दिली. मेळघाटातील धारणी तसेच चिखलदरा तालुक्यातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी मेळघाट हाट विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे एकाच छताखाली मेळघाटातील उत्पादित केलेल्या 47 प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रथम टप्प्यात एकूण 60 स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनाचा समावेश करण्यात आला आहे. त्यात बांबूपासून निर्मित विविध उत्पादनांसह तृणधान्यांमध्ये सावा, कुटकी, ज्वारी, बाजरी तसेच कडधान्य, गहू, लाल तांदुळ, तूर दाळ, विविध प्रकारची लोणची, चिखलदऱ्यात उत्पादित होणारी प्रसिध्द कॉफी, मध, तूप, गृहशोभेच्या वस्तू, आरोग्याच्या दृष्टिकोनातून पौष्टिक खाद्यान्ने असे विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. येथे गोदाम, पॅकेजिंग, लेबलिंग युनिटसह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या मॉल विक्री केंद्राचे स्वरूप देण्यात आले आहे.

            कार्यक्रमाची सुरुवातीला आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर मेळघाट हाट उद्घाटनाच्या कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी मेळघाट हाट मॉलमधील विक्री साहित्याची पाहणी करून याबाबत महिला बचत गटांच्या महिलांकडून माहिती जाणून घेतली. तसेच विविध वस्तूंची खरेदीही केली. कार्यक्रमाचे संचालन व आभार शिप्रा मानकर यांनी मानले.

00000

आदिवासी व सर्वसाधारण क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील








आदिवासी व सर्वसाधारण क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करा

- पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य व जिल्हा परिषदस्तरीय प्रमुख

कार्यान्वयन यंत्रणांच्या विकास कामांचा आढावा

 

अमरावती, दि. 4 (जिमाका): आदिवासी घटक योजनेंतर्गत जिल्हा परिषद, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, महिला व बाल कल्याण विभाग यांनी सन 2022-23 मधील आदिवासी क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री. व्यवहारे, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आदिवासी क्षेत्रात शासकीय विभागांच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत तरतूद करण्यात येते. त्याअंतर्गत आदिवासी घटक योजनेतील सर्व विभागांनी सन 2022-23 ची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी निर्धारित काळात निधी खर्च करुन विकास कामे पूर्ण करावीत. नजिकच्या काळात या विकास कामांची पाहणी करण्यात येईल. पाहणीच्यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित यंत्रणाचे विभागप्रमुख उपस्थित राहतील, असे पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

सर्वसाधारण योजनेंतर्गत वन विभागाच्या विविध विभागांचा यावेळी आढावा घेतला. आदिवासी विभागातील पेसांतर्गत निधी, कृषी पंपाची विद्युत जोडणी, अमृत आहार योजना आदी विविध योजनांबाबत यावेळी माहिती घेण्यात आली. वन्यजीव व्यवस्थापन व निसर्ग संवर्धन कामे करताना वन विभागाने जिओ टॅगिंग करावे. जेणेकरुन वन विभागामार्फत करण्यात आलेली विकास कामे नागरिकांना ऑनलाईन बघता येईल. येत्या काळात आदिवासी विभागातील कोणत्याही दोन तालुक्यांची निवड करुन त्यांना प्रत्यक्ष भेट देण्यात येईल. त्या अनुषंगाने वन विभागातील विकास कामांचा आढावा प्रशासनामार्फत घेण्यात येईल.  केंद्र शासनाकडे वन विभागाचा प्रलंबित विकास कामांचा प्रशासनामार्फत पाठपुरावा करावा, असे श्री. पाटील म्हणाले.

जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत वनविभागाच्या पाचही विभागाचा यावेळी आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे सन 2023-24 वरील प्राप्त निधी व खर्चाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. तसेच सन 2023-24 चा निधी विहित कालावधीत खर्च होईल, ही दक्षता संबंधित विभागाने घ्यावी, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

00000



 

मराठी विद्यापीठ येत्या जूनपासून सुरु होणार - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील








 


मराठी विद्यापीठ येत्या जूनपासून सुरु होणार

- पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

रिध्दपूर येथील थीम पार्कची पालकमंत्र्यांकडून पाहणी

 

अमरावती, दि. 4 (जिमाका): रिध्दपूर येथे येत्या जूनपासून सुरु होणाऱ्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज रिध्दपूर येथे दिले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी आज रिध्दपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य महंत कारंजेकर बाबा, गोविंद्रप्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वाईंदेशकर तसेच मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, तहसीलदार नरेश आकनुरी, गोविंद गुरुकुल आश्रम शाळेचे सचिव सुभाष पावडे, मुख्याध्यापक संजय कोहळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मराठी भाषा विद्यापीठाची प्रस्तावित जागा थीम पार्कची पाहणी करताना श्री. पाटील म्हणाले की, येत्या जून 2024 पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरु करण्यात येईल. त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी. विद्यापीठ स्थापनेच्यादृष्टीने अभ्यासक्रम, कुलगुरुंची निवड, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोई-सुविधा तसेच आवश्यक बाबींची पुर्तता लवकरात लवकर करण्यात यावी. या विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी विशेष कॅम्पेन आयोजित करण्यात यावे. विद्यार्थी निवडीचे निकष, अभ्यासक्रम आदींबाबत लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना दिले. येथील म्हाइंभट सभागृह, ज्ञानकेंद्र, भक्तनिवारा आदींची पाहणीही श्री. पाटील यांनी यावेळी केली.

मराठी भाषा विद्यापीठ सुरु व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे योगदान अमुल्य आहे. त्यांच्या अमुल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगोत्री रिध्दपूर ठरली आहे. यामुळे रिध्दपूर ही महानुभाव पंथाची सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे. 'लिळाचरित्रा'सारखा आद्य ग्रंथ जेथे लिहिला गेला त्या स्थानाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनामार्फत येत्या जूनपासून रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील, याचाही विचार करण्यात आला असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी श्री गोविंद गुरुकुल आश्रम विद्यालय परिसरातील आद्य मराठी गद्य ग्रंथ लिळाचरित्राचे निर्मिती स्थान, वाजेश्वरी येथील दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राजमठ मंदिरात श्री गोविंदप्रभू यांचे दर्शन घेतले. तसेच गोपीराज ग्रंथ संग्रहालयातील पुरातन पोथ्यांची पाहणी केली. येथील हस्तलिखित पोथ्या सातशे वर्षांपूर्वीच्या आहेत. येथील सहाशे वर्षापूर्वींच्या संत महात्म्यांच्या वापरातील कापडी भांडी, गाठी यांचीही पाहणी करुन येथील प्राचीन वस्तू आणि ग्रंथसंपदेचे जतन करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

0000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...