Friday, October 7, 2022

अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करावी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 








अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक

कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करावी

-  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

अमरावती, दि. 7 (विमाका): जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणारी कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्वक व्हावी. निधी संपूर्णपणे खर्ची पडावा. त्यासाठी आवश्यक मान्यता आदी प्रक्रिया गतीने प्रक्रिया पूर्ण करावी. कामाच्या गुणवत्तेबाबत कुठलीही तडतोड सहन केली जाणार नाही, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार डॉ. रणजीत पाटील, आमदार बच्चूभाऊ कडू, आमदार रवी राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, आमदार बळवंत वानखेडे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार किरण सरनाईक, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विकासकामांच्या प्रशासकीय, तांत्रिक मान्यता आदी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करुन कामांना वेग द्यावा. सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. कामे गुणवत्तापूर्ण असावीत. कामांच्या दर्जात तडजोड खपवून घेणार नाही. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी नवीन हेड तयार करण्यात येईल. अमरावती विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. नाईट लँडिंगची सुविधा आधी पूर्ण करावी. विमानतळ धावपट्टीची लांबी 2 हजार 300 मीटर करण्यासाठी प्रस्ताव देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, चिखलदरा येथील ‘स्काय वॉकला स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डाने मान्यता दिली असून केंद्राच्या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात येईल. मेळघाटातील वीज न पोहोचलेल्या 24 गावांना वीज मिळण्यासाठी गतीने हालचाली कराव्यात. याबाबतची परवानगी, आराखडा आदी तांत्रिक प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

 

मुख्यमंत्री सौर कृषी योजना पुन्हा सुरू करण्यात आली असून, सर्व कृषी फीडर सौर ऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न आहे. यासाठी आवश्यक शासकीय जमीन जिल्हाधिकारी हस्तांतरीत करू शकतील किंवा ती उपलब्ध नसल्यास भाडेपट्ट्याने मिळवता येईल. त्याद्वारे जमीनधारक शेतकरी बांधवानाही उत्पन्न मिळेल. त्याचप्रमाणे, शेतीला 12 तास वीज मिळेल. या योजनेद्वारे 2 वर्षांत 4 हजार मे. वॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. राज्यात यंदा 2 लक्ष सौरपंप वितरीत करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार विविध विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्यात येईल. प्रधानमंत्री आवास योजनेतील कामांना गती मिळण्यासाठी आवश्यक निधी लवकरच दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अमरावती महापालिकेने मिळकत करात केलेली वाढ स्थगित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महापालिकेने एकाचवेळी करात वाढ करणे जाचक ठरणारे आहे. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती द्यावी. करनिश्चिती न झालेल्या अनेक  मिळकती आहेत. त्यावरील कर निश्चित करून तो आधी वसूल करावा. जेणेकरून महापालिकेचे उत्पन्न वाढेल आणि   करवाढीची गरज पडणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण योजनेत 350 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेत 101 कोटी 20 लक्ष रुपये, आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 96 कोटी 55 लक्ष 17 हजार मंजूर नियतव्यय व अर्थसंकल्पीय तरतुद आहे. त्यानुसार नियोजित कामे विहीत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सप्टेंबर अखेर झालेल्या 7 कोटी 40 लक्ष खर्चाला मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी श्रीमती. कौर यांनी विकास कामांविषयी सादरीकरण केले. बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

 

00000

 

 

 

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती येथे आगमन

 





उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती येथे आगमन

अमरावती दि.७ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज येथील  बेलोरा विमानतळावर आगमन झाले. उपमुख्यमंत्र्यांच्या आगमनप्रसंगी  आमदार प्रवीण पोटे पाटील,आमदार रणजीत पाटील, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्यासह जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी स्वागत केले. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी आदी यावेळी उपस्थित होते.

000000

Thursday, October 6, 2022

महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेतील सादरीकरणाचा टप्पा यशस्वी करा जिल्हाधिकारी पवनीत कौर







 

महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेतील सादरीकरणाचा टप्पा यशस्वी करा

जिल्हाधिकारी पवनीत कौर

      अमरावती, दि. 6 : नव उद्योजकांच्या अभिनव संकल्पनांना मूर्तरूप मिळून उद्योजकतेचा विकास व्हावा या हेतूने महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा 2022 अंतर्गत‍ जिल्हा प्रशिक्षण व सादरीकरण स्पर्धा 14 ऑक्टोबरला होणार आहे. सर्व विभागांनी मिळून समन्वयाने हा उपक्रम यशस्वी करावा असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

            कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. कौशल्य विकास व रोजगार उपायुक्त सु.रा.काळबांडे, सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी के.एस. विसाळे, लीड बँक व्यवस्थापक जे. के. झा, 'आत्मा'च्या अर्चना निस्ताने, 'उमेद'चे सचिन देशमुख, डॉ. स्वाती शेरेकर आदी उपस्थित होते.

