Friday, December 24, 2021

वाई बोथमध्ये १०२ वर्षांच्या आजींचे लसीकरण

 


वाई बोथमध्ये १०२ वर्षांच्या आजींचे लसीकरण

अमरावती, दि. २४ : जन्म १९१९ मधला व आताचे वय १०२ वर्षे असलेल्या वाई बोथमध्ये आजींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण आज करण्यात आले. लसीकरण हे साथीपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असून, ते सर्वांनी करून घ्यावे, असा संदेश या आजींनी दिला आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यात घुईखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बोरी हे उपकेंद्र आहे. बोरी उपकेंद्रांतर्गत वाई बोथ हे गाव आहे. तिथे या आजी राहतात. पार्वतीबाई महादेवराव डवरे असे त्यांचे नाव असून, त्यांचा जन्म १९१९ मधील आहे.  आजमितीला १०२ वर्षांहून अधिक वय असलेल्या आजीबाईंचे यशस्वी लसीकरण घुईखेड पीएचसीच्या आरोग्य पथकाने केले, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका निकोसे यांनी दिली. आरोग्य पथकात राजेश जुमडे, कुंदा वानखडे आदींचा समावेश होता.

कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी आरोग्य पथके पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरणाला गती देत आहेत. ज्येष्ठ, दिव्यांग व्यक्ती यांचे घरी पोहोचून लसीकरण करण्यात येत आहे. यापुढेही अशीच गती कायम ठेवून लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

0000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मेळघाटात ‘मनरेगा’अंतर्गत निधी प्राप्त; मजुरांना तत्काळ वाटप सुरू पालकमंत्र्यांकडून पाठपुराव्याने प्रशासन गतिमान

 


मेळघाटात ‘मनरेगा’अंतर्गत निधी प्राप्त; मजुरांना तत्काळ वाटप सुरू

पालकमंत्र्यांकडून पाठपुराव्याने प्रशासन गतिमान

 

       अमरावती, दि. 24 : ‘मनरेगा’अंतर्गत काम करणा-या मजुरांना वेळेत वेतन न मिळाल्याच्या तक्रारीची दखल घेऊन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे हा निधी तातडीने उपलब्ध होऊन वेतनाचे वाटपही सुरू झाले आहे. मनरेगाच्या कामांमध्ये अमरावती जिल्हा सुरुवातीपासून आघाडीवर असून, मोठी रोजगारनिर्मिती व विकासकामेही त्याद्वारे होत आहेत. त्यामुळे मजुर बांधवांना वेतन आदी प्रक्रिया नियमित व्हावी यासाठी प्रशासनाने सजग राहून कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 

       मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून आदिवासी बांधव कामाच्या शोधात स्थलांतरित होतात. हे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाअंतर्गत कामे राबवली जातात. स्थानिक स्तरावर मनरेगात रोजगारनिर्मितीची शक्यता व विविध विकासकामांना चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यात व्यापक नियोजन करण्यात आले आहे. विशेषत: कोरोनाकाळात मेळघाटात मोठ्या प्रमाणावर कामे राबविण्यात आली. त्यामुळे मोठी रोजगारनिर्मिती होऊन अमरावती जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया व्यापक करतानाच निधीही वेळोवेळी प्राप्त होण्यासाठी प्रशासनाने नियमित पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. मनरेगाअंतर्गत निधी प्राप्त होऊन मजुरांच्या खात्यात वेतन जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी दिली.

 

       मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देण्यात आली. त्यातून जलसंधारण, इमारत बांधकाम, रस्तेदुरुस्ती अशी अनेक कामे अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मेळघाटातही स्थलांतर रोखण्यासाठी व स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीसाठी व्यापक स्वरूपात कामे करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार कामांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 

                        ०००

 

 

तिवसा मतदारसंघातील रस्त्यांसाठी विधीमंडळ अधिवेशनात 17 कोटी निधी मंजूर पालकमंत्र्यांचा पाठपुरावा

 


तिवसा मतदारसंघातील रस्त्यांसाठी विधीमंडळ अधिवेशनात 17 कोटी निधी मंजूर

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा

दळणवळणाच्या सुविधा अधिक बळकट होणार

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

     अमरावती, दि. 24 : तिवसा मतदारसंघातील वलगाव- चांदुर बाजार, यावली- व-हा यासह विविध महत्वाच्या रस्त्यांच्या सुधारणांसाठी 17 कोटी रूपयांचा निधी विधीमंडळ अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर झाला आहे. त्यामुळे महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण होऊन विकासाला गती मिळेल. दळणवळणाच्या सुविधा अधिक बळकट करण्यासाठी यापुढेही आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.

