Wednesday, September 4, 2019

मोर्शी -वरुड तालुक्यातील तांडा वस्तीच्या विकासासाठी 58 लाखांचा निधी मंजूर.- तांडा वासियांनी मानले डॉ.अनिल बोंडे यांचे आभार*



 *अमरावती* :: दलित वस्ती सुधार योजनांच्या धर्तीवर भटक्या जमाती मधील बांधव तांड्या मध्ये, वाड्यात वस्त्या करून  राहतात त्यांच्या वस्त्यांची सुधारणा घडवून आणण्याच्या हेतूने या तांडा मधील विद्युतीकरण, पिण्याचे पाणी, पक्के रस्ते,  गटारे,  शौचालय, वाचनालय इत्यादी मूलभूत सुविधा पुरवून तांड्याची सुधारणा करण्याचे अभिवचन शासनाने दिले होते. ते जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ.अनिल बोंडे यांच्या प्रयत्नाने पूर्ण होणार असून मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी 6 लक्ष रु.हिवरखेड, निंभी येथील  तांडा वस्तीच्या  विकास कामासाठी प्रत्येकी 4: लक्ष रुपये, हिवरखेड येथील पोकड पुरा कॉंक्रिटीकरण करण्यासाठी 6 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
 वरुड तालुक्यातील ईत्तमगाव येथे 6 लक्ष रुपये, गाडेगाव टेंभणी येथील समाज मंदिर बांधकामासाठी 6 लक्ष रुपये, बेलोरा येथील सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीसाठी 6 लक्ष रुपये, धनोडी येथील स्मशानभूमीच्या संरक्षक भिंती च्या बांधकामासाठी 4 लक्ष रुपये, लोणी वार्ड नंबर 2 दोन मधील रस्ता बांधकामासाठी 4 लक्ष रुपये, पुसला येथील सभागृह बांधकामासाठी 6 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर करजगाव येथील वार्ड क्रमांक दोन व वार्ड क्रमांक तीन मधील रस्ते बांधकामासाठी प्रत्येकी तीन लक्ष रुपये मंजूर करण्यात आले 
 हा विकास निधी मंजूर करण्यात आल्याने तांड्यावरील रहिवाशी नागरिक व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे आभार मानले.*

नझूल भाडेपट्टेधारकांना पट्टेवाटपाची कार्यवाही सुरु

    सर्वांसाठी घरे


अमरावती, दि. 4 : विदर्भातील नझूल जमिनी भोगवटादार वर्ग-1 (फ्री-होल्ड) करण्यास शासनाने मान्यता दिली असून, त्यानुसार दर्यापूर, अचलपूर व अमरावती शहरातील प्राप्त प्रस्तावांना जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली असून,  पट्टेवाटप करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे.

  जिल्ह्यात एकूण 8 हजार 262 भाडेपट्टे असून, बहुतांश नझूल भाडेपट्टे अमरावती व अचलपूर येथे आहेत. सर्वांसाठी घरे योजनेत शासनाने या भाडेपट्ट्याच्या फ्री होल्ड रूपांतरणास मान्यता दिली. त्यानुसार तत्काळ कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. त्यानुसार प्राप्त प्रस्ताव तपासून समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार तत्काळ पट्टेवाटप करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.  अमरावती शहरातील हनुमाननगर, लालखडी व चमननगर या परिसरातील, अचलपूर व दर्यापूर येथील भाडेपट्टेधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

 नागपूर व अमरावती या महसुली विभागात तत्कालीन मध्यप्रांत आणि बेरार भागात लागू असलेल्या कायद्यान्वये मोठ्या प्रमाणात नझूल जमिनी भाडेपट्ट्याने देण्यात आल्या होत्या.  नागरिकांच्या मागणीचा विचार करून  या जमिनी फ्री- होल्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकूण 8 हजार 262 नझूल भाडेपट्टे असून, त्यातील 4 हजार 576 भाडेपट्टे अमरावती तालुक्यात आहेत. यापैकी 4 हजार 562 भाडेपट्टे निवासी, तर 14 भाडेपट्टे वाणिज्यिक किंवा औद्योगिक आहेत. अचलपूर येथे 3 हजार 608 भाडेपट्टे असून, त्यातील 3 हजार 122 भाडेपट्टे निवासी व 486 वाणिज्यिक किंवा औद्योगिक आहेत. दर्यापूर येथे 68 निवासी भाडेपट्टे आहेत. धारणी येथे 24 भाडेपट्टे असून, ते सर्व वाणिज्यिक किंवा औद्योगिक आहेत. हे सर्व फ्री होल्ड रुपांतरणाचा लाभ घेऊ शकणार आहेत.  
                                        ०००

पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सुसज्ज -जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 मोर्शी पूरपरिस्थितीची जिल्हाधिका-यांनी केली पाहणी
१५ सदस्यांचे बचाव पथक मोर्शीला रवाना

                              




अमरावती, दि. ५ : मोर्शी येथील पूरस्थितीत नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांच्या यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मोर्शी येथे  दिले . श्री. नवाल यांनी आज सायंकाळी मोर्शी येथे भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. १५ सदस्यांचे बचाव पथकही मोर्शीला उपस्थित आहे. 
 जिल्हाधिका-यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यानुसार प्रशासनाला निर्देश दिले. मोर्शी शहरात मध्यवस्तीत पुराचे पाणी  शिरल्यामुळे तेथील काही कुटुंबांना नगरपरिषदेच्या शाळांत हलविण्यात आले आहे. त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिवृष्टीत घ्यावयाच्या काळजीबाबत नागरिकांमध्ये विविध माध्यमांतून संदेश प्रसारित करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी, पाटबंधारे अभियंता यांनी परस्पर समन्वय ठेवून  परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे, तसेच अप्पर वर्धा धरणाचे गेट उघडण्याबाबत तेथील स्थिती पाहून व संपूर्ण माहिती घेऊन निर्णय घ्यावा. मात्र, त्यापूर्वी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला कळविण्यात यावे. नागरिकांची कुठलीही गैरसोय होता कामा नये. सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा , असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील 15 सदस्यांचे शोध बचाव पथक मोर्शीला उपस्थित आहे. तसेच पूर स्थितीमुळे बाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश तहसीलदारांना जिल्हाधिका-यांनी दिले.  या काळात औषधे व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.  रस्ते नादुरुस्त झाल्यास तत्काळ दुरुस्तीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत.  पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महसूल प्रशासनाव्दारे आपत्ती व्यवस्थापन पथक व नियंत्रण कक्ष 24 तास सुसज्ज आहे.
                                                                        ०००

यशस्वी जीवनासाठी नव्या कल्पनांना आकार द्यायला शिका - जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे विद्यार्थ्यांना आवाहन





* स्टार्टअप बिझनेस प्लॅन स्पर्धेचे भव्य उद्घाटन

अमरावती, दि. ४ : नवीन कल्पना आणि नवे कौशल्य प्रगतीला सहाय्यकारी असते.  त्यामुळे ध्येय डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. यशस्वी जीवनासाठी नव्या कल्पनांना आकार द्यायला युवा पिढीने शिकले पाहिजे,  असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.
           स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जिल्हा नाविन्यता परिषद, विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालय, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नवसंशोधन, नवोपक्रम आणि साहचर्य मंडळ आणि उन्नत भारत अभियानाच्या संयुक्त सहकार्याने आयोजित दोन दिवसीय अमरावती स्टार्टअप बिझनेस प्लॅन स्पर्धेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, राज्य नाविन्यता परिषदेचे सदस्य तसेच आयोजन सुकाणू समितीचे प्रमुख प्रा. दिनेश सूर्यवंशी, विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. डी.वी.जाधव, संगाबा अमरावती विद्यापीठाचे नवोपक्रम संचालक डॉ.डी.टी.इंगोले, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप, कुलसचिव डॉ.तुषार देशमुख, तंत्र शिक्षण सहाय्यक संचालक डॉ.एम.ए. अली, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विनोद कलंत्री, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहसंचालक नरेंद्र येते, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, प्राचार्य डॉ. आर.टी.मोगरे आदी उपस्थित होते. 
           जेव्हा विज्ञान व्यवहाराशी जुळते तेव्हा त्याची किंमत अधिक वाढते, असे सांगत जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी थ्री इडियट या चित्रपटाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक 'रँचो' लपलेला आहे. केवळ त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांनी आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे.  कुठल्याही शॉर्ट कटचा आधार न घेता नेहमी प्रयत्नातून यश मिळवा. 
          कुलगुरू डॉ. चांदेकर म्हणाले की, समाज बदलायचा असेल तर विद्यार्थ्यांसहित उद्योजकांना देखील योगदान द्यावे लागेल. रोजगार देणारे उद्योजक बनण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. या दोन दिवसीय स्पर्धेत ३२५ हून अधिक युवकांनी आपल्या कल्पनांची मांडणी केली असून त्यातून निश्चितच चांगल्या कल्पना ब्रँड म्हणून पुढे येतील. त्यामुळे युवकांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून आणखी चांगल्या कल्पना येत राहाव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
         प्रा.दिनेश सूर्यवंशी प्रास्ताविकात म्हणाले की, युवकांमध्ये नवनवीन कल्पनांना साकार आणि आकार देण्याची क्षमता असून  केवळ त्यांच्या क्षमतांचा योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे. आपल्या शक्तीचा योग्य उपयोग करण्याचे कौशल्य ज्या दिवशी विद्यार्थ्यांना अवगत होईल त्या दिवशी हा देश एका वेगळ्या उंचीवर गेलेला असेल. या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअपच्या कल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी पुढाकार घेतला असून पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी देखील त्यासाठी पुढाकार घेऊन ही स्पर्धा युवकांसाठी आयोजित केली आहे. यावेळी शासनाच्या युवा पिढीला बळ देण्यासाठीच्या पुढाकाराची जाणीव सूर्यवंशी यांनी सर्वांना  करून दिली.

