Friday, March 24, 2017














आधुनिक तंत्रज्ञान व कर्तव्यनिष्ठेने टी.बी.वर मात करू
जिल्हाधिकारी

अमरावती, दि. 24 : आधुनिक तंत्रज्ञान व टीबी निर्मुलनासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा यांनेच आपण टीबी रोगावर मात करू शकतो असे मत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मांडले. स्थानिक क्षयरोग रुग्णालय परिसरात आयोजित जागतीक क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुळकर्णी, समाजसेवक गोंविद कासट, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अरुण राऊत, डॉ.विलास जाधव,डॉ.नितीन भालेराव डॉ.वसंत लुंगे, क्षयरोग अधिकारी डॉ.निकोसे, डॉ विनोद देशमुख उपस्थित होते. सुरूवातीला क्षयरोग निर्मुलनाकरीता लसीचे संशोधक रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला हारार्पण केले. टि.बी निर्मुलनाकरीता पथनाट्य सादर करण्यात आले. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते टी.बीच्या माहिती देणाऱ्या स्टॉलचे व पोस्टर प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुळकर्णी यांनी रेबीज,देवी,पोलीओ यासारखाच  टीबी आता निर्मुलनाच्या उंबरठयावर असल्याचे सांगीतले.
यावेळी बोलतांना डॉ किरण गीत्ते म्हणाले की आशिया खंडातील 6 देशात  क्षयरोगाचा प्रसार सर्वाधिक झालेला आहे. भारतात ही 1 लाख 70 हजार रूग्ण क्षयरोगाने ग्रस्त आहेत. टी.बी.हा संसर्गजन्य व जीवनशैलीशी संबंधीत रोग असल्याने तो प्रतीबंधानेच कमी होऊ शकतो यासाठी  आपल्या परिसरात स्वच्छता राखणे, उच्च प्रथिनयुक्त आहाराचे सेवन करणे या  आरोग्यविषयक चांगल्या सवयी आपण लावल्या पाहिजेत.
प्रास्ताविक क्षयरोग तज्ञ डॉ.निकोसे यांनी  तर संचालन उमेश आगरकर यांनी केले. कार्यक्रमाला परीचर्या विद्यालयाच्या  विद्यार्थीनी उपस्थित होते.
00000

Monday, March 20, 2017









 केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत उत्कृष्ट कामे करणार
पालकमंत्री
अमरावती दि.20 (जिमाका) : केंद्रीय मार्ग निधी योजनेतर्गत मिळालेला निधी हा पुर्णपणे विकासकामासाठी खर्च करणार व यातुन उत्कृष्ट कामे करणार असे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज केले.

पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत  आज शहरातील रेल्वे स्टेशन ते इर्विन चौक   व चांदुररेल्वे   रस्त्याची सुधारणा कामाचे भुमीपूजन संपन्न्‍ झाले.यावेळी आमदार डॉ.सुनिल देशमुख व  नगरसेवीका,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी  जाधव उपस्थित होते.

 केंद्रीय भुतल परिवहनमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानुन पालकमंत्री म्हणाले की केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत मिळालेलया निधीव्दारे होणारी कामे ही दर्जेदार व्हावीत.यावेळी आमदार डॉ.सुनील देशमुख यांनी शहरातील विकासासाठी मिळालेल्या निधी चा वापर करून शहराचा कायापालट करणार असल्याचे सांगीतले.

00000
व्यसनमुक्तीसाठी प्रसारमाध्यमांची  महत्वाची जबाबदारी
*व्यसनमुक्तीसाठी साहित्यीक व प्रसार माध्यमांची जबाबदारी परिसंवादातील वक्तयांचा सूर

अमरावती दि.20 (जिमाका): व्यसनमुक्तीसाठी प्रसारमाध्यमांची जबाबदारी मोठी असुन प्रसारमाध्यमातुनच व्यसनमुक्तीबाबत जाणीवजागृती करता येईल असे मत आज पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनातील परिसंवादात मांडण्यात आले.

 संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देशातील पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाचा आजचा दुसरा दिवस होता. व्यसनमुक्तीसाठी साहित्यीक व प्रसार माध्यमांची जबाबदारी  व  संत साहित्यातील व्यसनमुक्तीचा संदेश या दोन्ही परिसंवादात  अभिनेत्री मधुरा वेलनकर, नितिन कुळकर्णी, सचिन परब, प्राध्यापक अरविंद देशमुख, डॉ.हेमंत खडके यासह कवी श्यामसुंदर सोन्नर, डॉ.दिपक पुनसे उपसिथत होते.

