Friday, March 22, 2024

शहरातील उड्डाणपुलावरील वाहतुक बंदीचे आदेश जारी

 

शहरातील उड्डाणपुलावरील वाहतुक बंदीचे आदेश जारी

 

           अमरावती, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यात होळी व धुलीवंदन सण उत्साहात साजरा केला जातो. या सणउत्सव कालावधीत शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सार्वजनिक शांतता भंग होवू नये, करीता जनसामान्यांचा सुरक्षिततेच्या दृष्टिने धुलीवंदनाच्या दिवशी उपाययोजना म्हणून शहरातील उड्डणपुलावरील वाहतुक नियंत्रित करण्यासाठी दि. 25 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वाजता ते दुपारी 3 वाजेपर्यंत आवागमन करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश  पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी जारी केले आहे.

 

            सणउत्सव दरम्यान काही नागरिक बियर बार, धाबे, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी मद्यप्राशन करून रस्त्यावरून मोटर सायकलवर दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती बसून भरधाव वेगाने वाहन चालवितात. अशा परिस्थितीत वाहन चालवितांना वाहन चालकांचे संतुलन राहत नाही त्यामुळे बरेचदा अपघाता सारखा अनुचित पकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सार्वजनिक शांतता भंग होवू नये करीता जनसामान्यांचा सुरक्षिततेच्या दृष्टिने धुलीवंदनाच्या दिवशी खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रवेश बंदीचे आदेश  जारी केले आहे. ते याप्रमाणे.

 

उड्डाणपुलावरील वाहतुक बंद : गाडगेनगर समाधी मंदीरापासून ते जिल्हा स्टेडियम येथील उड्डान पुल, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन, कुथे हॉस्पीटल ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डानपुलावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहिल.

00000

 

सणउत्सव कालावधीत पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

 

सणउत्सव कालावधीत पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

 

            अमरावती, दि. 22 (जिमाका): जिल्ह्यात आगामी काळात सण उत्सव साजरा होणार आहे. तसेच केंद्रीय व माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षा होणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये सर्व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील सर्व पोलिस ठोणेदार, अंमलदार त्यांच्यावरील अधिका-यांना दि. 23 मार्च ते दि. 6 एप्रिल 2024 दरम्यान अधिकार प्रदान करण्याचे आदेश पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी निर्गमित केले आहे.

 

 रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, मिरवणूकांचे मार्ग विहित करणे, नदी, घाट याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सक्षम अधिका-यांनी या अधिनियमाच्या कलम 33, 35, 37 ते 40, 44 व 45 अन्वये कार्यवाही करावी, असे पोलीस आयुक्त यांच्या आदेशात नमूद केले आहे.

0000

शस्त्र परवाना धारकांसाठी प्रतिबंधक आदेश लागू

 

शस्त्र परवाना धारकांसाठी प्रतिबंधक आदेश लागू

अमरावती, दि. 22: लोकसभा निवडणूक 2024 कार्यक्रम जाहिर झाला असून सदर निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामधील शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन लोकसभा निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरातील कोणत्याही शस्त्र परवाना धारकास शस्त्र वाहुन येण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निर्गमित केले आहे.

            जिल्हादंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरातील कोणत्याही शस्त्र परवाना धारकास शस्त्र वाहुन येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. परंतु हा मनाई आदेश जो समाज दिर्घकालीन स्थायी कायदा, रूढी व परीपाठ या नुसार शस्त्रास्त्रे बाळण्यास हक्कदार आहे. त्या समाजाला लागू असणार नाही. तथापी अशा समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आल्यास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास अडचण निर्माण करत असल्याचे आढळून आल्यास व निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पाडण्यास अडथळा करीत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तीची शस्त्रास्त्रे अडकवून ठेण्यास जिल्हा प्रशासनास कोणत्याही प्रतिबंध असणार नाही.

 

तसेच अपवादात्मक परिस्थीतीत शस्त्र जमा करण्यापासून सुट मिळवण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशन मार्फत जिल्हा पुर्नर्विलोकन समितीकडे अर्ज करण्यास परवाना धारकांना मुभा राहील. जो कोणी या नियमांचे उल्लंघन करील तो इसम तथा शस्त्र परवानाधारक दंडनिय कार्यवाहीस पात्र ठरेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरूध्द पोलीस विभागाने नियमानुसार कार्यवाही केल्या जाईल.

