Saturday, February 22, 2025

DIO NEWS AMRAVATI 22.2.2025



 

विकासकामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करा

- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पालकमंत्र्यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा

 

        अमरावती , दि. 22 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल. पांदण रस्ते आणि काँक्रिट रस्त्यांच्या कामातील गुणवत्ता उत्कृष्ट ठेवा. विकासकामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्यावर भर द्या, असे प्रतिपादन  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

 

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात विविध विषयांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार सर्वश्री रवी राणा, प्रताप अडसड, राजेश वानखडे, केवलराम काळे, उमेश यावलकर, प्रवीण तायडे, प्रवीण पोटे -पाटील, मुख्य अभियंता गिरीश जोशी, अधीक्षक अभियंता रुपा गिरासे, कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी, राजेश सोनवाल, देवेंद्र अडचुले, प्रमोद वानखडे, रोहन पाटील आदी यावेळी उपस्थित होते. श्रीमती रूपा गिरासे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचे यावेळी सादरीकरण केले. शासनाच्या 100 दिवसातील विकासकामांतर्गत करण्यात येत असलेले रस्ते व पूल बांधकाम यांची यावेळी माहिती दिली.

 

      जिल्ह्यात जेथे रस्त्यांच्या बांधकामाची जास्त निकड आहे, ती कामे त्वरित हाती घ्या. जास्त वर्दळीचे रस्ते, शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ठरणारे रस्ते अशा रस्त्यांच्या कामांना प्राधान्य द्या. या रस्त्यांची यादी शासनाकडे त्वरित मंजुरीला पाठवा. वनविभागामुळे जेथे रस्त्यांचे रुंदीकरण थांबले आहे तसेच नवीन रस्ते बांधकाम करण्यात अडचणी येत असल्यास याबाबत मंत्रालयीन स्तरावर कार्यवाही करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले.

 

        जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी लोकप्रतिनिंधीशी चर्चा करून विकास कामे ठरवून नवीन कामे प्रस्तावित करावी. जिल्ह्यामध्ये जेथे-जेथे विश्रामगृहांची आवश्यकता आहे, तेथे नवीन विश्रामगृह बांधण्यासाठी शासनाकडे त्वरित प्रस्ताव सादर करावे. धारणी, सेमाडोह, बडनेरा येथे विश्रामगृह बांधण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करावे. तसेच अमरावती हे विभागस्तरीय ठिकाण असल्यामुळे येथील विश्रामगृहाचा विस्तार करण्यात यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

      पांदण रस्ते व काँक्रीट रस्त्यांच्या कामातील दर्जा व गुणवत्ता कायम ठेवून काम करण्यात यावे. अन्यथा त्रयस्थ  यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येईल. दोषी आढळल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल. सर्व उपअभियंतांनी याबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

       सन 2021 -22, 2022 -23 तसेच 2023 -24 या गेल्या तीन वर्षातील कामांची शासनामार्फत तपासणी करण्यात येईल. यासाठी विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रलंबित देयकांची माहिती मागविली.

00000

 

खल्लार पोलिस ठाण्यातील वाहनांवर

हक्क कळविण्याचे आवाहन

 

अमरावती, 20 : खल्लार पोलिस ठाण्यातील 16 दुचाकी वाहनांवर अद्याप कुणीही हक्क सांगितलेला नाही. या वाहनांची विल्हेवाट लावण्यात येणार असून वाहनधारकांनी हक्क कळवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

खल्लार पोलिस ठाण्यात वाहन क्रमांक आणि चेसीस, इंजिन क्रमांकानुसार वाहनाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाहनधारकांनी त्यांचे वाहन असल्यास पोलिस ठाण्याला कळवावी, असे आवाहन खल्लार पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांनी केले आहे.

00000



Friday, February 21, 2025

DIO NEWS AMRAVATI 21.2.2025








आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधांसाठी निधी देणार

              -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

            अमरावती, दि.21 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधांसह जल संधारणाच्या कामांना प्राधान्याने निधी मंजूर केला जाईल. तसेच सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

            पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज जलसंपदा विभाग, जिल्हा परिषदेत जाऊन बैठक घेतली. यावेळी त्यांनी सिंचन, पुनर्वसन, जलसंधारण, आरोग्य, आदींबाबत आढावा घेतला. त्यांच्या समवेत आमदार रवि राणा, प्रताप अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रविण तायडे, उमेश ऊर्फ चंदू यावलकर, प्रविण पोटे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी उपस्थित होते.

