Monday, March 10, 2025

DIO NEWS AMRAVATI 10-03-2025

 

योजना वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याचे आयोगाचे निर्देश

*एससी, एसटी आयोगाच्या उपाध्यक्षांकडून योजनांचा आढावा

अमरावती, दि. 10(जिमाका) : नाविन्यपूर्ण योजनांमधून 2019-20 मध्ये वसतिगृहामध्ये सोलार संच बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र वेळेत कामे पूर्ण झाली नसल्याने शासनावर याचा भार आला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाने योजना वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश अनूसुचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

ॲड. मेश्राम यांनी सहायक आयुक्त सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात विविध बाबींचा आढावा घेतला. यावेळी सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांच्यासह कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ॲड. मेश्राम यांनी आज सामाजिक न्याय‍ विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. प्रामुख्याने स्वाधार योजनेतील लाभापासून अद्यापही वंचित असलेल्या 7 हजार विद्यार्थ्यांच्या बाबीत तातडीने कार्यवाही करावी. त्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या जमिनी तातडीने वाटप करावेत. रमाई घरकुल योजनेमध्ये विविध कारणांनी दोन हजार घरे नामंजूर करण्यात आली आहेत. तसेच घरकुलांचे काम संथ गतीने सुरू असल्याबाबत ती तातडीने पूर्ण करण्यात यावे.

वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे तो तातडीने पाठविण्यात यावा. तसेच मागासवर्गीय औद्योगिक संस्थांना भाग भांडवल वाटप करताना पहिल्या टप्प्याची यशस्वी अमंलबजावणी केली असल्याबाबत खातरजमा करण्यात यावी. त्यानंतरच दुसऱ्या टप्प्याचे भागभांडवल वाटप करण्यात यावे. यासोबतच सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना जलद गतीने राबविण्यात याव्यात. यामुळे योजनांवरील येणारा भार कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले.

00000








मेहनत केली तरच यश मिळते

*जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

अमरावती, दि. 10(जिमाका) : कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अभ्यास करावा लागतो, मेहनत करावी लागते. अभ्यास आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास कोणत्याही क्षेत्रात हमखास यश मिळते, असा कानमंत्र जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हाभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना दिला.

दिव्य सेवा सोशल सेंटरच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांत जिल्हाधिकारी आणि विद्यार्थ्यांची भेट घालून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. जिल्हाधिकारी श्री. कटियार यांना अहवाल सुपूर्द करण्यात आल्यानंतर तनिष्का भोयर हिने केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कार्याची माहिती दिली.

विद्यार्थ्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात प्रथमच येत असल्याचे सांगितले. जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुखावर कामाचा प्रचंड व्याप असतो. त्यांच्या समोर आपण बोलू शकणार काय, त्यांच्या समोर आपल्या भावना मांडता येतील काय, असा प्रश्नही मनात आला असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील ध्येयाबद्दल विचारणा केली. यावर विद्यार्थ्यांनीही अधिकारी, पायलट अशी उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनीही जिल्हाधिकारी यांना अधिकारी होण्याचे ध्येय केव्हा निश्चित केल्याचे विचारले. यावर त्यांनी महाविद्यालयीन जीवनात भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा विचार केल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनीही आधीपासूनच ध्येय निश्चित करावे. त्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास आणि मेहनत करावी, मेहनतीमुळे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येत असल्याचे सांगितले.

दिव्य सेवा सोशल सेंटर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी चांगले उपक्रम राबवित आहे. यामुळे बालकांच्या व्यक्तीमत्वाला निश्चितच मदत होईल. कार्यालयांना प्रत्यक्ष भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर पडणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वासामुळे त्यांच्यात पुढे जाण्याची भावना निर्माण होणार असल्याचे सांगितले.

