Thursday, March 20, 2025

DIO NEWS AMRAVATI 20-03-2025


 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शनिवारी दौरा

अमरावती, दि. 20 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी शनिवार, दि. 22 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

त्यांच्या दौऱ्यानुसार, श्री. गडकरी यांचे सकाळी 10.15 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहतील. दुपारी 12.15 वाजता श्री संत अच्युत महाराज हृदयरोग रुग्णालयातील नवीन कॅथलॅबच्या उद्घाटनाला उपस्थित राहतील. दुपारी 1.45 वाजता शारदा उद्योग मंदिराच्या प्रकल्पाला भेट देतील. दुपारी 2.30 वाजता विश्रामगृह येथे अमरावती विभागातील राष्ट्रीय महामार्ग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्पांची आढावा बैठक घेतील. सायंकाळी 3.45 वाजता नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या न्यू हायस्कूलला भेट देतील. त्यानंतर सायंकाळी 4.45 वाजता बेलोरा विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

00000 

उष्मालाटेपासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना जारी

अमरावती, दि. 20 : हवामान विभागाने विदर्भात उष्मालाटेचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभर जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना उष्मालाटेपासून बचाव करावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.

 काय करावे : तहान लागलेली नसली तरी भरपूर पाणी प्यावे, हलके आणि सुती कपडे वापरावे, बाहेर जाताना गॉगल, टोपी आणि छत्रीचा वापर करावा. उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी डोक्यावर रुमाल किंवा टोपी वापरावी. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास ओआरएस, लस्सी, लिंबूपाणी यासारखी पेये घ्यावे. उन्हाचा झटका बसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पशूधन आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवावे आणि त्यांना पुरेसे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे आणि सनशेडचा वापर करावा. कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी. गरोदर महिला आणि आजारी कामगारांची विशेष काळजी घ्यावी.  

काय करू नये : लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या गाडीत ठेवू नये. दुपारी 12 ते 3.30 वेळेत उन्हात जाणे टाळावे. जास्त शारीरिक श्रमाचे काम करणे टाळावे. तसेच उष्णतेच्या काळात स्वयंपाक करणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाणे टाळावे, मद्य आणि शीतपेये घेणे टाळावे. उन्हात गाडी चालवणे टाळावे आणि ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000 

अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या जप्त वाहनांचा लिलाव

अमरावती, दि. 20 : अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव मंगळवार, दि. 25 मार्च रोजी दुपारी 12 वाजता तहसीलदार कार्यालयात होणार आहे.

गौणखनिज भरारी पथकांनी अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. यात वाहन मालकांनी दंड भरलेला नसल्याने 17 वाहनाचा लिलाव केला जाणार आहे. 

इच्छुकांनी लिलावात सहभागी व्हावे, यासाठी 25 हजार रुपये इसारा रक्कम भरणे, पॅन कार्ड आणि रहिवासी पुरावा देणे आवश्यक आहे, असे अचलपूर तहसीलदार यांनी कळविले आहे.

00000

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

 अमरावती, दि. 20 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. यात सुमारे चार हजार 435 अर्ज महाविद्यालय आणि विद्यार्थीस्तरावर प्रलंबित आहेत. सदर अर्ज तातडीने निकाली काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना राबविण्यात येतात. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी नवीन अर्ज  व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याकरिता दि. 25 जुलै 2024 पासून सुरूवात झाली. सन 2023-24 वर्षाचे महाडीबीटीनुसार जिल्ह्यातील महाविद्यालयस्तरावर शिष्यवृत्तीचे 3 हजार 675 अर्ज, तर विद्यार्थीस्तर 760 अर्ज प्रलंबित आहेत.

   मागील वर्षी 2023-24 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 20 हजार 521 अर्ज नोंदणीकृत झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील सर्व योजनाचे सुमारे 18 हजार 733 विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीकृत झाले आहे.

     जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील प्राचार्यांनी महाविद्यालयास्तरावरील प्रलंबित पात्र अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठवावे. तसेच विद्यार्थ्यांच्या लॉ‍गीनकडे त्रृटी पूर्ततेसाठी परत केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरीत पुर्तता करून अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठवावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

000000

--

Tuesday, March 18, 2025

DIO NEWS AMRAVATI 18-03-2025

 





                                प्रत्येकाने सजग राहून ग्राहक चळवळ सशक्त करावी

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 18(जिमाका) : प्रत्येक नागरिक हा ग्राहक आहे. त्यामुळे खरेदी करताना उत्पादनांबाबत चुकीची माहिती देत असल्यास ग्राहकांना असलेल्या अधिकाराचा उपयोग करावा. प्रत्येक नागरिकांने याबाबत सजग राहून ग्राहक चळवळ सशक्त करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

पुरवठा विभागातर्फे आज बचत भवनात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विवेक जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, तहसिलदार प्रज्ज्वल पाथरे, विधी अधिकारी श्री. बोहरा, अन्न धान्य वितरण अधिकारी श्री. राऊत, अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटन मंत्री अजय गाडे, अशोक हांडे, चारूदत्त चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, ग्राहकांना सशक्त करण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांना भ्रमित करणाऱ्या आणि गैरसमज पसरविणाऱ्या बाबींना आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. ग्राहकांना तक्रार करण्यासाठी आणि न्याय मिळविण्यासाठी विविध स्तरावर यंत्रणा उभारण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांचा अधिकारीचा उपयोग केल्यास निश्चितच भेसळ, कमी दर्जाच्या उत्पादनांना आळा घालणे शक्य होईल.

आज सायबर फसवणुकीचे गुन्हे वाढत आहे. यात प्रामुख्याने पैशाशी संबंधित गैरव्यवहार होत आहे. याबाबत स्थानिक स्तरावर नियंत्रण करणे शक्य नाही, मात्र नागरिकांनी काही पथ्ये पाळल्यास सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहू शकणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी दक्ष राहून आपल्या परिसरात काय घडत आहे, याची जाणिव ठेवावी. शासकीय यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करीत आहे, मात्र प्रत्येक नागरिकाने लक्ष ठेवल्यास फसवणुकीच्या प्रकारापासून दूर राहण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

श्री. जाधव यांनी चळवळीनंतर 1986 मध्ये ग्राहक हिताचा कायदा करण्यात आला आहे. या कायद्याची जागृती झाल्यास चळवळ यशस्वी होणार आहे. ग्राहकांना कायद्याचे संरक्षण प्राप्त होण्यासाठी वस्तूंच्या खरेदी पावती जपून वापरावी. वस्तूंमध्ये काही दोष आढळल्यास याच पावतीच्या आधारे ग्राहकांना मिळणारे संरक्षण प्राप्त होऊ शकेल. ई-कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी करण्याची पद्धत रूढ होत आहे. यात प्रामुख्याने परदेशी मालाची विक्री होताना दिसून येते. त्यामुळे दुसऱ्या देशाचे आर्थिक मांडलिकत्व पत्करावे लागत असल्याने अशा खरेदीपासून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.

यावेळी अजय गाडे, चारूदत्त चौधरी, अशोक हांडे यांनी ग्राहकांना असलेल्या हक्काबाबत माहिती दिली. शिवम पथनाट्यच्या चमूने ग्राहक जनजागृतीबाबत पथनाट्य सादर केले.

0000

अचलपूर तहसील कार्यालयाद्वारे

समपहरण केलेल्या मालमत्तेचा लिलाव

अमरावती, दि. 18 (जिमाक) : थकबाकी न भरल्यामुळे जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा लिलाव अचलपूर तहसील कार्यालय करणार आहे. किसन शिवरामजी खेरडे यांच्या वारसांकडून येणे असलेल्या जमीन महसुलाच्या थकबाकीसाठी ही कारवाई करण्यात येत आहे.  

