Friday, March 29, 2024

राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेमध्ये सिद्धान्त मोडक प्रथम; जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले कौतूक व अभिनंदन

 

राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेमध्ये सिद्धान्त मोडक प्रथम;

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले कौतूक व अभिनंदन

 

अमरावती, दि. 29 (जिमाका): राज्यस्तरीय पात्रता फेरीत अमरावती येथील सिद्धांत मोडकने पेंटिंग अँड डेकोरेटींग या कौशल्य प्रकारात सुवर्ण पदक पटकविले. सिद्धान्तच्या कामगिरीचे दखल घेऊन  जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सिद्धांतच्या मातोश्रीस स्मृतीचिन्ह देऊन त्याचा गौरव केला. तसेच त्यास पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार ‌उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, विकास समन्वयक वैभव तेटू व वरिष्ठ-लिपिक प्रविण बांबोळे, तसेच  सिद्धान्त मोडकच्या मातोश्री प्रमिला दिलीप मोडक उपस्थित होत्या.

 

भारतीय उद्योग महासंघ(CII) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ(NSDC) आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत दि. 19 व 20 मार्च 2024 रोजी डॉन बॉस्को सेंटर फॉर लर्निंग, मुंबई येथे राज्यस्तरीय कौशल्य विकास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  फ्रान्समधील लियोन येथे आयोजित प्रतिष्ठित जागतिक कौशल्य 2024 कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली होती.

 

या स्पर्धेत 60 ट्रेडमध्ये 300 हून अधिक उमेदवारांचा सहभाग होता. या स्पर्धेत 21 हजारहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते, ज्यामध्ये राज्यस्तरावर 4 हजार 300 स्पर्धकापैकी वेगवेगळ्या निकषानंतर अंतिम 110 स्पर्धकांची निवड करण्यात आली. राज्यस्तरावर झालेल्या या स्पर्धेमध्ये अमरावती शहरातील सिद्धान्त दिलीप मोडक, माजी आय. टी. आय. विद्यार्थी याने राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्याने राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधून या स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी झाले होते.

0000

Thursday, March 28, 2024

07- अमरावती लोकसभा मतदारसंघात एक नामनिर्देशनपत्र दाखल; 75 नामनिर्देशन अर्जाची उचल

 07- अमरावती लोकसभा मतदारसंघात एक नामनिर्देशनपत्र दाखल;

75 नामनिर्देशन अर्जाची उचल

 

अमरावती, दि. 28 (जिमाका):  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात आज एक नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. श्री. व्यंकटेश्वरा महा स्वामीजी ऊफ दीपक (भारतीय जनता पार्टी) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. तसेच आज 43 व्यक्तींनी 75 नामनिर्देशन अर्ज खरेदी केले.

 

07- अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी आज गुरुवार  दिनांक 28 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता गुरुवार दि. 6 जून पर्यंत लागू राहणार आहे.

00000

दिव्यांग व जेष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार


 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024;

दिव्यांग व जेष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार

 

            अमरावती, दि.28 (जिमाका): आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना सुलभ रीतीने मतदान करण्यास मदत व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने सक्षम नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व जेष्ठ मतदारांसाठी मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिले आहे. या सुविधेचा सर्व पीडब्ल्यूडी(पर्सनल व्हीथ डिसॲबेलिटी) मतदारांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून मतदारांसाठी दिलेला सोयी सुविधा प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन पीडब्ल्यूडी नोडल अधिकारी जया राऊत यांनी केले आहे.

 

पीडब्ल्यूडी (पर्सनल व्हीथ डिसॲबेलिटी) मतदारांकरिता आयोगाने तयार केलेले सक्षम ॲपवर विविध सोयी सुविधा देण्यात येत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक पीडब्ल्यूडी मतदाराने सक्षम ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावा. निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरीता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना त्यांचे नाव पत्ता आणि मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग वयोवृद्ध मतदारांना या सक्षम ॲपद्वारे मतदानासाठी लागणाऱ्या सहायतेची मागणी नोंदविता येईल. त्याद्वारे मतदार संघातील दिव्यांग वयोवृद्ध मतदानाचे मतदार संघ व स्थाननिश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर पीडब्ल्यूडी मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हील चेअर, सहाय्यक मदतनीस इत्यादी प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून पीडब्ल्यूडी मतदार मिळवू शकतो.

