Tuesday, September 26, 2023

गोरगरिबांना वस्त्रदान करणाचे धर्मदाय विभागाचे आवाहन

                          गोरगरिबांना वस्त्रदान करणाचे धर्मदाय विभागाचे आवाहन

 

            अमरावती, दि. 26: सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेवून अमरावती धर्मादाय विभागाच्या वतीने वस्त्रदान हा गरिबांवर मायेची चादर घालण्याच्या उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नोंदणीकृत मंदीर, सेवाभावी संस्था तसेच नागरिकांनी पुढाकार घेऊन वस्त्रदान करावे, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त संभाजी द. ठाकरे यांनी केले आहे.

समाजातील अनेक घटक आपल्या व्यक्तीगत आयुष्यात दैनंदिन कपडे घालण्याच्या स्थितीत नसतात. अशावेळी आपल्याकडील जुने आणि वापण्यायोग्य कपडे, शाल श्वेटर, ब्लॅकेट, चप्पल जोडे, तसेच ज्यांना शक्य असल्यास नवीन कपडे आणून दिल्यानंतर वस्त्रदान कार्यक्रमात त्यांचे वाटप करण्यात येणार आहे. याकरीता भाविकांकडून अर्पण केलेल्या साड्यापैकी जास्तीत जास्त साड्या तसेच नागरिकांनी इतर वस्त्रे या कार्यालयामध्ये वस्त्रदान वाटप करण्यासाठी पुरवठा करण्यात यावा. या पुण्य कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, म्हाडा भवन, 2 रा माळा, मालटेकडीजवळ टोपे नगर, अमरावती येथे किंवा अधिक्षक विजय सुं. चव्हाण, भ्रमणध्वनी  9371992525 या क्रमांकावर संपर्क साधावा.

000000

धामगाव रेल्वे येथे अमृत कलश यात्रा उत्साहात संपन्न

                         



 

           





 धामगाव रेल्वे येथे अमृत कलश यात्रा उत्साहात संपन्न

अमरावती, दि. 26 (जिमाका): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ (मिट्टी को नमन, विरोंको वंदन) हे अभियान प्रशासनामार्फत सर्वस्तरावर राबविण्यात येत आहे. गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी तसेच या मातृभूमीसाठी झटणारे आणि त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा, यासाठी हे अभियान देशभर राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत सर्व स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांनी योगदान द्यावे व मोठ्या प्रमाणावर जनसहभाग मिळावा, यासाठी नगरपरिषद धामणगाव रेल्वे येथे अमृत कलश यात्रा काढण्यात आली. अमृत कलश यात्रेचा प्रारंभ नगरपरिषद कार्यालयातून झाला. संपूर्ण गावामध्ये फिरुन या यात्रेचा समारोप शहिद भगतसिंग चौक येथे महाराष्ट्र गान, पंचप्रण शपथ व स्वच्छता शपथ घेऊन समारोप करण्यात आला.

अमृत कलश यात्रेत धामणगाव रेल्वे येथील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. येथील सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक व विद्यार्थी या यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनेही चोख बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्था ठेवली. यात्रेतील सहभागी विद्यार्थी व लहानग्यांना सार्वजनिक गणेश मंडळामार्फत खाऊचे वाटप करण्यात आले. येथील अमृत कलश यात्रा यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे धामणगाव रेल्वे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.

*****

Sunday, September 24, 2023

जिल्हाधिकारी यांच्यासोबत आज दिलखुलास संवाद!

 


जिल्हाधिकारी यांच्यासोबत आज दिलखुलास संवाद!

 

      अमरावती , दि २४: राष्ट्रीय पोषण महिन्याचे औचित्य साधून  जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासोबत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. कैलास घोडके उद्या सोमवार, दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता संवाद साधणार आहेत.  जिल्हाधिकारी यांची जडणघडण, अभ्यास करण्याच्या पद्धती, स्पर्धा परीक्षेतील यशमंत्र आणि प्रशासनातील त्यांची तंत्र या विषयावर दिलखुलास संवाद साधणार आहेत.

           राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये  ‘पोषण आणि शिक्षण‘  ही एक महत्त्वपूर्ण बाब असून या अंतर्गत शाळेतील विद्यार्थी, कॉलेजमधील युवक-युवती, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे परीक्षार्थी त्याचबरोबर पालक आणि कर्मचारी यांना मार्गदर्शक होईल, या विषयावर संवाद साधणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील पाचशे शाळा आणि अंगणवाडी केंद्र झूम लिंकद्वारे सहभागी होणार आहेत . तर उर्वरित शाळा आणि जे इच्छुक आहेत ते  या https://youtube.com/live/_HgOQSS9T6s?feature=share युट्युब लिंक द्वारे सहभागी होऊ शकतात.

      जास्तीत जास्त अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांनी यामध्ये सहभागी व्हावे ,असे आवाहन डॉ.कैलास घोडके यांनी केले आहे.

00000

Thursday, September 21, 2023

भातकुली तालुक्यातील विविध कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

 







भातकुली तालुक्यातील विविध कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

            अमरावती, दि. 21 : भातकुली तालुक्यातील विविध ठिकाणच्या विकास कामाची पाहणी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज केली. यावेळी भातकुली तहसिल कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेऊन प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश श्री. कटियार यांनी दिले.

            औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भातकुली येथे आयोजित शिबिराला जिल्हाधिकारी श्री.कटियार यांनी भेट दिली. यावेळी मतदान नोंदणी अधिकाऱ्यांनी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन नवमतदारांची नोंदणी करुन घ्यावी. तसेच नवमतदारांनेही पुढाकार घेऊन मतदान नोंदणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनतर भातकुली ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेबाबत चौकशी करुन रुग्णांना उत्तम सेवा देण्याचे निर्देश श्री. कटियार यांनी दिले.

