Wednesday, February 21, 2024

संविधान महानाट्याने आज महासंस्कृती महोत्सवाची सांगता

 

संविधान महानाट्याने आज महासंस्कृती महोत्सवाची सांगता

अमरावती, दि. 21 (जिमाका) : स्थानिक सायन्सस्कोर मैदानावर 18 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाची सांगता उद्या, दि. 22 फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित संविधान या महानाट्याने होणार आहे. सायंकाळी 7 ते 10 या वेळात संविधान हे महानाट्य सादर होणार असून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित या महानाट्याचे आजवर अनेक प्रयोग झाले आहेत.

               पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महासंस्कृती महोत्सवाची उद्या सांगता होणार आहे. 18 फेब्रुवारी पासून विविध सांस्कृतिक, कला, आणि संगीत कार्यक्रमांची मेजवानी अमरावतीकरांना मिळाली. गायक सुदेश भोसले, अनिरुद्ध जोशी, ऋषिकेश रानडे यांच्यासारख्या गायकांनी अमरावतीकर श्रोत्यांना रिझविले. महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक कलावंतांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली.

  महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गाजलेले संविधान हे महानाट्य महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून अमरावतीकरांना बघावयाची आज  संधी मिळणार आहे. तरी या महानाट्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महासंस्कृती महोत्सव आयोजन समितीमार्फत करण्यात आले आहे.

00000

आपल्याला जे हवे ते इतरांना मिळवून देण्याची क्षमता ठेवावी -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

आपल्याला जे हवे ते इतरांना मिळवून देण्याची क्षमता ठेवावी

-पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 









अमरावती, दि.21 (जिमाका) : प्रशासनामार्फत नागरिकांना सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीमुळे आता नागरिकांना एका छताखाली महसूल विभागातील विविध कार्यालयांशी संपर्क साधता येणे, सोपे होणार आहे. प्रशासनात काम करताना आपल्याला जे हवे ते इतरांना मिळवून देण्याची क्षमता ठेवावी व त्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

 

             मोर्शी रोड, अमरावती येथील तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे-पाटील, माजी महापौर चेतन गावंडे, निवेदिता दिघडे यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ .निधी पांडेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी, मनपा आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, अधीक्षक अभियंता रूपा गिरासे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.

 

             पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा आत्मा आहे. नागरिकांना विविध कामांसाठी तसेच कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात यावे लागते. यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी एका छताखाली महसूल विभागाची कार्यालये असल्यास नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होते. या दृष्टीने या प्रशासकीय इमारतीची निर्मिती सर्व नागरिकांसाठी सोयीची झालेली आहे. या प्रशासकीय इमारतीमध्ये महसूल कार्यालय व तत्सम निगडित असलेल्या कार्यालयांचा समावेश आहे. इमारतीमध्ये असलेल्या कॉन्फरन्स हॉलमुळे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे वेळच उपलब्ध व्हावीत, यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असते. आता नागरिकांना घरी बसून सातबारा ऑनलाइन मिळतो. याप्रमाणे येत्या काळात नागरिकांना विविध शासकीय सुविधा अधिक सुलभतेने कशा मिळतील, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 

              तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीच्या मध्यभागी असलेल्या जागेवर डोमची निर्मिती करण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल. आगंतुकांसाठी आसनव्यवस्था, स्वच्छ पाणी आदी सुविधा उपलब्ध असाव्यात. शासकीय कार्यालयामध्ये नियमितपणे स्वच्छता राखण्यात यावी. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सकारात्मकतेने काम करावे. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन येत्या काळात वाढविण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

 

तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीसाठी सर्व आवश्यक फर्निचर, साहित्य पालकमंत्री श्री. पाटील यांनी  वेळेत उपलब्ध करून दिले. तसेच अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दहा कोटी रुपये मंजूर करून दिल्याबद्दल खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पालकमंत्री महोदय यांचे यावेळी आभार मानले. तसेच अमरावती जिल्ह्यात पीएम विश्वकर्मा योजनेतंर्गत 5 हजार प्रकरणे मंजूर झाली आहेत. राज्यामध्ये यात अमरावती जिल्हा आघाडीवर आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांचे अभिनंदन केले. मोझरी विकास आराखड्यातंर्गत मोझरी येथील इमारत पूर्ण झाली आहे. येत्या काळात मोझरी विकास आराखड्यातंर्गत पुढील कार्यवाही लवकर करण्यात यावी, अशी मागणीही डॉ. बोंडे यांनी केली.

