Thursday, July 24, 2025

DIO NEWS AMRAVATI 24.07.2025
















सरन्यायाधिश न्या. भूषण गवई यांचे आगमन

अमरावती, दि. 24 (जिमाका) : मा. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे आज सायंकाळी ४ वाजता बेलोरा, अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी खासदार बळवंत वानखेडे, आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपस्थित होते.

त्यानंतर सरन्यायधीश न्या.  श्री. गवई नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

00000

--






 

हुमणी अळी नियंत्रणासाठी उपाययोजना

अमरावती, दि. 24 (जिमाका) : बहुभक्षीय हुमणी अळीच्या (Holotrichia serrata) प्रभावी व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. हुमणी अळी ही जमिनीमध्ये राहून विविध खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या मुळांवर उपजीविका करणारी कीड असून, वेळेवर उपाय न केल्यास मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करते. होलोट्रीचिया प्रजातीच्या या अळीमुळे विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर, मका, भात, गहू, ऊस, मिरची, वांगी, सुर्यफूल व अन्य पिकांमध्ये नुकसान होताना आढळते.

पावसाळ्यात कीड नियंत्रणासाठी कृषी विभागाने पुढील उपाय सुचवले आहेत :

शेतीतील निरीक्षण आणि प्रकाश सापळ्यांचा वापर पावसानंतर सायंकाळी शेतातील बाभूळ, कडुलिंब व बोर झाडांखाली प्रकाश सापळे लावावेत. एका मादी भुंग्याचा नाश झाल्यास पुढील 40 ते 50 अळ्यांचा नाश होतो.

फवारणीची शिफारस ज्या भागात सतत हुमणी किडीचा प्रादुर्भाव होतो, तिथे संबंधित झाडांवर कीटकनाशकाची पहिली फवारणी करावी. प्रत्येक झाडावर 20 किंवा त्यापेक्षा अधिक भुंगे आढळल्यास नियंत्रणासाठी मोहीम हाती घ्यावी.

प्रादुर्भावाचे निदान कसे करावे?

शेतात एकरी 20 ठिकाणी (1 फूट x 1 फूट x 6 इंच खोलीचे) मातीचे नमुने घेऊन अळ्यांचा शोध घ्यावा. झाडांची पाने पिवळी पडून सुकल्यास आणि झाड कोलमडले असल्यास, ती झाडे उपटून मुळे कुरतडलेली आहेत का ते पाहावे.

जैविक नियंत्रण उपाय

तुरळक प्रादुर्भाव आढळल्यास मेटॅरायझियम ही जैविक मित्र बुरशी 4 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवावी किंवा 1 किलो मेटॅरायझियम 100 किलो शेणखतात मिसळून एक हेक्टरमध्ये वापरावे.

रासायनिक उपाय योजना - गंभीर प्रादुर्भावासाठी

जर प्रादुर्भाव लक्षणीय प्रमाणात असेल, तर खालीलपैकी एक रासायनिक उपाय करावा : फिप्रोनील 40 टक्के + इमिडॅक्लोप्रिड 40 टक्के  (दानेदार)-5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाजवळ ओतावे. कार्बोफ्यूरॉन 3 टक्के दानेदार -33.30 किलो प्रति हेक्टर, थायोमेथोक्झाम 0.4 टक्के + बायर्फेनथ्रिन 0.8 टक्के - 12 किलो प्रति हेक्टर, थायोमेथोक्झाम 0.9 टक्के + फिप्रोनिल 2 टक्के - 12 ते 15 किलो प्रति हेक्टर.

वरील सर्व रसायने पिकाच्या खोडांजवळ जमिनीत मिसळावीत आणि वापराच्या वेळी जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. तसेच मजुरांना योग्य सुरक्षा साधने पुरवावीत. शेतकऱ्यांनी वेळेवर उपाययोजना केल्यास हुमणी अळीच्या नियंत्रणात यश मिळू शकते, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती यांनी केले आहे.