000000

विमानसेवेमुळे अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती होईल

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 10(जिमाका) : बेलोरा येथील विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. या विमानतळावरून 31 मार्चपासून प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती होईल. अर्थसंकल्पात विमान प्रवासाची सेवा सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे. याबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार मानले आहे.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा आश्वासक अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची तरतूद करताना जिल्ह्यासाठीही विशेष तरतुदी केल्या आहेत. दर्यापूर येथे नवीन न्यायालय उभारण्यासोबतच खारपाणपट्टा असलेल्या दर्यापूर भागात विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जमीन खारपणामुक्त होऊन सुपीक होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानासोबत नवीन पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. ज्यातून या भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ सुरू केले. या अर्थसंकल्पात मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे मराठी भाषेचे संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संकलन केंद्र आणि अनुवाद अकादमीची स्थापना करण्यासाठी तरतूद करण्यात आली. महानुभाव पंथाचे महत्वाचे असलेल्या रिद्धपूर येथील विविध मंदिरांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील भरीव तरतुदीमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणर आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने संपूर्ण नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या लोकाभिमुख अर्थसंकल्पासाठी आभार व्यक्त करीत असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

00000

आज विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद

अमरावती, दि. 10 (जिमाका): उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन मंगळवार, दि. 11 मार्च  रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल ग्रँड महफिल येथे करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय गुंतवणूक शिखर परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणूकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत चर्चा, सामंजस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम, इत्यादी बाबींचा समावेश आहे.

            तसेच जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणूक आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिल्ह्यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यांच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. ही परिषद उद्योजक व निमंत्रकांसाठी नि:शुल्क आहे. उद्योजकांनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कार्यालयाचे उद्योग सहसंचालक निलेश निकम यांनी केले आहे.

000

 

कौशल्य विकास केंद्रामार्फत 12 मार्चला रोजगार मेळावा

               अमरावती, दि. 10 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’चे आयोजन करण्यात येते. त्यानुसार बुधवार, दि. 12 मार्चला 2025 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

     जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मदत करण्यात येते. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. एम्प्लायमेंटवर क्लिक करावे. जॉब सिकर पर्याय निवडून आपला नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड साईन-इन करावे. आपल्या होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडावे. अमरावती जिल्हा निवडून फिल्टर बटनवर क्लिक करावे. त्यानंतर दिनांकित मेळावा निदर्शनास येईल. त्यासमोर असलेल्या ॲप्शन बटनाच्या खाली व्ह्यू व अप्लाय बटन दिसेल. त्यानंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनवर क्लिक करा. आय ॲग्री हा पर्याय निवडा. शेवटी सक्सेसफुली अप्लाईड फॉर द जॉब असा मॅसेज दिसेल. यारितीने ऑनलाईन सहभाग नोंदवावा. रजिट्रेशन स्लिप पीडीएफची प्रिंट काढुन मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे.

       याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा ई-मेल amravatirojgar@gmail.com वर संपर्क करावा. तसेच 12 मार्च 2025 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

 

Friday, March 7, 2025

DIO NEWS AMRAVATI 08-03-2025

 























वॉकथॉनमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

*विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान

 

अमरावती, दि. ८ (जिमाका) : जिल्हा प्रशासनातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित वॉकथॉनमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच समारोपीय कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला.

 

विभागीय क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, डॉ. मोनिका कटियार, विभागीय महिला बालकल्याण अधिकारी विलास मसराळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील सोसे आदी उपस्थित होते.

 

यावेळी उपस्थितांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन वॉकथॉनला हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर विभागीय क्रीडा संकुल, इर्विन चौक, मदर टेरेसा मार्ग, गर्ल्स हायस्कूल चौक, शिवाजीनगरमार्गे परत विभागीय क्रीडा संकुल स्टेडियम रॅलीचा समारोप करण्यात आला. वॉकथॉनमध्ये महिला सुरक्षा आणि स्त्री-पुरुष समानता याबाबत जनजागृती करण्यात आली. परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत सुप्रिया गजभिये, सुषमा वानखडे, प्रणिता तागडे, सीमा कोरडे, शामू दारसिंबे, सरिता किल्लेदार, निकिता पवार, जयश्री मानकर, वर्षा वानखडे, नीलाक्षी दर्यापूरकर, मनीषा टवलारे, स्वामिनी तायडे, ईश्वरी गांजरे, मनोरमा गायकवाड, रेणूका सपाटे, छाया काळमेघ यांचा सत्कार करण्यात आला.