 

खासदार नवनीत राणा यांनी तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीसाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच अमरावती जिल्ह्यात चुर्णी तसेच वलगाव येथे तहसील कार्यालय निर्माण व्हावे, अशी मागणी केली. चुर्णी तालुक्यात 90 गावे येतात. तेथील नागरिकांना कामकाजासाठी चिखलदरा तहसील कार्यालयात यावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ जावून खर्च वाढतो. यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी चुर्णी आणि वलगाव येथे तहसील कार्यालय निर्माण व्हावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 

            आमदार प्रवीण पोटे-पाटील यांनी तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीमुळे नागरिकांची कामे वेळेत आणि गतीने पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले. या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 14 कोटी खर्च करण्यात आले असून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.

प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर महसूल, सेतू कार्यालय, मुद्रांक कार्यालय, लोक अदालत, तहसीलदार, भूमि अभिलेख तालुका निरीक्षक, तहसील कार्यालय, महसूल कार्यालय तसेच उपकोषागार कार्यालयाचा समावेश आहे. तसेच पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी, उपविभाग कार्यालय, तालुका निबंधक कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, प्रादेशिक वन कार्यालय, तालुका कृषी अधिकारी तसेच सभागृहाचा समावेश असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी श्री. भटकर यांनी मानले.

00000

 

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; अर्ज सादर करण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना;

अर्ज सादर करण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

            अमरावती, दि. 21 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे सन 2023-24 वर्षातील अनुसूचित जाती व नवबौध्द  प्रवर्गातील नविन तसेच नुतनीकरणाची, घटकांच्या विद्यार्थ्यांनी swadharyojana.com या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख दि. 31 जानेवारी 2024 होती. परंतु कोणताही विद्यार्थ्यांनी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी वरीष्ठ कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे विद्यार्थ्यांनी अर्जाची हार्ड कॉफी व सर्व कागदपत्रासह दि. 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपले अर्ज विहित मुदतीत कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

00000

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; 5 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना;

5 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

            अमरावती, दि. 21 (जिमाका): सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2022-23 या वर्षातील नवीन प्रवेशित व नुतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयास सादर केले आहे. त्यांनी 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे अर्ज, महाविद्यालयाचे उपस्थितीपत्रक व मार्कशिट कार्यालयात सादर करावयाची आहे. तरी दि. 5 मार्च 2024 पर्यंत कार्यालयात आवश्यक कागदपत्र सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

00000

Tuesday, February 20, 2024

महासंस्कृती महोत्सवात 'महाराष्ट्राची लोकधारा' अमरावतीकर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

 






















अबीर गुलाल उधळीत रंग.....

 

अनिरुद्ध जोशींच्या स्वरांजलीने ग्रामीण संस्कृतीचे घडविले दर्शन

 

महासंस्कृती महोत्सवात 'महाराष्ट्राची लोकधारा'

 

अमरावतीकर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

 

अमरावती , दि 20 (जिमाका) : अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अशा एकापेक्षा एक लोकगीतांचे सादरीकरण करून गायक अनिरुद्ध जोशी यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविले. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने दोन दिवसांपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवात आज 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमांतर्गत गायक अनिरुद्ध जोशी, आनंदी जोशी व सहकलाकारांनी महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारा कलाविष्कार अमरावतीकर प्रेक्षकांसमोर सादर केला.