मौजा कांडली येथील भू-मापन क्रमांक 112/2 मधील चार भूखंडांचा लिलाव होणार आहे. या भूखंडांचा दि. 24 मार्च रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालय, अचलपूर येथे जाहीर लिलाव होणार आहे. या मालमत्तांवर असलेले सर्व भार, अनुदान आणि करार रद्द करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती आणि लिलाव प्रक्रियेच्या तपशीलांसाठी अचलपूर तहसील कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

घरकुल योजनांसाठी व्हॉट्सॲप क्रमांक सुरु

अमरावती, दि. 18 (जिमाका) : घरकुल योजनांची प्रभावी आणि जलद अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ७७६९९३७३३६ हा व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला आहे. लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते वेळेवर मिळाले नसल्यास जिओ टॅग फोटोवर आपले नाव, गाव आणि पंचायत समितीचे नाव नमूद करून या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

"सर्वांसाठी घरे" हे शासनाचे महत्वाचे धोरण आहे. याच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि अमरावती जिल्हा परिषद यांच्यातर्फे विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास घरकुल योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य योजनांचा समावेश आहे.

00000


Monday, March 17, 2025

DIO NEWS AMRAVATI 17-03-2025



 

कायदेविषयक शिबीरात कुष्ठरोगाबाबत जनजागृती

अमरावती, दि. 17 (जिमाका) : वायगाव, ता. भातकुली येथील कायदेविषयक जनजागृती शिबिरात कुष्ठरोगाबद्दल जनजागृती करण्यात आली. सन 2027 पर्यंत जिल्हास्तरावर कुष्ठरोग प्रसार निर्मुलनाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले. यात सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालयामार्फत कुष्ठरोग आजार आणि त्यासंबंधित कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. आरोग्यसेवा कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. पूनम मोहोकार यांची चमू आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी ताहेर, फैज उल्ला, स्वप्निल खंडार, अनुश्री जिचकार, क्षितिजा चिमोटे, गौरी राठी, रायना खान यांनी कुष्ठरोग आजार कायद्याबाबत पथनाट्य सादर केले.

कुष्ठरोग संशयित लक्षणे असणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकांनी शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन स्वतःची कुष्ठरोगाचे निदान करणे गरजेचे आहे. लवकर निदान आणि लवकर उपचार महत्त्वाचे आहे. तसेच कुष्ठरोगामुळे होणारी विकृती सुद्धा टाळण्यासंबंधी माहिती देण्यात आली. बहुविध औषधोपचार कुष्ठरोगावर असणारा खात्रीशीर इलाज सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध असल्याची माहिती डॉ. मोहोकार यांनी दिली.

कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. नंदकिशोर रामटेके, प्रा. डॉ. किर्तीराज सावळे, वायगाव आयुष्मान आरोग्यवर्धिनी मंदिर येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद उल्हे, कुष्ठरोग तंत्रज्ञ रितेश बथेरिया यांनी पुढाकार घेतला.

000000

आज जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रम

अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा विभागातर्फे मंगळवार, दि. 18 मार्च रोजी सकाळी 11 वाजता बचत भवनात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी 'शाश्वत जीवनशैलीकडे न्याय्य संक्रमण' ही संकल्पना आहे.

चर्चासत्र व प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायालयाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, पुरवठा उपायुक्त रमेश आडे, अप्पर जिल्हाधिकारी विवेक जाधव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटन मंत्री अजय गाडे उपस्थित राहतील. नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी केले आहे.

0000

अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करा, अन्यथा 50 हजार दंड

अमरावती, दि. 17 (जिमाका): दहा किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 नुसार, सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणांची कार्यालये, खासगी कार्यालये आणि दहा किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या संस्था, संघटना, मंडळे, कंपन्या, कारखाने, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, दुकाने, बँका आदी ठिकाणी ही समिती स्थापन करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयानेही समिती स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. समिती स्थापन केली नसल्यास कार्यालयांच्या प्रमुखांना 50 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, अशी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.

