Saturday, March 9, 2024

विद्यापिठाच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणार - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील







विद्यापिठाच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना

तीन लाभांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणार

-  पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

अनुकंपा तत्वावर सात उमेदवारांना

पालकमंत्र्यांच्या हस्ते नोकरीच्या आदेशांचे वितरण

 

अमरावती, दि. 9 : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही तीन लाभांच्या (दहा-वीस-तीस) सुधारित सेवांतर्गत  आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्ष्ण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिली. विद्यापीठातील शिक्षक- शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हिताचे सर्व प्रश्न राज्य शासनाकडून सोडविण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

          संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरातील दृक-श्राव्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात सात उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते आज वितरीत करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, आमदार प्रताप अडसळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते, प्र. कुलगुरु प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. उमेश काकडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्यासह विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

          पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येत आहे, ही चांगली गोष्ट विद्यापीठ प्रशासनाकडून होत आहे. यामुळे मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार मिळणार आहे. यापुढेही विद्यापीठाच्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे हिताचे प्रश्न राज्य शासनाकडून तत्परतेने सोडविण्यात येईल. तसेच अनुकंपा तत्वाचे प्रलंबित आठ प्रकरणे व वयोमर्यादा ओलांडलेली चार प्रकरणे विशेष बाब म्हणून विचार करुन त्यांचा मंत्रालय स्तरावर निर्णय घेण्यात येईल. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी या मागण्या पूर्ण करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

          ते पुढे म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यापीठाने सुध्दा आपल्या कार्यात गतीमानता आणावी. परीक्षांचे निकाल घोषित केल्यानंतर पदवी प्रदानासाठी अधिक कालावधी न घालवता डिजिटल स्वाक्षरीची पदवी डिजी लॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताची कामे स्वनिधीतून पूर्ण करावीत. आगामी काळात विद्यापीठ व महाविद्यालयातील 2 हजार 100 पद भरती करण्यात येईल. तसेच 2001 पूर्वीच्या सर्व महाविद्यालयांना अनुदानही उपलब्ध करुन देण्यात येईल. खूप अंतर असलेल्या धारणी व बुलडाणा येथील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाचे स्वतंत्र उपकेंद्र निर्मितीसाठी शासनाकडून मदत करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

          कुलगुरू डॉ. बारहाते म्हणाले की, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने स्थापनेपासूनच अनेक यशाची मोठी शिखरे गाठली आहेत. नुकताच विद्यापीठाला पी.एम. उषा योजनेंतर्गत 20 कोटी रुपये, इन्क्युबेशन सेंटरला पाच कोटी रुपयाचे अनुदान शासनाकडून प्रदान करण्यात आले आहे. विद्यापीठामध्ये आदिवासी विद्यार्थीनींकरीता वसतीगृहाचे बांधकाम सुरू असून अनेक इमारतींचे बांधकाम प्रस्तावित आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.  विद्यापीठांतर्गत पाच जिल्ह्यांचे विद्यार्थी शैक्षणिक सुविधा घेतात, परंतू, बुलडाणा व धारणी सारख्या अधिक अंतर असलेल्या विद्यार्थ्यांना लवकर शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी उपकेंद्र निर्मितीसाठी शासनाने मंजूरी द्यावी, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांना यावेळी केली.

अनुकंपा तत्वावर नोकरीचे आदेश प्राप्त करणारे उमेदवार :

          अनुकंपा तत्वावर नोकरीचे आदेश कु. नेहा देवानंद रॉय. श्री अनजर खान अयुब खान, श्री अब्दुल तौसिफ अब्दुल तसलीम, श्री ऋषिकेश विनोद कांडलकर, श्री अभिषेक गणेश देशमुख, कु. अदिती दत्ता वाबळे व कु. अदिती दिपक मोहोड यांना कनिष्ठ लिपिक पदाचे शासनादेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

 

0000


 

गाव तिथे ग्रंथालय ही संकल्पना राबविणार - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील












गाव तिथे ग्रंथालय ही संकल्पना राबविणार

                  -   पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

 

