Sunday, June 27, 2021

पोलीस यंत्रणा बळकटीकरणासह दर्जेदार सुविधांची निर्मिती - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 










चिखलदऱ्यात नवे पोलीस विश्रामगृह

पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 

                      पोलीस यंत्रणा बळकटीकरणासह दर्जेदार सुविधांची निर्मिती

                                                          - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

            अमरावती, दि. 27 :  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कार्यरत असतात. कोरोना साथीच्या काळात जोखीम पत्करून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या व आताही पार पाडत आहेत.

त्यामुळे पोलीस दलाचे अधिक बळकटीकरण करण्याबरोबरच नानाविध दर्जेदार सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज चिखलदरा येथे केले.

 

जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे चिखलदरा येथील हिरेकन पॉईंट येथे उभारण्यात आलेल्या पोलीस विश्रामगृहाचे पालकमंत्री यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

जि.प. समाज कल्याण सभापती दयाराम काळे, चिखलदरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विजयाताई सोमवंशी, पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन., श्रीमती श्वेता के. हरी बालाजी, अपर पोलीस अधिक्षक श्याम घुगे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, तहसीलदार श्रीमती माने, पोलीस निरीक्षक श्री. मानकर चिखलदऱ्याचे ठाणेदार राहुल वाढवे आदी यावेळी उपस्थित होते.

      पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस कर्मचा-यांसाठी पोलीस हेल्थ ॲप, क्लब व क्रीडा संकुल, विश्राम कक्ष, उपाहारगृह, महिलांसाठी स्वतंत्र जीम अशा अनेक उत्तमोत्तम सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यालाच जोडून चिखलदरा येथील विश्रामगृहाचीही दर्जेदार सुविधा निर्माण झाली आहे. चिखलदऱ्याच्या लौकिकाला साजेशी अशी ही निर्मिती आहे.

पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांनी धडाडीने या सुविधा अंमलात आणल्या हे निश्चित वाखाणण्यासारखे आहे. त्या पुढे म्हणाल्या की, यापूर्वीही रक्षादीपसारखा चांगला उपक्रम राबवला गेला. पोलीस कर्मचा-यांवरील महत्वाच्या जबाबदा-या, अविश्रांत काम व तणाव पाहता त्यांच्या आरोग्य व मनोबल टिकवून ठेवण्यासाठी असे विविध उपक्रम उपयुक्त ठरतील. अशा अनेकविध उपक्रमांना पोलीस दलाने चालना द्यावी. चांगल्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. श्रीमती श्वेता  बालाजी यांनी त्यांच्या कल्पकता व उत्तम नियोजनातून येथील विश्रामगृहात सुविधांचे सौंदर्यीकरण करून त्यांचा दर्जा उंचावला, असे त्यांनी सांगितले.

 यावेळी चिखलदरा उभारण्यात येणाऱ्या स्काय वॉक ची पाहणी पालकमंत्री यांच्या द्वारे करण्यात आली.

00000

Saturday, June 26, 2021

पालकमंत्र्यांकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कामांचा आढावा

 





पालकमंत्र्यांकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कामांचा आढावा

अभियानातील कामांबाबत तक्रारी; त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करा

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश

अमरावती, दि. 26 : गरीब, वंचित तसेच गरजू ग्रामीण नागरिकांना सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात अनेक कार्यक्रम राबविले जातात. तथापि, जिल्हा यंत्रणेकडून त्यांची चांगली अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अभियानातील अनेक कामांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. या सर्व बाबींची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी व्हावी व जबाबदारांवर कारवाई व्हावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

अभियानातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जि. प. आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. रेवती साबळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, संसर्गजन्य व असंसर्गजन्य, स्थानिक रोगांच्या साथीचा प्रतिकार व नियंत्रण, एकात्मिक प्राथमिक आरोग्य सुविधांचा वापर वाढविणे,आरोग्यदायी जीवनाचा प्रचार व प्रसार, प्राथमिक आरोग्य केंद्र व सामाजिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण, आरोग्य सेवांचा वापर वाढविणे, उपकेंद्राला स्थानिक नियोजन करण्यासाठी सक्षम करणे आणि बहुउद्देशीय कार्यकर्त्यांची उपलब्धता वाढविणे अशी कितीतरी कामे करण्यासाठी मोठा निधी या अभियानात उपलब्ध करून दिला जातो. मात्र, त्या प्रमाणात सुविधांची वाढ झाल्याचे दिसत नाही. अनेक कामे अपूर्ण आहेत. अनेक कामे निकृष्ट दर्जाची असल्याबाबत ग्रामीण भागातून तक्रारी प्राप्त आहेत. या सर्व बाबींची चौकशी त्रयस्थ यंत्रणेकडून व्हावी व जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

                        लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात

                         ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे सुरु करण्यात आली. मात्र, अनेक कामे अपूर्ण आहेत. पथ्रोट, शिराळा व करजगाव येथील पीएचसीचे काम गतीने पूर्ण करावे. प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण असले पाहिजे. यापूर्वीच्या सर्व कामांचे छायाचित्रांसह सविस्तर व सुस्पष्ट सादरीकरण करावे. कामांचे नियोजन व अंमलबजावणी या दोहोंबाबत पारदर्शकता असली पाहिजे. लोकप्रतिनिधींना त्याबाबत माहिती दिली पाहिजे. त्यांच्या सूचना विचारात घेऊन परिपूर्ण नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, यंत्रणेकडून कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. सादरीकरणातही सुस्पष्टता नाही. हे गंभीर असून, या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी. आपण स्वत: ठिकठिकाणी भेट देऊन आरोग्य केंद्राच्या कामांची पाहणी करू, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.  

                                                उपकेंद्रांसाठी मनुष्यबळ मिळवा

बृहद आराखड्यात पूर्ण झालेल्या उपकेंद्रांसाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. नांदगावपेठ व खोलापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तेथील लोकसंख्या पाहता तिथे ग्रामीण रुग्णालय होणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता पाहता संपूर्ण यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा योजना, कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, पक्षाघात प्रतिबंधक कार्यक्रम, वृद्धापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम, पॅलिएटिव्ह कार्यक्रम, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, कर्णबधीरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम, मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, मौखिक आरोग्य कार्यक्रम आदी विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

            राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या कामांबाबत समग्र आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

                                                               000


Tuesday, June 22, 2021

महिला बचत गटाच्या शेतीपूरक व्यवसायांना आवश्यक बळ मिळवून देऊ - महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू

 













‘माविम’तर्फे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते

 शेतकरी महिलांना बी-बियाणे व औषधींचे वितरण

 

        महिला बचत गटाच्या शेतीपूरक व्यवसायांना आवश्यक बळ मिळवून देऊ

               

                                       -महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू

अमरावती, दि. 22 : ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबात शेतकरी आत्महत्या झाली तर त्या कुटुंबाची सर्व जबाबदारी घरातील महिलांवर येते. अर्ध्यावर सोडलेला संसाराचा गाडा महिला स्वकर्तृत्वाने समोर नेते. अशा माताभगिनींना बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसायांच्या संधी निर्माण होणे गरजेचे आहे. बियाणे निर्मितीच्या क्षेत्रातही व इतरही शेतीपूरक व्यवसायांत चांगली संधी असून, त्यासाठी महिलाभगिनींनी पुढाकार घ्यावा. अशा उपक्रमाला आवश्यक बळ मिळवून देऊ, अशी ग्वाही महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज चांदूर बाजार येथे दिली.

