Saturday, November 30, 2019

आरटीओ कार्यालयाच्या ‘महावॉकेथॉन’ मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग





अमरावती, दि. 30 – वाहतूक सुरक्षेबाबत संदेश देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा रस्ता सुरक्षा समितीतर्फे आज शहरात आयोजित महावॉकेथॉन मध्ये अमरावतीकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कॅम्पमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशफाक अहमद यांनी हिरवी झेंडी दाखवून वॉकेथॉनची सुरुवात झाली. कर वसुली विजय गावंडे, प्रदीप गुडदे यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सहभागींकडून फलकावर रस्ता सुरक्षेबाबत विविध संदेश प्रदर्शित करण्यात आले.  पुढे जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे गर्ल्स हायस्कूल चौक व पुन्हा परिवहन कार्यालयाकडे असा वॉकेथॉनचा मार्ग होता.   
राष्ट्रीय सेवा योजना, ड्रायव्हिंग स्कूलचे कर्मचारी, परिवहन अधिकारी व कर्मचा-यांसह नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.  

Friday, November 29, 2019

अचलपूरमध्ये महिला चावडी मेळाव्याला मोठा प्रतिसाद महिलांनी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल







अचलपूर, दि. २९ : कुटुंबात विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलांमध्ये सामाजिक, आर्थिक व्यवहारातही अग्रेसर राहण्याचे सामर्थ्य आहे. आपली ही ताकद  ओळखून महिलांनी उद्योग-व्यवसायाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.
केंद्र शासनाच्या आर्थिक समावेशन धोरणांतर्गत 'स्टेट बँक ऑफ इंडिया'तर्फे महिलांसाठी चावडी मेळावा अचलपूर येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. बँकेचे उपमहाव्यवस्थापक रतन बॅनर्जी, क्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश शिवप्रिय, तहसीलदार मदन जाधव, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे विभागीय सल्लागार एच. एम. चौबे, जिल्हा प्रबंधक सचिन देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, स्त्री ही कुटुंबात अनेक जबाबदाऱ्या लीलया पार पाडते. तिने आपले सामर्थ्य ओळखून व्यवसायात पाऊल ठेवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे.जिल्ह्यात बचत गटांकडून चांगले काम होत आहे. ते अधिक विस्तारले पाहिजे. बँकेने कर्जवाटपाचे प्रमाण वाढवावे.
विविध सामाजिक लाभाच्या योजनांतून ग्रामीण महिलांमधील बँकिंगचे प्रमाण वाढून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाने आर्थिक समावेशन धोरण लागू केले आहे. त्यानुसार 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने देशातील २०० जिल्ह्यांची निवड केली असून अमरावती जिल्ह्याचा त्यात समावेश आहे, असे श्री. बॅनर्जी यांनी सांगितले.
बचत गटांच्या सदस्यांना  कर्जवाटपाचे धनादेश यावेळी वितरित करण्यात आले. विविध बँका व लघुउद्योग, व्यवसाय, बचत गट यांच्या सुमारे ५० दालनांचा मेळाव्यात समावेश होता. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो महिलांची उपस्थिती होती.
00000

गावागावांत पांदणरस्त्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

पांदणरस्त्यांच्या कामांना जिल्ह्यात गती

*अचलपूर तालुक्यात कामांची पाहणी
अमरावती, दि . 29 – जिल्ह्यात गावोगाव चांगले पांदणरस्ते तयार करण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल. गावकरी बांधवांनीही गावासाठी चांगले पांदणरस्ते निर्मिण्यासाठी सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज अचलपूर तालुक्यातील सावळापूर पूर्णा येथे केले.
          जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी पांदणरस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश उपविभागीय कार्यालयांना यापूर्वीच दिले आहेत. त्यांनी आज अचलपूर तालुक्यातील सावळापूर, कुष्ठा आदी गावांतील कामांची पाहणी केली व गावक-यांशी संवाद साधला. सावळापूरच्या सरपंच वैशालीताई सगणे, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.
सावळापूर या गावानजिक पांदणवाटेत पाणी असल्याने शेतात जाणे जिकिरीचे झाले होते. त्यामुळे येथे गावाच्या सहभागातून अडीच किलोमीटरचा पांदणरस्ता तयार होत आहे. या रस्त्यामुळे शेतकरी बांधवांना शेतात जाणे, मालवाहतूक आदी कामे सुलभ होतील, असे समाधान गावक-यांनी यावेळी व्यक्त केले.
पांदणरस्त्याचे काम दर्जेदार करावे. आवश्यक तिथे भराव घालावेत. जिथे नदीचे खोलीकरण करणे शक्य आहे, तिथे ते करून तिथला गाळा, इतर राडारोडा भरावासाठी वापरता येतो का, ते पहावे. उपविभागीय अधिका-यांनी या कामात काही अडचणी आल्यास त्या तत्काळ सोडवून काम पूर्णत्वास जाण्यासाठी मदत करावी. मोठी झाडे तोडू नयेत, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी मोर्शी तालुक्यातील गावांचीही नुकतीच पाहणी केली.
                             000