       अमरावती, दि. 09 (जिमाका): माणसामध्ये प्रगल्भता विकसित होण्यासाठी तसेच अनुभव, शब्दसंग्रह वाढून अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. यासाठी येत्या काळात ‘गाव तिथे ग्रंथालय’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून काही हजारांवर लोकसंख्या असलेल्या गावातही ग्रंथालय सुरू करण्यात येईल. आदिवासी दुर्गम पाड्यांवरही विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व पुस्तके उपलब्ध करून दिली जाईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

 

     उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि अमरावती जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अमरावती ग्रंथोत्सव -2023 चे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन जवळील शासकीय विभागीय ग्रंथालय येथे करण्यात आले आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे -पाटील, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, सहायक ग्रंथालय संचालक राजेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

 

     पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील  म्हणाले की, ग्रंथालयाच्या अनुदानामध्ये 60 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, पुस्तकांची खरेदी यासाठी सहाय्य होत आहे. पूर्वी ग्रंथालयांना अनुदान मिळायला विलंब व्हायचा. आता यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून केवळ एका क्लिकवर राज्यातील 12 हजार ग्रंथालयांना तात्काळ अनुदान मिळत आहे. सुरु ग्रंथालय तसेच नवीन ग्रंथालयांच्या विकासासाठी या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आजच्या स्मार्ट युगात ई-लायब्ररी हा प्रयोग राबवावा लागणार आहे. येत्या जूनमध्ये 4 हजार नवीन ग्रंथालयांना परवानगी देण्यात येणार आहे. ग्रंथालयांची अ, ब, क आणि ड ही वर्गवारी आणि तपासणी सोपी होण्यासाठी ऑनलाईन पद्धत वापरण्यात येणार आहे. जून महिन्यामध्ये ग्रंथालयांच्या वर्गवारीतही वाढ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

      प्रयत्न केल्यास वाचन संस्कृतीत निश्चितच वाढ होते, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की,  यापुढे जिल्ह्याच्या नियोजनातही ग्रंथालयाला अनुदान दिले जाईल. हा निधी ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणासाठी वापरला जाईल. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपायोजनांना विद्यार्थीवर्ग तसेच नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ ही देश पातळीवरील रास्त व वाजवी दरात पुस्तके प्रकाशित करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत ‘बुक फेस्ट’ नावाने राष्ट्रीय प्रदर्शन नुकतेच पुण्यात घेण्यात आले होते. या बुक फेस्टच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांची पुस्तके विकली गेली. पुस्तक खरेदी करणाऱ्यांमध्ये 90 टक्के खरेदीदार हे शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी होते, हे विशेष. वाचकसंख्या वाढविण्यासाठी अशा विविध उपक्रमांचा फायदा होतो. वाचकांपर्यंत त्यांना आवश्यक असणारी पुस्तके पोहोचावी, यासाठी कोल्हापूर येथे ‘फिरते वाचनालय’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. फिरते वाचनालयाला कोल्हापूरकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या प्रतिसादानंतर आता येथील शाळेतही फिरते वाचनालय ही संकल्पना राबविण्यात येत आहे. एका विशिष्ट वेळेला शाळेच्या प्रांगणात फिरते वाचनालय येते. फिरते वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या रुचीची पुस्तके घेवून आवडीने वाचतात.  वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी ग्रंथालयांनी पुढाकार घेवून विविध उपक्रम राबवावेत. ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशक, लेखक यांच्या पुस्तकांचे परिक्षण, परिसंवाद अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे. आवश्यकतेनुसार ग्रंथालया विकासासाठी शासन सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

     दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला आज सकाळी ग्रंथदिंडी ने सुरवात झाली. ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसह, परिसंवाद, व्याखान, नाटक आदी भरगच्च कार्यक्रमांमुळे रसिक व ग्रंथप्रेमींना खास  बौद्धिक मेजवानी मिळत आहे. ग्रंथोत्सवामध्येमध्ये पालकमंत्री श्री. पाटील यांनी विविध स्टॉल्सला भेटी दिल्यात. त्यांनी प्रकाशक, आणि वाचक यांच्याशी संवाद साधला. ग्रंथोत्सवात व्यक्तिपरत्वे आवड-निवड लक्षात घेऊन पुस्तकांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य, कला कौशल्य, प्रशासकीय रचना, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके, मानसशास्त्र, प्रभावी व्यक्तिमत्व विकास आदी विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत.