0000




मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहाय्याने बालकाची यशस्वी शस्त्रक्रिया

            अमरावती, दि. 24 (जिमाका) : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत वडगांव तालुका, अचलपूर येथील वीरेंद्र प्रफुल्ल कंटाळे, (वय -अडीच वर्षे ) या बालकाची अतिशय अवघड शस्त्रक्रिया अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली. या शस्त्रक्रियेला लागणारा संपूर्ण निधी हा जिल्हास्तरावरील कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत देण्यात आला. नागपूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी बालकाचे वडील प्रफुल्ल कंटाळे यांनी शासनाचे आभार मानले.

  राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 या वयोगटातील मुलांची आरोग्याची तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये शस्त्रक्रियेसाठी संदर्भित बालके निघतात, त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये वीरेंद्रच्या   पायाचा त्रास लक्षात आला. या त्रासामुळे त्याला मांडी घालून बसता येत नव्हते. यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी लागणारा सुमारे एक लक्ष रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत देण्यात आला. वीरेंद्रला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून पुढील वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

            अमरावती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे  डॉ. श्याम गावंडे  तसेच डॉ सुषमा सावलकर , राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक, अचलपूर व कर्मचारी यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे तातडीने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.  

00000






 

Wednesday, July 23, 2025

DIO NEWS AMRAVATI 23.07.2025

 सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई तीन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर

अमरावती, दि. 23 (जिमाका) : सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे गुरूवार, दि. 24 जुलैपासून तीन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दारापूर, दर्यापूर आणि अमरावती येथील विविध कार्यक्रमाला न्या. गवई उपस्थित राहतील.

उद्या गुरुवार, दि. 24 जुलै  दुपारी 3. 45 वाजता बेलोरा विमानतळ, अमरावती येथे आगमन होईल.

शुक्रवार, दि. 25 जुलै रोजी सकाळी 10.45 वाजता दारापूर येथील विविध कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजल्यापासून दर्यापूर येथील विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता दर्यापूर येथील नवीन न्यायालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील.

शनिवार, दि. 26 जुलै रोजी सकाळी 10.35 वाजता सिपना कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय येथील ई -लायब्ररीचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून सोयीनुसार बेलोरा विमानतळावरून श्रीनगरकडे प्रयाण करतील.

00000

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

यांचा  अमरावती दौरा

             अमरावती, दि. 23 (जिमाका) : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा शुक्रवार, दि. 25 जुलै रोजीचा अमरावती दौरा पुढीलप्रमाणे:

            शुक्रवार, दि. 25 जुलै  रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथील परीक्षा भवन व प्रशासकीय इमारत, उपहारगृह, विद्यार्थ्यांचे सामान्य कक्ष उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पीडीएससी कॅम्पस, मोर्शी रोड, येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती येथे आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल्स असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 40 व्या वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थिती. दुपारी 2 वाजता आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ, बहिरमकुऱ्हा, चांदूरबाजार येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 वाजता बहिरमकुऱ्हा येथून वाहनाने समृध्दी महामार्गाने नागपूरकडे प्रयाण.

00000




जिल्हाधिकारी कार्यालयात  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन

            अमरावती, दि. 23 (जिमाका) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अधीक्षक निलेश खटके  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

      अधिकारी - कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  उपस्थितांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

रोहयोच्या विहिरींची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 23 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) तिवसा तालुक्यात सुरू असलेल्या विहिरींच्या कामांना गती देण्यासाठी पंचायत समितीने महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. तालुक्यात एकूण ५८४ विहिरींची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंर्तगत वैयक्तिक सिंचन विहीर ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. यात विहीरी खोदुन व बांधुन पूर्ण करणे ही वैयक्तिक लाभार्थ्यांची जबाबदारी आहे. विहीरीच्या बांधकामासाठी प्राप्त होणारा कुशल, अर्धकुशल निधी हा विहिरीचे भौतिकदृष्ट्या काम पुर्ण झाल्यावरच तांत्रिक अधिकाऱ्यामार्फत मोजमाप करुन व शासनाला मागणी सादर केल्यानुसार प्राप्त होत असतो.