गुरूदेव मासिकाचे संपादक डॉ.दीपक पुनसे यांनी ग्रामगीतेतील तुकडोजी महाराजांच्या चरणाव्दारे व्यसनमुक्तीचा संदेश समजावुन सांगीतला. व्यसनमुक्तीचा कार्यक्रम एक दिवसाचा न राहता ती एक निरंतर प्रकीया राहावी. डॉ.हेमंत खडके यांनी तुकाराम महाराजांनी व्यसनावर ओढलेल्या आसुडाचे दाखले देऊन साही त्यात व्यसनाची यादी असल्याचे दाखले दिले. गुलाबराव महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आदीच्या कार्याचा आढावा घेतला.
गुलाबराव महाराजांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक प्राचार्य अरविंद देशमुख यांनी संतानी महाराष्ट्रात भक्तीमार्गाच रोपण केल्याचे सांगीतले. रोगापेक्षा उपचार प्रभावी असतो असे सांगुन तत्कालीन संत साहित्याने विवेकाची काजळी घालवण्याचे महान कार्य केल्याचे सांगीतले. प्रजापिता ब्रम्हाकुमारी परिवारात व्यसनमुक्तीचे काम ध्यानधारणेव्दारे करण्यात येते हे सांगुन सचिन परब यांनी  12 लाख विद्यार्थी 140 देशात ब्रम्हाकुमारीचे कार्य चालत असल्याचे सांगीतले. व्यसनमुक्ती होण्यासाठी छंदाची आवड जोपासण्याचे आवाहन दिले. विवेकानंदानी सांगीतल्याप्रमाणे आम्ही अमृताचे पुत्र आहोत या भावनेने तरुण पिढीने व्यसनापासुन दुर राहण्याचे आवाहन केले.

 पत्रकार नितीन कुळकर्णी यांनी प्रसारमाध्यमांनी महसुलाचा विचार  न करता व्यसनमुक्तीसारख्या दुष्प्रवृतीवर माध्यमांनी लिहीत राहण्याचे आवाहन केले. परिसंवादाला सुरू करण्याआधी दोन चित्रफीती दाखविण्यात आल्या. परिसंवादात अंत्यत ओघवत्या शैलीत वक्तयांनी श्रोत्यांना खिळवुन ठेवले.कार्यक्रमाला विद्यार्थी नागरीकांची उपस्थित होते.

आज व्यसनमुक्ती समेंलनात नशाबंदी ऑकेस्ट्रा, नशाबंदीची लावणी, बतावणी, पोवाडा, व्यसनमुकतीची प्रेरणागीते आदीचे मनोहारी सादरीकरण करण्यात आले.
00000







Sunday, March 19, 2017

प्रत्येकाने व्यसनाधिन व्यक्तीला
व्यसनमुक्त करण्याची शपथ घ्यावी
- सत्यपाल महाराज
* देशातील पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाचे थाटात उद्घाटन
* व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या 51 संस्था व व्यक्तींना पुरस्कार
* चर्चासत्राच्या माध्यमातून व्यसनाधिनतेवर प्रकाश व जनजागृती