            सिंचन हा शासनाचा प्रथम प्राधान्याचा विषय आहे. प्रामुख्याने गेल्या वीस वर्षांपासूनची सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी जुनी कामे शोधून त्याची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात येणार आहे. टप्प्याने ही कामे घेण्यात येणार आहे. यामुळे अल्प निधीमध्ये याठिकाणी पाणी साचणार असल्याने सिंचनाची सोय होणार आहे. त्यामुळे प्रत्येक कामाची माहिती सादर करण्यात यावी.  सिंचनाची व्यवस्था करताना दर्जेदार पुनर्वसनाची कामे करण्यात यावी. पुनर्वसित गावातील सर्व नागरिक स्थलांतरित होत नाही तोपर्यंत शासनाची जबाबदारी पूर्ण होत नाही. त्यामुळे पुनर्वसनाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

            नाला खोलीकरण करून त्यातील माती पांदण रस्त्यासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पात गाळ आणि रेती साचली असल्यास आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे याबाबतचे प्रस्ताव सादर करण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांना भेटी देण्यात येणार आहे. यात पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच पुनर्वसन आवश्यक असलेल्या गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. शासनाकडून आवश्यक असलेली मदत यासाठी देण्यात येईल. पाणी गळती ही मोठी समस्या असून या बाबीवर लक्ष केंद्रित करावे. येत्या काळात सिंचनाची व्यवस्था सुरळीत करण्यात येणार आहे. यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

            जिल्हा परिषदेत जलसंधारण, आरोग्य, महिला व बालविकास आदींचा आढावा घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागात डॉक्टर आणि रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. डॉक्टरांसाठी कमी मुदतीत मुलाखती घेण्याचे नियोजन करावे. आवश्यकता भासल्यास आयुर्वेदिक डॉक्टरांची भरती करण्यात यावी. प्रामुख्याने ‘आपला दवाखाना’ येथे डॉक्टरांची व्यवस्था करावी. मेळघाटसारख्या दुर्गम भागात विशेषज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था करण्यात यावी. सर्व शाळा, अंगणवाडीमध्ये वीज पुरवठा करण्यात यावा. याठिकाणी पाणी आणि फिल्टरची व्यवस्था करण्यात यावी. येथे डिजीटल अंगणवाडी आणि शाळा तयार करण्यात येईल. यासाठी सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शासनाच्या शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल. जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी जाणून घेतली.

00000 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा रविवारी अमरावती दौरा

अमरावती, दि. 21 (जिमका) : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन रविवार, दि. २३ फेब्रुवारी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या दौऱ्यानुसार, रविवार, दि. 23 फेब्रुवारी ऑक्टोबर रोजी सकाळी 10.25 वाजता अमरावती येथील बेलोरा विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.45 वाजता विमानतळावरून  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे प्रयाण करतील. सकाळी 11 ते दुपारी 12.15 वाजेपर्यंत विद्यापीठाच्या 41 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. दुपारी 12.15 ते 1.15 वाजेपर्यंत राखीव.

दुपारी 1.15 वाजता विद्यापीठ येथून वझ्झर फाटा, मल्हारा, तालुका अचलपूर येथे प्रस्थान. दुपारी 2.45 वाजता वझ्झर फाटा येथे आगमन. दुपारी 2.45 ते 3 वाजेपर्यंत स्व.अंबादास पंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालगृह येथे भेट. दुपारी 3 वाजता अमरावती विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता अमरावती विमानतळावर आगमन. दुपारी 4.35 वाजता विमानतळावरून मुंबईकडे प्रस्थान करतील.

००००


नावेड डेपोतील वाळूचा लिलाव 28 फेब्रुवारीला

 अमरावती, दि. 21 (जिमाका) : मौजा नावेड, ता. भातकुली येथील येथील वाळूडेपोची मुदत संपुष्टात आली आहे. डेपोतून वाळू विक्रीनंतर शिल्लक असलेला वाळूसाठा 2 हजार 92 ब्रास जप्त करण्यात आला आहे. या वाळूचा शुक्रवार, दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता लिलाव करण्यात येणार आहे.

