Saturday, January 25, 2020

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा सत्कार पत्रकारांना घरकुल मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत - पालकमंत्री यशोमती ठाकूर







अमरावती, दि. 25 : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे.  समाजातील प्रश्न राज्यकर्त्यासमोर मांडून त्याच्या निराकरणासाठी पत्रकार सतत धडपडत असतो. त्यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी जिल्ह्यातील नियोजित भूखंडावर घरकुल निर्मितीसाठी शासनाव्दारे सर्वतोपरी मदत करू, असे जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.
अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांचा सन्मानचिन्ह,  शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे, दिलीप एडतकर, नानक आहुजा, शशिकांत ओहळे व संघाचे गोपाल हरणे, गिरीष शेरेकर यांच्यासह इतर पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पत्रकारांना हक्काचे घर असावे, त्यांच्यासाठी वैद्यकीय विमा योजना यासारख्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करू. सोलापूर येथे निर्माण होत असलेल्या घरकुल प्रकल्पाच्या धर्तीवर अमरावती येथे सुध्दा म्हाडा मार्फत घरकुल बांधकामाच्या प्रस्तावाला पालकमंत्री या नात्याने सर्वकष मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बसस्थानक, तहसील कार्यालय, न्यायालय यासारख्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या इमारतींचे वैभव कायम ठेवून सुशोभीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार भवनासाठी निवासाच्या सोयीसह अद्ययावत इमारत व पत्रकारांसाठी आरोग्य विमा योजनासह तीन महिन्यातून एकदा संपूर्ण चेकअप सारखी योजना राबविण्यात येणार असल्याचे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. 
 उपस्थित पत्रकारांशी यावेळी त्यांनी मनमोकळा संवाद साधला.  
ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे, दिलीप एडतकर व पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांनी मनोगत व्यक्त  केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन गिरीष शेरेकर यांनी तर कृष्णा लोखंडे यांनी सर्वांचे आभार मानले. अमरावती शहरातील सर्व मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार मंडळी यावेळी उपस्थित होते.
00000

पालकमंत्री कार्यालयाचा ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते शुभारंभ









अमरावती, दि. 25 – पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या कार्यालयाच्या शुभारंभ ज्येष्ठ नागरिक भास्करराव गुडदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजनभवनात आज झाले.
अमरावतीच्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे कार्यालय हक्काचे ठिकाण आहे. या कार्यालयामार्फत नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सदैव तत्पर राहीन, असे यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार देवेंद्र भुयार, तिवसा येथील नगराध्यक्ष वैभव वानखडे, हरीभाऊ मोहोड यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
नागरिकांचे प्रश्न, मागणी, निवेदने, त्यावरील प्रशासकीय कार्यवाही, प्रलंबित प्रश्नांचे निराकरण, विविध कार्यालयांशी समन्वय आदी विविध कामकाजासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारीपदी रणजीत भोसले रुजू झाले आहेत. कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून नायब तहसीलदार अरविंद माळवे काम पाहतील. त्याचप्रमाणे, प्रशासकीय कामकाजासाठी अधिकारी संध्या गवळी,  महेश दुबे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतील.   
यावेळी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातील स्त्री सक्षमीकरणाच्या प्रतिज्ञा फलकावर सर्व मान्यवरांनी स्वाक्षरी केली.  
                                    000


Friday, January 24, 2020

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिली प्रतिज्ञा





अमरावती, दि. 24 : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली.
           मतदार यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी स्नेहल कनीचे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी शरद पाटील यांच्यासह सह अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


मतदारांसाठी प्रतिज्ञा
 भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याव्दारे, प्रतिज्ञा करतो की, आल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करुन आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्व वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.’’
00000