अमरावती दि.19 (जिमाका) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेल्या समान हक्कामुळे आज व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षा म्हणून महिलांना संधी मिळाली आहे. त्याच बरोबर समाजाच्या व्यसनमुक्तीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ.आंबेडकर, संत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज या महापुरुषांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे एक छोटे काम मला सोपविण्यात आले आहे. हे काम सर्व समाजाचे असुन त्यासाठी प्रत्येक व्यक्तिने एकातरी व्यसनाधिन व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याची शपथ या निमित्ताने घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाचे संम्मेलनाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.
 संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देशातील पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. उद्योग, खनीकर्म व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मावळत्या संम्मेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर, अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड, समाज कल्याण विभागाचे आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, उपायुक्त भिमराव खंडाते, प्रादेशिक उपायुक्त दिपक वडकुते उपस्थित होते.
सत्यपाल महाराजांनी विनोदाच्या माध्यमातून व्यसन करणाऱ्यांच्या डोळ्यात खनखनीत अंजन घातले. त्यांनी अनेक उदाहरणांच्या माध्यमांतून लोक व्यसनाच्या आहारी कसे जातात हे पटवून दिले.
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी अमरावतीचा उल्लेख रत्नांची खान असा करुन समाजातील बदलत्या व्यसनाधिनतेवर प्रकाश टाकला. व्यसनाधिनता ही समाजाची मोठी समस्या असुन दारुबंदी असणाऱ्या जिल्ह्यातही व्यसनाधिनता आढळून येते या बद्दल खंत व्यक्त केली. शासन समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी काम करीत आहे. त्याचबरोबर नागरिकांची व समाजाची जबाबदारी मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांची जबाबदारी वाढली आहे. काही माणसे पुरस्कारापलिकडे असतात. अशा माणसांना मिळालेले पुरस्कार हे पुरस्काराची शोभा वाढविणारे असतात असे प्रशंसोद्गार संम्मेलनाध्यक्ष सत्यपाल महाराज यांच्याबद्दल काढले. व्यसनाधिनतेमुळे केवळ एका व्यक्तीचा किंवा कुटूंबाचा तोटा होत नसुन संपुर्ण समाजाचा नाश होतो. अशा संम्मेलनाच्या माध्यमातून आपला समाज व्यसनमुक्त करण्यासाठीचे मोठे काम होत असल्याचे ते यावेळी ते म्हणाले.
 व्यसन करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वत:चा मुलगा म्हणून थांबविण्याची मनोवृत्ती जोपर्यंत समाजामध्ये निर्माण होणार नाही तो पर्यंत पुढची पिढी व्यसनधिनतेकडे जाण्या वाचून आपण थांबू शकणार नाही. अशा पद्धतीची व्यसनमुक्तीची संम्मेलने प्रत्येक जिल्ह्यात झाली तर महाराष्ट्रात एकही व्यक्ती व्यसनाधिन राहणार नाही असे मत पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
मुक्ता पुणतांबेकर- प्रत्येक सामाजिक समस्येच्या मुळाशी व्यसनाधिनता आहे. त्यामुळे व्यसनाधिनतेचे परिणाम लहानपणीच मुलांच्या लक्षात आणून दिल्यास पुढील पिढी चांगली घडेल. आजच्या पिढीतल्या सगळ्या मातांना त्यांची मुल व्यसनाधिन होणार नाहीतं ना? याची काळजी लागून राहते. अशा संम्मेलनाच्या माध्यमातून समाजाला व्यसनमुक्त करण्याचे मोठे काम होत आहे. निराशा पचविण्याची क्षमता असणारी व्यक्तीच या क्षेत्रात काम करु शकते. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांना पुरस्काराच्या स्वरुपात बळ देणे जास्त महत्वाचे ठरते असेही त्या यावेळी म्हणाल्या. दारुबंदीचे जे काम गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा सारख्या जिल्ह्यात आणि केरळ सारख्या राज्यात होवू शकते ते काम संपुर्ण महाराष्ट्रात का होवू शकत नाही असा सवाल मावळत्या संम्मेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर यांनी उपस्थित केला.
निशिगंधा वाड यांनी आपल्या ओघवत्या भाषण शैलीने उपस्थितांची मने जिंकुन घेतली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची उदाहरणे देवून त्यांनी माणसाला मिळालेल्या नव्या कोऱ्या आयुष्याचा उपयोग सुंदर पद्धतीने कसा करता येवू शकते याचे दाखले दिले. मनाने उचल घेतली तर अंधारात ही माणूस उभा राहू शकतो त्यामुळे व्यसन सोडणे हे फक्त व्यक्तीच्या मनावर अवलंबून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
व्यसनमुक्ती साहित्य ठेवलेल्या ग्रंथदालनाचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते झाले. तसेच यावेळी व्यसनमुक्तीची शपथ सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सर्व उपस्थितांना दिली.
प्रास्ताविकातून पियुष सिंह यांनी व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाची भुमिका विषद केली. या कार्यक्रमाचे संचलन रेणुका देशकर तर आभार भालचंद्र मळे यांनी व्यक्त केले.
व्यसनमुक्तीसाठी यांना मिळाले पुरस्कार
        व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांना शासनाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थीना गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप संस्थेसाठी 30 हजार रुपये तसेच व्यक्तींसाठी 15 हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.
            संस्था - ब्रम्हकुमारीज मेडीकल विंग राजयोग एज्यूकेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन मालेगावं नाशिक, किशनलालजी बहुउद्देशिय सामाजिक संस्था, हिमायत नगर, नांदेड, नियती फिलॅर्न्थोपिक सोसायटी, ज्योतिबा नगर तरोडा, नांदेड, रिजनल रिसोर्सेस ॲण्ड ट्रेनिंग सेंटर, मुक्तांगण मित्र पुणे, निशिगंधा व्यसनमुक्ती केंद्र, मुक्तांगण मित्र पुणे, राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी संचलित जयंत दारिद्रय निर्मुलन अभियान, इस्लामपूर, सांगली, आरोग्य प्रबोधिनी आमगाव, देसाईगंज गडचिरोली, जागृती ग्रामीण विकास संस्था, एकलारी, भंडारा, महर्षी दयानंद कॉलेज, परेल मुंबई, जिल्हा परिषद केंद्रीय उच्च माध्यमिक शाळा, मुडाणा, यवतमाळ, एव्हरेस्ट फाऊंडेशन नाशिक, युगांधर फाऊंडेशन परभणी, भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था भाकर, रत्नागिरी, जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था औरंगाबाद, राम मनोहर लोहिया प्रतिष्ठाण विकास मंडळ, दगडगाव, नांदेड, डॉर्फ कॅटल केमिकल्स, प्रा.लि.मुंबई या संस्थांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
            व्यक्ती - निलेश सोमाणी वाशिम, नरेश रहिले (लोकमत) गोंदिया, प्रफुल्ल व्यास (तरुण भारत) वर्धा, हेरंब कुलकर्णी अहमदनगर, कार्तिक लोखंडे (हितवाद) नागपूर, ॲड.बाळासोहब बानखेले पुणे, गणेश वानखेडे बुलडाणा, धनंजय बामणे सांगली, डॉ.विजय मोरे पिंपरी पुणे, शालनताई वाघमारे कराड सातारा, जयपाल गायकवाड नांदेड, उत्तम गिरी बुलडाणा, प्रदिप माळी औरंगाबाद, निळकंठ बोरोळे अमरावती, प्रसाद ढवळे पुणे, रुस्तम कंपली सोलापूर, तुषार सुर्यवंशी नागपूर, राजाराम पवार रत्नागिरी, डॉ.ज्ञानेश्वर मिरगे बुलडाणा, मांगिलाल चव्हाण बुलडाणा, जगदेव पवार बुलडाणा, अनंतकुमार साळुंखे सांगली, रामदास धुमाळ औरंगाबाद, संतोष खडसे वाशिम, विजय पांडे आकोट, अकोला, विष्णू मापारी औरंगाबाद, ताणाजी जाधव पनवेल, रायगड, डॉ.अमोल चित्रकार अचलपूर, अमरावती, कैलास पानसरे मुंबई, विजया टाळकूटे जेजुरी, पुणे, हरिश्र्चंद्र पाल चंद्रपूर, अवधूत वानखडे यवतमाळ, डॉ.सुमंत पांडे पुणे, डॉ.राजहंस वंजारी नागपूर, अखिलेश हळवे (झी 24 तास) नागपूर     