 

     कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये डॉ. सुरज मडावी यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनाची संकल्पना स्पष्ट केली. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक वाचकाला त्यांच्या आवडीनुरुप ग्रंथ मिळावा,  प्रकाशक व विक्रेत्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी, नवलेखकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रंथोत्सवाचे महत्त्व विशेष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रंथेत्सवात नियमित वाचकांचाही सत्कार करण्यात येतो. शासकीय ग्रंथालयाची नवीन इमारत पूर्णत्वास येत असून येथे वाचकांना वाचनविषयक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे, दीपक गेडाम यांच्यासह ग्रंथालयाचे अधिकारी, कर्मचारी, प्रकाशक, लेखक, वाचक आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रिती बनारस यांनी मानले.

 

ग्रंथोत्सवात आज विविध कार्यक्रम

 

      ग्रंथोत्सवात, उद्या, रविवार दि. 10 मार्च रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या कालावधीत ‘सोशल मीडियाचा वाचन संस्कृतीवरील परिणाम’ या विषयावर व्याख्यान होईल. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विभागीय उपायुक्त संजय पवार तर अमरावती विद्यापीठाचे प्रा. डॉ. हेमंत खडके, प्रा. प्रणव कोलते व प्रा. ऋषभ डाहाके सहभागी होतील. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुत्र संचालन नितीन भट तर कविसंमेलनमध्ये अनंत नांदूरकर, प्रणाली देशमुख, सारिका उबाळे, विष्णु सोळंके, संघमित्रा खंडारे, ऋषिकेश पाडर, शिल्पा पवार, विशाल मोहोड, नंदा भोयर सहभागी होतील. दुपारी 4 वाजता समारोपीय कार्यक्रमात ग्रंथवाचक गौरव प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न होईल. समारोप सत्राचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर हे राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून ग्रंथप्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीने केले आहे.

 

000000


Thursday, March 7, 2024

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांचा अमरावती जिल्हा दौरा

 


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील

यांचा अमरावती जिल्हा दौरा

 

           अमरावती, दि. 07 (जिमाका): राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे शनिवार, दि. 09 मार्च 2024 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे:

 

           शनिवार, दि. 09 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता नागपूर येथून शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता वस्त्रोद्योग विभागाच्या ऑनलाईन बैठकीस उपस्थिती. सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने संत गाडगेबाबा विद्यापीठकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता दृकश्राव्य सभागृह, संत गाडगेबाबा विद्यापीठ येथे आगमन व अनुकंपातत्वावरील नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता शासकीय विभागीय ग्रंथालय संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन जवळ, मोर्शी रोड, येथे आगमन व अमरावती ग्रंथोत्सव 2023 उद्धाटन समारंभ उपस्थिती. दुपारी 12.15 वाजता अमरावती महानगरपालिका मुख्य कार्यालय, राजकमल चौक येथे आगमन व अमरावती महानगरपालिका येथील विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमीपूजन सोहळ्यास उपस्थिती.

 

सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ऑनलाईन बैठकीस उपस्थिती. दुपारी 3 वाजता जिल्हा परिषद कन्या शाळा परिसर येथे आगमन व महिला व बालविकास भवन इमारतीच्या उद्धाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.15 वाजता जिल्हा परिषद येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता सायन्स कोअर मैदान येथे आगमन व स्वयंसहाय्यता बचत गटांचे वैदर्भी जिल्हा प्रदर्शनी व जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमांचा सांगत समारंभ, पारितोषिक वितरण आणि अमृत महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गचा पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 4.45 वाजता पोलीस कवायत मैदान, जोग स्टेडियम येथे आगमन व पोलीस अधिक्षक ग्रामीण यांना जिल्हा नियोजन समिती निधीतुन मंजूर 35 चारचाकी व 15 दुचाकी वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता अमरावती येथून वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

धारणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साद्रावाडी व बैरागड येथील केंद्रावर आरोग्य सखी निवडीकरीता 15 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

 

धारणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साद्रावाडी व बैरागड

येथील केंद्रावर आरोग्य सखी निवडीकरीता 15 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

 

अमरावती, दि. 07 (जिमाका):  मेळघाट क्षेत्रात न्युक्लिअस बजेट योजनांतर्गत मेळघाटातील गरोदर माताची संस्थात्मक प्रसुती होण्यासाठी ए.एन.एम. झालेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांनीना तात्पुरत्या स्वरुपात  प्राथमिक आरोग्य केंद्र साद्रावाडी व बैरागड येथील विविध केंद्रावर आरोग्य सखी निवड करावयाची आहे. याकरीता इच्छुक आदिवासी महिला, युवतीनी दि. 15 मार्चपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन धारणी तालुका आरोग्य अधिकारी  यांनी केले आहे.

 

धारणी कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र साद्रावाडी येथील दादरा, हिराबंबई, रेद्यट्या, भवर, नारदु, झांझरीधाना, ढोमणाढाणा, नागझिरा, शिवाझिरी, मांडु, रबांग,पाथरपुर, खापरखेडा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बैरागड येथील रंगुबेली, सावलखेडा, भुलुमगव्हाण, चेथर, चटबाबोड, कसईखेडा मेळघाट क्षेत्रात न्युक्लिअस बजेट योजनांतर्गत मेळघाटातील गरोदर माताची संस्थात्मक प्रसुती होण्यासाठी ए. एन. एम. झालेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांथींना प्रोत्साहित अनुदान देणे या योजनेच्या अनुषंगाने अंत्यत तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य सखी यांची निवड करावयाची आहे. करीता अनुसूचित जमातीच्या महिला, युवतीकडुन नमुद निवड करीता अर्ज तालुका आरोग्य कार्यालय धारणी, प्राथमिक आरोग्य केंद्र साद्रावाडी व बैरागड येथे नि:शुल्क उपलब्ध करण्यात आले आहे. या ठिकाणी विहित मुदतीच्या आत अर्ज सादर करावा. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 07226-295223  वर संपर्क साधावा.

000000

 

महिला रोजगार मेळावा येत्या 11 मार्चला

 

महिला रोजगार मेळावा येत्या 11 मार्चला

 

            अमरावती, दि. 7 (जिमाका): सुशिक्षित नोकरी इच्छुक महिलांसाठी स्थानिक तसेच इतर जिल्ह्यातील नामवंत खासगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमार्फत महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन येत्या 11 मार्च, 2024 रोजी करण्यात आले आहे. इच्छुक महिला उमेदवारांनी सिकची रिसोर्ट, दर्यापूर रोड, वलगाव येथे स्वखर्चाने आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

 

          जिल्ह्यातील युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी तसेच विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरीता आवश्यक उमेदवारांच्या निवडीकरीता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांचे थेट मुलखती घेतील व मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी मिळेल.

 

          या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन कॅंडिडेड रजिट्रेशन या बटनावर क्लिक करा. रिक्त पदांना अप्लाय करण्यापुर्वी कंपनी व पोजीशन लिस्ट या बटनावर क्लिक करून डाऊनलोड झालेल्या यादीतुन आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसार उपलब्ध पदांची नावे पहावी. त्यानंतर Next बटनावर क्लिक करून त्यात आपला आधार व मोबाईल नंबर टाकून व्हेरिफीकेशन करून घ्यावे. आपली वैयक्तिक, संपर्क व शैक्षणिक माहिती भरावी. तसेच Organization Sector निवडावे. कमाल 4 आस्थापनांकडील उपलब्ध पदांना अप्लाय करून सबमिट बटनावर क्लिक करावे. आपली रजिट्रेशन स्लिप पीडीफची प्रिंट काढुन मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील दुरध्वनी क्र. 0721-2566066 किंवा ईमेल amravatirojgar@gmail.com वर संपर्क करावा.