चांदूर बाजार येथील टाऊन हॉलमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्याव्दारे आयोजित कार्यक्रमात स्वंय सहाय्यता महिला बचत गटातील शेतकरी महिलांना बि- बियाणे व औषधींचे राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी नितीन सोसे, मंगेश देशमुख, माविमचे संनियंत्रण अधिकारी केशव पवार, सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा अनिता शिंगाळे, कृषी सहायक प्रवीण मोहोड, पुष्पाताई बोंडे यांच्यासह बचतगटाच्या महिला मंडळी आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत. बचत गटाच्या महिलांनी माविमच्या सहकार्याने आपापल्या गावात शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पेरणीच्या दिवसांत बियाण्यांची आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेता महिला बचत गटांनी उत्तम दर्जाचे बियाणे कसे निर्माण करता येईल यासाठी नियोजन करावे. माविमव्दारे आज वितरीत होणाऱ्या बियाण्यांच्या बॅगच्या माध्यमातून आणखी बियाणे कसे तयार करता येईल, यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन तसे नियोजन करावे. पुढच्या वर्षी आपल्या बचतगटाव्दारे बियाणे विक्री व्हावी, असा निश्चय करुन एकजुटीने प्रयत्न करावे. उत्पादित बियाणे किंवा शेतीपूरक मालाचे मार्केटिंगसाठी पुढाकार घ्यावा. अशा प्रयत्नांतूनच आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल.

                                    बचत गटांच्या उत्पादनांच्या विपणनासाठी दिवाळीपासून उपक्रम

बचतगटातर्फे एखादा कुटीर उद्योग, ग्रामोद्योग उभारावा. त्यासाठी निधीची तरतूद शासनाकडून केली जाईल. येत्या दिवाळी पासून चांदूर बाजार तालुक्यातील बारा गावांत बचतगटाव्दारे उत्पादित मालाच्या विक्रीचा उपक्रम राबविला जाणार आहे. यातही महिलांनी आपला सहभाग नोंदवावा. बचतगटांना उद्योग उभारणीसाठी बँकेद्वारे कर्ज दिले जाते. त्यासाठी नियोजन करुन लघु उद्योग उभारावा. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी प्रयत्न केला जाईल. बँकेद्वारे तालुक्यात तसेच गावांत गोदाम निर्मितीसाठी बचतगटांनी समोर यावे. जागेची व्यवस्था झाल्यास गोदाम निर्मितीसाठी आमदार निधीतून निधी दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

माविम, जीआयझेड व बायेर यांच्या संयुक्तपणे तालुक्यातील शेतकरी महिलांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कंपन्यांच्या सीएसआर फंड मधून पाच हजार रुपयाचे बि बियाणे व किटकनाशक औषधी शेतकरी महिलांना वितरीत केल्या जात आहे. जिल्ह्यात साडे सहा हजार बचतगट कार्यरत असून सुमारे 70 हजार महिलांचा त्यात समावेश आहे.  सर्व गटांव्दारे माविमच्या दशसुत्रीचे पालन केल्या जात आहे. या बचत गटांना आतापर्यंत सुमारे 32 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून त्यांची शंभर टक्के कर्ज परतफेडची टक्केवारी आहे. महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व योजनांचा लाभ दिला जात आहे. चांदूर बाजार तालुक्यात 350 बचतगट कार्यरत असून यात 200 शेतकरी महिला सदस्यांचा समावेश आहे. यातील 87 शेतकरी महिलांना सोयाबिनचे बियाणे तर 113 शेतकरी महिलांना कपाशीचे बियाणे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. सोसे यांनी यावेळी दिली.

यावेळी बचतगटाच्या सात शेतकरी महिलांना प्रातिनिधीक स्वरुपात बि-बियाणे व औषधींचे राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

0000

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून 'एचव्हीपीएम'ला भेट

 





शंकरबाबा पापळकर यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून 'एचव्हीपीएम'ला भेट

क्रीडा महाविद्यालयात पदभरती व इतर मागण्यांबाबत पाठपुरावा करू

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 22 : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा महाविद्यालयातील पदभरतीबाबत पाठपुरावा करू, असे पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी येथे सांगितले.