 

00000

Thursday, March 21, 2024

मुद्रणालयांनी निवडणूक साहित्य छपाईसाठी लोकप्रतिनिधीत्व कायद्याचे काटेकोर पालन करावे

 

मुद्रणालयांनी निवडणूक साहित्य छपाईसाठी लोकप्रतिनिधीत्व कायद्याचे काटेकोर पालन करावे

 

अमरावती, दि. 21 (जिमाका): लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने आदर्श आचार संहिता काळात मुद्रणालयांनी निवडणूक साहित्य छपाईसाठी लोकप्रतिनिधीत्व कायदा कलम 127 अ अंतर्गत दिलेल्या तरतुदीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

 

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 127 (अ) चे तरतुदी याप्रमाणे : सर्व मुद्रक तथा प्रकाशकांनी राजकीय पक्षाशी संबंधित मुद्रणाचे अथवा जाहिरात विषयक मुद्रणाचे काम करताना त्यांच्या दर्शनी भागावर मुद्रकाचे नाव पत्ता आणि प्रकाशकाचे नाव व संख्या नमुद करणे अनिवार्य आहे. निवडणूक विषयक कोणतीही जाहिरात अथवा पत्रक, मुद्रण करण्यापूर्वी मुद्रकाने प्रकाशकाकडून स्वत:ची  ओळख पटविणारी उद्घोषणा, दोन साक्षीदारांच्या स्वाक्षरीसह प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. तसेच त्याची प्रत जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देणे बंधणकारक आहे. या तरतुदींचे उल्लंघन केल्यास संबंधित मुद्रक तथा प्रकाशकांची अनुज्ञप्ती रद्द करण्याची कार्यवाही केल्या जाईल, अशी माहिती प्रसिद्धीपत्राव्दारे देण्यात आली आहे.

00000

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवा; बँकर्सना निर्देश

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवा;

बँकर्सना निर्देश

 

अमरावती, दि. 21 (जिमाका): लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी खर्च संनियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे.  बँकांनी संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून तत्काळ माहिती जिल्हा निवडणुक कार्यालयास द्यावी, अशा सूचना मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा खर्च संनियंत्रण पथकाचे नोडल अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांनी दिले.

 

जिल्ह्यातील अग्रणी बँक व सर्व प्रमुख  बँकर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच झाली. यावेळी खर्च संनियंत्रक नोडल अधिकारी चंद्रशेखर खंडारे, सहायक नोडल अधिकारी विजय देशमुख, दिनेश मेतकर तसेच सर्व बँकचे अधिकारी उपस्थित होते.

00000

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक: राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक; निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक: राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक;

निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 21 (जिमाका):  लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीना कायदेशिर तरतुदी व प्रचारासंबंधातील साहित्य व वस्तूच्या दराची माहिती देण्यात आली. राजकीय पक्ष प्रतिनिधींनी निवडणुका पारदर्शक, भयमुक्त व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. कटियार बोलत होते. उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, खर्च संनियंत्रक नोडल अधिकारी चंद्रशेखर खंडारे, सहायक नोडल अधिकारी विजय देशमुख, दिनेश मेतकर तसेच भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

राजकीय पक्षाच्या बैठकीमध्ये उमेदवारांच्या खर्चाच्या संदर्भात सर्व कायदेशिर तरतुदींबाबत अवगत करण्यात आले. जिल्हास्तरावर तसेच प्रत्येक विधानसभेनिहाय उमेदवारांच्या निवडणूकीवर होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी संनियंत्रण पथकाची स्थापना केली असून जिल्हा नियोजन भवनाच्या इमारतीमध्ये खर्च संनियंत्रण पथक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. खर्चाचे अचूक लेखांकन होण्याकरीता जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रचारासंबंधातील वस्तु, साहित्य व सेवांचे दर निश्चित करण्याकरिता विविध शासकीय कार्यालय तसेच खुल्या बाजारातुन दरपत्रक मागविण्यात आले. प्राप्त झालेल्या दराची माहिती सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली.  उमेदवारांना 95 लक्ष रूपये खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून यापेक्षा जास्त खर्च होवून आचार संहीतेचे उल्लंघन होणार नाही याबाबत काळजी घेण्यात यावी. आचारसंहीता अंमलबजावणीकरीता राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी केले.

00000

Wednesday, March 20, 2024

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

 

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

 

      अमरावती, दि. 20 (जिमाक) :  शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

     सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून  तो दि. 22 मार्च ते 5 एप्रिल 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे.

000000

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...