Wednesday, April 3, 2024

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास दि.30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 


महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास दि.30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

              अमरावती दि. 03(जिमाका):  सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मंगळवार दि. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.

 

            सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  शिक्षण फी  परीक्षा फी योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज  गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना या योजना राबविण्यात येतात.

 

           माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत सन 2023-24 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरणाचे अर्ज व नवीन अर्ज भरण्यासाठी  तसेच सन 2022-23 साठी रि-अप्लाय करण्यासाठी  दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  ऑनलाईन नुतनीकरणाचे  अर्ज  विहित मुदतीत  भरण्यासाठी  https://mahadbtmahait.gov.in  महाडीबीटीच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन नुतनीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांच्या  लॉगिनमधील त्रुटी पुर्ततेसाठी सेंड बँक केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयानी त्वरीत त्रुटिपूर्तता  करुन जिल्हा लॉगीन वर पाठविण्यात यावे. विहित वेळेत अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील.

 

महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांना नुतनीकरणाचे अर्ज भरुन रि-अप्लाय करण्यासाठी आणि सेंड बॅक केलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाव्दारे करण्यात आले आहे.

00000



हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (योगिता इंगळे)

 


हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (योगिता इंगळे)

अमरावती, दि. 3 (जिमाका) :  येथील  योगीता गजानन इंगळे  (वय 28 वर्षे, रा. देशमुख लॉन मागे, नांदगाव पेठ, अमरावती) ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

योगीता गजानन इंगळे हे दि. 13 मार्च, 2024 रोजी देशमुख लॉन येथील निवासस्थानावरुन  निघून गेली. शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांचा बांधा मजबूत, उंची 5 फुट 4 इंच, घरुन जातेवेळी अंगात हिरव्या रंगाचा सलवार व पांढऱ्या रंगाची लॅगीन घातलेली होती. डाव्या हातावर वाय असे गोंदलेले होते. पायात चप्पल घातलेली होती. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

00000

Tuesday, April 2, 2024

रमजान महिना उत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

 

रमजान महिना उत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

            अमरावती, दि. 02 (जिमाका) : मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजान महीना कालावधीत जवाहर गेट ते टांगापडाव रोडवर मिना बाजार भरविण्यात येतो. या कालावधीत रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना दि. 9 एप्रिल 2024 चे रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी निर्गमित केले आहे.

वाहतुकीचा पर्यायी मार्ग :  गद्रे चौकाकडून शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या गिट्टी, रेती, मुरूम, माल वाहतुक करणारी वाहने गद्रे चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालविय चौक, दिपक चौक मार्गे चित्रा चौक या मार्गाचा अवलंब करावा. किंवा जुना बायपास मार्गे चपराशीपुरा चौक, बियाणी चौक, गर्ल्स हायस्कुल चौक, इर्विन चौक, दिपक चौक मार्गे चित्रा चौकाकडे जाता येईल.

            मोटार सायकल व सायकल स्वार हे राजकमल चौक, श्याम चौक, तहसिल कार्यालय, साबन पूरा चौकी, प्रभात चौक ते चित्रा चौकाकडे जाता येईल.

 

प्रवेश बंदी : इतवारा बाजार(टांगापडाव) ते जवाहर गेट सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहिल.

निर्बंध :  सर्व प्रकारची मालवाहु जड व हलकी वाहने, तसेच गिट्टी बोल्डर वाहतुक करणारी वाहनांनकरीता बंद केलेला वाहतुकीचा मार्ग यप्रमाणे ;  गद्रे चौक व रविनगर चौकाकडून गांधी चौक मार्ग इतवारा बाजारकडे, इतवारा बाजार चौकाकडून गांधी चौक मार्गे गद्रे चौक, राजकमल चौक ते गांधी चौक मार्गे इतवारा बाजारकडे , इतवारा बाजार चौक ते गांधी चौक मार्ग राजकमल चौक.

अधिसूचनेची जो कोणी वाहनचालक उल्लंघन करेल त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायदा, 1988 प्रमाणे कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.