सदर वाळूसाठ्याचा लिलाव करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे निर्देश आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी, तिवसा-भातकुली यांनी जाहीरनामा काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी, तिवसा-भातकुली यांच्या दालनात लिलाव करण्यात येणार आहे. या जाहीर लिलावात इच्छुक व्यक्ती, संस्था आणि शासकीय विभागांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

'फिट्स इन फिटू' ही दुर्मिळ शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णास सुटी

            अमरावती, दि. 21 (जिमाका) : स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे दिनांक 4 फेब्रुवारी रोजी तीन दिवसीय बालकाची अतिशय दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या बालकास 17 दिवसानंतर सुटी देण्यात आली. त्यासाठी रुग्णालयातील पेडियाट्रिक सर्जन, बालरोग तज्ज्ञ, व टीमचे आमदार सुलभाताई खोडके, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, संजय खोडके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

            रुग्णाचे आई-वडील यांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नरोटे, डॉ. नवीन चौधरी, डॉ. उषा गजभिये, डॉ.नागलकर, डॉ. नितीन बरडिया, डॉ. नम्रता भस्मे, डॉ. पाचबुद्धे, आर. एम. ओ. डॉ. माधव ढोपरे, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ. उज्ज्वला मोहोड, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. शाम गावंडे आदी यावेळी उपस्थित होते.

 समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) शीतल बोंडे यांनी सूत्रसंचालन तर ऋषिकेश धस यांनी आभार मानले.

000000

रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा 25 फेब्रुवारी रोजी

          अमरावती, दि. 21 (जिमाका) : कुष्ठरोग निवारण दिन म्हणून 30 जानेवारी हा दिवस देशभर साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2025 या कालावधीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आले. याअंतर्गत कुष्ठरोगाविषयी जनजागृती होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन कुष्ठरोगाबाबत भिती व गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी मंगळवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा क्रीडा स्टेडिअम, मोर्शी रोड येथून रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे.

            स्पर्धेचे अंतर पुरुषांसाठी सुमारे 5 कि.मी. तर महिलांसाठी अंतर 3 कि.मी. राहील. पुरुषांसाठी स्पर्धेचा मार्ग जिल्हा क्रीडा स्टेडिअम, इर्विन चौक, आय.एम.ए. हॉल, गर्ल्स हायस्कुल चौक, बचत भवन, पंचवटी, गणेशदास राठी हायस्कुल समोरुन जिल्हा क्रीडा स्टेडिअम असे राहील तर महिलांसाठी स्पर्धेचा मार्ग जिल्हा क्रीडा स्टेडिअम, इर्विन चौक, आय.एम.ए. हॉल, गर्ल्स हायस्कुल चौक, डावीकडे वळून गणेशदास राठी हायस्कुल समोरुन जिल्हा क्रीडा स्टेडिअमकडे असे राहील.

            रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा 10 वर्षांवरील व्यक्तींकरिता असून रजिस्ट्रेशन नि:शुल्क आहे. ही स्पर्धा फक्त अमरावती जिल्ह्यासाठी आहे. स्पर्धेमध्ये रजिस्ट्रेशन करणाऱ्या पहिल्या 100 पुरुष व पहिल्या 50 महिला यानांच सहभागी होता येईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य राहील. सोबत आधारकार्ड आणणे अनिवार्य आहे. स्पर्धकांना टी-शर्ट व स्पर्धेनंतर प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्यास 4 हजार रुपये, व्दितीय येणाऱ्यास 2 हजार 500 रुपये व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना 1 हजार 500 रुपये बक्षीस देण्यात येईल. स्पर्धेमध्ये परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील.

            स्पर्धकांना निरोगी असल्याचे हमीपत्र भरुन द्यावे लागेल. अधिक माहितीसाठी 9765438802 तसेच 9404201377 येथे संपर्क साधावा. जास्तीत-जास्त नागरिकांनी रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक यांनी केले आहे.

00000

ध्वनीक्षेपकासाठी वर्षभरात 15 दिवस सुट

            अमरावती, दि. 21 (जिमाका) : जिल्ह्यात ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरण्यास वर्षभरात 15 दिवसांसाठी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी विशेष परवानगी दिली आले.

             केंद्र शासनाच्या 10 ऑगस्ट 2017 च्या अधिसूचनेद्वारे ध्वनिप्रदूषण (नियम व नियंत्रण) सुधारित नियमानुसार, ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृह, सभागृह, सामूहिक सभागृह आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार, वर्षभरात 15 दिवस निश्चित करून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत विशेष सूट जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जाहीर केली आहे.