00000

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ; अनुदान व बिज भांडवल योजनेत सुधारणा

 

 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ;

अनुदान व बिज भांडवल योजनेत सुधारणा

 

            अमरावती, दि. 07 (जिमाका): महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती तसेच नवबौध्द संवर्गातील पात्र व्यक्तींना विविध लघू व मध्यम व्यवसायाकरीता राष्ट्रीयकृत बँकामार्फत 50 टक्के अनुदान व बिजभांडवल योजनेंतर्गत लाभ दिला जातो. या दोन्ही कर्ज योजनेअंतर्गत महामंडळामार्फत 10 हजार रूपये अनुदान देण्यात येत होते. आता केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेंतर्गत अनुदान मर्यादा 50 हजार रूपये करण्यात आली असून 50 टक्के अनुदान योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयेपर्यंत 25 हजार अनुदान देय असून बिजभांडवल योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादेच्या तुलनेत जास्तीत जास्त 50 हजार रूपये अनुदान देय आहे. तरी दोन्ही कर्ज योजनेंतर्गत अनुदानामध्ये झालेल्या बदलाची नोंद घेवून अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील जास्तीत जास्त पात्र इच्छुक व्यक्तींनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक माधुरी अवघाते यांनी केले आहे.

00000

शनिवारपासून दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव’; ग्रंथदिंडी, व्याख्यान, कविसंमेलन, प्रयोग भरगच्च कार्यक्रम

 



शनिवारपासून दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव’;

ग्रंथदिंडी, व्याख्यान, कविसंमेलन, प्रयोग भरगच्च कार्यक्रम

 

            अमरावती, दि. 07 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विभागीय ग्रंथालय, अमरावती येथे शनिवार दि. 9 आणि रविवार दि.10 मार्च 2024 रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसह, ग्रंथदिंडी, परिसंवाद, व्याखान, नाटक, प्रयोग आदी भरगच्च कार्यक्रमांची  साहित्य रसिक व ग्रंथप्रेमींना खास मेजवानी असणार आहे. या मेजवानीचा ग्रंथप्रेमी, साहित्य रसिक, नागरिकांनी सहभागी होऊन साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी यांनी केले आहे.

 

                   सविस्तर कार्यक्रम पत्रिका याप्रमाणे- या ग्रंथोत्सवाचा प्रारंभ शनिवार दि. १० रोजी सकाळी 9 वाजता आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते ग्रंथदिंडीने होणार आहे. सकाळी 11 वाजता उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू व विशेष अतिथी खासदार डॉ. अनिल बोंडे उपस्थित राहणार आहेत.

 

            उद्घाटन सत्रानंतर दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटकाचे सादरीकरण होईल. दुपारी 1 वाजता ‘व्यक्तीमत्व विकासाचे पैलू’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीरकुमार महाजन उपस्थित राहील.  दुपारी 4 वाजता ‘आजची पीढी काय वाचते’ या विषयावर मिडीया वॉच पब्लिकेशनचे संपादक अविनाश दुधे, शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. महेंद्र मेटे, निखिल वाघमोर, अभिजित इंगळे संवाद साधतील.

 

          दुसरा दिवशी सोमवार दि. 10 मार्च रोजी सकाळी 10.30 ते 12.30 पर्यंत ‘सोशल मिडीयाचा वाचन संस्कृतीवरील परिणाम’ या विषयावर व्याख्यान होईल. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विभागीय उपायुक्त संजय पवार, तर अमरावती विद्यापीठाचे प्रा. डॉ. हेमंत खडके, प्रा. प्रणव कोलते व प्रा. ऋषभ डाहाके सहभागी होतील. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुत्र संचालनाची भुमीका नितीन भट तर कविसंमेलनमध्ये अनंत नांदूरकर, प्रणाली देशमुख, सारिका उबाळे, विष्णु सोळंके, संघमित्रा खंडारे, ऋषिकेश पाडर, शिल्पा पवार, विशाल मोहोड, नंदा भोयर सहभागी होतील.  दुपारी 4 वाजता समारोपीय कार्यक्रमात ग्रंथवाचक गौरव प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न होईल. समारोप सत्राचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर हे राहणार आहेत.

या सर्व कार्यक्रमांना जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून ग्रंथप्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीने केले आहे.

00000

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...