सर्व शासकीय आणि खासगी कार्यालयांनी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी आणि 2024-25 चा वार्षिक अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अमरावती येथे सादर करावा, तसेच, मासिक आणि त्रैमासिक अहवाल नियमितपणे सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे यांनी केले आहे.

00000

 

Thursday, March 13, 2025

DIO NEWS AMRAVATI 13-03-2025

 



सर्व कार्यालयांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 13 (जिमाका): राज्य शासनाने क्षेत्रीय स्तरावरील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृति आराखडा निश्चित केला आहे. या आराखड्यामध्ये दिलेल्या मापदंडानुसार गुणांकन करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरील सर्व कार्यालयांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे स्पर्धेबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातून महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, भातकुली उपविभागीय अधिकारी मिन्नू पीएम, धारणी उपविभागीय अधिकारी प्रियंवदा म्हाडदडकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव आदी जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

श्री. कटियार यांनी पहिल्या टप्प्यात केवळ चार विभागांसाठी असलेला कृति आराखडा संपूर्ण शासकीय यंत्रणेला लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व कार्यालयांनी यात भाग घ्यावा. कार्यालयाच्या समस्या इतर विभागाच्या मदतीने सोडविण्यास मदत होत असल्यास निश्चितच मदत घ्यावी. प्रामुख्याने परिसर स्वच्छता, अभ्यागतांसाठी असलेली व्यवस्था, नागरिकांच्या समस्या सोडविणे आदी मानके ही कार्यालयीनस्तरावरील असल्याने यावर भर द्यावा, असे आवाहन केले.

जिल्हास्तरावरील कोणत्याही कार्यालयांना मदतीची आवश्यकता भासल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालयांना आलेल्या समस्या तातडीने सोडविली जाईल. स्पर्धेतील मानके पूर्ण करण्यासाठी अद्यापही पुरेसा कालावधी असल्याने कार्यालयांनी तयारी करून अहवाल सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

00000

 

रोजगार मेळाव्यात 68 उमेदवारांची प्राथमिक निवड

अमरावती, दि. 13 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर तसेच विद्याभारती महाविद्यालय यांच्यावतीने दि. 12 मार्च रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात 68 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

मेळाव्यात 210 उमेदवारांनी ऑनलाइन, ऑफलाईन सहभाग नोंदविला. यातील 162 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती दिल्या. यापैकी 68 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, नितीन मेटागे, वैशाली पवार, अभिषेक ठाकरे, जितेंद्र गायकवाड उपस्थित होते. तसेच महिंद्रा आणि महिंद्रा, रेनबो कोटिंग प्रायव्हेट लिमीटेड बडनेरा, पीपीएस एनर्जी प्रायव्हेट लिमीटेड अमरावती, क्रेडीट एक्सेस ग्रामीण प्रायव्हेट लिमीटेड अमरावती, जाधव गियर प्रायव्हेट लिमीटेड अमरावतीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

इंटरशिप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

       अमरावती, दि. 13 (जिमाका): सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री इंटरशिप योजना सुरू केली आहे. यात तरूणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटरशिपची संधी दिली जाणार आहे. सदर योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी दि. 31 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.

          जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना pminternship.mca.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. उमेदवारांना 12 महिन्यांसाठी इंटरशिप मिळणार आहे, तसेच दरमहा 5 हजार रूपये मिळणार आहेत. याशिवाय इंटरशिप पूर्ण झाल्यानंतर 6 हजार रूपये एकरकमी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण दिले जाणार आहे.