मात्र कुंपन घातलेला नाही आणि बांधकाम अपूर्ण असलेल्या विहीरी शेतकरी व जनावरांसाठी धोकादायक ठरत आहे. अशा विहीरीमुळे जावरा शिवारात घडलेल्या दुर्घटनेमुळे विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर अपुर्ण विहीरीचे काम पुर्ण करणे कठीण आहे. मात्र सर्व लाभार्थी आणि शेतकऱ्यांनी शेतातील विहीरीचे काम अपूर्ण असल्यास खबरदारीने उपाय म्हणून सदर जागी तातडीने संरक्षण कुंपण लावुन घ्यावे. तसेच शक्य तितक्या लवकर बांधकाम पूर्ण करावे. याबाब पॅनल तांत्रिक अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांनी अपूर्ण विहीरींना प्रत्यक्ष भेट देवून लाभार्थ्यांना अवगत करून कोणतीही दुर्घटना घडणार नाही यांची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पंचायत समिती तिवसा अंतर्गत मनरेगामध्ये खोदलेल्या व बांधकाम पूर्ण केलेल्या विहिरींच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विहिरींची कामे अपूर्ण असलेल्या ठिकाणी तातडीने पाहणी करून ती पूर्ण करण्याची जबाबदारी तांत्रिक अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि रोजगार सेवक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तांत्रिक अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांनी विहिरींना प्रत्यक्ष भेट देऊन कामाची सद्यस्थिती तपासण्यास व उर्वरित कामे त्वरीत पूर्ण करावे, असे आवाहन तिवसाचे गटविकास अधिकारी यांनी केले आहे.

000000










जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा चांदूर रेल्वे उपविभाग दौरा;
'माझी सुंदर शाळा' अभियान, सूतगिरणी व रोपवाटिकेची पाहणी
अमरावती, दि. २३ (जिमाका) :अमरावती जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चांदूररेल्वे उपविभागातील नांदगाव खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे तालुक्यांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शिक्षण, उद्योग, वनीकरण, कृषी आणि प्रशासकीय कामकाजाचा विस्तृत आढावा घेतला.
'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' अभियानाला प्रोत्साहन:
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जि. प. शाळा पीएम श्री दाभा येथे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी भेट दिली. या शाळेने 'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' अभियान अंतर्गत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्हाधिकारी यांनी या शाळेतील विविध अभिनव उपक्रमांची माहिती जाणून घेतली. शाळेतील आयसीटी (ICT) लॅबला भेट दिली. यावेळी त्यांनी 'मिशन आरंभ' अंतर्गत नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षकांना शैक्षणिक कार्याविषयी सूचना दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनीही जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांचे 'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' अभियानाअंतर्गत प्रथम क्रमांक पटकाविल्याबाबत अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डीजी कॉटसिन सूतगिरणीची पाहणी:
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दाभा येथील डीजी कॉटसिन (DEGEE cotsyn) सूतगिरणीला भेट दिली. येथे त्यांनी वस्त्रोद्योग मूल्य साखळी (Textile industry Value chain) बाबत सविस्तर माहिती घेतली. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.
सामाजिक वनीकरण आणि मनरेगा मजुरांशी संवाद:
माहुली चोर येथील सामाजिक वनीकरण रोपवाटिकेलाही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याशी रोपवाटिका प्रकल्पाबद्दल चर्चा केली. तिथे काम करणाऱ्या मनरेगा मजुरांशी जिल्हाधिकारी यांनी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ग्रामरोजगार सेवकांचे मस्टर तपासले आणि त्यांना सनकोट, टी-शर्ट व कॅपचे वाटप करून त्यांच्या कामाचे कौतुक केले. 'एक पेड माँ के नाम' या संकल्पनेनुसार वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
कृषी क्षेत्राचा आढावा आणि गोडाऊन पाहणी:
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नवीन गोडाऊनची पाहणी करून जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी ज्वारी खरेदी केंद्राला भेट दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली.
विभागप्रमुखांची आढावा बैठक:
उपविभागीय अधिकारी कार्यालय, चांदूर रेल्वे येथे उपविभागातील तिन्ही तालुक्यातील विभागप्रमुखांची यावेळी बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषी विभाग, पंचायत समिती, नगरपरिषद, वनविभाग, शिक्षण विभाग, आणि भूमिअभिलेख विभाग या प्रमुख विभागांच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधितांना त्यांनी निर्देश दिले.
एफपीओ (FPO) शेतकऱ्यांशी चर्चा:

