Friday, February 23, 2024

बेवारस दुचाकी वाहनाचे पुराव्यासह दावा दाखल करण्याचे आवाहन

 बेवारस दुचाकी वाहनाचे पुराव्यासह दावा दाखल करण्याचे आवाहन

 

          अमरावती, दि. 23 (जिमाका):  येथील पोलीस स्टेशन, राजापेठ येथे सन 2021 ते 2023 पर्यंत बेवारस वाहने तसेच दिर्घ कालावधीपासून अभिलेखावर नोंद नसलेली 46 प्रकारचे वाहने भंगार अवस्थेत पडलेली आहे. या बेवारस वाहनाचे दुचाकी मालकांनी पुरावा दाखल करण्याचे आवाहन  वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी केले आहे.

 

            बेवारस वाहनाची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तपासणी केली असता वाहन मालकाचे  नाव व पत्ता आढळुन आलेले नाही. बेवारस वाहने कोणाच्या मालकीची असल्यास त्यांनी त्याबाबत कागदपत्रे सादर करावी. वाहन मालकांनी आपल्या वाहनाचा मालकी हक्क न सादर केल्यास वाहनांची 60 दिवसानंतर(2 महिने) लिलाव प्रक्रिया करण्यात येईल. लिलाव प्रक्रियेपुर्वी वाहन मालकांना कागदपत्रांची पुर्तता करूनच वाहने परत दिली जाणार आहे. तरी दुचाकी वाहन मालकांनी वाहनाचे मुळ कागदपत्र व आधारकार्ड सह पोलीस स्टेशन राजापेठ (0721-2672010) येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर मो.क्र. 9923647985 व सुनिल विधाते मो.क्र. 9923810879 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000


Thursday, February 22, 2024

संविधान महानाट्यातून अमरावतीकरांनी अनुभवला घटना निर्मितीचा संघर्ष महासंस्कृती महोत्सवाची संविधान महानाट्याने सांगता

 


















संविधान महानाट्यातून अमरावतीकरांनी अनुभवला घटना निर्मितीचा संघर्ष

महासंस्कृती महोत्सवाची संविधान महानाट्याने सांगता

 

अमरावती, दि.22 (जिमाका) : महासंस्कृती महोत्सवाच्या शेवटच्या आणि पाचव्या दिवशी 'संविधान- डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या महानाट्यातून घटना निर्मितीचा प्रत्यक्ष संघर्ष अमरावतीकरांनी अनुभवला. स्वातंत्र्य चळवळीपासून ते स्वातंत्र्यप्राप्तीचा आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संविधान निर्मितीचा सखोल व बोलका जीवनपट महानाट्यातील कलाकारांनी रंगमंचावर जिवंत केला. या महानाट्याने पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाची  सांगता झाली. अमरावतीकरांनी या संविधान महानाट्याला भरभरून प्रतिसाद देत महानाट्य बघण्यासाठी गर्दी केली.

            पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने 18 फेब्रुवारीपासून सायन्सस्कोर मैदान येथे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवसांच्या विविध सांस्कृतिक, लोककला, संगीतमय कार्यक्रमाच्या आयोजनानंतर  नितीन बनसोड दिग्दर्शित व अमन कबीर लिखित 'संविधान-डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या महानाट्याने महासंस्कृती महोत्सवाची सांगता झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मीतीसाठी घेतलेले परिश्रम, त्याग आणि समर्पण अत्यंत प्रभावीपणे कलाकारांनी या महानाट्यातून मांडले.

             तीन तास चाललेल्या या संविधान महानाट्याला प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी पसंती दर्शविली. सायन्सकोर मैदान प्रेक्षकांच्या गर्दीने फुलून गेले होते. नागरिकांसह अधिकारी, कर्मचारी वर्ग आपल्या कुटुंबासह या महानाट्याला उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, मनपाचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह अन्य अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

            संविधान महानाट्याच्या मुख्य भूमिकेत रवी पटेल, विवेक फूसे, सुवर्णा नलोडे, राकेश खाडे, सुनील हिरकणे,आरुष ढोरे, रवींद्र तिवारी, विजय रामटेके, सुरेखा गायकवाड, अनिल पालकर, समीर दंडारे, चंद्रकांत साळुंखे,

मुमताज सय्यद, नवाब हमीदउल्ला नंदू मानकर, श्याम वर्मा, शकील कुरेशी, सर्जेराव गलफट कोरिओग्राफर पंकज डोंगरे, रोहन पराते, बशीर खान यांच्यासह शेकडो कलाकारांनी सहभाग घेतला होता.