 

पालकमंत्र्यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला आज भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, माजी महापौर विलास इंगोले, मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

क्रीडा प्रशिक्षण महाविद्यालयातील रिक्त पदांची भरती होण्याबाबत उच्च शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाकाळात महाविद्यालय बंद असल्याने प्रशिक्षणात अडचणी आल्या. त्यामुळे किमान प्रात्यक्षिक वर्गासाठी तरी परवानगी मिळावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबतही  शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 

शंकरबाबांवरील विशेषांकाचे प्रकाशन

 

 'शब्दप्रभु' या मासिकाच्या शंकरबाबा पापळकर यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. अमरावतीच्या कल्पना नितीनराव देशमुख यांनी या अंकाच्या माध्यमातून आपल्या लेखनातून शंकरबाबा पापळकर यांच्या जीवनकार्यावर  प्रकाश टाकला आहे. हा मोलाचा दस्तऐवज असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

शंकरबाबा पापळकर यांचे कार्य मोठे आहे. या सच्च्या समाजसेवकाच्या कार्याची ओळख या अंकाच्या माध्यमातून होते, अशी प्रतिक्रिया श्री. वैद्य यांनी व्यक्त केली.

 

यावेळी लेखिका कल्पना देशमुख, नितीनराव देशमुख, गोपाळराव उताणे, मंजुषा उताणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

00000

 

 

अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रक्रियेला वेग द्यावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 




अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रक्रियेला वेग द्यावा

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 22 :  शासनाच्या विविध विभागांमध्ये अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक असते. ही प्रक्रिया पारदर्शी व गतीने पूर्ण होण्यासाठी याबाबतच्या अद्ययावत माहितीची आज्ञावली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

 

विविध विभागात अनुकंपा तत्वावर भरण्यात येणाऱ्या पदांच्या भरतीबाबत आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंड्या,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमोद निरवणे, अपर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालयाचे उपायुक्त नितीन तायडे,  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहायक संचालक श्री भुते, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रमेश गित्ते उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, प्रतीक्षायादीनुसार पात्र उमेदवारांना वेळेत नियुक्ती मिळाली पाहिजे. यासाठी सर्व विभागांतील रिक्त पदांची  माहिती , प्रतीक्षा सूची अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करावे. ही प्रक्रिया पारदर्शीपणे राबवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

याबाबत प्रशासनाने वेळोवेळी आढावा घेऊन प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

                        000

 

 

 

 

वनसंवर्धन करताना पर्यटनस्नेही प्रकल्प राबवा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 







पालकमंत्र्यांकडून वन विभागाच्या कामांचा आढावा

वनसंवर्धन करताना पर्यटनस्नेही प्रकल्प राबवा

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 22 : वनसंवर्धनासाठी विविध योजना राबविताना विविध भागांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन पर्यटनस्नेही प्रकल्पही राबवावेत, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

वन विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत, तसेच विभागांतर्गत केलेल्या विविध कामांचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अपर मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, वनांचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक तिथे पुनर्वनिकरणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. वनपर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्नेही उपक्रमांची अंमलबजावणी करावी. विविध भागांची स्थानिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यानुसार प्रकल्प राबवावेत. जिल्ह्यात केकतपूर येथे स्थलांतरित पक्ष्यांची वर्दळ असते. पक्षी अभयारण्यासारखे उपक्रम तिथे राबवता येणे शक्य आहे. यासाठी पक्षीप्रेमींची बैठक घेऊन त्यांच्या सूचना विचारात घ्याव्यात. आवश्यक तिथे वॉचटॉवर्स उभारावेत, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात पांदणरस्त्यांसाठी विशेष मॉडेल राबविण्यात येत आहे. ठिकठिकाणी पांदणरस्त्यांची अनेक कामे सुरु आहेत. शेतकरी बांधवांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी व शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी पांदणरस्ते चांगले असणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामांसाठी वनविभागाने आवश्यक परवानगी आदी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. पांदणरस्त्याच्या कामात कुठेही अडथळा येऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले.