Thursday, January 23, 2020

अंगणवाड्यांना मिळणार नवीन चार हजार खोल्या - श्रीमती यशोमती ठाकूर

पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश


मुंबई, दि. 23 : पुढील आर्थिक वर्षात अंगणवाड्यांच्या 4 हजार नवीन खोल्या बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय आदी पायाभूत सुविधा दर्जेदार उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.
          महिला व बालविकास विभाग अंतर्गत राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण अभियान आणि युनिसेफच्या विद्यमाने आयोजित पोषण अभियानसंदर्भातील राज्यस्तरीय परिषदेत त्या बोलत होत्या.
          बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अंगणवाड्यांचे काम महत्त्वाचे असल्याचे सांगून श्रीमती ठाकूर म्हणाल्या, राज्यातील सर्व अंगणवाड्या कार्यान्वित करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने अंगणवाडी सेविकांची साडेपाच हजार रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच खासगी जागेत भरणाऱ्या अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात भरीव वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. कार्यान्वित नसलेल्या अंगणवाड्या तातडीने कार्यान्वित कराव्यात.
          अंगणवाड्यांच्या खोल्या बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच ग्रामपंचायत विकास आराखड्यातून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एका वर्गखोलीसाठी साडेआठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्या म्हणाल्या.
पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी
          शून्य ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तरात सुधारणा होण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियमाची (पीसीपीएनडीटी) कठोर अंमलबजावणी करावी. या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावावी. चुकीच्या गोष्टी घडत असलेल्या सोनोग्राफी सेंटर्स, दवाखान्यांवर अचानक छापे टाकण्यात यावेत. यामध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढावे यासाठी योग्य पद्धतीने तपासाच्या सूचना देण्यात येतील.
          दुर्गम भागातील बालकांचे कुपोषण ही एक गंभीर समस्या असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी यंत्रणांनी संवेदनशीलपणे काम करणे आवश्यक आहे. टेक होम रेशन (टीएचआर) तसेच हॉट कुक मील (एचसीएम) सुव्यवस्थितरित्या पुरविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुरवठा व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. टीएचआर आणि एचसीएम पुरवठ्यासाठी अधिकाधिक संस्थांना निविदा प्रक्रियेत भाग घेता यावा यासाठी वार्षिक उलाढालीची मर्यादा 25 हजार रुपयांवरुन 10 हजार रुपये इतकी कमी करण्यात आली आहे, असेही त्या म्हणाल्या.
          आदिवासी भागातील तसेच दुर्गम भागात पोषण आहाराच्या व्यवस्थेकडे अधिक लक्ष द्यावे. तीव्र कुपोषित (मॅम) तसेच अतितीव्र कुपोषित (सॅम) बालके शोधून त्यांच्यावर तत्काळ उपचार करावेत. महिला व बालविकास विभागाच्या योजनांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून शहरी भागामध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्पांचे पर्यवेक्षण अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी कार्यप्रणाली तयार करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
          योजनेच्या अंमलबजावणीसाठी तसेच विविध माहिती ऑनलाईन भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल कार्यान्वित राहतील याची काळजी घ्यावी. नादुरुस्त उपकरणे बदलण्यात यावीत. वजनकाटा, उंची मापक सुस्थितीत असतील याची खात्री करावी. सर्व अहवाल नियमितपणे भरले जातील याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
          कार्यशाळेत यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांनी महिला व बाल विकास विभागाच्या कामांची माहिती दिली. एकात्मिक बाल विकास प्रकल्प आयुक्त श्रीमती इंद्रा मालो यांनी प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा सादर केला. माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी यांनी महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाबाबत माहिती दिली. युनिसेफच्या राज्यासाठीच्या प्रमुख (सीएफओ) राजेश्वरी चंद्रशेखर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी यावेळी सादरीकरण केले.
          एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंब शस्त्रक्रिया केलेल्या मातांना 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेंतर्गत मुलीच्या नावे मुदत ठेव केल्याचे प्रमाणपत्र मंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आले. मंत्री श्रीमती ठाकूर यांनी उपस्थितांना 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' प्रतिज्ञा दिली.
          कार्यशाळेस जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बाल विकास विभागाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
00000

स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

Monday, January 20, 2020

पालकमंत्र्यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप


     पावसाळ्यात घराची पडझड व नुकसान झाल्याबद्दल नुकसानग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे वाटप महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले.

      जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचतभवनात हा कार्यक्रम झाला. पं. स. सभापती संगीताताई तायडे, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते.

      पावसाळ्यात पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीबद्दल सुमारे 225 नागरिकांना मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले.  राष्ट्रीय अर्थसहाय्य कुटुंब योजनेंतर्गत नऊ लाभार्थ्यांना मदतीचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाले.  आपद्ग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा

नियमभंग व बेशिस्त रोखण्यासाठी कायद्याचा धाक निर्माण करा पालकमंत्री यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 20 : अवैध दारूविक्री, गुटखाविक्री, वाहतुकीतील बेशिस्त आदी गुन्हे रोखण्यासाठी पोलीसांकडून सातत्याने कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. कायद्याची जरब नसल्यास गुन्हेगारी फोफावते. त्यामुळे पोलीसांनी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा घडवून आणावी, असे स्पष्ट निर्देश महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, माजी आमदार वीरेंद्र जगताप, प्र. जिल्हाधिकारी संजय पवार, आयपीएस अधिकारी पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्याम घुगे, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

          पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात तरूण पिढी, शाळकरी मुलेही व्यसनांना बळी पडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध दारूविक्री व गुटखाविक्री पूर्णपणे थांबली पाहिजे. या कार्यवाहीत कुठलीही कारणे देऊ नयेत. महिलांवरील अत्याचार, छेडछाडीच्या घटना, बालक अत्याचार घटना पूर्णपणे थांबल्या पाहिजेत. त्यादृष्टीने यंत्रणा अधिक सजग ठेवावी. दामिनी पथक अधिक कार्यक्षम करावे. नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची जपणूक करताना सार्वजनिक सुरक्षिततेसाठी कायदेपालन व शिस्त निर्माण करण्याची जबाबदारी पोलीसांची आहे.  आपल्याला कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून ही जबाबदारी सुयोग्यरीत्या पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.   

                             वाहतुकीत शिस्त आणा

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावती शहरात इर्विन चौक, गाडगेनगर, जयस्तंभ चौक, अंबादेवी मंदिर मार्ग अशा अनेक ठिकाणी वाहतुकीत विस्कळीतपणा सतत दिसून येतो. परवाना नसतानाही वाहन चालविणा-यांचे, त्यातही किशोरवयीन मुलांचे प्रमाण आढळते. वाहने रस्त्यात लावलेली आढळतात. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बेशिस्त करणारांना पोलीसांचा धाक राहिला नाही, असाच याचा अर्थ आहे. ही परिस्थिती तातडीने सुधारली पाहिजे. वाहतुकीत तत्काळ शिस्त निर्माण करावी व तसा बदल झाल्याचे दिसून आले पाहिजे. परिवहन विभागानेही वेळोवेळी आवश्यक तपासण्या, कारवाई केली पाहिजे.

जिल्ह्यात विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉली फिरत असल्याची तक्रार माजी आमदार श्री. जगताप यांनी केली. त्याचप्रमाणे, वाळू चोरी, शेती साहित्याची चोरी अशा घटनाही वाढत असल्याचे ते म्हणाले. मध्यप्रदेश सीमेलगतच्या गावांत अवैध दारूचे प्रमाण अधिक असल्याची तक्रार आमदार श्री. भुयार यांनी केली. हे प्रकार रोखण्यासाठी काटेकोर कारवाईचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...