            जिल्ह्यातील उत्तमोत्तम संकल्पना राज्य पातळीवर पोहचून त्यांना यश मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावे. यात्रेचा प्रचार व प्रबोधानाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा होणार आहे. त्यात अधिकाधिक संकल्पनांचा समावेश व्हावा. सादरीकरणाबाबत संबंधितांना चांगले प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

            स्पर्धेत जिल्हास्तरावर अनुक्रमे 25 हजार, 15 हजार व 10 हजार अशी पहिली 3 बक्षिसे देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावरील स्पर्धेत कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलीटी, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा व इतर क्षेत्राबाबत संकल्पना प्रकल्पांची निवड करण्यात येणार आहे. या प्रत्येक क्षेत्रासाठी पहिले पारितोषिक 1 लाख व दुसरे 75 हजार रुपये आहे तसेच सर्वेात्कृष्ट महिला उद्योजिका यांना 1 लाख रुपये देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. शेळके यांनी दिली.

0000

सेवा पंधरवड्यानिमित्त शासकीय वसतिगृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन

 सेवा पंधरवड्यानिमित्त शासकीय वसतिगृहात

 विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

अमरावती, दि. 6: चांदूररेल्वे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व मुलांचे शासकीय वसतिगृहात दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत सेवा पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, पथनाट्याव्दारे जनजागृतीसह मुक-बधिर विद्यालयात फळवाटप, नशामुक्त भारत अभियानांतर्गत निबंध, चित्रकला स्पर्धा, आरोग्य तपासणी, आरोग्य व आहारविषयक मार्गदर्शकपर कार्यशाळा, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्याऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले. अशी माहिती चांदूररेल्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय व मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी दिली.

0000

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम

 जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त

जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम


     अमरावती, दि. 6 : जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त 4 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी मानसिक विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयामध्ये मानसिक आरोग्य सप्ताहाचे उद्घाटन व जनजागृती कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, प्रमुख मार्गदर्शक मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने होते. प्रमोद निरवणे व डॉ. अमोल गुल्हाने यांनी उपस्थित रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना मानसिक आजार, त्याची लक्षणे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच रुग्णांचे नातेवाईकांच्या प्रश्नांचे निराकरण केले. 

     परिचारिका श्रीमती पेंदाम, सुनील कळतकर, सायली डंभे, भावना पुरोहित, श्रध्दा हरकंचे, नदीम पठाण, शुभम झळके यांनी कार्यक्रमासाठी सहाय्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रमोद भक्ते यांनी मानले. रूग्ण व रूग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते. 

00000

Friday, September 30, 2022

सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा विभागीय आयुक्ताच्या हस्ते सामाजिक संस्थांचा गौरव





 सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा

विभागीय आयुक्ताच्या हस्ते सामाजिक संस्थांचा गौरव

 

अमरावती दि.30 (विमाका) : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणा-या सामाजिक संस्थांचा सत्कार विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे  यांच्या हस्ते आज करण्यात आला.

साईनगरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. डॉ.स्वप्निल दुधाट, प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे उपस्थित होते. अनेक वर्षापासून निराधार, निराश्रीत ज्येष्ठ नागरीकांचा सांभाळ करणा-या अनुदानित वृध्दाश्रमांचे अध्यक्ष व सचिवांना गौरविण्यात आले. विभागातील पाचही जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नागरीक समन्वय समितीचे अध्यक्ष व सचिव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ नागरीक हे समाजाचे ख-या अर्थाने मार्गदर्शक आहेत. सर्वांनी सकारात्मकता बाळगून उत्साही राहावे. सकारात्मकतेने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते असे डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले. श्री. वारे यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. 

 डॉ. दुधाट यांनी वाढत्या वयामुळे ज्येष्ठ नागरीकांना उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्यांवर मार्गदर्शन केले. जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा समालकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी आभार मानले.  

सहायक आयुक्त माया केदार, प. विदर्भ समन्वय समितीचे श्री. पिंपरकर, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रामकृष्ण कवाने व सर्व पदाधिकारी, सदस्य, वृध्दाश्रमाचे पदाधिकारी, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

 

नवरात्रौत्सवानिमित्त शनिवारी ध्वनीक्षेपक वापराबाबत सवलत

 

नवरात्रौत्सवानिमित्त शनिवारी ध्वनीक्षेपक वापराबाबत सवलत

 

            अमरावती, दि. 30 : नवरात्रौनिमित्त शनिवारी (1 ऑक्टोबर) ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजतापासून रात्री 12 वाजतापर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

 

तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांच्या मान्यतेने अप्पर जिल्हा दंडाधिकारी विवेक घोडके यांनी आज जारी केला. ही सवलत राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात लागू होणार नाही व ध्वनीमर्यादेचे पालन करणे बंधनकारक आहे. आदेशानुसार, दि. 1 ऑक्टोबर रोजी सभागृहे, मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वापरासाठी सवलत देण्यात आली आहे.

 

अधिसूचनेची अंमलबजावणी होण्यासाठी ध्वनी प्राधिकरण, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. वर्षातील 14 दिवसांसाठी अशा प्रकारची सवलत यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती.

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...