            या दिवसांसाठी विशेष सूट : 19 फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज जयंती, 6 एप्रिल - श्रीराम नवमी, 14 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 12 मे - बौद्ध पोर्णिमा, 15 ऑगस्ट- श्रीकृष्ण जयंती, 27 ऑगस्ट - गणेश चतुर्थी (गणपती स्थापना), 6 सप्टेंबर- अनंत चतुर्दशी, 26 सप्टेंबर - नवरात्र पंचमी, 30 सप्टेंबर -  नवरात्र अष्टमी, 1 ऑक्टोबर - नवरात्र नवमी, 2 ऑक्टोबर - दसरा, 18 ऑक्टोबर -  दिवाळी सण धनत्रयेदशी, 21 ऑक्टोबर - दिवाळी सण लक्ष्मी पूजन, 25 डिसेंबर - नाताळ, 31 डिसेंबर - नुतन वर्ष.

            ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्याबाबत देण्यात आलेली ही सूट राज्य सरकारने घोषित शांतता क्षेत्रात लागू नसेल. त्‍यामुळे या ठिकाणी ध्वनिप्रदूषण नियमावरील तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.

00000



 

Thursday, February 20, 2025

DIO NEWS AMRAVATI 20.2.2025

 


पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज दौरा

अमरावती, दि. 20 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 21 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे यांचे शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेतील. दुपारी 1.30 वाजता पंचवटी येथील सिंचन भवनात पाणी आरक्षण, कालवा सल्लागार समिती बैठक घेऊन जलसंपदा विभागाचा आढावा घेतील. दुपारी 2.30 वाजता जिल्हा परिषद कार्यालयात जिल्हा परिषदेचा आढावा घेतील. दुपारी 3.30 वाजता मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेतील. दुपारी 4.30 वाजता महानगरपालिका सभागृहात महानगरपालिकेचा आढावा घेतील. सायंकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृहात जनतेच्या भेटी घेऊन लेखी निवेदने स्विकारतील. सायंकाळी 6.30 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा, रात्री 8 वाजता स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करतील.
00000



जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी
अमरावती, 20 : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रसन्नजीत चव्हाण, विवेक जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000



आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी
अमरावती, 20 : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जिल्हा माहिती कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, छायाचित्रकार सागर राणे, वरीष्ठ लिपिक योगेश गावंडे, लिपिक विजय राठोड, राजश्री चौरपगार आदी उपस्थित होते. उपस्थितांनी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

Tuesday, February 18, 2025

DIO NEWS AMRAVATI 19.2.2025




















 

‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रे’त

मल्लखांब, दांडपट्टा ठरले आकर्षण

*शिवटेकडी येथे शिवाजी महाराजांना अभिवादन

 

अमरावती, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त आज ‘जय शिवाजी - जय भारत पदयात्रा’ काढण्यात आली. सायन्सकोर मैदान येथून निघालेल्या पदयात्रेत मल्लखांब, लेझीम, दांडपट्टा, योगा, शस्त्रकला आदींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पदयात्रेतील ही प्रात्यक्षिक आणि देखावा नागरिकांचे आकर्षण ठरली.

सायन्सस्कोर मैदान येथे झालेल्या कार्यक्रमाला पद्मश्री शंकरबाबा पापळकर, खासदार डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले. त्यानंतर पदयात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

श्री. पापळकर यांनी संपूर्ण देशभरासह 260 देशात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यातून देशाला सन्मान प्राप्त झाला आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. खासदार डॉ. बोंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाची देशपातळीवर प्रेरणा घेण्यात आली आहे. संपूर्ण देशातील जनतेच्या स्वाभीमानाचे रक्षण करणारा राजा आहे. गुलामगिरीतून मुक्तता आणि महिलांचा सन्मान करणारा राजा म्हणून छत्रपतींचा आदर्श ठेवला जात आहे. देशभरात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीतून प्रेरणा प्राप्त होईल. या प्रेरणेतून विकसीत भारत घडविण्यास मदत होणार आहे.