00000

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024: 5 उमेदवारांची 7 नामनिर्देशन पत्रे दाखल; 19 व्यक्तींनी केली 28 नामनिर्देशन अर्जांची उचल

 






सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024:

5 उमेदवारांची 7 नामनिर्देशन पत्रे दाखल; 19 व्यक्तींनी केली 28 नामनिर्देशन अर्जांची उचल

 

अमरावती, दि. 2 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात आज मंगळवार, दि. 2 एप्रिल रोजी 5 उमेदवारांनी  7 नामनिर्देशन पत्रे दाखल केली. यामध्ये राहुल लक्ष्मण मोहोड यांनी तीन नामनिर्देशन (विकास इंडिया पार्टी व बहुजन महा. पार्टीचे दोन) तर गौतम उर्फ अनंता रामदास इंगळे(अपक्ष), मानकर ज्ञानेश्वर काशीराव (अपक्ष), दिगांबर वामन भगत(नकी भारतीय एकता पार्टी), आनंदराज यशवंत आंबेडकर(रिपब्लिकन सेना) यांनी प्रत्येकी एक प्रमाणे नामनिर्देशन अर्ज दाखल केले. दरम्यान आज 19 व्यक्तींनी 28 नामनिर्देशन अर्जांची उचल केली. 

 अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता गुरुवार दि. 6 जून पर्यंत लागू राहणार आहे.

00000

Monday, April 1, 2024

‘फेसबुक लाईव्ह शो’ माध्यमातून गावागावात पोहोचला जिल्हाधिकारी यांचा आवाज; मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग

 









‘फेसबुक लाईव्ह शो’ माध्यमातून गावागावात पोहोचला जिल्हाधिकारी यांचा आवाज;

मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग

 

अमरावती, दि. 1 (जिमाका): जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी  यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वीप उपक्रमांतर्गत ‘मतदानावर बोलू काही’ हा फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मनपा आयुक्त देविदास पवार, स्वीपचे सहायक नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके हे सहभागी होऊन त्यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

                फेसबुक लाईव्ह शोच्या माध्यमातून सर्व मतदारांपर्यंत पोहोचता येते. फेसबुक आणि झूम लिंक या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. याला गावागावातून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. गावातील महिला, युवक-युवती, नागरिक यांनी शाळा, मंदिर, सावलीचे ठिकाणी ज्या ठिकाणी नेटवर्क असेल अशी जागा येथे बसून जिल्हाधिकारी यांच्या लाईव्ह शो मोठ्या उत्सुकतेने बघितला. या शोमध्ये पद्मश्री शंकरबाबा पापळकर,कोन बनेगा करोडपती विजेती बबिता ताडे त्याचबरोबर काही ज्येष्ठ नागरिकांनीही जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि जिल्ह्यातील नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केले.

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी नागरिकांनी आपल्या मनात कोणतीही भीती न बाळगता किंवा कोणाच्याही दबावात न येता निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन यावेळी केले. फेसबुक लाईव्ह शोच्या माध्यमातून डॉ. घोडके यांनी नागरिकांना मतदानांशी संबंधित प्रश्न विचारून मतदान प्रक्रियाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करून असाच उत्साह मतदानाच्या दिवशी दाखवावा, असे आवाहन सर्व नागरिकांना केले. शोच्या यशस्वी आयोजनासाठी संजय राठी, नितीन माहुरे, गजानन कोरडे, हेमंत कुमार यावले, श्रीकांत सदाफळे, विजय काळे यांनी परिश्रम घेतले.

00000

माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची बैठक

 



लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024;

माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची बैठक

 

अमरावती, दि. 1 (जिमाका): निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली असून, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची  बैठक आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या दालनामध्ये झाली.

निवडणूक काळात विविध उमेदवारांकडून प्रसृत होणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणिकरण व पेड न्यूजबाबत तक्रारींच्या तपासणीचे काम समिती करणार आहे. समिती सदस्यांनी निवडणूक आयोगाने निश्चित केलेली नियमावली, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आदींबाबत जाणून घेऊन त्यानुसार काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिले. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तसेच समाज माध्यमांनी पेड न्यूज संदर्भातील निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता सर्व माध्यमांनी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

समितीचे सदस्य तथा निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर,  सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार, आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी विनोद गवळी, सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, सहायक माहिती अधिकारी सतीश बगमारे आदी यावेळी उपस्थित होते.