            दौऱ्यादरम्यान खोलापूर व भातकुली सब स्टेशनला भेट देऊन पाहणी केली. त्यांनतर मौजा खारतळेगाव व नांदेड खु. येथे करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचे भेट देऊन पाहणी केली. खोलापूर येथील ग्राम उत्कृष्ट शेतकरी उत्पादक कृषी अवजार बँक, सांसद आदर्श ग्राम ऋणमोचन, भातकुली नगरपंचायत येथील डंपिंग ग्राऊंडची प्रत्यक्ष पाहणी केली . तसेच येथील वाचनालयाला जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी भेट देऊन पाहणी केली. येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून द्यावी . जेणेकरून विद्यार्थ्यांना गावातच परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यास साहित्य उपलब्ध होईल, असेही ते यावेळी म्हणाले .

000000

‘राष्ट्रीय पोषण माह’निमित्त आहार प्रदर्शन

 









‘राष्ट्रीय पोषण माहनिमित्त आहार प्रदर्शन

           अमरावती दि.21 : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत दि. 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत ‘राष्ट्रीय पोषण माह 2023’ राबविण्यात येत  आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे आहार प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे  यांनी केले.

            जिल्हा शल्य चिकित्सक श्री. सौंदळे म्हणाले की, शारिरीक सदृढ राहण्यासाठी योग्य पद्धतीचा  आहार असणे आवश्यक आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे आहारामध्ये होत असलेल्या बदलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे सर्वानी योग्य व समतोल आहाराचे सेवन करणे काळाजी गरज असून या पोषण माह सप्ताहानिमित्त आहाराचे महत्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

            आहार प्रदर्शनीमध्ये फळ, भाज्या, तृणधान्य, विविध पाककृती यांची आरोग्य विषयक माहिती देऊन जनजागृतीपर पोस्टरव्दारे माहिती देण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. प्रिती मोरे, आहार विभागाचे आहारतज्ज्ञ डॉ. कविता देशमुख, आरोग्यसेविका ललिता अटळकर आरोग्य परिचारिका शशीकला गेडाम तसेच  वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सेस आदी उपस्थित होते.

00000

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रम जिल्ह्यात 14 अमृत कलशांची निर्मिती

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रम

जिल्ह्यात 14 अमृत कलशांची निर्मिती

 

अमरावती, दि. 21: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमाच्या अनुषंगाने, 'माझी माती माझा देश' अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यातील सर्व 841 ग्रामपंचायती, सर्व 14 पंचायत समिती तसेच सर्व शासकीय कार्यालयामध्ये शासनाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

            दि. 1 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत गावनिहाय मातीचे कलश तयार करण्यात येत असून तालुक्यातील सर्व  गावांमधून माती गोळा करून पंचायत समिती स्तरावर संकलित करण्यात येत आहेत.     तालुक्याचा एक अमृत कलश याप्रमाणे 14 अमृत कलश तयार करण्यात येत आहेत. नुकतेच पंचायत समिती ,वरूड येथे तालुकास्तरावर अमृत कलश तयार करण्यात आला. यामध्ये तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ, स्वच्छता शपथ घेऊन अमृत कलश तयार करण्यात आला.

            जिल्ह्यातील 1023 गावांमधून मिट्टीगान, संगीत, वाद्य वाजवून उत्सवाचे वातावरणात अमृत कलश तयार करण्यासाठी माती गोळा करण्यात आली आहे.  ग्रामपंचायत पिंपरी निपानी, ता. नांदगांव खंडेश्वर येथे आज अमृत कलश तयार करण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. नांदगांव खंडेश्वर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी,  विस्तार अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

            जिल्ह्यात प्रत्येक गावामधून माती गोळा करून तालुकास्तरावर प्रत्येकी एक अमृत कलश तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तालुकास्तरावर  शहीद व वीर यांच्या कुटुंबाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासनाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबवून अमृत कलश तयार करण्यात येत आहेत.

00000

सर्व शासकीय कार्यालयांनी जेम प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

 सर्व शासकीय कार्यालयांनी जेम प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

            अमरावती, दि. 21:  शासकीय कार्यालयामार्फत खरेदी करीत असताना अत्यंत सोप्या व अचूक पध्दतीने  प्रक्रिया पार पाडण्यासाठी गव्हर्मेंट ई -मार्केट प्लेस ( जेम) हे पोर्टल उपलब्ध करून दिले असून त्यास शासनाने मान्यता दिली आहे. या पोर्टलव्दारे शासकीय कार्यालयास आवश्यक वस्तू, सयंत्रे, सेवा खरेदी करण्यासाठीचे जेम पोर्टलचे प्रशिक्षण सोमवार ,दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे.  सर्व शासकीय कार्यालयातील संबंधित खरेदी प्रक्रिया राबविणारे कर्मचारी यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांनी केले आहे .

      या प्रशिक्षणानंतर कार्यालयातील वस्तू, सयंत्रे, सेवा खरेदी प्रक्रिया पार पाडणे सुकर होईल. सद्यस्थितीत जेम पोर्टलवर 69 हजार शासकीय विभाग आणि 64 लाख विक्रेता व सेवा नोंदणीकृत आहे. तसेच संबंधित खरेदीबाबत अटी व शर्ती जेम पोर्टलमध्ये उपलब्ध आहे.  जेम पोर्टलवरून खरेदी करताना काही अडचण असल्यास उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या ई –मेल आयडी dicspo@maharashtra.gov.in व भ्रमणध्वनी क्रमांक 8605728567,9975296286 व मदत कक्ष 8250547255, 7823922501 यांचेशी संपर्क साधावा.

 

00000


अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...