पदयात्रा सायन्सस्कोर मैदान, शिवटेकडी, पोलिस आयुक्त कार्यालय, एनसीसी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, बियाणी चौकमार्गे निघाली. पदयात्रेदरम्यान शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माँ जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

जिल्हा प्रशासनातील सर्व कार्यालये, शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, संत गाडगेबाबा विद्यापिठ एनएसएस विभाग, एनसीसी, स्काऊट गाईड, उच्च शिक्षण संचालनालय, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, क्रीडा संघटना, जिल्हा क्रीडा अधिकारी, विद्याभारती महाविद्यालय, महापालिकेच्या सर्व शाळा, मनीबाई गुजराती हायस्कूल, गोल्डन किड्स स्कूल, श्री गणेशदास राठी विद्यालय, प्रेमकिशोर सिकजी विद्यालय, संत गाडगेबाबा विद्यालय, शारदा कन्या, कस्तुरबा, होलीक्रॉस इंग्रजी व मराठी, ज्ञानमाता, सेंट झेविअर्स, न्यू हायस्कूल मेन, रामकृष्ण क्रीडा विद्यालय, समर्थ हायस्कूल, वनिता समाज, सेंट पिटरबर्क, साईबाबा विद्यालय, श्रद्धानंद इंग्लीश स्कूल, जॅक अँड जिल प्रायमरी स्कुल, जिल्हा परिषद शाळा, सिंदी हिंदी हायस्कूल, प्रशांत विद्यालय आदी शाळांनी पदयात्रे सहभाग नोंदविला. जेवड येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेने शिवजन्माची नाटीका सादर केली.

पदयात्रेत विविध देखावे सादर करण्यात आले. यात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत धीरजकुमार आणि मावळ्यांच्या भूमिकेत विनर अॅकॅडमीचे विद्यार्थी, वनिता समाजाचे लेझीम प्रात्याक्षिक, मनपा अधिकारी कर्मचारी यांचा शिवजन्मोत्सव सोहळा, आयडीयल स्कूलचा शिवराज्याभिषेक, कस्तुरबा विद्यालयाचा शिवराज्याभिषेक, मनीबाई गुजराती हायस्कूलचा पोवाडा, जेडीपी मल्लखांब प्रशिक्षण केंद्राची प्रात्याक्षिके, हनुमान प्रसारक मंडळाचा योगा, सोनल रंगारी व त्यांचा संच यांचा शस्त्रकला, लाठीकाठी बंजटी आदी प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. सदर पदयात्रे सुमारे 10 हजाराहून अधिक विद्यार्थी, युवक, युवती, शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी सहभाग घेतला.

000000




जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

अमरावती, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, तहसिलदार विजय लोखंडे, अधीक्षक निलेश खटके, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार आदी उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

सारस्वती जन्मभू : आदिपर्व

 


98वे अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर विशेष लेख

……

सारस्वती जन्मभू : आदिपर्व

दक्षिण हिंदुस्थानातील सर्वात प्राचीन देश म्हणून विदर्भाचे नाव घेण्यात येते. रामायण, महाभारत, रघुवंश आदी प्राचीन ग्रंथांमधून विदर्भाचे संदर्भ येतात. कवी राजशेखरने 'सारस्वती जन्मभू' म्हणून या भूमीला प्रशस्तिपत्र बहाल केले आहे. मराठी भाषेची जननी म्हणूनही तिचा उल्लेख करण्यात येतो.

काळ कुणासाठी थांबत नाही. गतकाळाची पुनरावृत्तीही होत नाही. या काळाच्या विशाल पडद्यावर अनेक ऋषिमुनी आणि लेखक कवी आपल्या शब्दांची अक्षरनोंद ठेवून व आपले अस्तित्व चिरंजीव करून पडद्याआड निघून जातात. वाचकांच्या हाती उरतो तो या आठवणीतील अक्षरांचा अमोल ठेवा... विदर्भाच्या सुवर्णाक्षरांतले एक पान इंद्रपुरीचे आहे. एके काळची संपन्न आणि विख्यात नगरी म्हणजे इंद्रपुरी म्हणजेच अमरावती. तिच्या प्राचीनतेच्या खुणा आज जागोजागी आढळतात. ऋग्वेदातील काही सूक्तांचा द्रष्टा आणि आर्यपुरुष अगस्ती ऋषी यांची पत्नी विदर्भ राजकन्या लोपामुद्रा, नळराजाची राणी दमयंती, श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी आणि दशरथ राजाची आई इंदुमती येथल्याच मातीत जन्मल्या. या चारही विदर्भकन्यांचा इतिहास अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर तहसीलीतील 'कौडिण्यपूर' या एकेकाळच्या विदर्भाच्या राजधानीच्या नावाने जगाला ज्ञात आहे.