Thursday, November 28, 2019

उन्नत भारत अभियानात समन्वय संस्थेची स्थापना अभियानात प्राध्यापक-विद्यार्थ्यांना लोकजीवनात मिसळण्याची संधी - कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर



·       राज्यपालांच्या हस्ते 20 डिसेंबरला शुभारंभ
        अमरावती, दि. 28 – ग्रामीण लोकजीवनात मिसळण्याची, तेथील समस्या जाणून घेण्याची व त्यावर उपाय सुचविण्याची संधी उन्नत भारत अभियानाद्वारे शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मिळाली आहे.  या अभियानातील समन्वय संस्थेच्या शुभारंभाचा कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत होणार असून, तो यशस्वी होण्यासाठी नियुक्त सर्व समित्यांनी समन्वयाने काम करावे,  असे निर्देश विभागीय समन्वय संस्थेचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी आज येथे दिले.
        उन्नत भारत अभियानात विभागीय समन्वय संस्थेचे उद्घाटन व मार्गदर्शिकेचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दि. 20 डिसेंबरला दुपारी 4 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित बैठकीत कुलगुरू डॉ. चांदेकर बोलत होते. विद्यार्थी विकास संचालक डॉ. दिनेशकुमार सातंगे, डॉ. हेमंत खडके, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, डॉ. डी. टी. इंगोले, डॉ. प्रणव कोलते, विभागीय सहसमन्वयक प्रा. के. सी. मोरे, डॉ. पी. बी. शिंगवेकर यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
        डॉ. चांदेकर म्हणाले की,  समन्वय संस्थेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला राज्यपाल महोदयांसह ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या दृष्टीने समन्वय समिती, स्वागत व व्यवस्था, प्रसिद्धी व तांत्रिक समित्यांचे गठण करण्यात आले आहे.  शासनाच्या विविध विभागांचाही सहभाग या कार्यक्रमात आहे. सर्वांनी समन्वय ठेवून आपापली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.
                        ०००

जीवनात यशस्वितेसाठी खिलाडू वृत्ती आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

राज्यस्तरीय शालेय खो- खो क्रीडा स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ
                







·       राष्ट्रीय स्पर्धेचा बहुमानही अमरावतीलाच  
अमरावती, दि. 28 – जीवनात यशस्वितेसाठी खिलाडू वृत्ती, साहस, चिकाटी व उमदेपण या गुणांची गरज असते. खेळांतून हे गुण विकसित होतात. त्यामुळे सर्वांनीच खेळासाठी वेळ दिला पाहिजे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात क्रीडा विभागातर्फे चौदा वर्षांखालील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय खो- खो क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ आज श्री. नवाल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.  विभागीय क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख अध्यक्षस्थानी होत्या. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव डॉ. माधुरी चेंडके, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देवनाथ, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू डॉ. नितीन चव्हाळे उपस्थित होते.
या स्पर्धेत राज्यातील आठ विभागांतून 16 संघाचे 192 विद्यार्थी व विद्यार्थिनी खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यातून निवड झालेल्या संघांना राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग मिळणार असून, राष्ट्रीय स्पर्धेचा बहुमानही अमरावतीलाच मिळाला आहे. ही स्पर्धा जानेवारीत होईल.
खेळाडूंना खेळताना प्रतिस्पर्ध्यांचा खेळ पाहून तातडीने निर्णय घेणे व वेगवान हालचाली कराव्या लागतात. त्यामुळे खेळणा-या मुलांमध्ये शारीरिक बळाबरोबर निर्णयक्षमता, बुद्धिमत्ता विकासही होतो, असे श्रीमती देशमुख यांनी यावेळी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथसंचलन व मल्लखांब प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय पांडे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी आभार मानले. निवड समितीचे सदस्य प्रशांत पवार, गुरुदत्त चव्हाण, योगेश शिर्के, प्रा. विलास दलाल, संजय कथलकर, भास्कर घटाळे, अनिल बोरवार, संतोष विघ्ने, उमेश बडवे, संदेश गिरी, नितीन चवाळे, महेश अलोणे आदी उपस्थित होते.
                            000