00000


DIO NEWS AMRAVATI 07-03-2025

 

उद्योजकता प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

        अमरावती, दि. 07 (जिमाका) : अनूसुचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी 45 दिवसांचे नि:शुल्क निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यासाठी इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उद्योग संचालनालय, जिल्हा उद्योग केंद्र, मैत्री कक्ष, आणि महराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती विशेष प्रोत्साहन योजनेंतर्गत सदर प्रशिक्षण दि. 17 मार्च ते 3 मे 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. यात कृषीमाल प्रक्रिया, डाळ मिल, मिनी आईल मिल, मसाला उद्योग, इन्स्टंट रेडीमिक्स, मशरूम, भाजीपाला निर्जलीकरण, फळांपासून विविध उत्पादन, उद्योजकीय गुण, व्यक्तीमत्व विकास, उद्योगासंबंधात मार्गदर्शन, मार्केटिंग, बँकेची सबसिडी, योजनांची माहिती, उद्योजकीय अडचणीचे निष्कारण, परवाना, उद्योग व्यवस्थापन या विषयाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी उमेदवार 18 ते 50 या वयोगटातील असावा. उमेदवाराची निवड प्रत्यक्ष मुलखातीद्वारे करण्यात येणार आहे. परिचय मेळावा व मुलाखतीला येताना मूळ कागदपत्रे, त्यांची छायांकित प्रत, यात शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, 3 फोटो, सोबत आणावे. दि. 11 मार्च रोजी 12 ते 3 वाजेदरम्यान एक दिवसीय परिचय मेळावा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात घेण्यात येणार आहे. तसेच मुलाखती घेण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणासाठी दि. 4 मार्च ते दि. 13 मार्चपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी स्वप्नील इसळ, कार्यक्रम आयोजक, संपर्क क्रमांक 8788604226, राजेश सुने संपर्क क्रमांक 7507747097  प्रकल्प अधिकारी, तसेच जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पहिला माळा, टांक चेम्बर्स बिल्डींग, गाडगेनगर, व्हीएमव्ही रोड, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी किशोर अंभोरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी केले आहे.

00000

जमीन फ्री होल्ड करण्यासाठी गुरूवारपासून विशेष शिबिर

अमरावती, दि. 07 (जिमाका) : निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे प्रिमियम अथवा अन्यप्रकारे भाडेतत्वावर देण्यात आलेल्या जमीन फ्री होल्ड करण्यासाठी विशेष अभय योजना 2024-25 दि. 01 एप्रिल 2024 ते दि. 31 जुलै 2025 या कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे. यासाठी दि. 13 ते 31 मार्चपर्यंत विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

अर्जदार नागरिकांनी त्‍यांचा अर्ज, मालमत्ता पत्रक पी-आर कार्ड, मुळ जागा मिळाल्याबाबतची कागदपत्रे, हक्कनोंदणी, सेटलमेंट, फेरफार, मुळ मालकाकडून व्यक्तींकडे सदर मालमत्ता हस्तांतरीत झाली असल्याबाबतची कागदपत्रे, खरेदीखत फेरफार, भाडेपट्टा नुतनीकरणाचे आदेश, शर्तभंग झाला असल्यास नियमानुकूल बाबतचे आदेश, आदी कागदपत्रे जोडुन अर्ज करावा लागणार आहे.

यासाठी गुरूवार, दि. 13 मार्च 2025 ते दि. 31 मार्च 2025 पर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय अमरावती येथे अर्ज स्विकारण्यात येतील, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.

