Wednesday, December 20, 2023

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांसाठी

 अनुदान तत्वावर मिनी ट्रॅक्टर; अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 20 (जिमाका):  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना अनुदान तत्वावर  साडेतीन लाख रुपये मर्यादेत किमान 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व रोटाव्हेटर, ट्रेलर मिळण्यासाठी समाजकल्याण कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

योजनेत 90 टक्के शासकीय अनुदान व 10 टक्के स्वयंसहायता बचत गटाचा हिस्सा अशी तरतूद आहे. बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य, तसेच अध्यक्ष, सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत,  गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.  मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांची खरेदी मर्यादा साडेतीन लाख रुपये असेल. या मर्यादेच्या रकमेच्या 10 टक्के (35 हजार रुपये)  स्वहिस्सा गटाने भरल्यावरच उर्वरित 90 टक्के हिस्सा अर्थात कमाल 3.15 लाख रूपये शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. प्राप्त अर्जांचा आढावा घेऊन लॉटरी पद्धतीने सोडत होईल.  यापूर्वी पॉवर टिलरचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

 

इच्छूक गटांनी दि. 29 डिसेंबरपूर्वी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदूर रेल्वे मार्ग, अमरावती येथे संपर्क साधून विहित अर्ज  कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

00000


हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (गजानन तुळशिराम गुडधे)

  हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (गजानन तुळशिराम गुडधे)

 

            अमरावती, दि. 20 (जिमाका):  येथील गजानन तुळशिराम गुडधे(वय 50 वर्षे, रा. लोणटेक) ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद खोलापुरीगेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

गजानन तुळशिराम गुडधे  हे दि. 2 डिसेंबर, 2023 रोजी दुपारी सायंकाळी 6 वाजता त्यांच्या दोन मित्रासह चैत्रभूमि, मुंबई येथे गेले असता तेथून घरी परत आले नाही. तसेच त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता तो बंद असून नातेवाईकाकडे शोध घेतला असता सापडले नाहीत. 

हरविलेली व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी टेंभुणै पोलीस स्टेशन खोलापुरी गेट, पोलीस ठाण्यात (मो. क्र.) 9588467307 वर संपर्क साधावा.

 

00000

 






‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा’;

जिल्ह्यातील नवउद्योजकांसाठी उत्तम संधी -अविश्यांत पंडा

 

अमरावती, दि. 20 (जिमाका):  विद्यार्थ्यांच्या डोक्यात नवनवीन कल्पना असतात. त्यांच्या नवसंकल्पनाना मूर्त रुप मिळवून उद्योग उभारणीकडे वळविण्यासाठी ‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा’ उत्तम संधी आहे. याचा तरुणांनी लाभ घ्यावा. तसेच तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा स्पर्धा नियमित आयोजन करावे. जेणेकरुन नवसंकल्पाना वाव मिळवून उद्योग उभा उभारण्यास पाठबळ मिळेल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

 

नवसंशोधकांना आपल्या नाविन्य पूर्ण संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी नाविन्यता सोसायटी, मुंबई व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावतीमार्फत श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे नुकतेच जिल्हास्तरीय सादरीकरण करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, प्राचार्य डॉ. जी.व्ही.कोरपे, कार्यक्रम संयोजक डॉ. डी. डी. खेडकर, मार्गदर्शन अधिकारी अभिषेक ठाकरे तसेच इतर प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

उपायुक्त दत्तात्रय ठाकरे म्हणाले की, भारताचे पहीले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने ज्याप्रकारे विविध उपाययोजना राबविल्या तेही एक इनोव्हेशनच असल्याबाबतचे उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.

 

 कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतुन युवावर्गामधे उद्योग प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने उद्योजकीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल हिरुळकर यांनी इन्क्युबेशन सेंटरच्या कार्यपध्दतीबाबत माहिती दिली. ई.सी.ई इंडीयाचे संचालक अमित आरोकार यांनी संकल्पना ते उद्योग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर एमआयडीसी असोसीएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी उद्योजकीय क्षमता, विकास या विषयी मार्गदर्शन केले. एम.सी.ई.डीचे विभागीय संचालक प्रदीप इंगळे यांनी यशस्वी उद्योजक व्यक्तिमत्वाचे पैलू काय असतात याबाबत मार्गदर्शन केले.

 

 जिल्हास्तरावर निवड झालेल्या एकूण 11 नवसंशोधकांनी या स्पर्धेमधे आपल्या नवसंकल्पनांचे सादरीकरण केले. या सादरीकरणाचे  ज्युरी मेंबर कडून मूल्यमापन करण्यात आले. त्यापैकी उत्कृष्ट 10 नवसंकल्पानाची निवड करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयाचे बीज भांडवल  महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई याच्यामार्फत देण्यात येणार आहे. तसेच श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती यांनी सुध्दा त्यांच्या महाविद्यालयीन स्तरावर अशी नवसंकल्पना स्पर्धा आयोजीत केली होती. ज्यामधील चार विजेत्यांना महाविद्यालयामार्फत प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा समन्वयक डॉ. रेखा मग्गीरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे यांनी केले.