सालबर्डी

याच जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रम्य कुशीत सालबर्डी वसली आहे. येथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. सीता इथेच आश्रयाला होती. लव-कुश ह्याच ठिकाणी वाढले अणि राम-सीतेचे पुनर्मिलन येथेच झाले, अशी आख्यायिका आहे. श्री चक्रधरस्वामींनीही येथेच तप केले होते.


येथले रिद्धपूर म्हणजे महानुभावपंथीयांची काशी. या पंथाचे चौथे कृष्ण श्री गोविंद प्रभू यांचे वास्तव्य रिद्धपूरला होते. त्यांच्याकडून चक्रधर स्वामींनी ज्ञान प्राप्त केले आणि महानुभाव पंथ पुरस्कृत केला. (तेरावे शतक) अनेक पुरोगामी तत्त्वांची बांधिलकी स्वीकारलेला हा पंथ येथूनच पुढे भारतभर पसरला. चक्रधरस्वामींची शिष्या महदंबा महानुभाव वाङ्मयात आद्य कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिचा चक्रधरांच्या स्तुतीपर लिहिलेला अभंग लीळाचरित्रात आहे. तद्वतच ‘धवळे’ हे तिचे एक सुंदर कथागीत असून गेयता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. आजही महानुभावांच्या मठातून हे धवळे सामूहिकरित्या म्हटले जाते. देश-विदेशातील संशोधक आजही रिद्धपूरला येत असतात.

राजज्योतिषी कृष्ण:

या भूमीत अंदाजे सतराव्या शतकात एक प्रसिद्ध ज्योतिष घराणे होऊन गेले. या घराण्यातला विद्वान ज्योतिषी आणि ग्रंथकार कृष्ण याने काही ग्रंथांची निर्मिती केली. बीजगणितावर टीकाग्रंथ लिहून स्वतःचे काही नवे सिद्धांत मांडले. त्यावेळचा राजा जहांगीर याने त्याला आपल्या दरबारात राजज्योतिषी म्हणून मानाचे स्थान दिले.

सुर्जी-अंजनगाव

साहित्याचा अभिजात वारसा मिळालेले एक गाव सुर्जी अंजनगाव. संत एकनाथ महाराजांच्या शिष्यपरंपरेतले विदर्भकवी श्री देवनाथ महाराज (इ.स. १७५४-१८३१) हे अंजनगावचेच. श्री. राजेश्वरपंत कमाविसदार यांच्या कुळात सुर्जी येथे 'देवराज' जन्माला आले. त्यांना कुस्त्यांचा भारी शौक. 'निरुद्योगी' म्हणून घरी आईशी व मोठ्या बंधूशी भांडण झाले. त्यामुळे ते सुर्जीच्या हनुमान मंदिरात गेले आणि ध्यान लावले. योगायोगाने या २७ वर्षांच्या ब्रह्मचारी देवरावांची संत एकनाथांच्या संप्रदायातील तेरावे पुरुष श्री गोविंदनाथ यांच्याशी गाठ पडली. गोविंदनाथांनी त्यांच्यावर अनुग्रह केला.

आणि त्यांचे 'देवनाथ' हे सांप्रदायिक नाव ठेवले. तेव्हापासून त्यांचा काव्यप्रवास आणि कीर्तने यांना प्रारंभ झाला. या निमित्ताने ते भारतभर फिरले. संत नामदेव महाराजानंतर पंजाबात जाऊन समाजप्रबोधनाचे कार्य श्री देवनाथांनीच केले. अनेक ठिकाणी आपले मठ स्थापन केले. आज मुख्य मठ सुर्जीला आहे.