चांदूर रेल्वे तालुक्यात लखदातार येथे स्मार्ट अंतर्गत उभारण्यात आलेल्या एफपीओ (Farmer Producer Organisation) यांच्या गोडाऊन व प्रोसेसिंग युनिटला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. एफपीओला येणाऱ्या अडचणी आणि इतर विषयांवर शेतकऱ्यांशी थेट चर्चा करून, त्यांच्या समस्यांची नोंद घेतली.
उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, नांदगाव खंडेश्वर तहसीलदार अश्विनी जाधव, धामणगाव रेल्वे तहसीलदार अभय घोरपडे, चांदुर रेल्वे तहसीलदार पूजा माटोडे, मुख्याधिकारी नगरपरिषद चांदुर रेल्वे विकास खंडारे, नांदगाव खंडेश्वर गट विकास अधिकारी स्नेहल शेलार, चांदुर रेल्वे गट विकास अधिकारी संजय खारकर तसेच संबंधित विभाग प्रमुख, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
***

Tuesday, July 22, 2025

DIO NEWS AMRAVATI 22.07.2025

 


कौशल्य विकास केंद्राचा महारोजगार मेळाव्याला  युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!


अमरावती, दि. २२ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती, आणि सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आज यशस्वीरित्या पार पडला.

या मेळाव्याला आमदार संजय खोडके, आमदार श्रीमती सुलभा खोडके, श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे वसंतकुमारजी मालपाणी तसेच श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भांगडिया आणि प्रा. दिवेश सूर्यवंशी, श्रीमती चांडक  यावेळी उपस्थित होत्या. 


     या मेळाव्याला  जिल्ह्यासह परिसरातील विविध तालुक्यांमधून ४०० पेक्षा अधिक उमेदवारांनी उपस्थिती लावली. यामध्ये ३०० हून अधिक रिक्त पदांसाठी विविध नामांकित कंपन्या, ज्यात रेमंड लाइफस्टाइल, कॉटन अमरावती, इंडस्ट्रीज प्रा.लि., गुरुलक्ष्मी कोटेक्स प्रा.लि., टेक्नोक्रॉफ्ट, फ्लिपकार्ट, मुस्ली टोयोटा बजाज ऑटो, कोअर प्रोजेक्ट, आयलर्न फाउंडेशन, जाधव गियर्स लि, स्पंदन मायक्रो फायनान्स प्रा.लि., स्विगी, रेडियंट हॉस्पिटल, जिनस पॉवर लि. यांचा सहभाग होता. उद्योग, उत्पादन, आयटी, विक्री, मार्केटिंग आणि इतर क्षेत्रांतील प्रतिनिधींनी थेट ४७६ मुलाखती घेतल्या. यात २२४ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर ४ उमेदवारांची अंतिम निवड जागेवरच करण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. इतर उमेदवारांच्या मुलाखती पुढील प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आल्या. या मेळाव्यातील ठळक बाबींमध्ये ७ हजार१०० उमेदवारांची (ऑनलाइन/ऑफलाइन) उपस्थिती, १४ हून अधिक कंपन्यांचा सहभाग, ३०० पेक्षा जास्त रोजगाराच्या संधींची उपलब्धता आणि १०वी पास ते पदवीधरांपर्यंतच्या उमेदवारांचा सहभाग यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय खोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. श्री . खोडके यांनी अमरावती व विदर्भातील उद्योजकतेच्या आणि रोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली. आकडेवारी व प्रात्यक्षिक उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित उमेदवारांसमोर स्थानिक उद्योगविश्वाचे स्पष्ट चित्र मांडले. ते म्हणाले की, नोकरीची संधी उपलब्ध झाल्यानंतर जरी त्यामध्ये अडथळे निर्माण झाले, तरी त्या अडथळ्यांना मेहनतीने, जिद्दीने व विकासाने सामोरे जाण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असले पाहिजे, तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो. त्यांनी युवकांना उद्योगधंद्यांची नवदिशा दाखवण्याबरोबरच, रोजगारक्षम असणाऱ्या उमेदवारांना नव्या संधी मिळाव्यात यासाठी प्रेरणा दिली. 