00000

Thursday, March 6, 2025

DIO NEWS AMRAVATI 06-03-2025

 

महिला दिनानिमित्त शनिवारी वॉकथॉनचे आयोजन

अमरावती, दि. 6 (जिमाका) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे शनिवार, 8 मार्च रोजी विभागीय क्रीडा संकुलात सकाळी 6.30 वाजता 'वॉकथॉन 2025'चे आयोजन करण्यात आले आहे. महिला सुरक्षा आणि स्त्री-पुरुष समानता या विषयांवर जनजागृती करण्यासाठी या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

वॉकथॉनचा मार्ग हा विभागीय क्रीडा संकुलापासून सुरू होऊन इर्विन चौक, मदर टेरेसा मार्ग, गर्ल्स हायस्कूल चौक, शिवाजीनगरमार्गे परत विभागीय क्रीडा संकुल स्टेडियम असा राहणार आहे. या उपक्रमात जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी, विविध संघटना, संस्था, क्लब, शहरातील नागरिक आणि बचतगट सहभागी होणार आहेत. नागरिकांना उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

वसतिगृह इमारत भाड्यासाठी प्रस्ताव आमंत्रित

अमरावती, दि. 6 (जिमाका) : दर्यापूर येथील मुलींच्या वसतिगृहासाठी इमारत भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, दर्यापूर हे सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातर्फे चालविण्यात येते. सदर वसतिगृहाकरिता 100 मुलींच्या वास्तव्याच्या दृष्टीने प्रती विद्यार्थिनी 100 चौरस फूटाप्रमाणे निवासी खोल्या, तसेच, स्नानगृह, स्वच्‍छतागृह हे 10 विद्यार्थिनींमागे एक याप्रमाणे असणे आवश्यक आहे.

स्वयंपाकगृह, भोजनकक्ष, वाचनकक्ष, संगणककक्ष, मनोरंजन कक्ष, गृहपाल, अधीक्षक निवासस्थान या सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज इमारत दर्यापूर येथे भाडेतत्वावर देण्यास इच्छुक असणाऱ्यांनी 125वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सांगळूदकर कॉम्प्लेक्स, बनोसा-दर्यापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 06 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 17 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी कळविले आहे.

000000

 

आज डाक अदालतीचे आयोजन

अमरावती, दि. 06 (जिमाका) : भारतीय डाक विभागातर्फे प्रवर अधीक्षक कार्यालयात शुक्रवार, दि. 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

पोस्टासंबंधीत स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, रजिस्टर पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर अशा तक्रारींचे निराकरण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल आणि समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यास आलेल्या तक्रारींबाबत डाक अदालतीमध्ये कार्यवाही होणार आहे. 

संबंधितांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक, डाक घर, अमरावती विभाग, अमरावती 444602 यांच्याकडे सादर करावेत. त्यामध्ये तक्रारीचा सर्व तपशील, तारीख, अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असल्यास त्याचे नाव व हुद्दा आदीचा उल्लेख करुन दि. 7 मार्चपर्यंत पाठवावे लागणर आहे, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

00000

वसतिगृह इमारतीसाठी खासगी जमीनमालकांनी संपर्क करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 6 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 125व्या जयंती मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी दर्यापूर शहरात 1 हेक्टर खासगी जमिनीची आवश्यकता आहे. यासाठी खासगी जमीन मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वसतिगृहासाठी शासकीय जमीन उपलब्ध नसल्याने, वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी खासगी जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर्यापूर शहरात शाळा, महाविद्यालय, बसस्थानक आणि रुग्णालय सुविधांच्या जवळ जमीन उपलब्ध असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुक जमीन मालकांनी सांगळूदकर कॉम्प्लेक्स, बनोसा-दर्यापूर येथील वसतिगृहाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Wednesday, March 5, 2025

DIO NEWS AMRAVATI 05-03-2025

 

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 05 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी गुरूवार, दि. 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. योजनेचे निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना hmas.mahait.org  वर उपलब्ध आहे.

परिपूर्ण कागदपत्रासह विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये दि. 15 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करावा. तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करून देयात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी बँक तपशिल भरून घेण्याची कार्यवाही तातडीने करावी. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती, तसेच speldswo_amt@rediffmail.com व दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

 000000

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास मुदतवाढ

            अमरावती दि. 05 (जिमाका) :  सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास दि. 15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

             सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  शिक्षण फी  परीक्षा फी योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज  गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना राबविण्यात येतात.