वन विभागाकडून निकृष्ट वनांच्या पुनर्वनिकरण, वनपर्यटन व पर्यटनस्नेही पर्यावरण, जल व मृद जलसंधारण कामे, मध्यवर्ती रोपमळा, वनातील इमारती दुरुस्ती, वन संरक्षणाची कामे, वनातील मार्ग व पूल, आगीपासून वनांचे संरक्षण आदी विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी जिल्हा योजनेतून 18 कोटी 25 लाख व कॅम्पा योजनेतून सुमारे 3 कोटी निधीची तरतूद करण्यात आली, अशी माहिती श्रीमती बॅनर्जी यांनी सादरीकरणादरम्यान दिली.

00000

विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी हालचालींना वेग - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 









पालकमंत्र्यांकडून बेलोरा विमानतळावरील कामांची पाहणी

अद्ययावतीकरणामुळे अमरावतीत साकारेल अत्याधुनिक विमानतळ

विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी हालचालींना वेग

-    पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 19 : अमरावती येथून विमानसेवा सुरु होण्याच्या दृष्टीने विमानतळाची कामे पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विमानतळाच्या अद्ययावतीकरणाच्या शासनाच्या निर्णयानुसार अत्याधुनिक विमानतळ अमरावतीत साकारण्यासाठी अपेक्षित कामे मिशनमोडवर पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निधी उपलब्धता व इतर बाबींसंदर्भात लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येईल व आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिली.

पालकमंत्र्यांनी आज सकाळी अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला भेट देऊन अधिका-यांशी चर्चा केली व संपूर्ण विमानतळाची पाहणी केली. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे (एमएडीसी) मुख्य अभियंता एस. के. चटर्जी, रामेश्वर कुरजेकर, त्याचप्रमाणे ‘राईटस् लि.’ या कंपनीचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

प्रत्यक्ष विमानसेवा सुरु होण्यासाठी मिशनमोडवर कामे करा

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावती हे विभागीय मुख्यालय आहे. त्यामुळे विमानतळाचे अद्ययावतीकरणाच्या कामाची जबाबदारी शासनाने ‘एमएडीसी’कडे सोपवली आहे. त्यानुसार विमानतळावर एटीआर-72 किंवा तत्सम प्रकारची विमाने येथे उतरण्याची सोय होण्यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्यात येत आहे व येथे रात्रीच्या वेळी विमाने उतरण्याची सुविधाही निर्माण होणार आहे. या विमानतळाचा उडान (आरसीएस) या केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत उडान 3.0 मध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमअंतर्गत अमरावती- मुंबई विमानसेवा सुरु करण्याचा मार्ग अलायन्स एअरलाईन्स यांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष विमानसेवा सुरु होण्यासाठी मिशनमोडवर कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे एमएडीसी प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा करून कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार आवश्यक निधीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला जाईल. याबाबत स्वतंत्र बैठक लवकरच होईल. एमएडीसीचे अधिकारीही उपस्थित असतील. आवश्यक तो सर्व निधी मिळवून देऊ, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

           एटीआर-72 विमाने उतरण्याची सुविधा व नाईट लॅडिंगच्या सुविधेसाठी विस्तारीकरणाची कामे करण्यासाठी ‘एमएडीसी’कडून ‘राईटस् लि.’ या कंपनीची निवड करण्यात आली आहे. ‘राईटस् लि.’ ही कंपनी केंद्र शासनाचा उपक्रम असून, ती आरेखन सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करेल. या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या संरक्षण, तसेच वने व पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळालेली आहे.

 

  पाणी, वीज सुविधांसह वळण रस्त्याचे काम पूर्ण

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत विमानतळाला पाणीपुरवठा उपलब्ध करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. महावितरणमार्फत अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम पूर्ण झाले आहे. बडनेरा- यवतमाळ वळणरस्त्याचे बांधकामही पू्र्ण झाले आहे. विमानतळाच्या संरक्षक भिंतीची उभारणी करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात येत असून, त्याची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. धावपट्टीची लांबी 1372 मीटरवरून 1850 मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. हे काम प्रगतीपथावर आहे.  ही सर्व कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

000

 

 

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...