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमदार श्रीमती सुलभा खोडके उपस्थित होत्या. त्यांनी शासन, लोकप्रतिनिधी आणि उद्योजक यांच्या सुसंवादातून स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील यावर माहिती दिली. युवकांनी कौशल्य वाढवून नवनवीन संधी मिळवाव्यात आणि आपल्या यशाने संपूर्ण जिल्ह्याचे भाग्य समृद्ध करावे, असे मत  त्यांनी व्यक्त केले. नोकरी इच्छुक उमेदवारांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

     रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असून, भविष्यात अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे , असे आयोजक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी सांगितले.

   रोजगार मेळाव्याचे सूत्रसंचालन श्रीमती संपदा डावरे यांनी केले. 

                        ****




नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्जांसाठी अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत

अमरावती, दि. 22 (जिमाका): शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) 2.0 वर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2025 आहे. शाळा स्तरावरील पडताळणीची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2025, तर जिल्हा स्तरावरील पडताळणीची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 आहे.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांचे आधार कार्डावरील नाव, बँक खात्याचे नाव आणि NMMS परीक्षेच्या गुणपत्रकातील नाव एकसारखे असणे बंधनकारक आहे. या अटीची पूर्तता न केल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. तसेच, सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी INO (Institutional Nodal Officer) आणि HOI (Head of Institution) निश्चित करून एनएसपी पोर्टलवर FACE AUTHENTICATION (OTR) करणे अनिवार्य आहे.

सन 2024-25 मध्ये NMMS परीक्षेद्वारे निवड झालेल्या नववीतील विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज आधारकार्डनुसार भरणे आवश्यक आहे. तर, इयत्ता 10 वी, 11 वी व 12 वी मधील विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाचे अर्ज भरणे बंधनकारक आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन NSP 2.0 पोर्टलवरच अर्ज करावेत. विहित मुदतीपूर्वी शाळा व तालुका स्तरावरून नवीन व नूतनीकरण अर्जांची पडताळणी पूर्ण करावी. त्रुटी असलेले अर्ज त्वरित दुरुस्त करून मुदतीपूर्वी ऑनलाइन भरून पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                                                       000000






पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात तरुणांना रोजगार प्राप्त

अमरावती, दि. 22 (जिमाका): जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची दिशा देणारा 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' नुकताच  श्री गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज मोझरी, ता. तिवसा येथे यथे आयोजित करण्यात आला होता. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच मॉडेल करिअर सेंटर आणि डाखरे महाराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्याने अनेक तरुणांना त्यांच्या करिअरसाठी संधी उपलब्ध करून दिली.

या मेळाव्याचेउद्घाटन गुरुदेव नगरचे उपसरपंच मिलिंद काळमेघ यांच्या हस्ते झाले. यावेळी गुरुदेव मानव विकास संस्थेचे  अमोल बांबल, गुरुकुल मोझरीचे संचालक रवी मानय ,डाखरे महाराज फाउंडेशनचे संचालक  धनंजय डाखरे उपस्थित होते.

उद्योग, उत्पादन, आयटी, विक्री, मार्केटिंग आणि इतर क्षेत्रांतील प्रतिनिधींनी थेट 202 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यापैकी 79 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर 11 उमेदवारांची अंतिम निवड जागेवरच करण्यात आली. या मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे 2 हजार उमेदवारांचा सहभाग, 40 प्रमुख कंपन्यांचा सहभाग, 75 पेक्षा अधिक नोकरीच्या संधी आणि 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी हा मेळावा खुला होता. 'गार्डियन्स ट्रेनिंग अकॅडमी, हैदराबाद', 'टेक्नोक्राफ्ट प्रा. लि., नांदगाव पेठ, अमरावती', 'स्पिनी व्हॅल्युड्राइव्ह टेक्नॉलॉजी प्रा. लि., गुरुग्राम', 'फातेमा कॉलेज ऑफ नर्सिंग, तिवसा, अमरावती' या नामवंत कंपन्यांनी विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या. काही उमेदवारांची लगेच निवड झाली, तर काहींची प्राथमिक निवड करण्यात आली.

रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात अशा उपक्रमांचे आयोजन करून तरुणाईच्या स्वप्नांना दिशा देण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. मेळाव्याचे  संचालन राजूभाऊ हरणे यांनी, तर आभार धनंजय डाखरे यांनी मानले.

00000

Monday, July 21, 2025

DIO NEWS AMRAVATI 21.07.2025

                                               






          

                               महिलांच्या हितासाठी एकत्रितपणे कार्य करावे

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 21 (जिमाका) : महिला व बालविकास विभाग हा शासनासाठी अत्यंत महत्वाचा विभाग आहे. महिलांच्या सर्वांगीण विकास आणि उत्थानासाठी शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण, चाईल्ड हेल्पलाईन, बाल विवाह प्रतिबंध, बाल संरक्षण संस्थेची त्रैमासिक सभा, कोवीडमुळे पालकत्व गमाविलेल्या बालकांची काळजी व संरक्षण कृती दल सभा, पुनर्वसन समितीची त्रैमासिक सभा, अपराधी परिविक्षा अधिनियमानुसार सभा, महिला सल्लागार समितीची त्रैमासिक सभा पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, विभगीय महिला व बालविकास अधिकारी विलास मसराळे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी अतुल भडांगे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, महिलांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. यामुळे महिला विकासात योगदान देऊ शकतील. अल्पवयात लग्न, मुले होणे, घरगुती हिंसाचार यामुळे महिलांचे खच्चीकरण होत असून विभागाने महिलांकडे पाहण्याचा कल बदलविण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने बाल विवाह रोखल्यास निर्माण होणाऱ्या समस्या निकाली निघू शकतील. महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिल्यास त्या आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे त्यांना पारंपारिक प्रशिक्षणापेक्षा वेगळे प्रशिक्षण देण्यात यावे.

येत्या पिढीला अंमली पदार्थापासून वाचविणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनी कार्यवाही वाढवावी. शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. याबाबत शिक्षणाधिकारी यांनी खातरजमा करावी. तसेच मुलांसाठी असलेल्या चाईल्ड हेल्पलाईनची माहिती प्रत्येक शाळेत देण्यात यावी. अल्पवयीन मुलांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना त्याची माहिती बाल संरक्षण कक्षास देण्यात यावे. यामुळे त्यांचे समुपदेशन होऊ शकेल. रेल्वेस्टेशनप्रमाणे महत्वाच्या बसस्थानकावरही मुलांसाठी मदत कक्ष उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या.

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिलांच्या उद्योजकतेला वाव देण्यात येत आहे. त्यांच्यातर्फे निर्मित वस्तूंना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे महिलांमध्ये उद्योजकता वाढावी यासाठी आरसेटी, जिल्हा उद्योग केंद्र या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचा उपयोग करून घ्यावा. महिलांच्या विकासाठी विभाग म्हणून भूमिका महत्वाची राहणार आहे. त्यामुळे येत्या काळात परिणामकारक ठरतील, अशा कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

00000

जिल्ह्यातील घरकुलांना मोफत टीपी वाटपाला वेग

अमरावती, दि. 21  (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील घरकुलांना पाच ब्रास वाळू वाटपाला वेग आला आहे. आतापर्यंत साडेनऊ हजार ब्रास वाळूचे वितरण 7 हजार 710 लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. वाळू वितरणाची प्रक्रिया वेगात सुरू झाल्याने घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू वितरणाची प्रक्रिया वेगात सुरू असून विविध पाच टप्प्यात वाळूचे वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 54 हजार 949 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 7 हजार 710 लाभार्थ्यांना 9 हजार 427 ब्रास वाळूचा पुरवठा करण्यात आला आहे.