 

जिल्हास्तरीय सादरीकरणाचे मुल्यमापन करण्यासाठी ज्युरी मेंबरची नियुक्ती राज्यस्तरावरून विविध क्षेत्रनिहाय करण्यात आली होती. त्यामध्ये ज्युरी मेंबर सहायक प्राध्यापक पियुष डालके, सहायक प्राध्यापक अमितकूमार राणीत, सुशील चरपे, प्राध्यापक काशिनाथ बाराहाते, राजेश चव्हाण, रोशन देवतारे, रश्मी हलगे, सहायक नगररचनाकार जुगल मालधुरे, सहायक प्राध्यापक डॉ.शंतनु लोही, राजेश मेटकर, डॉ.निलेश गोटकर, दिनेश चांडक यांचा समावेश आहे. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय व जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

00000

Tuesday, December 19, 2023

ग्रामीण भागात कलम 37(1) व (3) लागू

 

ग्रामीण भागात  कलम 37(1) व (3) लागू

 

           अमरावती, दि. 19 (जिमाका) :  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती  यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 31 डिसेंबर 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी  विवेक घोडके  यांनी कळविले आहे.

00000

जिल्ह्यातील दृष्काळसदृश गावात उपाययोजना लागू

 

जिल्ह्यातील दृष्काळसदृश गावात उपाययोजना लागू

 

अमरावती, दि. 19 (जिमाका):   राज्यातील ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मि.मि. पेक्षा कमी झाला आहे, अशा महसूली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आले आहे. त्यापैकी जिल्ह्यातील 79 महसूली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्यात आला असून त्या ठिकाणी विविध सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जाहिर केले आहे.

          

दि. 10 नोव्हेंबर 2023 शासन निर्णयानुसार बाधित महसूली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केला आहे अशा गावांत दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे पुढीलप्रमाणे आठ प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहे.

 

जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी सवलती दुष्काळग्रस्त गावांना लागू राहतील.

00000

Monday, December 18, 2023

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मोबाईल डेमॉन्स्ट्रेशन व्हॅन मार्गस्थ

 





जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मोबाईल डेमॉन्स्ट्रेशन व्हॅन मार्गस्थ

अमरावती, दि. 18 (जिमाका) : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती करण्याबाबत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रम दि. 10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील सर्व आठ मतदार संघांमध्ये प्रत्येक मतदार संघामध्ये चार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पुरविण्यात आलेल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मतदार संघाचे मुख्यालयी ईव्हीएम डेमॉन्स्ट्रेशन सेंटर उघडण्यात येऊन त्यामध्ये दोन ईव्हीएम मशीन्स प्रात्याक्षिक करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच प्रत्येक मतदार संघामध्ये प्रसिध्दीसाठी दोन मोबाईल  डेमॉन्स्ट्रेशन व्हॅन (एमव्हीडी) देण्यात आल्या आहेत. व त्यामध्ये दोन ईव्हीएम मशीन्स राहणार आहेत. सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात स्थापन केलेल्या ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रामध्ये तसेच मोबाईल प्रात्याक्षिक व्हॅन सोबत दिलेल्या ईव्हीएम मशीनव्दारे ईव्हीएमबाबत नागरिकांना माहिती देणे तसेच मतदानाचे प्रात्याक्षिक करुन दाखवणे व होणार मतदान योग्यरित्या झाल्याबाबत पडताळणी करुन दाखविण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅट बाबतची माहिती तसेच व्हीव्हीपॅटव्दारे झालेल्या मतदानाची नोंदी मतदारांच्या निदर्शनास आणून प्रत्येक मतदारांचे शंका निरसन करण्यात येणार आहे.

या प्रचार, प्रसिध्दीचा एक भाग म्हणून मोबाईल  डेमॉन्स्ट्रेशन व्हॅन (एमव्हीडी) आज जिल्हाधिकारी कार्यालयामधून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते मोबाईल व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून तालुक्याच्या ठिकाणी मोबाईल डेमॉन्स्ट्रेशन व्हॅन रवाना करण्यात आली आहे. यावेळी अपर जिल्हादंडाधिकारी सूरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राम लंके तसेच नागरिक उपस्थित होते.

*****


सुरक्षा रक्षक मंडळाकडून आयोजित भरती प्रक्रिया रद्द

 सुरक्षा रक्षक मंडळाकडून आयोजित भरती प्रक्रिया रद्द

अमरावती, दि. 18 (जिमाका) : उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत सुरक्षा रक्षक मंडळाने समुच्चय पुल तयार करण्यासाठी शासन नियमाप्रमाणे तसेच योजनेतील तरतूदीनुसार भरती प्रक्रिया राबवून उमेदवाराचा निकाल तथा प्रतिक्षायादी जाहीर करण्यासाठी मंडळाने शासनास प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास प्रशासनाने मंडळाद्वारे कायदेशिर बाबीची पूर्तता न केल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करुन नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तथा सहायक कामगार आयुक्त  अध्यक्ष यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 अन्वये अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, योजना दि. 21 फेब्रुवारी 2012 नुसार हे मंडळ स्थापीत असून मंडळामार्फत सरकारी, निमसरकारी, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, कारखाने व खाजगी आस्थापना येथे नोंदीत सुरक्षा रक्षकांचा नियमानुसार व आस्थापनेच्या मागणीनुसार पुरवठा करण्यात येते. मंडळाचे कार्यक्षेत्र पाच जिल्ह्याचे असून अमरावती येथील मुख्य कार्यालयातून पाचही जिल्ह्याचे कामकाज करण्यात येते. 

*****

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...