श्री देवनाथ महाराज या मुख्य पीठावर विराजमान झाले. त्यांच्यानंतरचे पीठाधीश श्री दयाळनाथ महाराज हेही श्रेष्ठ प्रतीचे आख्यानक कवी होते. त्यानंतरच्याही पीठाधीशांनी काव्यरचना केल्या. श्री देवनाथ व श्री दयाळनाथ यांची कविता प्रासादिक आहे. द्रौपदीचा कृष्णासाठीचा धावा दयाळनाथ या शब्दांत बद्ध करतात- 'ये धावत कृष्णा बाई अति कनवाळे निज जन मन सर समराळे.' हृदय हेलावून टाकणारी अशी ही रचना आहे. श्री दयाळनाथांचे निधन वयाच्या ४८ व्या वर्षी (इ.स.१८३६) हैद्राबाद येथे झाले. श्री देवनाथांच्या निधनाची कथा मात्र मती गुंग करून टाकणारी आहे. रामनवमीच्या निमित्ताने ग्वाल्हेरला ते कीर्तन करण्यासाठी गेले. अपार गर्दीत त्यांनी कीर्तन सुरू केले. एवढ्यात मंडपाला आग लागली. शेकडो लोक मारले गेले. देवनाथ महाराज बाहेर पडणार तोच कुणीतरी त्यांना कुत्सितपणे म्हणाले, 'नैन छिन्दती शस्त्राणी, नैन दहती पावक.' हे ऐकून देवनाथांनी त्या इसमाला घट्ट पकडून ठेवले आणि त्याच्यासोबतच ते अग्निदेवतेच्या स्वाधीन झाले. श्री देवनाथांची समाधी ग्वाल्हेरला आहे अन् त्यांनी स्थापित केलेला मठही तेथे आहे.

अमरावती : काही वेधक नोंदी

अमरावती हे नाटककारांचे गाव आहे, तसेच ते नाट्यवेड्यांचे गाव आहे. नामवंत कंपनींची नाटके अमरावतीला आली की ती पाहण्यासाठी दूरदूरून नाटकांचे रसिक येत. छकडा, पायटांगी व सायकल ही त्यावेळची वाहने. काही श्रीमंत व्यक्ती घोडा वा घोडागाडी वापरत. जमेल त्या वाहनाने माणसे येत. रात्रभर नाटकांचा आस्वाद घेत. त्या काळची नाटकंही 'रात्रीचा समय सरूनी येत उषःकाल हा...' अशा स्वरूपाची असत.

अमरावती लेखक-कवींचेही गाव आहे. या शहराने महाराष्ट्राला 'साहित्य-सोनियाच्या खाणी' दिल्या आहेत. मराठी कवितेला मुक्तछंद देणारे कवी अनिल येथेच शिकले. कुसुमावती देशपांडेही येथल्याच. कुसुमावतींचे वडील जयवंत कविता लिहीत. शालेय जीवनापासूनच कुसुमावती येथल्या साहित्य विशेष आणि सांस्कृतिक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेत. 'कुसुमानिल' यांचे प्रेम येथेच फुलले.

बेडेकर इथलेच

विश्राम बेडेकर यांचा जन्म अमरावतीचाच. त्यांची नाटक व चित्रपटातील कामगिरी सर्वांना परिचित आहे. 'ब्रह्मकुमारी' हे त्यांचे पहिले नाटक दि.१५/६/१९३३ रोजी रंगभूमीवर आले. (संगीत- मास्टर दीनानाथ) त्यानंतर त्यांनी मोजकेच लेखन केले. त्यांच्या वास्तव्यातली अमरावती, विदर्भ महाविद्यालय, मित्रमंडळी आणि येथे भोगलेले दारिद्र्य... या साऱ्या आठवणी त्यांनी आपल्या आत्मचरित्र ग्रंथातून (एक झाड दोन पक्षी) मांडल्या आहेत. बेडेकरांचे वडील रेल्वे स्टेशन परिसरातील आळशी राममंदिराचे पुजारी होते.

कवी कृष्णमूर्ती, गोपाळराव बेडेकर, बा. सं. गडकरी, ना. कृ. दिवाणजी, दादासाहेब आसरकर, डॉ. श्री. व्यं. केतकर, काकासाहेब सहस्रबुद्धे. वि. रा. हंबर्डे, रा. द. सरंजामे, डॉ. भवानराव म्हैसाळकर, मा. ल. व्यवहारे, पु. य. देशपांडे, खापर्डे बंधू, वीर वामनराव जोशी, नानासाहेब बामणगावकर, कृष्णाबाई खरे, अ. तु. वाळके, जा. दा. राऊळकर, वासुदेवशास्त्री खरे, तात्यासाहेब सबनीस, भाऊसाहेब असनारे, अप्रबुद्ध, संत गुलाबराव महाराज, संत तुकडोजी महाराज, गीता साने, सुदामजी सावरकर, विमलाबाई देशपांडे आदींनी आपल्या लेखनकर्तृत्वाने आपला काळ गाजवला आहे. संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, श्लोक, अभंग आणि इतर लेखन यांची जनमानसावरील पकड आजही कायम आहे. त्यांचे एकूणच लेखन चिरंजीवी ठरले आहे.