 

      भक्कम पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी पालकमंत्री ॲड. ठाकूर सातत्याने प्रयत्नरत आहेत. त्यानुसार अनेक ठिकाणी निर्माणकार्य सुरू असून, आवश्यक निधीसाठी पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह शासन स्तरावर पाठपुरावा होत आहे. त्यानुसार तिवसा मतदारसंघातील महत्वाच्या रस्त्यांसाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे निधी मंजूर करण्यात आला.

 

     राज्य महामार्ग क्र. २९८ वलगाव- चांदूर बाजार रस्त्याची सुधारणा करण्यासाठी आठ कोटी निधी मंजूर झाला आहे. तिवसा तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. 308 यावली, डवरगाव, मोझरी, व-हा रस्त्याची मजबुतीकरणासह सुधारणा करण्यासाठी एक कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे. राज्य महामार्ग 308 वरील अंजनगाव काकडा, रामा साऊर, शिराळा, मोझरी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 3 कोटी रूपये, तसेच राज्य महामार्ग 303 येथील अडगाव यावली, पिंपळविहिर, कारला, रामा या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 5 कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

     अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. निधीअभावी कुठलेही काम खोळंबू नये म्हणून सातत्याने पाठपुरावा होत आहे. अधिवेशनात महत्वाच्या रस्त्याच्या कामांना निधी मंजूर झाल्याने ही कामे गती घेतील. चांगले रस्ते निर्माण झाल्याने दळणवळणाची भक्कम सुविधा निर्माण होऊन विकासाला गती मिळेल. यापुढेही आवश्यक त्या कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

 

 

 

०००

 

Thursday, December 23, 2021

दिव्यांग बांधवांची तपासणी व आवश्यक साहित्याचे विनामूल्य वाटप - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


 

सेवा माह’ जनजागरण अभियानातून गरजूंना आवश्यक सेवा- सुविधा

दिव्यांग बांधवांची तपासणी व आवश्यक साहित्याचे विनामूल्य वाटप

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 23 : केंद्रिय दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग व मोझरी येथील श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेतर्फे विविध तालुक्यांतील दिव्यांग बांधवांची तपासणी शिबिरे ठिकठिकाणी घेण्यात येत आहेत.  तपासणीनंतर दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.

 

आवश्यक संपूर्ण खर्च आपण स्वत: करणार : पालकमंत्री

 

दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग व श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेतर्फे लोकनेते स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त 28 जानेवारीपर्यंत संपूर्ण महिना ‘सेवा माह’ म्हणून व जनजागरण अभियान साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार ‘एडिप’ योजनेत दिव्यांग बंधूभगिनींना पहिल्या टप्प्यात तपासणी व दुस-या टप्प्यात उपकरण व आवश्यक साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. योजनेत अनुदानाव्यतिरिक्त लाभार्थ्याने भरावयाचा हिस्सा आपण स्वत: भरणार आहोत. त्यामुळे दिव्यांग बांधवांना कुठलाही खर्च लागणार नाही. गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक त्या सर्व सेवा, सुविधा मिळवून देण्याचा आमचा निर्धार आहे, असे पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

 

शिबिरांना सुरूवात; तज्ज्ञांचे पथक दाखल

 

दिव्यांगजन तपासणी शिबिरांना मंगळवारपासून (21 डिसेंबर) सुरुवात झाली असून, तपासण्यांसाठी दिल्ली येथून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दाखल झाले आहे.  मोर्शी तालुक्यात पहिले शिबिर लेहगाव येथे घेण्यात आले. त्यात 447 दिव्यांगजनांची तपासणी झाली. दिव्यांगांना लागणा-या आवश्यक उपकरणांसाठी मोजमाप घेण्यात आले. पहिल्या शिबिरातील तपासणीत 327 दिव्यांगांना उपकरणांची गरज असल्याचे आढळले. त्यांना ती विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतील. भातकुली तालुक्यात सिकची रिसॉर्ट येथे 498 दिव्यांगजनांची तपासणी झाली. तपासणीनंतर गरजू 352 दिव्यांगजनांना विनामूल्य उपकरणे दिली जातील. अमरावती तालुक्यासाठी क्षितिज मंगल कार्यालयात शिबिर झाले. तिवसा तालुक्यात मोझरी येथे बहुउद्देशीय सभागृहात शुक्रवारी तपासणी शिबिर होणार आहे.   शिबिरांत नोंदणीकृत, तसेच नोंदणी नसलेल्या दिव्यांगजनांनाही लाभ मिळवून देण्यात येत आहे.