‘पेडन्यूज’ वर राहणार लक्ष

 ‘मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक्स) प्रसिध्द होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण’ अशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पेडन्यूजची व्याख्या केली आहे. निवडणूक कालावधीत जिल्ह्यात प्रसारित होणाऱ्या पेडन्यूजवर माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या (एम.सी.एम.सी.) माध्यमातून लक्ष राहणार आहे.

निवडणूक कालावधीत माध्यमात प्रसारित होणारे वृत्त हे उमेदवाराच्या बाजूने काही मोबदला घेऊन प्रसारित करण्यात येत असतील, अशी शंका समितीला आल्यास अथवा तशी समितीकडे कोणी तक्रार केल्यास त्या वृत्तासंबंधी संबंधित उमेदवाराला सूचनेव्दारे एम.सी.एम.सी समिती खुलाश्यासंबंधी विचारणा करू शकते. जर समितीला संबंधितांचा खुलासा मान्य झाल्यास त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. मात्र समितीला त्याबाबत खुलासा मान्य न झाल्यास संबंधित वृत्त हे पेड न्यूज आहे, असे गृहित धरून तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जातो.

जिल्हास्तरीय समितीचा निर्णय उमदेवारास मान्य नसल्यास जिल्हास्तरीय समितीला माहिती देवून राज्यस्तरीय समितीकडे 48 तासाच्या आत अपील करता येते. राज्यस्तरीय समिती 96 तासाच्या आत तक्रारीचा निपटारा करून तसा निर्णय उमेदवार आणि जिल्हास्तरीय समितीला कळवितात. या निर्णयाविरूध्द उमेदवार आदेश मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत भारत निवडणूक आयोगाकडे अपील करू शकतो. आयोगाचा निर्णय अंतिम असतो.

 

 प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने संशयित पेडन्यूजसंदर्भात काही दाखले दिले आहेत. यानुसार  साधारण एकाचवेळी निरनिराळ्या लेखकांच्या बायलाईन नमुद करून स्पर्धा असलेल्या प्रकाशनामध्ये छापून येणारे छायाचित्र व ठळक मथळे दिलेले समान लेख, निवडणूक जिंकण्याची शक्यता असल्याचा दावा करणा-या उमेदवारांची स्तुती करणारे लेख, उमेदवाराला समाजातील प्रत्येक समुहाचा पाठिंबा मिळत आहे व तो मतदारसंघातील निवडणूक जिंकेल, असे नमुद करणारे वृत्त, उमेदवाराला वारंवार अनुकूल असणारे वृत्त प्रकाशित करणे , प्रत्येक वाक्य पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने लिहून एखादा पक्ष किंवा  उमेदवार यांच्याकडून केल्या गेलेल्या कार्याने दुसरा पक्ष अथवा उमेदवार यांचे निवडणूकविषयक भवितव्य संपुष्टात येत असल्याचा दावा करणारे वृत्त अशा लिखाणाचा समावेश होतो .

समाजमाध्यमांवरही लक्ष

उमेदवार अथवा नोंदणीकृत पक्षांनी आपल्या प्रचारासाठी कोणत्याही माध्यम प्रकारांचा उपयोग करण्यात काहीच गैर नाही. मात्र, हे करीत असताना या माध्यमांव्दारे प्रसारित करण्यात येणाऱ्या मजकूराचे प्रमाणिकरण होणे आवश्यक आहे. या जाहिरात मजकूराच्या माध्यमातून कोणाचेही चारित्र्य हनन होऊ नये, समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नये, नैतिकता, सभ्यता यांचा भंग होऊ नये, शत्रुत्व-तिरस्काराची भावना निर्माण होऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेमध्ये या सर्व बाबींचा समावेश आहे.

00000

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024:आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही; 16 व्यक्तीनी 21 नामनिर्देशन अर्जाची उचल

 

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024:आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही;

16 व्यक्तीनी 21 नामनिर्देशन अर्जाची उचल

 

अमरावती, दि. 1 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात आज सोमवार, दि. 1 एप्रिल रोजी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. दरम्यान आज 16 व्यक्तींनी 21 नामनिर्देशन अर्जांचे उचल केली. 

 अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता गुरुवार दि. 6 जून पर्यंत लागू राहणार आहे.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...