            या योजनांचे सन 2024-25 वर्षातील महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 16 हजार 891 नोंदणीकृत अर्जापैकी महाविद्यालयस्तरावर शिष्यवृत्तीचे 4 हजार 33 अर्ज, तर विद्यार्थीस्तरावर 735 अर्ज प्रलंबित आहे. सन 2021-22 मधील महाविद्यालयस्तरावर 276, तर विद्यार्थीस्तरावर 640, सन 2022-23 मध्ये महाविद्यालयस्तरावर 182, तर विद्यार्थीस्तरावर 537, सन 2023-24 मध्ये महाविद्यालयस्तरावर 338, तर विद्यार्थीस्तरावर 719 अर्ज प्रलंबित आहे. संबंधित महाविद्यालयांनी एकही अर्ज मंजूरी करीता जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेला नाही.

            काशीबाई अग्रवाल, येवदा 24, नगर परिषद, चांदूरबाजार 23, कृषी तंत्र, भिलोना 18, झेपी धारणी 18, नूतन कन्या, अमरावती 16, जनता कनिष्ठ महाविद्यालय, शिंदी बु 14, इग्नीज कनिष्ठ महाविद्यालय, बडनेरा 14, जागृत कनिष्ठ महाविद्यालय, वरूड 14, शहीद स्मारक महाविद्यालय, यावली 12, अभिनव कनिष्ठ महाविद्यालय, वरूड 11 अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत.

जिल्हातील प्राचार्यांना महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज दि. 15 मार्च 2025 पर्यंत जिल्हा लॉगिनवर पाठवावे. तसेच विद्यार्थ्यांनी लॉगीनकडे त्रृटी पूर्ततेकरीता परत केलेले अर्ज विद्यार्थ्यांकडून त्रृटी पूर्तता करून पात्र अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठविण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

00000

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ !

* 500 रुपयांची स्टॅम्प ड्यूटी रद्द

*  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

अमरावती, दि. 05 (जिमाका):   शैक्षणिक कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला.

या निर्णयाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळाला असून विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक ताण आता कमी होणार आहे. कुठल्याही शैक्षणिक कामाकरीता जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलेयर अथवा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच शिक्षणाकरिता महसूल विभागाकडून जी प्रमाणपत्र लागतील त्याला कुठलेही मुद्रांक शुल्क लागणार नाही. हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वपूर्ण आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल.

साधारणतः दहावी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे दाखले मिळवावे लागतात. यासाठी पालकवर्ग तहसील कार्यालयात जाऊन दाखले मिळवतात. प्रत्येक दाखल्यासाठी 500 रुपये याप्रमाणे सुमारे तीन हजार रुपये यासाठी पालक खर्ची घालतात. नव्या निर्णयामुळे पालकांचा हा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे. साध्या कागदावर अर्ज लिहून तो सेतू कार्यालयामार्फत तहसील कार्यालयात द्यावा लागेल. त्यानंतर लागलीच दाखले मिळतील.

000

Tuesday, March 4, 2025

DIO NEWS AMRAVATI 04-03-2025


 

उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

अमरावती दि 04 (जिमाका) :- मार्च महिन्‍यापासून उन्‍हाच्‍या झळा जाणवतात. त्‍याची तीव्रता मार्चपासून मेपर्यंत वाढते. शरीरातील पाण्‍याचे प्रमाण कमी होणे, अशक्‍तपणा वाढणे, काम कमी केले तरी जास्‍त थकवा जाणवणे, तसेच घामावाटे पोषकद्रव्‍ये शरीराबाहेर टाकली जाण्यास सुरुवात होते. तापमान बदल व वाढत्‍या उष्‍णतेमध्‍ये पुरेशी काळजी घेतली नसल्यास उन्‍हाळ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्‍यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात आरोग्य सांभाळावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

उन्‍हाळ्यात उद्भवणाऱ्‍या समस्‍यांमध्‍ये प्रामुख्‍याने अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार आणि उष्‍माघाताचा समावेश असतो. याशिवाय त्‍वचेसंदर्भात समस्‍या देखील उद्भवतात. उघड्यावरील अन्‍न किंवा द्रवपदार्थ खाण्‍यापिण्‍यात आल्याने पचनाशी संबंधित आजार उद्भवू शकतात.