 

गरजेनुसार उपकरणे मिळणार

 

दिव्यांग बांधवांच्या तपासणीनंतर त्यांच्या गरजेनुसार मोजमाप घेऊन आवश्यक ट्रायसिकल, कॅलिपर्स, फूट, श्रवणयंत्र, स्टिक आदी साहित्य विनामूल्य देण्यात येणार आहे. याचबरोबर, ‘सेवा माह’ उपक्रमात नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, प्रशासनविषयक विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी शिबिरे आदींचेही आयोजन करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

 

00000

Wednesday, December 22, 2021

मोहिमेत टक्का वाढला, धडाडी कायम राखून उद्दिष्ट पूर्ण करावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर




जिल्ह्यात प्रतिदिवस लसीकरण 12 हजारांवर लसीकरण

मोहिमेत टक्का वाढला, धडाडी कायम राखून उद्दिष्ट पूर्ण करावे

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 12 : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष मोहिम राबवल्यानंतरही लसीकरणाचा वेग कायम राखण्यात आरोग्य पथकांना यश मिळाले आहे. जिल्ह्यात प्रतिदिवस सुमारे 12 हजारहून अधिक व्यक्तीचे लसीकरण होत असून, जिल्ह्यात एकूण 27 लक्ष 40 हजार लसीकरण झाले आहे.

 

एकूण लसीकरणात प्रथम मात्रा घेतलेल्या व्यक्तींची संख्या 18 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. दुसरी मात्रा घेतलेल्या व्यक्तींची संख्या सव्वानऊ लाखांपर्यंत पोहोचली आहे. दुस-या मात्रेचे लसीकरण वाढविण्यासाठी वेळोवेळी संबंधितांकडे फॉलोअप घेणे व विहित वेळेत लसीकरण पूर्ण आवश्यक आहे. लसीकरणातून आरोग्याचे संरक्षण होते. आपण नववर्षाच्या उंबरठ्यावर असताना निरामय सार्वजनिक आरोग्यासाठी लसीकरणाचे हे कार्य याच धडाडीने पूर्ण करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

 जिल्ह्यातील अनेक गावांत शंभर टक्के लसीकरण झाले आहे. अशा गावांची संख्या वाढली पाहिजे. 31 डिसेंबरपर्यंत पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. मोहिमेत ज्या धडाडीने काम केले, तीच धडाडी यापुढेही कायम राखण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

                        ०००

 

 

 

 

 

 

 


'थर्टी फर्स्ट'ला शहरात अनुचित प्रकार रोखण्यासाठी विशेष मोहिम - पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह

 


'थर्टी फर्स्ट'ला शहरात अनुचित प्रकार रोखण्यासाठी विशेष मोहिम

- पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह

 

            अमरावती, दि. 22 : नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली नशेत बेदरकारपणे गाड्या चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. 'थर्टी फर्स्ट'ला शहरात अनुचित प्रकार रोखण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिले आहेत.

 

तळीरामांवर होणार कारवाई

 

 ‘थर्टी फर्स्ट’चा उत्सव साजरा करताना बेधुंद वर्तणूक, नशेत बेदरकारपणे गाड्या चालविण्याचे प्रकार घडत असतात.  अनेक नागरिक विशेषत: तरूण वर्ग मद्यप्राशन करून वाहनासह रस्त्यावर येतात. अनेकजण अतिउत्साहात स्टंट रायडिंग करतात. अशावेळी अपघात घडून जिवितहानी व मालमत्तेचे नुकसान झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ प्रतिबंधासाठी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

 

प्रमुख चौकात नाकाबंदी करा

 