            वासुदेवाची गाणी, गोंधळ, भारुड, धनगर गीतांचे बहारदार सादरीकरण करून गायकांनी ग्रामीण संस्कृतीचा आहेर प्रेक्षकांना दिला. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, कला, संस्कृती, परंपरा यांचे जतन व्हावे आणि स्थानिक कलावंतांच्या कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हे उद्दिष्ट पुढे ठेवून महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

            भक्ती आणि कलेचा अनोखा संगम महासंस्कृती महोत्सवात बघायला मिळाला. मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गीतांचा बहारदार नजराणा गायक अनिरुद्ध जोशी यांच्या स्वरांजलीमधून श्रोत्यांना मिळाला.

 अमरावती महानगरपालिका आणि महिला व बालविकास विभागाच्या  वतीने तेरा वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या स्वयं आधार व आधार या दोन्ही प्रकल्पातील महिला, पुरुष व वृद्धांनी आपल्या कलेचे सादरीकरण याठिकाणी केले. शिवाय प्रकल्पातील महिलांनी स्वतः डिजाईन केलेले ड्रेस येथील आयोजित फॅशन शो मध्ये सादर करण्यात आले.

            जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी स्वयंआधार आणि आधार मधील पीडितांची रंगमंचावर भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देवून त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदनही केले.

 

00000

अमरावतीकर आज अनुभवणार बेला शेंडे यांच्या आवाजाची जादू

 

अमरावतीकर आज अनुभवणार बेला शेंडे यांच्या आवाजाची जादू

अमरावती, दि. 20 (जिमाका) : सायन्सस्कोर मैदान अमरावती येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या पार्श्वगायिका बेला शेंडे यांच्या आवाजाची जादू उद्या, बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी रसिक प्रेक्षक अनुभवणार आहेत. सायंकाळी 5 ते 7.30 वाजता 'जागर स्थानिक कलावंतांचे कलाविष्कार' यामध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारा  आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील सायंकाळी 6 .30 वाजता  महासंस्कृती महोत्सवाला भेट देवून कलाकारांचा उत्साह व्दिगुणीत करणार आहेत. त्यांनतर 7.30 ते 10 वाजता बेला शेंडे यांच्या संगीतमय कार्यक्रमांचा नजराणा सादर करण्यात येणार आहे.

000000

बारावी परिक्षेनिमित्त जिल्ह्यात कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

बारावी परिक्षेनिमित्त जिल्ह्यात कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश लागू

        अमरावती, दि.20 (जिमाका): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीची परिक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 पर्यंत तर इयत्ता दहावीची परीक्षा दि. 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजीत करण्यात आलेली आहे. या कालावधीत शांतता व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहावी व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टिने पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील परीक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रिया  1973  चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश पोलीस आयुक्त (अमरावती शहर) नविनचंद्र रेड्डी यांनी निर्गमित केले आहे.

परिक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात परीक्षार्थींचे पालक व नातेवाईक तसेच अनावश्यक लोक विविध कारणाने भेटी देत असतात. त्यामुळे परीक्षार्थींना परीक्षा देण्यास अडचण निर्माण होवू नये यासाठी तसेच परीक्षा निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मिटर परीसरात विद्यार्थीं उमेदवार तसेच परीक्षेशी संबंधित पर्यवेक्षक बोर्ड शिक्षण अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांव्यरिक्त कोणासही परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

आदेश याप्रमाणे : परीक्षा केंद्राचे 100 मिटर परीसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन बुथ, एसटीडी, आय एस डी, फॅक्स केंद्र बंद राहिल. परिक्षा केंद्रावर डीजीटल डायरी, कॅलक्युलेटर, भ्रमणध्वनी, पेजर, मायक्रोफोन, ब्ल्युटूथ स्मार्ट वॉच, ट्रांजस्टर, वायरलेस, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिम कार्ड दुरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तु वापरास परीक्षा केंद्रात घेवून जाण्यास प्रतिबंध राहिल. परीक्षा केंद्राचे 100 मिटर परीसरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद राहिल. आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय दंड सहिता कलम 188 याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...