याबाबत नागरिकांनी दोन पद्धतीने काळजी घ्यावी. यात पहिले म्‍हणजे शरीरातील पाण्‍याचे प्रमाण कमी होवू देवू नये आणि दुसरे म्‍हणजे विनाकारण उन्‍हामध्‍ये बाहेर जावू नये. कामानिमित्त बाहेर जायचे असल्यास छत्री, टोपी, हेल्‍मेट परिधान करावे. या सुरक्षा कवचामधील सर्वात महत्‍वाचा घटक म्‍हणजे घरातील स्‍वच्‍छ पाणी आहे. बाहेर जाताना पाण्‍याची बाटली घेवून निघावे. त्‍याचबरोबर सैलसर, सुती आणि शक्‍यतो फिकट रंगाचे कपडे घालावे. शरीरातील पाण्‍याचे प्रमाण कमी होण्‍याला डिहायड्रेशन म्‍हणतात, जेव्‍हा शरीरातून द्रव पदार्थ शरीरातून जास्‍त प्रमाणात बाहेर पडतात. तेव्‍हा ही स्थिती उद्भवते. ही स्थिती उन्‍हाळ्यात सामान्‍य असते. आपल्‍या शरीरातून घामावाटे किंवा लघवीवाटे पाणी बाहेर जात असते आणि तेवढ्या प्रमाणात पाणी शरीरात गेले नसल्यास तहान वाढवते.

उन्‍हाळ्यात उष्‍माघात ही समस्‍या आहे. तीव्र उष्‍णता असलेल्‍या भागात ही समस्‍या आढळून येते. उन्‍हाच्‍या संपर्कामुळे शरीरातील तापमान वाढल्यामुळे ही अवस्‍था उद्भवू शकते. यामध्‍ये डोकेदुखी, चक्‍कर येणे, नाकातून रक्‍त येणे, पोटात किंवा पायात गोळा येणे, तीव्र परिणाम झाल्‍यास व्‍यक्‍ती बेशुद्ध पडू शकतो ही प्रमुख लक्षणे आहे. ही लक्षणे आढळल्‍यास शरीरातील पाण्‍याच्‍या प्रमाणावर कटाक्षाने लक्ष ठेवावे. पाणी पित राहावे. गरज नसल्‍यास बाहेर पडू नये. सामान्‍य नागरिकांनी आणि व्‍यावसायिकांनी तीव्र उष्‍णतेत शक्‍यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाण्‍यास टाळावे. उन्‍हाळ्यात उपाशी राहणे आणि अतिरिक्‍त खाणे टाळावे. रात्रीच्‍या जेवनात हलक्‍या आहाराचा समावेश करावा. तीव्र उष्‍णतेमुळे शरीरातील पाण्‍याचे प्रमाण घटत असल्याने दिवसातून 8 ते 10 ग्‍लास पाणी पिणे अत्‍यंत गरजेचे आहे.

उन्‍हाळ्याचे संपूर्ण चार महिने योग्‍य आहार घेणे हे उन्‍हाच्‍या त्रासापासून स्‍वतःचा बचाव करण्‍यासाठी महत्वाचे आहे.

नागरिकांनी तहान लागली नसली तरीही जेव्‍हा शक्‍य असेल तेव्‍हा पुरेसे पाणी प्‍यावे. तहान लागणे हे निर्जलीकरणाचे सूचक आहे. प्रवास करताना पिण्‍याचे पाणी सोबत ठेवावे. ओरल रिहायड्रेशन सोल्‍युशन आणि लिंबू पाणी, बटर मिल्‍क, लस्‍सी यासारखे घरगुती पेये वापरावे, थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्‍यावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर, उपलब्‍ध फळे आणि भाज्‍या यासारख्‍या उच्‍च पाण्‍याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्‍या खावे.