00000










Saturday, February 25, 2017

चिखलदऱ्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करू
                                                    - प्रविण पोटे
·        चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन
          अमरावती, दि 25 (जिमाका) : निसर्गाचं वरदान लाभलेले, विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचीत असलेले चिखलदरा, पर्यटनाच्या बाबतीत  मात्र माघारले आहे. या थंड हवेच्या ठिकाणाची देशभर उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी चिखलदरा पर्यटन महोत्सवा सोबतच येथे चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देऊ अशी हमी पालकमंत्री प्रविण पोटे यांनी दिली.
          चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन आज चिखलदरा येथे खासदार आनंदराव अडसूळ यांचे हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री.पोटे बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार सर्वश्री प्रभुदास भिलावेकर, डॉ.अनिल बोंडे, रमेश बुंदिले, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, धारणी उपविभागीय अधिकारी शण्‍मुखराजन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत सवाई, नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल कर्डीले उपस्थित होते. 
         चिखलदरा पर्यटन महोत्सव पुन्हा सुरु करण्याची प्रेरणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. मेळघाट मधील व्याघ्र प्रकल्पातील 15 गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. चिखलदरा शहराची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी 432 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना राज्य शासनाने मंजूर केली आहे. 132 कोटी रुपये खर्च करून सबस्टेशन सुरु केल्यामुळे आतापर्यंत अंधारात जीवन जगणाऱ्या मेळघाटमधील 120 गावांना वीज पुरवठा सुरू झाला आहे. मेळघाटमध्ये उत्तम रस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 5 हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात चिखलदरा पर्यटन स्थळ म्हणून देशभर नावारूपास येईल यात शंका नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
          चिखालदऱ्यामध्ये रस्ते, पाणी, वीज आणि राहण्याची उत्तम व्यवस्था निर्माण झाली तर पर्यटकांची संख्या वाढून येथील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाने योग्य काम करणे आवश्यक असल्याचे मत खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केले. येथे उत्पादित होणाऱ्या मध, स्ट्रॉबेरी, बांबूच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
          येथे लावलेल्या विविध विभागाच्या तसेच महिला बचत गटाच्या स्टॉलचे फित कापून मान्यवरांनी उद्घाटन केले. चिखलदरा पर्यटन वार्षिकांकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते पार पडले. तसेच मुख्याधिकारी राहुल कर्डीले आणि  सूर्यकांत पिदूरकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
          या कार्यक्रमाचे संचालन गजानन देशमुख यांनी केले तर आभार राहूल कर्डीले यांनी मानले. यावेळी नगरसेवक, चिखलदरा पर्यटन महोत्सव समितीचे सदस्य, अधिकारी, आदिवासी बांधव उपस्थित होते.
00000

सावळे/झिमटे/खंडारकर/दि.25-02-2017/18-34 वाजता



















अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...