Wednesday, November 27, 2019

पणन महासंघाने विविध प्रयोगांसाठी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

पहिल्या दिवशी 216. 55क्विंटल खरेदी
                शासकीय कापूस खरेदीचा जिल्ह्यात शुभारंभ
              






अमरावती, दि. 27 - पणन महासंघाने कापूस खरेदीच्या कामाप्रमाणेच शेतकरी बांधवांसाठी इतरही उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा. कापूस वेचणी यंत्र आदी साहित्य पुरविण्यासारखे वेगवेगळे प्रयोग करता येणे शक्य आहे. अशा कामांसाठी जिल्हा प्रशासन सदैव सहकार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केले.
 राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे यंदाच्या हंगामासाठी शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. वलगाव येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी येथे हा शुभारंभाचा कार्यक्रम झाला. महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. महासंघाचे उपाध्यक्ष ॲड. विष्णुपंत सोळंके, संचालक उषाताई शिंदे, प्रसेनजीत पाटील, सुरेशराव देशमुख,सुरेश चिंचोळकर, शिरीष धोत्रे, नामदेवराव केशवे, ययाती नाईक, भरत चामले, नरेंद्र ठाकरे, शिवाजीराव दसपुते  जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव आदी यावेळी उपस्थित होते.  खरेदीच्या पहिल्याच दिवशी 216.55 क्विंटल खरेदी झाली आहे.
          श्री. नवाल म्हणाले की,  पणन महासंघ कापूस हमीभावाने खरेदी करत आहे. आता महासंघाने शेतक-यांच्या लाभासाठी शक्य ते सर्व प्रयोग करावेत. शेतक-यांचे सातबारा ऑनलाईन करण्यात आले आहेत.  तथापि, त्यावर पीकांची नोंद बरोबर आहे किंवा कसे, हे तपासून घ्यावे. तांत्रिक चूक राहू नये जेणेकरून विमा व इतर योजनांचा लाभ घेताना काहीही अडचण येणार नाही.  ग्रामीण परिसरासाठी पांदणरस्त्यांची योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
  यावेळी महासंघाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
                                       000

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याव्दारे पांदन रस्त्यांची पाहणी






अमरावती, दि. 27 : शेतकऱ्यांना शेतमाल, निविष्ठा, बीबियाणे शेतात ने-आण करणे सोईचे व्हावे, यासाठी मोठ्या संख्येने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित विभागाला दिले. शेतकऱ्यांना पांदण रस्त्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाशी संपर्क साधावा. त्यांच्या अडचणींचे व प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मोर्शी तालुक्यातील विविध गावांच्या पांदण रस्त्यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी नेरपिंगळाई येथील पिंगळादेवी देवस्थान व गडाची पाहणी केली. पिंगळादेवी येथील विकासकामांचा आढावा घेतला. मंदिराच्या विश्वस्थांशी चर्चा करुन पुढील विकासकामांच्या नियोजनाबाबत माहिती घेतली. या देवस्थानचा दर्जा ‘क’ वरुन ‘ब’ होण्यासाठीचा प्रस्ताव मंजूरीसाठी प्रयत्न करण्यात येईल. मंदिराच्या खुल्या परिसरात वृक्ष लागवड करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मंदिर परिसरात भक्तनिवास उभारण्यासाठी प्रशासनातर्फे मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी येरला ग्राम पंचायतीला भेट देऊन तेथील पालकमंत्री पांदन रस्ते योजनेतून निर्माण करण्यात आलेल्या मौजा येरला ते खानापूर रस्त्यांची पाहणी केली. या पांदण रस्त्या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मौजे येरला ते लाडकी या पांदण रस्त्याचे काम सुरु करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतांना केल्या.
पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे वरुड ते भंगारा, चिंचोली गवळी ते रसुलपूर कोपरा या पांदण रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तालुक्यातील सर्व पांदण रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी सार्व. बांधकाम विभागाच्या अभियंतांना दिल्या.
यानंतर त्यांनी मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्याकडून पांदण रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. पुढील कामांच्या नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पाहणी दौऱ्यात संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व शेतकरी बांधव, गावकरी मंडळी उपस्थित होते.
00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...