थेट सूर्यप्रकाशाच्‍या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक वस्‍तू डोके झाकण्‍यासाठी वापरावे. सूर्य प्रकाश, उन्‍हात बाहेर जाताना शूज किंवा चप्‍पल घालावे. स्थानिक हवामानाची माहिती घेऊन काम करावे. शक्‍यतो घर, चांगल्‍या हवेशीर आणि थंड ठिकाणी सावलीत रहावे. थेट सूर्यप्रकाश आणि उष्‍णतेच्‍या लाटांना अडथळा निर्माण करावे. शक्‍यतो घराच्‍या ऊन येणाऱ्या बाजूच्‍या खिडक्‍या आणि पडदे दिवसा बंद ठेवा, रात्री थंड हवा येण्‍यासाठी त्‍या खिडक्‍या उघडाव्‍यात. घराबाहेर जात असल्‍यास, तुमची बाहेरील कामे दिवसाच्‍या थंड वेळेत करा. शक्यतो ही कामे सकाळी आणि संध्‍याकाळी करावीत.

दुपारी बाहेर पडताना अति परिश्रमाची कामे टाळावी. अनवाणी बाहेर जाऊ नये. जास्‍त उन्‍हाळ्यात स्‍वयंपाक करणे टाळावे. स्‍वयंपाक क्षेत्र हवेशीर ठेवण्‍यासाठी दरवाजे आणि खिडक्‍या पुरेशा उघडावे. अल्‍कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेये टाळावे. यामुळे शरीरातील द्रवपदार्थ जास्‍त प्रमाणात कमी होतात किंवा पोटात पेटके येऊ शकतात. उच्‍च प्रथिनेयुक्‍त अन्‍न टाळावे आणि शिळे अन्‍न खाऊ नये. पार्क केलेल्‍या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्‍यांना एकटे सोडू नये. त्यांना वाहनातील तापमान धोकादायक ठरु शकते. जोखमीच्‍या नागरिकांना इतरांपेक्षा उष्‍णतेचा त्रास आणि उष्‍णतेशी संबंधीत आजाराचा त्रास होऊ शकतो. याबाबत अतिरिक्‍त देण्यात यावे.

एकटे राहणारी वयस्‍कर किंवा आजारी लोकांचे पर्यवेक्षन करावे. त्‍यांच्‍या आरोग्‍याचे दैनंदिन निरीक्षण करावे. घर थंड ठेवावे, पडदे, शटर किंवा सनशेड वापरावे. रात्री खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात. शरीर थंड करण्‍यासाठी पंखे, स्‍प्रे बाटल्‍या, ओले कापड, बर्फाचा वापर करावा. 20 अंश तापमान असलेल्‍या पाण्‍यात घोट्याच्‍या वरपर्यंत पाय बुडवल्‍याने निर्जलीकरण आणि थर्मल अस्‍वस्‍थता कमी होऊन जलद थंडावा मिळत असल्याने या उपाययोजांची खबरदारी घ्यावी.

उष्‍माघाताच्‍या घटनांसाठी उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत. यात प्रत्‍येक प्राथमिक आरोग्‍य केंद्र आणि त्‍यावरील आरोग्‍य संस्‍थांमध्‍ये उष्‍माघात रुग्‍णांच्‍या त्‍वरीत उपचारासाठी कोल्‍ड रुम कार्यान्वित करण्यात आली आहे. उष्‍माघातासाठी आवश्‍यक औषधे, आयव्‍ही फ्लूईड, ओआरएस आदींची उपलब्‍धता तपासण्‍यात आली आहे. आवश्‍यकता भासल्‍यास त्‍वरीत पुरवठा करण्‍यात येणार आहे. उष्‍माघाताचे प्रकार हाताळण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्‍य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्‍यात आले आहे. तसेच उष्‍माघात नियंत्रणासाठी मुख्‍य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी टास्‍क फोर्स सभा घेऊन मार्गदर्शन केले आहे, असे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी कळविले आहे.