        या कार्यक्रमाचे संचालन वंदना पैकिजे यांनी केले. आभार डॉ. डी. टी. इंगोले यांनी मानले. या स्पर्धेत अमरावती विभागातील तीन विविध गटातून जवळपास ३२५ हून अधिक स्पर्धकांनी आपले मॉडेल्स सादर केले आहेत. या मॉडेल्सचे प्रदर्शन सांस्कृतिक भवनातील आर्ट गॅलरीत उद्यापर्यंत सुरू राहणार आहे.  स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उद्या दुपारी १ वाजता पालकमंत्र्यांच्या हस्त होईल.
                                                                        ०००

कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी


अमरावती, दि. 4 : शेतकरी व शेतमजुरांनी किटकनाशकांच्या फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घेण्याच्या सूचना कृषी विभागाव्दारे जारी करण्यात आल्या आहे.
किटनाशकांची फवारणी करतांना सर्वप्रथम लेबलमधील दिशानिर्देश काळजीपूर्वक वाचावे आणि त्याचे अनुकरण करावे. लेबलवरील चेतावणी व सावधगिरीकडे विशेष लक्ष द्यावे. कीटकनाशकांच्या डब्यावरील मार्गदर्शक चिन्हा कडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. लाल रंगाचे चिन्ह अथवा खून असलेली औषधे सर्वात अधिक विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा, हिरवा असा क्रम लागतो. कीटकनाशके थंड, कोरड्या आणि सुरक्षित जागी कुलूप लावून मुलांपासून दूर ठेवावीत. कीटकनाशके नेहमी त्यांच्या मुळ डब्यात साठवावी. आणि कधीही खाद्य आणि खाद्य सामग्रीसह साठवू नये. कीटकनाशकांचे रिकामे डबे, बाटल्या, खोकी इत्यादींचा पुनर्वापर करू नये. फवारणी करिता गळक्या फवारणी यंत्राचा वापर करू नये.
कीटकनाशके हाताळतांना सुरक्षीततेच्या दृष्टीने रबरी हातमोजे, लांब पॅन्ट आणि लांब बाहीचे शर्ट वापरावेत तसेच पायात बुट, नाक व तोंडावर माक्स अथवा रेस्पायरेटरचा वापर करावा. कीटकनाशके वापरल्यानंतर लगेच कपडे बदलुन हात धुवावेत. फवारणीसाठी वापरायची कपडे स्वतंत्र ठेवावीत तसेच ती वेळोवेळी स्वच्छ धुवावीत. कीटकनाशके विहिर किंवा इतर जलस्त्रोतांच्या जवळपास कधीही मिसळू नयेत अथवा त्याठिकाणी कीटकनाशके वापरलेली भांडी स्वच्छ करू नये. उघड्या हातांनी कीटकनाशके कधीही ढवळू नये. याकरिता काठीचा वापर करावा तसेच कीटकनाशकांचा वास घेणे टाळावे. कीटकनाशकांचे शिल्लक द्रावण पडीक जमिनीत खड्डा करुन पुरुन टाकावे.
बंद पडलेल्या नोझल स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून थुंकू नये त्यासाठी तार किंवा काडी किंवा टाचणीचा वापर करावा. रिकाम्या पोटी फवारणी करू नये. कीटकनाशके वापरतांना खाऊ-पिऊ किंवा धूम्रपान करू नये. खाण्यापिण्याच्या पूर्वी हात आणि चेहरा साबनाने स्वच्छ धुवावा. कीटकनाशक फवारणी नेहमी वाऱ्याच्या दिशेने करावे.  कीटकनाशके शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. शरीरावर जखमा असलेल्या व्यक्तीने कीटकनाशके हाताळू नये. फवारणी करून आल्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती विजय चवाळे यांनी सर्व शेतकरी बंधूंना केले आहे.
000000

प्लास्टिक निर्मूलनासाठी शासकीय कार्यालयांनी पाऊल उचलावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

दैनंदिन वापरातून प्लास्टिक हटविण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
         