               आयोजन समितीमधील अधिकारी वर्गाच्या वतीने सहभागी मुख्य कलाकारांचा रंगमंचावर सत्कार करण्यात आला. महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांचा सन्मानचिन्ह देऊन विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. महोत्सव यशस्वी केल्याबद्दल श्री. भटकर यांनी स्थानिक कलाकारांचे तसेच प्रेक्षकांचे आभार मानले.

0000

शासन आपल्या दारी अभियानातंर्गत पंधरवाडा मोहिम; अनाथ बालकांना विविध प्रमाणपत्राचे होणार वाटप

 

शासन आपल्या दारी अभियानातंर्गत पंधरवाडा मोहिम;

अनाथ बालकांना विविध प्रमाणपत्राचे होणार वाटप

 

अमरावती, दि.22 (जिमाका): जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत शासन आपल्या दारी अभियानातंर्गत पंधरवाडा मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील अनाथ बालकांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समर्पित कक्ष स्थापन करण्यात आला असून अनाथ बालक व त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

 

जिल्ह्यातील अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, महाराष्ट्र राज्याचे अधिवास,  राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान कार्ड इत्यादी उपलब्ध करून देण्यासाठी दि.24 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीत पंधरवाडा मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समर्पित कक्ष स्थापन करण्यात आला असून संबंधित तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका बाल संरक्षण समिती(सर्व) व बाल विकास प्रकल्प अधिकारी(ग्रामीण) तथा सदस्य सचिव तालुका बाल संरक्षण समिती(सर्व)अमरावती यांच्याकडे तर जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, भुतेश्वर चौक, देशपांडे वाडी, अमरावती येथील समर्पित कक्षात अनाथ बालकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावी. तसेच अधिक माहिती व मागदर्शनासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डवले(मो.9021358816) व समुपदेशन आकाश बरवट (मो.9975709829) याच्यांशी संपर्क साधावा, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली.

00000

 

 

अधिकृत कंपणीमार्फतच आरोग्य मित्राची नियुक्ती; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

 

अधिकृत कंपणीमार्फतच आरोग्य मित्राची नियुक्ती;

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

 

अमरावती, दि.22 (जिमाका):  महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी आरोग्यमित्रांची नियुक्त करण्यात आली आहेत. काही संस्थाव्दारे आरोग्यमित्र नियुक्तीसंदर्भात जाहिराती व्हायरल होत आहे. अशा अफवा व भाम्रक जाहिरातीवर तरुणांनी विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रधान मंत्री जन आरोग्य योजनाचे विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोरे यांनी केले आहे. आरोग्य मित्रांची नियुक्ती अधिकृती संस्थेकडून केली जात असून नियुक्ती संदर्भात कोणतेही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना 2012 पासून तर केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2018 पासून राज्यात राबविली जात आहे. तसेच 1 एप्रिल 2020 पासून दोन्ही योजना एकत्रित कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनाची माहिती व मार्गदर्शनासाठी तसेच प्रणालीवर रुग्णांचे कागदपत्रांची नोंदणी करण्यासाठी आरोग्यमित्र नियुक्त केले जातात. आरोग्यमित्रांची नियुक्ती इन्शुरन्स कंपनीच्या थर्ड पार्टी एडमिनिस्ट्रेटरव्दारे कार्यरत एम.डी. इंडिया, मेडीअसिस्ट, प्यारा माऊंट व हेल्थ इन्शुरन्स या चार कंपन्या व्दारे केली जातात.

 

मागील काही दिवसांपासून विविध यंत्रणा व संस्थांद्वारे आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेकरीता आरोग्यमित्र नियुक्ती देण्यासंदर्भात जाहिराती व संदेश व्हायरल होत आहे. सुशिक्षित तरुण, तरुणींनी या अफवेवर विश्वास ठेवू नये. अशा कोणत्याही प्रकारची जाहिरात कंपणीकडून प्रसिद्ध झाली नसून अशा अफवा, भ्रामक जाहिरातीला बळी पडू नये. योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी निशुल्क दूरध्वनी क्रमांक 155388 किंवा  18002332200 वर संपर्क साधावा, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

 

Wednesday, February 21, 2024

महासंस्कृती महोत्सवामध्ये पालकमंत्र्यांची विशेष उपस्थिती:कलाकारांना दिली उत्स्फूर्त दाद; महासंस्कृती महोत्सवात भक्ती आणि कलेचा अनोखा संगम -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 













महासंस्कृती महोत्सवामध्ये पालकमंत्र्यांची विशेष उपस्थिती:कलाकारांना दिली उत्स्फूर्त दाद;

 

