Wednesday, November 9, 2022

उठ तरूणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांच्या सहभागासह सायकल रॅलीद्वारे मतदार जनजागृती

 

उठ तरूणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो

विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांच्या सहभागासह सायकल रॅलीद्वारे मतदार जनजागृती

 

 














अमरावती, दि. ९ : मतदार जागृतीसाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांच्या सहभागात आज शहरात उत्साहपूर्ण वातावरणात सायकल रॅली काढण्यात आली.मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात निरंतर मतदार नोंदणीच्या अनुषंगाने बुधवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने याचदिवशी सकाळी शहरात सायकल रॅलीचा उपक्रम राबविण्यात आला. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीला हिरवी झेंडी शुभारंभ करण्यात आला.

रॅलीच्या अग्रस्थानी मतदार जागृतीच्या संदेशाने सुशोभित चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांसह अनेक अधिकारी, अमरावती सायकलिंग असोसिएशन, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी- विद्यार्थिनींनी रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

‘उठ तरूणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणांनी वातावरणात उत्साह निर्माण केला.  ‘ओ भाऊ, मी मतदार नोंदणी केली तुमी पण मतदार नोंदणी करा’ असे संदेशफलक घेऊन सहभागींनी शहरभर जनजागृती केली.  जिल्हाधिकारी कार्यालय येथून एस. बी. आय. चौक, वेलकम पॉईंट, पंचवटी चौक, इर्विन चौक, रेल्वेस्थानक चौक, बसस्थानक, सुंदरलाल चौक मार्गे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. 

मतदारांना मतदार नोंदणीचे महत्व कळावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.  ताणतणावाच्या व धावपळीच्या आजच्या युगात सायकलिंग निरामय आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे मतदार जागृतीबरोबरच फिटनेस व आरोग्य जागृतीचा संदेशही या रॅलीतून साधला गेला, असे विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.

 

अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे, तहसीलदार संतोष काकडे, विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, जिल्हा न. प. प्रशासन अधिकारी गीता वंजारी, नायब तहसीलदार श्याम देशमुख, अरविंद माळवे, अमरावती सायकलिंग असोसिएशनचे श्री. कुलकर्णी, श्री. कळमकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी, प्रा. डॉ. श्रीकांत पाटील, अमित चेडे, चंदू धकिते, आशिष ढवळे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

000

Tuesday, November 8, 2022

माझा एक दिवस बळीराजासाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा शेतकरी बांधवांशी संवाद

 















माझा एक दिवस बळीराजासाठी

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा शेतकरी बांधवांशी संवाद

 

अमरावती, दि. ७ : कृषी विभागाच्या माझा एक दिवस बळीराजा या उपक्रमात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी देवरा येथे शेतकरी बांधवाच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी आज संवाद साधला. देवरा येथील शेतकरी बांधवांच्या अडचणी  जाणून त्यांचे तत्काळ निराकरण करण्याबाबत निर्देश त्यांनी यावेळी दिले.

उपक्रमात अशोकराव कडू यांच्या घरी भेट देऊन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी त्यांच्याशी कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना येणा-या अडचणी जाणून घेतल्या, तसेच, पीकपद्धती, उत्पन्न, पशुधन आदी बाबींची माहिती घेतली. शेतकरी बांधवांना येणा-या अडचणींचा तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या वनराई बंधा-याचे जलपूजन जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाले. तसेच बीजप्रक्रियेबाबत शेतकरी बांधवांना माहिती देण्यासाठी यंत्राद्वारे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

 गावाच्या सरपंच मनीषाताई वरघट, उपसरपंच गजाननराव देशमुख, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जोशी,  जिल्हा कृषी विकास अधिकारी गोपाळराव देशमुख, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, कृषी विज्ञान केंद्राचे श्री. कळसकर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गावातील सभागृहात जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी शेतकरी बांधवांशी बोलताना श्रीमती कौर म्हणाल्या की, शेतमालाची साठवणूक करण्यासाठी गावात गोदाम निर्माण करण्याची मागणी होत आहे. देवरा हे गाव पोकरा योजनेत समाविष्ट नाही. त्यामुळे मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. गावानजिक पेढी नदीचे आवश्यक तिथे खोलीकरण करण्याच्या कामालाही गती देण्यात येईल, तसेच कायमस्वरूपी बंधाराही निर्माण करण्यात येईल. अवजार बँकेसारखे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. गावक-यांच्या मागणीनुसार रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

खारपाणपट्ट्यातील तूर व हरभरा डाळ वैशिष्ट्यपूर्ण असून, त्याचे ब्रँडिंग करण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न होत आहेत. विविध योजनांद्वारे गावात कृषी प्रक्रिया उद्योग सुरू होण्यासाठी शेतकरी बांधवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. खर्चान यांनी केले. उपविभागीय कृषी अधिकारी माणिक त्र्यंबके यांनी प्रास्ताविक केले. तंत्र व्यवस्थापक रूपाली चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

 

00000

Friday, November 4, 2022

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रवेश घेण्याऱ्यांसाठी सूचना

 महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या

इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रवेश घेण्याऱ्यांसाठी सूचना

 

                अमरावती दि.4 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या व मे-जून 2023 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दि. 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 (रात्री 11.59 वाजेपर्यत) या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत.