 

सक्षम ॲपवर अनेक वैशिष्ट्ये प्रदान करते. दृष्टीहीन असलेल्या पीडब्ल्यूडीसाठी आवाज  प्रदान करते. श्रवण अक्षम असलेल्या पीडब्ल्यूडीसाठी ॲप- टेक्स्ट-टु-स्पीच प्रदान करते. ॲप मध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे पीडब्ल्यूडीसाठी वापरणे सोपे होते. ॲपमध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र उपलब्ध प्रवेश योग्यता वैशिष्ट्ये आणि मतदान अधिकाऱ्यांच्या संपर्क तपशिलांचा समावेश आहे. पीडब्ल्यूडीला निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतांना येणाऱ्या कोणत्याही समस्याबद्दल ॲपवर तक्रारी नोंदविता येते.

 

पीडब्ल्यूडीसाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सक्षम ॲप हे महत्वाचे असून वापरण्यास सोपा आहे.  ज्यामुळे पीडब्ल्यूडीला मतदान करण्यासाठी नोंदणी करणे, त्यांचे मतदान केंद्र शोधणे आणि त्यांचे मत देणे सोपे होते. जिल्ह्यातील सर्व पीडब्ल्यूडी मतदारांनी सक्षम ॲप डाऊनलोड करून विविध सुविधेचा लाभ घ्यावा.

000000

Wednesday, March 27, 2024

निवडणूकीबाबत सूचना

 

निवडणूकीबाबत सूचना

 

             अमरावती, दि. 27 (जिमाका): 07- अमरावती लोकसभा मतदार संघातून एका सदस्याची लोकसभेसाठी निवडणूक घ्यावयाची आहे. नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला, निवडणूक निर्णय अधिकारी, 07- अमरावती लोकसभा मतदार संघ किंवा उपविभागीय अधिकारी, अमरावती उपविभाग तथा सहायक निवडणूक अधिकारी यांच्याकडे  दि. 4 एप्रिल 2024 (गुरूवार) पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महसुल भवन जिल्हाधिकारी यांचे दालनाशेजारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती-444602 येथे दाखल करता येतील.

            नामनिर्देशपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील. नामनिर्देशपत्रे छाननी दि. 5 एप्रिल, 2024 (शुक्रवार) रोजी सकाळी 11 वाजता , महसूल भवन जिल्हाधिकारी यांचे दालनाशेजारी, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबद्यलची सूचना उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या निवडणूक प्रतिनिधीला वरील परिच्छेदामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास उपरोक्त नमुद कार्यालयात दि. 8 एप्रिल, 2024 (सोमवार) रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल.

            निवडणुक लढविली गेल्यास दि. 26 एप्रिल 2024 (शुक्रवार) रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.

00000

Tuesday, March 26, 2024

लोकसभा निवडणूक-2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य

 

लोकसभा निवडणूक-2024

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य

 

अमरावती, दि. 26 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरीता मतदान ओळखपत्रासह (EPIC) 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरलेले आहे.

 

07-अमरावती लोकसभा मतदार संघात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरीता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे.  त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करतांना मतदारांची ओळख पटविणे शक्य होणार आहेत. या ओळखपत्रात आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार / पीएसयू / पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे, खासदार, आमदार यांना जारी केलेल्या अधिकृत ओळखपत्रांचा समावेश आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही. ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.