वाचता वाचता

जुन्या लेखनकर्तृत्वाचा धांडोळा घेताना काही संस्मरणे वाचनात आली.

सुप्रसिद्ध कादंबरीकार बाळकृष्ण संतुराम गडकरी, यवतमाळचे यशवंत खुशाल देशपांडे आणि डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे तिघेही जिवाभावाचे मित्र होते. ते एकाच शाळेत शिकत. नगर वाचनालयात ग्रंथवाचन करीत आणि मराठी वाङ्‌मयावर चर्चा घडवत.

सुप्रसिद्ध कादंबरीकार गीता साने अमरावतीतली १९२६ मध्ये प्रथम श्रेणीत मॅट्रिक होणारी पहिली मुलगी. सायन्स कॉलेजचीही पहिली विद्यार्थिनी. लग्नानंतर आडनाव न बदलविणारी पहिली मराठी लेखिका ! उत्तर प्रदेश व बिहारमध्ये स्त्री-शिक्षणाचा प्रसार करणारी पहिली विदर्भकन्या !

कवी गणपतराव देशमुख हे स्वामी शिवानंद नावाने ओळखले जायचे. अमरावती नगरपालिकेत ते लिपिक होते. इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध कविता रचल्यामुळे १९०७ साली त्यांना सात वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली होती. परंतु पुढे वऱ्हाडात पाय ठेवू नये, या अटीवर त्यांना मुक्त करण्यात आले. कविता लेखनामुळे तुरुंगात जाणारा हा पहिलाच वैदर्भीय कवी असावा.

डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी लेखन केले नसले तरी ते अनेक लेखकांचे प्रेरणास्थान होते. डॉ. वि. भि. कोलते यांनी आपल्या आत्मचरित्रात (अजूनि चालतोचि वाट) भाऊसाहेबांच्या अनंत उपकारांचे स्मरण मोठ्या हृद्यतेने केले आहे. भाऊसाहेबांबद्दल एक विशेष माहिती मिळाली. त्यांना स्वतःचे नाव इंग्रजीत Panjab ऐवजी Punjab लिहिणे योग्य वाटत नसे. कुणी असे लिहिल्याचे लक्षात आले की ते नावातल्या 'यू' अक्षराचा 'ए' करीत.

सुप्रसिद्ध नट-दिग्दर्शक गजानन जागिरदार अमरावतीलाच चौथीपर्यंत शिकले. सुप्रसिद्ध नाटककार जयराम केशव ऊर्फ भाऊसाहेब असनारे यांनी आपले आयुष्य संगीत नाटकांना वाहून टाकले. आजही असनारे घराण्याची आजची पिढी संगीत, वादन आणि गायन या क्षेत्रात नाव मिळवित आहे. परंतु आज हे कुटुंब सांगलीला स्थायिक झाले आहे.

दादासाहेब खापर्डे ह्यांनी हिराबाई बडोदेकरांना 'गानकोकिळा' पदवी अमरावतीलाच प्रदान केली होती.

पूर्वी राजकमल चौकात 'महाराष्ट्र प्रकाशन' या नावाची सुप्रसिद्ध प्रकाशन संस्था होती. या प्रकाशनाने आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, जयवंत दळवी इ. नामवंत लेखकांची काही पुस्तके एका काळात प्रकाशित केली होती. कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी 'जयध्वज' नावाचे नाटक लिहून त्याचा पहिला प्रयोग १९०५ च्या सुमारास अमरावतीला केला होता. विख्यात लेखक रा. भि. जोशी हे अमरावतीला शिकले आणि काही वर्षे अमरावतीच्या डेप्युटी कमिशनरच्या ऑफिसात नकलनवीस म्हणून काम केले. ह.भ.प. ल. रा. पांगारकर हे काही काळ अमरावतीला शिक्षक होते. डॉ. श्री. व्य. केतकर हे त्यांचे विद्यार्थी. अमरावतीच्या एके काळच्या साहित्य आणि सांस्कृतिक जीवनाचा हा धावता आढावा.

लेखक सुरेश अकोटकर (भावचित्रे )
अमरावती

#उत्सवअभिजातमराठीचा

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...