चिखलदरा येथे रविवारी ‘मेळघाट रंगोत्सव’
*सांस्कृतिक महोत्सवात सेवा आणि स्पर्धांचा संगम
अमरावती, दि. 21(जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अमरावती आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी यांच्या वतीने चिखलदरा येथे 'मेळघाट रंगोत्सव 2025'चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 23 मार्च रोजी गिरीजन शाळेसमोरील मैदानावर सकाळी 10 वाजल्यापासून या महोत्सवाला सुरुवात होणार आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्षस्थानी राहतील. तसेच, तसेच खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, धिरज लिंगाडे आणि केवलराम काळे उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवात विविध सेवांची माहिती आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांसाठी आधार अपडेट, ऍग्रीस्टॉक नोंदणी, रेशनकार्ड नोंदणी, गोल्डन कार्ड नोंदणी, असंसर्गजन्य रोगांची चाचणी, सिकलसेल तपासणी, मोफत डोळे तपासणी, विनाशुल्क मौखिक तपासणी, घरकुल योजना आणि रोजगार हमी योजना आणि पोस्ट ऑफिस व बँक खाते उघडण्याची सुविधा राहणार आहे. तसेच लोकनृत्य स्पर्धा, पाककला स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा आणि पथनाट्य यांसारख्या सांस्कृतिक स्पर्धांही आयोजित करण्यात आल्या आहे.
मेळघाट रंगोत्सवातील विविध शासकीय सेवा आणि योजनांची माहिती देण्यात येणार असल्याने नागरिकांनी सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, धारणीच्या उपविभागीय अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी केले आहे.
00000
रमजाननिमित्त मिना बाजारमुळे वाहतुकीत बदल
अमरावती, दि. 21 (जिमाका) : अमरावती शहरात रमजान महिन्यानिमित्त मीना बाजार भरणार आहे. यामुळे दि. 24 ते 29 मार्च दरम्यान जवाहर गेट ते टांगापडाव रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या आदेशामुळे इतवारा बाजार (टांगापडाव) ते जवाहर गेटपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सायकलसह वाहतूक बंद राहील. हे निर्बंध 24 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 29 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू असतील.
या निर्बंद कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून गद्रे चौकाकडून शहरात येणारी आणि जाणारी जड वाहतूक गिट्टी, रेती, मुरूम, माल वाहतूक गद्रे चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, दीपक चौक मार्गे चित्रा चौक किंवा जुना बायपास मार्गे चपराशीपुरा चौक, बियाणी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, इर्विन चौक, दीपक चौक मार्गे चित्रा चौकाकडे वळविण्यात आली आहे. मोटारसायकल आणि सायकलस्वार राजकमल चौक, श्याम चौक, तहसील कार्यालय, साबनपुरा चौकी, प्रभात चौक ते चित्रा चौकाकडे जाऊ शकतील.
गद्रे चौक आणि रविनगर चौकाकडून गांधी चौक मार्गे इतवारा बाजारकडे, तसेच इतवारा बाजार चौकाकडून गांधी चौक मार्गे गद्रे चौकाकडे आणि राजकमल चौक ते गांधी चौक मार्गे इतवारा बाजारकडे तसेच इतवारा बाजार चौक ते गांधी चौक मार्ग राजकमल चौक या मार्गावर मालवाहतूक करणाऱ्या जड व हलक्या वाहनांसाठी बंदी राहणार आहे.
निर्बंधाचे उल्लंघन केल्यास मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी कळविले आहे.
00000
शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
अमरावती, दि.21 : सर्व न्यायालयात शनिवार, दिनांक 22 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकअदालतीमध्ये दाखल व दाखलपूर्व असे प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. नागरिक तसेच पक्षकारांनी तडजोडप्राप्त प्रलंबित खटले राष्ट्रीय लोक अदालत समक्ष तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणाबाबत नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याशी संपर्क साधावा. नागरिक तसेच पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालती समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा आणि सचिव मंगला कांबळे यांनी केले आहे.
0000
मंत्री प्रकाश आबिटकर यांचा दौरा
अमरावती, दि. 21 : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर रविवार, दि. 23 आणि 24 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, श्री. आबिटकर हे रविवार, दि. 23 मार्च रात्री 10.30 वाजता चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला भेट देतील.
सोमवार, दि. 24 मार्च रोजी सकाळी 10 वाजता हतरू प्राथमिक आरोग्य केंद्र, सकाळी 11 वाजता हिरडा गाव भेट, सकाळी 11.45 वाजता बारूगवाण गाव भेट, दुपारी 1.15 वाजता चुरणी ग्रामीण रुग्णालय भेट, दुपारी 2.40 वाजता काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता डफरीन हॉस्पीटल येथे अमरावती विभागीय आढावा बैठक घेतील. सायंकाळी 7 वाजता हॉटेल ग्रँड मैफिल येथे अमरावतीमधील खासगी डॉक्टरांसमवेत संवाद साधतील. रात्री 8 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.
00000
जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा दौरा
अमरावती, दि. 21 (जिमाका) : जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी सोमवार, दि. 24 मार्च रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
दौऱ्यानुसार, श्री. गांधी दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. सायंकाळी 5 वाजता नियोजन भवनात भगवान महावीर जन्म कल्याणक निबंध स्पर्धा प्रमाणपत्र वितरण आणि सकल जैन समाज प्रतिनिधींशी चर्चा करतील. सायंकाळी 6 वाजता व्यापारी, उद्योजक आणि संस्था संघटना पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतील. सायंकाळी 7 वाजता गांधी चौक येथे जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अमरावती जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करतील. सायंकाळी 7.30 वाजता स्थानिक जैन मंदिरांना भेटी देऊन रात्री 8.30 वाजता धामणगावकडे रवाना होतील.
00000