00000

 

आज निंभारी डेपोतील वाळूचा लिलाव

अमरावती, दि. 4 : निंभारी, ता. अचलपूर येथील वाळूडेपोची मुदत संपुष्टात आली आहे. डेपोतून वाळू विक्रीनंतर शिल्लक असलेला वाळूसाठा 1 हजार 66 ब्रास जप्त करण्यात आला आहे. या वाळूचा बुधवार, दि. 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता लिलाव करण्यात येणार आहे.

सदर वाळूसाठ्याचा लिलाव करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे निर्देश आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी, अचलपूर यांनी जाहीरनामा काढण्याचे निर्देश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी, अचलपूर यांच्या दालनात लिलाव करण्यात येणार आहे. या जाहीर लिलावात इच्छुक व्यक्ती, संस्था आणि शासकीय विभागांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 13 (जिमाका) : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फ्रीशिप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी महाविद्यालयांनी अर्ज तातडीने सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2011-12 ते 2017-18 कालावधीतील महाईस्कॉल प्रणालीवरील नोंदणीकृत प्रलंबित, तसेच सन 2017-18 वर्षातील ऑफलाईन पद्धतीने स्विकारण्यात आलेल्या अर्जांचा समावेश आहे. अद्यापही महाविद्यालयांनी संबंधित प्रस्ताव इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयास सादर केले नाहीत, अशा महाविद्यालयांना कागदपत्रांसह अर्ज दि. 17 मार्च 2025 पर्यंत सादर करावे लागणार आहे. यात विलंब झाल्यास प्रस्ताव शासनास सादर करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी प्राचार्यांवर राहणार आहे, असे इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक गजेंद्र मालठाणे यांनी कळविले आहे.

00000

Monday, March 3, 2025

DIO NEWS AMRAVATI 03-03-2025

 

धारणीत आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत योजनांसाठी निशु:ल्क अर्ज मागविण्यास सुरुवात

अमरावती, दि 3 (जिमाका): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांच्या कार्यक्षेत्रात केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना 2024-25 अंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विविध योजनांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

आदिवासी महिला-पुरुष बचत गटांसाठी दालमिल उभारणे, प्रिंटिंग प्रेस मशिन खरेदी करणे, तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी विविध व्यवसाय सुरू करणे (नळ फिटिंग, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, सुतारकाम इत्यादी) आणि सुशिक्षित युवकांसाठी सेतू केंद्र सुरू करणे यांसारख्या योजनांसाठी 85 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

धारणी, चिखलदरा, अंजनगाव आणि अचलपूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अर्ज धारणी येथील प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहेत. नांदगाव खंडेश्वर, भातकूली, अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अपर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती येथे अर्ज उपलब्ध आहेत. तसेच, मोर्शी, वरुड, तिवसा आणि चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी उप कार्यालय मोर्शी येथे अर्ज उपलब्ध आहेत.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 आहे. अधिक माहितीसाठी 07226-224217 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आले आहे.लाभार्थी निवड करताना दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, परितक्त्या आणि निराधार महिलांना प्राधान्य दिले जाईल. अशी माहिती प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी दिली.

0000

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना 'बालस्नेही पुरस्कार' प्रदान

अमरावती, दि. 03 (जिमाका): महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे 'बालस्नेही पुरस्कार 2024' अंतर्गत उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांना बाल हक्कांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आज मुंबई येथे गौरविण्यात आले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, डॉ. पंकज भोयर, आमदार संजय केळकर, मनिषा कायंदे, प्रशांत नारनवरे, पोलिस अपर महासंचालक अश्वती दोरजे, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांच्या उपस्थितीत त्यांना गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात बालकांच्या हक्कांसाठी अनेक प्रभावी योजना राबवण्यात आल्या आहेत. विशेषतः बालविवाह प्रतिबंध, बालकामगार निर्मूलन आणि शिक्षण हक्कांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पुरस्कारासाठी निवड केली.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, हा पुरस्कार संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. आम्ही भविष्यातही बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहू, अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्विकारल्यानंतर दिली. पुरस्काराबद्दल जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांचे अभिनंदन केले आहे.

00000

 

 

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...