योजनेमध्ये तरूणांनी सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद परिसर, डेपो रोड, अमरावती येथे भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

 

 

वाहन चालक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

       अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती येथील प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने एक वाहन चालक पद भरण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

          एक वाहन चालकाचे पद 11 महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रथम सहा महिन्यानंतर नियुक्त उमेदवाराची प्रगती पाहून मुदतवाढ देण्यात येणार आहे. यासाठी मासिक वेतन सर्व भत्यासह 15 हजार रूपये देण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 38 वर्षे व उमेदवार मागासवर्गीय असल्यास 43 वर्षे पर्यंत वयोमर्यादा राहणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 27 मार्च 2025 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, अमरावती विभाग, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय अधिकारी यांनी केले आहे.

000000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता 11 महिने

अमरावती, दि. 13 (जिमाका): मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता 11 महिने करण्यात आला आहे. यापूर्वी सहा महिन्यांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता पाच महिन्यांसाठी उमेदवार कार्यरत राहणार आहे.

युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी ही योजना राबविण्यात आली. जिल्हयामध्ये विविध आस्थापनांमध्ये उमेदवारांनी कार्यप्रशिक्षण घेतले. त्यानंतर संबंधित उमेदवारांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. मात्र मुदतवाढ मिळाल्यामुळे विविध आस्थापनेमध्ये 6 महिने युवाकार्य प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी पुढील 5 महिन्याच्या कार्यप्रशिक्षण कालावधीसाठी मूळ आस्थापनेवर त्वरीत रुजू व्हावे, तसेच संबंधित आस्थापना प्रमुखांनीही त्यांना रुजू करून घ्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

सोमवारी महिला लोकशाही दिन

अमरावती, दि. 13 (जिमाका) : महिलांच्या तक्रारीसाठी महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. महिलांनी त्यांच्या तक्रारी विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रासंह पाठविण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक निलेश खटके यांनी केले आहे.

00000

 राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा दौरा

अमरावती, दि. 6 (जिमाका) : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे  शनिवार, दि. 15 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता अमरावती येथील विश्रामगृह येथे आगमन व ओबीसी संघटनांशी चर्चा करतील. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता रहाटगाव येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री आठ वाजता चंद्रपूरकडे प्रस्थान करतील.

00000

शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 13 (जिमाका) : शहरात शांतता  सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1)  (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 18 मार्च ते दि. 1 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

000000

 

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा दौरा

अमरावती, दि. 6 (जिमाका) : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे  शनिवार, दि. 15 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता अमरावती येथील विश्रामगृह येथे आगमन व ओबीसी संघटनांशी चर्चा करतील. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता रहाटगाव येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री आठ वाजता चंद्रपूरकडे प्रस्थान करतील.

00000

शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 13 (जिमाका) : शहरात शांतता  सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1)  (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 18 मार्च ते दि. 1 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

000000

 

Wednesday, March 12, 2025

DIO NEWS AMRAVATI 12-03-2025


 

जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन


अमरावती, दि.12 (जिमाका) : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी तहसिलदार प्रशांत पडघम, निलेश खटके यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.


0000



धुलीवंदनाला उड्डाणपुलावरील वाहतूक बंद


           अमरावती, दि. 22 (जिमाका) : सण उत्सवाच्या कालावधीत कोणताही अनूचित प्रकार होऊ नये, यासाठी अमरावती शहरातील उड्डाणपूलावरील वाहतूक धुलीवंदनाच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे.

जिल्ह्यात होळी व धुलीवंदन सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. या सण-उत्सव कालावधीत शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धुलीवंदनाच्या दिवशी शहरातील उड्डाण पुलावरील वाहतूक नियंत्रित करण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवार, दि. 14 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, असे आदेश पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी जारी केले आहे.

त्यानुसार गाडगेनगर समाधी मंदिरापासून ते जिल्हा स्टेडियम, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन, कुथे हॉस्पीटल ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे.