            शहराच्या प्रमुख चौकात, तसेच पोलीस ठाणे हद्दीतील आवश्यक ठिकाणी बॅरिकेटस् लावून नाकाबंदी मोहिम राबवावी. स्टंट रायडिंग, भरधाव वेगाने गाडी चालवणा-यांवर कारवाई करावी. अतिवेगाने वाहन चालविणा-यांव कारवाई करताना इंटरसेप्टर वाहनाचा उपयोग करावा. आकस्मिक वाहन तपासणी मोहिम राबवून विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

 

आतषबाजीची वेळ निश्चित

 

ऑनलाईन ई-कॉमर्स फटाक्यांवर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. नाताळ अर्थात 25 डिसेंबरला व नववर्ष उत्सव अर्थात 31 डिसेंबरला फटाके फोडण्याची वेळ रात्री 11.55 ते रात्री 12.30 पर्यंत अशी निश्चित करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी या वेळेचे व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. सिंह यांनी केले आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट शासनाकडून वेळेवर प्राप्त आदेशानुसार निर्धारित वेळेत सुरू राहतील. ते या वेळेनंतर सुरू राहिल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

00000

 

 

 

 

जिल्ह्यात विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 




पालकमंत्र्यांचा पाठपुरावा

हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यासाठी मोठा निधी मंजूर होण्याचे संकेत

‘व्हीएमव्ही’साठी 10 कोटी; स्त्री रूग्णालयासाठी साडेचार कोटी मिळणार

जिल्ह्यात विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

         

मुंबई, दि. 22 : शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, जिल्हा स्त्री रूग्णालयासह विविध कामांसाठी हिवाळी अधिवेशनातून सुमारे 15 कोटी रूपयांचा निधी मंजूर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधांसाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. 

 

            स्त्री रूग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या नियोजित कामाबरोबरच विविध विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर सातत्याने प्रयत्नरत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध स्तरावर त्यांच्याकडून पाठपुरावा होत आहे. त्यानुसार जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी चार कोटी 56 लाख रूपये व अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांसाठी 10 कोटी रूपये एवढा निधी अधिवेशनात मंजूर होण्याचे संकेत मिळाले आहेत.         वित्त विभागाने दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या खर्चाचे पूरक विवरण पत्र २०२१-२०२२ मध्ये सदर बाब अधोरेखित करण्यात आली आहे. हा निधी लवकरच उपलब्ध  होणार असल्याने मंत्री ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांचे आभार मानले आहेत. 

 

 

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार

 

कोविडकाळात आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी स्त्री रूग्णालयाच्या विस्तारीकरणासह ग्रामीण भागातही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती, सुविधांची उभारणीसाठी नियोजन करण्यात आले. त्यानुसार अनेक कामे सुरूही झाली आहेत. स्त्री रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबत आरोग्यमंत्री  राजेश टोपे यांना पत्र लिहून निधी मंजूरीसाठी विनंती केली होती. त्यानुसार केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. विस्तारित इमारतीमुळे स्त्री रूग्णालयाची क्षमता वाढून जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा दर्जा उंचावेल, असा विश्वास पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

 

           शासकीय ज्ञान विज्ञान विदर्भ महाविद्यालयाची शतकपूर्ती, तेथील विस्तीर्ण परिसर, संशोधनाची परंपरा या पार्श्वभूमीवर आवश्यक नव्या सुविधा लक्षात घेता निधी मिळण्यासाठी मंत्री ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यानुसार उच्च शिक्षणाशी संलग्नित प्रगत अभ्यासक्रम तसेच अद्ययावत अभ्यासिका व आंतरराष्ट्रीय दर्जाची ई-लायब्ररी साकारण्याचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी अद्ययावत क्रिकेटचे मैदान, तसेच धावनपथसुद्धा निर्माण करण्याचे नियोजन असून, या सुविधांसाठी सुमारे 50 कोटी निधी आवश्यक असल्याची बाब मंत्री ॲड. ठाकूर यांनी श्री. पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार मागील अर्थसंकल्पीय भाषणात नाविन्यपूर्ण शैक्षणीक उपक्रम  व पायाभूत सुविधा निर्मितीसाठी पहिल्या टप्प्यात  10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली होती आणि आता 10 कोटींचा निधी मंजूर होणार असून एकूण 20 कोटीचा निधी  शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या विकासावर खर्च करण्याचे नियोजन आहे. 

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...