अमरावती, दि. 3 : प्लास्टिक निर्मूलन ही काळाची गरज असून, त्यासाठी विविध शासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी  कार्यालयातील आपल्या दैनंदिन वापरातून प्लास्टिक हटवावे व पर्यायी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
            प्लास्टिक कच-याच्या निर्मूलनासाठी व प्रदुषण रोखण्यासाठी विविध उपाय जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.  प्लास्टिक कच-यापासून उपयुक्त विविध वस्तू तयार करून त्याचा शहर सौंदर्यीकरणासाठी किंवा इतर सुविधांसाठी वापर करता येणे शक्य आहे. त्यासाठी अभ्यास करून अंदाजित खर्चासह प्रकल्प अहवाल सादर आदेशही जिल्हाधिका-यांनी अभियांत्रिकी तज्ज्ञांना नुकतेच दिले आहेत. त्याचप्रमाणे, शासकीय, निमशासकीय कार्यालयांनीही दैनंदिन वापरातून प्लास्टिक हटविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
 विविध कार्यालयांत कार्यक्रम, सभा, बैठकांसाठी प्लास्टिक बाटलीबंद पाणी मागवले जाते. त्यानंतर या बाटल्यांचा प्लास्टिक कचरा निर्माण होतो. अशा वेळी पाणी जार किंवा पर्यायी वस्तूंच्या माध्यमातून वापरता येणे शक्य आहे. चहा, नाश्ता, जेवणासाठी चिनीमाती, स्टील किंवा पर्यायी कप, कागदी प्लेटस् वापरता येणे शक्य आहे. अनेक वर्षांची सवय एकदम थांबणार नसली तरी त्याची सुरुवात आपल्या सर्व कार्यालयांनी करणे आवश्यक आहे. कार्यालयाप्रमुखाने आपल्या अधिकारी- कर्मचा-यांना प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत सांगावे, त्यांना प्रोत्साहित करावे. आपण सर्वांनी प्लास्टिकला नकार दिला तरच हळूहळू का होईना इतरत्रही प्लास्टिकचा वापर कमी- कमी होत जाईल. यामुळे प्लास्टिक कच-याची समस्या काही प्रमाणात निश्चित दूर होईल व त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
 महापालिकेकडून प्लास्टिक कचरा गोळा केला जातो. त्या कच-यापासून पेव्हिंग ब्लॉक, व्हर्टिकल गार्डनसाठी उपयुक्त बाबींच्या निर्मितीसह रस्ता बांधकामातही वापर शक्य आहे. यासाठी अभियांत्रिकी तज्ज्ञ, प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून नव्या संकल्पनांवर आधारित प्रकल्प अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यापूर्वी बैठकीत दिले आहेत. 
                                                                        000

Tuesday, September 3, 2019

आकाशवाणीवर ‘हॅलो इन’मध्ये कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा संवाद


·         शनिवार-रविवारी होणार प्रसारण
अमरावती, दि. 3 :  महाराष्ट्रातील कृषीजीवन, पारंपरिक व आधुनिक शेती पद्धती, आव्हाने व उपाय, शासनाच्या योजना व उपक्रम याबाबत माहिती देणारी  राज्याचे कृषी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची मुलाखत अमरावती आकाशवाणीच्या ‘हॅलो इन’ या लोकप्रिय कार्यक्रमात शनिवारी व रविवारी ( 7 व 8 सप्टेंबर)  प्रसारित होणार आहे.  
            आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचे कार्यक्रमप्रमुख एकनाथ नाडगे यांनी ही मुलाखत घेतली आहे. बदलत्या पर्यावरणातही कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्यासाठी होणारे प्रयत्न, महापूर, दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना, कृषी संजीवनी, पीक विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, महाकर्जमाफी, जलसंवर्धन, सूक्ष्म सिंचन, जैविक शेती आदी विविध योजना व उपक्रमांबद्दल विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांना कृषी मंत्री डॉ. बोंडे यांनी मुलाखतीत मनमोकळी उत्तरे दिली आहेत.
            कृषी क्षेत्रातील बदल, विकास व दीर्घकालीन उपाययोजना याबाबत उपयुक्त माहिती देणारी ही मुलाखत शनिवार व रविवारी सकाळी 10.05 वाजता दोन भागांत प्रसारित होणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामजीवनाचे वर्णन करणारी कृषी मंत्र्यांना आवडणारी अनेक सुंदर गाणीही या कार्यक्रमातून ऐकायला मिळणार आहेत. ही कार्यक्रम श्रोत्यांना निश्चित आवडेल, असा विश्वास श्री. नाडगे यांनी व्यक्त केला.   
                                                                        000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...