00000

Sunday, March 24, 2024

गावागावात 'पिंक फोर्स' पुढे येणार , मतदानाची टक्केवारी वाढणार

 


गावागावात 'पिंक फोर्स' पुढे येणार , मतदानाची टक्केवारी  वाढणार

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिलांनी पुढे यावे

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

              अमरावती, दि. 23 (जिमाका) : महिला शक्ती ही कोणत्याही गोष्टीत परिवर्तन घडवून आणू शकते. महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवल्यास जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल त्यासाठी सर्व महिलांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनामार्फत वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत . जिल्हा आणि तालुका पातळीवर मतदान जनजागृती करण्यासाठी मतदार जागृती कक्ष स्थापन करण्यात आले असून गावागावात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली मोर्शी येथे महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एएनएम, शिक्षिका आणि बचत गटांची महिला यांचा "द पिंक फोर्स" जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्थापन करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

              मागच्या वेळीच्या लोकसभेच्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा स्तरावरून मतदारांना वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित करण्यात येत आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून मतदार जनजागृती कक्षांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक तालुका स्तरावर तालुका नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. जिल्हा कक्ष आणि चौदा तालुक्याचे टीम मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा काम करत असून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. त्याचबरोबर सायकल रॅली, विद्यार्थ्यांची रॅली, विविध स्पर्धा,  कॉलेज कॅम्पस ॲम्बेसिडरची नियुक्ती, सावली सभा, बस स्थानकावर जिंगल, जाऊ तिथे शपथ घेऊ, मतदानावर बोलू काही  यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात आयोजन केले करण्यात आले असून यावर्षी मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल असा विश्वास श्री. कटियार यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजनासाठी मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार, मोर्शीचे तहसीलदार उज्वला ढोले, मोर्शीचे गटविकास अधिकारी देवयानी पोकळे, मोर्शीचे बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ.नितीन उंडे, मोर्शीचे गटशिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेतला.

00000

 

 

 

 

 

 

संपूर्ण जिल्ह्यात ‘चुनाव की पाठशाला’; मतदारांमध्ये जनजागृती करणारा एक अभिनव उपक्रम: सौरभ कटीयार

 


संपूर्ण जिल्ह्यात ‘चुनाव की पाठशाला’; मतदारांमध्ये जनजागृती करणारा एक अभिनव उपक्रम: सौरभ कटीयार

अमरावती दि.24 (जिमाका) : जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दि. 26 मार्चला अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण मतदान केंद्रावर "चुनाव की पाठशाला" हा उपक्रम आयोजित करण्यात येणार असून यामध्ये  जास्तीत जास्त मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येईल. मतदार जनजागृती करण्याचा हा एक अभिनव उपक्रम असून यामध्ये सर्व शासकीय यंत्रणांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार केले आहेत.

मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि अमरावती जिल्ह्यातील मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वीप कक्ष' अर्थात पद्धतशीरपणे मतदारांचे शिक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील सहभाग या कक्षांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याला एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील गावागावात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या अवलंबण्यात येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी मंगळवारी संपूर्ण जिल्ह्यातील 2 हजार 699 मतदान केंद्रावर 'चुनाव की पाठशाला' हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये मतदारांमध्ये जनजागृती करणे, यांच्या समस्यांची निराकरण करणे, त्यांचे मतदार यादीतील नाव, त्यांचे मतदान केंद्र, त्याचबरोबर मतदान करण्याची पद्धत आणि त्यांच्या मतांचे मूल्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार असून हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व केंद्रावर एकाच दिवशी राबवणारा अमरावती हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे.

               हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्र जागृती कक्षा मधील प्रतिनिधी, कॉलेज कॅम्पस अँबेसिडर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्याचबरोबर 'द पिंक फोर्स' मधील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एएनएम, महिला बचत गटांच्या महिला इत्यादी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या उपक्रमांची संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हास्तरावरून आणि तालुकास्तरावरील वरिष्ठ अधिकारी काही मतदान केंद्रांना भेटी देणार असून ते सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मतदार जनजागृती कक्षाचे नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी दिली आहे.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...