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. दि. 7 नोव्हेंबर (रात्री 11.59 वाजेपर्यंत) पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांनी दि. 10 नोव्हेंबरपर्यंत मुळ अर्ज, विहित शुल्क व मुळ कागदपत्रे अर्जामध्ये नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे. तसेच दि. 18 नोव्हेंबपर्यंत संबंधित संपर्क केंद्र असलेल्या शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क व मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात सादर करावे.

उपरोक्त माहितीच्या अनुषंगाने सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-scc.ac.in या संकेतस्थळाचा उपयोग करावा. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्यासंबंधीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव उल्हास गरड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती आणि मतदार नोंदणी करा पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमास मुदतवाढ

 



अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

 

9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती आणि मतदार नोंदणी करा

 

पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमास मुदतवाढ

 

अमरावती, दि. 4 : भारत निवडणूक आयोगाच्या दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याच्या कार्यक्रमांतर्गत दि. 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत दावे स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.

तथापि, याच कार्यक्रमांतर्गत दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी झाल्यानंतर  दि. 23 नोव्हेंबर 2022 ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून या काळामध्ये सुध्दा पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी करता येणार आहे.

           दि. 30 डिसेंबर 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरही, निरंतर मतदार नोंदणी             ( Continuous Updation) निवडणूकीसाठी उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणी करता येईल. त्यानुसार सर्व पात्र पदवीधर मतदारांनी उक्त कालावधीमध्ये मतदार नोंदणी करावी, असे विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी कळविले आहे.

Thursday, November 3, 2022

विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन सुरू













 विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन सुरू

विचारसमृद्धीसाठी तरूणांनी वाचनाकडे वळावे

-  उपायुक्त संजय पवार

 

अमरावती, दि. 3 : वाचनातून आकलनशक्ती वृद्धिंगत होऊन विचारांना स्थैर्य मिळते. त्यामुळे केवळ स्मार्ट फोनवर वेळ न घालवता पुस्तकांचे वाचनही तरूण पिढीने नियमितपणे करावे, असे प्रतिपादन विभागीय उपायुक्त संजय पवार यांनी आज येथे केले.

 

विभागीय ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन उद्या दि. 4 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

 

ग्रंथालयाला भेट देणे हे आपल्यासाठी कायम आनंददायी असल्याचे सांगून उपायुक्त श्री. पवार म्हणाले की, वाचनाचा ठेवा माणसाला लहानपणापासून शेवटपर्यंत साथ देतो. पुस्तकांचा परिणाम सकारात्मक असतो. स्मार्ट फोनच्या युगातही वाचनाची परंपरा टिकून राहणे आवश्यक आहे. विचारांची बैठक घडविण्यासाठी वाचन आवश्यक असते. 

 

 सहायक आयुक्त श्री. म्हस्के म्हणाले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी मूलभूत संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकांसारखी अभ्यास साधने उपयुक्त असतात. विविध क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे वाचल्याने त्यांच्या जीवनसंघर्षाचे, कार्याचे आकलन होते व प्रेरणा मिळते. संवेदनशील मन घडविण्याची ताकद पुस्तकांत असते.

 

प्रदर्शनात राज्यातील महत्वाच्या 200 दिवाळी अंकांचा समावेश असल्याचे श्री. मडावी यांनी सांगितले. प्रदर्शनाला अमरावतीकर रसिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन श्री. ढोणे यांनी केले.

 

०००

 

शनिवार व रविवार सुध्दा सुरू राहणार पदवीधर मतदार नोंदणी

 



शनिवार व रविवार सुध्दा सुरू राहणार पदवीधर मतदार नोंदणी

 

            अमरावती, दि. 3 : आगामी पदवीधर मतदार संघ निवडणूक-2023 करीता दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर पुर्णत: नविन मतदार यादी तयार करण्याची मोहिम दि. 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत दि. 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमुना 18 (फार्म 18) स्विकारण्यात येत आहे.

            जिल्ह्यातील अधिकाधिक पदवीधरांना मतदार म्हणुन नोंदणी करता यावी या करीता जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी केंद्रावर पदवीधर मतदार नोंदणी शनिवार दि. 5 व रविवार दि. 6 नोव्हेंबर 2022 या  सार्वजनिक सुट्टीचे दिवशी कार्यालयीन वेळेत मतदार नोंदणी फार्म स्विकारण्यात येणार आहे. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. व जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी. तसेच जिल्ह्यातील मतदार नोंदणी केंद्रावर कुठल्याही मतदाराने फार्म क्रमांक 18 भरून दिल्यास तो स्विकारण्यात येईल. याची सुध्दा सर्व मतदारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांनी केले आहे.

00000

नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया 4 नोव्हेंबरपासून

 नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया 4 नोव्हेंबरपासून

 

अमरावती, दि. 3 (जिमाका) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या, नागरी सेवा परीक्षा-2023 (आयएएस,आयपीएस,आयएफएस) विनामुल्य पूर्व प्रशिक्षण  देण्यासाठी ‘भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रा’तील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा राज्यस्तरावरून ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

            ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज दि. 4 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. 25 नोव्हेंबरपर्यंत आहे. प्रवेश परीक्षा दि. 4 डिसेंबर 2022 (ऑफलाईन पध्दतीने) घेण्यात येईल. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहिल.

           परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका डॉ. संगिता पकडे यांनी केले आहे.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...