00000






राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाला सुरुवात

*क्षयरोग तपासणीला सहकार्य करण्याचे आवाहन


अमरावती, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. सक्रीय क्षयरूग्ण शोध मोहिम दि. 22 मार्च दरम्यान राबविण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व क्षयरोगपथकामार्फत अतिजोखीमग्रस्त झोपडपट्टी, वीटभट्टी, भटक्या जमाती, कामासाठी स्थलांतरित, तसेच खाणीमध्ये काम करणारे कामगार, बेघर सामाजिक गट तसेच तुरुंग, वृद्धाश्रम, आश्रमशाळा, वसतिगृह, मनोरुग्णालयात क्षयरोगाबाबत जनजागृती आणि चाचण्या करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती आणि स्वयंसेवक घरभेटी देणार आहे. त्यांच्याकडून संशयित क्षयरूग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. यात आढळलेल्या क्षयरुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे.

शोधलेल्या सर्व संशयीत क्षयरुग्णांची राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बेडका नमुन्याची तपासणी व क्षकिरण तपासणी  करण्यात येणार आहे. संशयित क्षयरुग्ण यात लहान मुले, एचआयव्हीबाधित रुग्ण, एक्सट्रा प्लमनरी संशयित क्षयरुग्णांची नॅट तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत करण्यात येणाऱ्या तपासणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड यांनी केले आहे.

00000

--

Tuesday, March 11, 2025

DIO NEWS AMRAVATI 11-03-2025










 

विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद संपन्न


अमरावती, दि. 11 (जिमाका): उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद हॉटेल ग्रँड महफिल येथे आज संपन्न झाली.

विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र सिंह खुशवाह, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, विभागीय कार्यालयाचे उद्योग सहसंचालक निलेश निकम यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल तसेच जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या हस्ते यावेळी उद्योजकांसमवेत 32 सामंजस्य करार करण्यात आले. गुंतवणूक शिखर परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत नवउद्योजकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

आपल्या जिल्ह्याची बलस्थाने ओळखून गुंतवणूकीच्या नवनवीन संधी शोधा. उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी अमरावती जिल्ह्याचे वातावरण, येथील भौगोलिक परिस्थिती, दळणवळणाची साधने पूरक आहेत. या बाबींचा लाभ घ्या.अन्य क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत माहिती घ्या व उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्या. उद्योजकांना जेथे निकड आहे, तेथे प्रशासन मदतीसाठी तत्पर असल्याचे श्रीमती सिंघल म्हणाल्या.

अमरावती जिल्हा हा 'ट्रेडिंग हब' म्हणून उदयास यावा यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवित आहेत. येथील टेक्सटाइल पार्क ही जिल्ह्याची ओळख आहे. सर्व गुंतवणूकदारांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे. जिल्ह्यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यांच्या व राज्याच्या विकासाला चालना देण्याचा परिषदेचा उद्देश आहे. नवोद्योजकांनी याचे महत्त्व जाणून गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री कटियार यांनी केले.

00000




नितेश मेश्राम मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीची शिफारस
उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांची माहिती

अमरावती, दि. 11 : चांदूर रेल्वे येथील नितेश मेश्राम याच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे, अशी शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.

यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण राजेंद्र जाधवर यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ॲड. मेश्राम यांनी नितेश मेश्राम यांच्या मृत्यूबाबत पोलिस विभागाशी चर्चा केली. आयोगाकडे तक्रार आल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यात आली. तसेच डॉक्टर, सुरक्षा रक्षक, बाह्यरूग्ण विभागातील कर्मचारी बयाण घेण्यात आले आहे. यात प्रामुख्याने 10 जून रोजी अटक करण्यात आल्यानंतर 13 जून रोजी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. याबाबत 13 जानेवारी रोजी तक्रार आल्यानंतर 27 जानेवारी आणि 17 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे बैठक घेण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासात निष्काळजीपणा केल्याने गुन्हे दाखल करावे, तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

पिडीताच्या कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी शासकीय योजनेतून नियमानुसार शेतजमीन देण्यात यावी. तसेच कुटुंबियातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेली कार्यवाही आणि बयानातील तफावत आढळून आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्याकडून याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्यात येणार आहे, असे ॲड. मेश्राम यांनी सांगितले.

00000









अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...