महासंस्कृती महोत्सवात भक्ती आणि कलेचा अनोखा संगम

-पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

अमरावती, दि. 21 (जिमाका) : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने भारतीय संस्कृतीचे जतन करून स्थानिक कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन राज्यभर करण्यात येत आहे. येथील स्थानिक कलाकारांना महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी नृत्य, कोरकू, गोंधळ, भारुड, कला, संस्‍कृती सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. भक्ती आणि कलेचा अनोखा संगम महासंस्कृती महोत्सवात बघायला मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

 

            सायन्स स्कोर मैदान येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाला पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पार्श्वगायिका बेला शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीसह खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे-पाटील, माजी महापौर चेतन गावंडे, तुषार भारतीय, निवेदिता चौधरी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, मनपा आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, देशातील 141 कोटी नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय शासनाने केली आहे. शंभर दिवस प्रत्येकाला सक्तीचा रोजगार मिळत आहे. त्यामुळे आता मनाची भूक भागविणे गरजेचे आहे. महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून मनाची भूक भागविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना आपली कला दाखविण्याची संधी मिळाली आहे. यामुळे या कलाकांराना प्रोत्साहन मिळत असून त्यांच्यासाठी संधीची नवीन कवाडे खुली होत असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

 

               पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी कलाकारांना शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री श्री. पाटील उपस्थित होते. श्री. बुलीदान राठी मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कलाविष्कार बघून मी खरोखर अंर्तमुख झालो. देवाने त्यांना एखादा अवयव कमी दिला असेल मात्र कलाविष्कार सादर करताना त्यांनी आपल्यातील कला जिवंत ठेवून खऱ्या अर्थाने महासंस्कृती महोत्सवाला मोठे केल्याची प्रतिक्रिया श्री. पाटील यांनी दिली. यावेळी पालकमंत्री यांनी प्रत्यक्ष रंगमंचावर जाऊन मूकबधिर विद्यार्थ्यांचे सांकेतिक भाषेत कौतुक केले आणि त्यांच्या शिक्षकास स्वतःच्या हातावरील घड्याळ बांधून त्यांचेही अभिनंदन केले. शिवाय मूकबधिर विद्यालयाला नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच लोकसहभागातूनही स्वतः पाच लक्ष रुपये देण्याचे आश्वासनही श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

 

              या महासंस्कृती महोत्सवात पार्श्वगायिका बेला शेंडे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजातील मराठी गीतांनी अमरावतीकर रसिक श्रोत्यांना भुरळ पाडली. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध  गीतांचा नजराणा यावेळी सादर करण्यात आला. अमरावतीकर रसिकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला.

 

सिंघम आदिवासी नृत्य ठरले आकर्षण

 

महासंस्कृती महोत्सवात स्थानिक कलावंतांनी सहभाग घेऊन दमदार कलाविष्कार सादर केले. यामध्ये सिंघम आणि आदिवासी नृत्य सर्वांचे आकर्षण ठरले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांनी सादर केलेले मल्लखांब प्रात्यक्षिक दर्जेदार ठरले. स्थानिक कलावंतांनी एकापेक्षा एक सरस कलाविष्कार सादर करून अमरावतीकर प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

0000

 

शासकीय तंत्रनिकेतन येथील सुरक्षाभिंतीचे पालकमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन; नवीन शैक्षणिक धोरणामुळे कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील


 








शासकीय तंत्रनिकेतन येथील सुरक्षाभिंतीचे पालकमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन;

नवीन शैक्षणिक धोरणामुळे कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल

-पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

         

अमरावती, दि. 21 (जिमाका) : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या विविध संधी निर्माण होवून कौशल्य व व्यावहारिक शिक्षणाला प्राधान्य देण्यात येईल. या शैक्षणिक धोरणामुळे देशात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन स्वयंरोजगारक्षम युवापिढी तयार होईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

 

शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथील सुरक्षाभिंतीचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रविण पोटे-पाटील, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, माजी नगरसेवक तुषार भारतीय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे  मुख्य अभियंता गिरीश जोशी, रुपा गिरासे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजय मानकर, विभाग प्रमुख डॉ. एस.पी. बुरघाटे, डॉ. एस.पी. बाजड आदी यावेळी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, केंद्र शासनाने देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे. या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणातील रचनात्मक बदल, अभ्यासक्रमातील सुसूत्रता, अध्यापनाच्या अभिनव पद्धती, मूल्यमापनातील सुधारणा, मातृभाषेतून शिक्षणाच्या संधी, नवीन अभ्यासक्रमांतील एकसमान पद्धती अशा विविधांगी पर्यायांतून नवी शिक्षण व्यवस्था निर्माण होईल. यातून स्वयंरोजगारक्षम युवापिढी तयार होईल. तसेच पारंपरिक शिक्षण पद्धतीतून केवळ बेरोजगारांचे लोंढे तयार न होता विद्यार्थ्यांना कौशल्येही आत्मसात करता येणार आहेत. यामुळे तरुणाईसाठी शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. प्रगत देशामध्ये कुशल मनुष्यबळाला मोठी मागणी आहे. या शैक्षणिक धोरणामध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन रोजगाराचे विविध पर्याय नवयुवकापुढे निर्माण होईल. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणातील सुरक्षा भिंतीचे भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणातील सुरक्षा भिंतीमुळे वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिंनींच्या सुरक्षिततेमध्ये अधिक भर पडेल. मुलींच्या वसतिगृहामध्ये महिला सुरक्षा गार्ड पूर्णवेळ उपस्थित राहील, यांची संस्थेने जबाबदारी घ्यावी, असेही पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मानकर तर संचालन प्रा. रंजना वानखडे यांनी केले.

00000

 

 

पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनांचे शहर पोलीस विभागाला हस्तांतरण ; प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण

 

पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार

 

-पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनांचे शहर पोलीस विभागाला हस्तांतरण ; प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण

 













 

          अमरावती, दि. 21 : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभाग अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना पोलीस विभागाचे सर्व सुविधायुक्त अत्याधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात शहर व ग्रामीण पोलीस विभागाला मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले.

 

पोलीस कवायत मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्तालयाला नवीन अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनांचे हस्तांतरण आणि पोलीस आयुक्तालयातील प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, माजी महापौर चेतन गावंडे, निवेदिता दिघडे, तुषार भारतीय यांच्यासह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण) विशाल आनंद, पोलीस उपायुक्त सागर पाटील, गणेश शिंदे, कल्पना बारावकर व सर्व पोलीस निरीक्षक आदी यावेळी उपस्थित होते.

 

प्रारंभी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व वाहनांच्या ताफ्याला हिरवी झेंडी दाखवून वाहने विभागाला हस्तांतरीत करण्यात आलीत. त्यानंतर पोलीस आयुक्तालयातील नुतणीकरण करण्यात आलेल्या प्रशिक्षण सभागृहाचे पालकमंत्र्यांचे हस्ते फीत कापून लोकार्पण झाले.

 

श्री. पाटील म्हणाले की, अमरावती पोलीस खात्याला जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहने खरेदीसाठी 2 कोटी 26 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच दुचाकी वाहनांसाठी 8 लाख 30 हजार रुपये व सभागृहाच्या नुतणीकरणासाठी 12 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार मंजूर निधीतून उपरोक्तप्रमाणे विभागाच्या बळकटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. यापुढेही पोलीस खात्याचे आधुनिकीकरण तसेच निवासस्थानांच्या दुरुस्ती, नवीन पोलीस स्टेशन निर्मिती, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, वेलफेअर फंड, सभागृहांची निर्मिती, अत्याधुनिक साहित्य खरेदी आदींसाठी सीएसआर फंड व जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

 

पुढे बोलताना ते म्हणाले की, पोलीसांच्या सन्मानाला कुणाव्दारेही ठेच पोहोचविली जावू नये, यासाठी पोलीसांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करण्यात येणार नाही. मादक पदार्थांची विक्री व व्यसन ही समाजाला लागलेली किड आहे. ही किड समाजातून पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलीसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. पोलीसांच्या कुटुबिंयांना सर्व सोयीयुक्त निवासस्थाने उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या निवासस्थांनाची दुरुस्ती करण्यात यावी. समाजातील विघातक, गुन्हेगारी वृत्तींना आळा घालण्यासाठी तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांना पायबंद करण्यासाठी पोलीसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. दामिनी पथके अधिक सजगपणे कार्यान्वित करावित. कायदा व सुव्यवस्था अबाधितपणे राखण्यासाठी पोलीस विभागाला जे जे काही लागेल ते ते तुम्हाला पुरविण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

शहर पोलीस विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर सुमारे दोन कोटी 50 लक्ष रुपये निधीतून नवीन अठरा चारचाकी, दहा दुचाकी वाहनांची खरेदी तसेच अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण सभागृहाचे नुतणीकरण करण्यात आले आहे. याव्दारे पोलीस विभागाला गस्ती व गुन्हे शोध प्रक्रिया  गतीने पूर्ण करण्यासाठी सहाय्यता होणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती, साईनगर, बडनेरा एमआयडीसी, नांदगाव पेठ एमआयडीसी याठिकाणी नवीन पोलीस ठाणे तसेच सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्प आदींसाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी पालकमंत्र्यांना केली.

 

0000

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...