जिल्ह्यात घरकुलांच्या बांधकामासाठी एकूण 2 लाख 15 हजार 14 ब्रास वाळूची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये स्थानिक वापरासाठी 165 वाळू गट राखीव ठेवण्यात आले आहे. त्यातून 54 हजार 918 ब्रास वाळूसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, एकही वाळू गट अद्यापही लिलावात विकल्या गेलेला नाही, त्यामुळे हा संपूर्ण साठा घरकुल लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

तालुकानिहाय वाळू वाटपाचा तपशील (लाभार्थी संख्या आणि वाटप झालेली वाळू ब्रासमध्ये) अमरावती-15 लाभार्थी, 75 ब्रास,  तिवसा- 31, लाभार्थी, 121 ब्रास, भातकुली- 751 लाभार्थी, 759 ब्रास, चांदूर रेल्वे- 306 लाभार्थी, 355 ब्रास,  नांदगाव खंडेश्वर- 399 लाभार्थी, 430 ब्रास,  धामणगाव रेल्वे- 208 लाभार्थी, 241 ब्रास,  मोर्शी- 458 लाभार्थी, 458 ब्रास,  वरुड- 479 लाभार्थी, 490 ब्रास, दर्यापूर- 265 लाभार्थी, 628 ब्रास, अंजनगावसुर्जी- 350 लाभार्थी, 350 ब्रास, अचलपूर- 2 हजार 731 लाभार्थी, 2 हजार 991 ब्रास, चांदूरबाजार-217 लाभार्थी, 1 हजार 29 ब्रास,  धारणी- 1 हजार 500 लाभार्थी, 1 हजार 500 ब्रास,  चिखलदरा-0 लाभार्थी, 0 ब्रास.

000000

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

*ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत मुदत

अमरावती, दि. 21 (जिमाका) : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत यांना मानधन सन्मान योजनेअंतर्गत मानधन मंजूर करण्यात येतात. त्यानुसार ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांकडून सन 2025-26 या वर्षाकरिता दि. 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेच्या लाभासाठी पात्रता ही वय 50 वर्षापेक्षा जास्त असावे. दिव्यांगांना वयाची अट 10 वर्षांने शिथिल आहे. यात कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी 15 वर्षे असेण आवश्यक आहे. साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. तसेच वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहणार आहे. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रूपयांपेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच अवलंबून आहे, असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबू होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न मिळत नाही असे कलाकार किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेंतर्गत नसलेले पात्र कलाकार तसेच कलाकार, साहित्यिक हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक आहे.

अर्जासोबत पती-पत्नीचा एकत्रित पासपोर्ट आकाराचा फोटो, सक्षम अधिकारी यांनी साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचा बँक खाते क्रमांक आणि बँकेचा आयएफएससी कोड क्रमांक साक्षांकीत प्रत, जन्मतारखेचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला, ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका यांच्या समक्ष अधिकाऱ्यांनी रहिवाशी असल्याबाबत दिलेला दाखला किंवा तहसिल कार्यालयाचे रहिवासी अधिवास प्रमाणपत्र, तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला, रोगाबाबत, अपंगत्वाबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांचे ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र, इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरी केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत, अर्जामध्ये नमुद इतर कलेसंबंधी कागदपत्रे ही मागील 15 ते 20 वर्षांतील आवश्यक पुरावे साक्षांकित केलेले असणे बंधनकारक आहे. यासोबतच आधार कार्डची सत्यप्रत, अर्जदाराचे अर्जासोबत कलाक्षेत्राबाबत परिचय पत्र तयार करून त्यामध्ये वर्षनिहाय उल्लेखनीय कार्याबाबत उल्लेख करावा, ही सर्व कागदपत्रे प्रस्तावास जोडावीत.

केंद्र, राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त असल्यास सांस्कृतिक संचालनालयाकडून पुरस्कार अथवा साहित्यिक असल्यास साहित्य प्रकाशित झाल्याबाबतचे आवश्यक पुरावे, साहित्यिक क्षेत्रात पुरस्कार प्रमाणपत्र प्राप्त असल्यास अर्जासोबत जोडावे. अर्जदाराने अर्जामध्ये ज्या कला क्षेत्राचा उल्लेख केला असेल त्या कलाक्षेत्रासंबंधीचे आवश्यक पुरावे जोडावेत. रेडिओ, आकाशवाणी प्रसारमाध्यमांवर कार्यक्रमाचे सादरीकरण केले असल्यास त्याबाबतच्या सत्यप्रती जोडावी. कार्यक्रम सादर केल्याबाबतचे छायाचित्रे कात्रणे त्यामध्ये अर्जदाराचा कला सादरीकरणाचा उल्लेख असणे आवश्यक आहे.

निकषांची पुर्तता करणाऱ्या वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांनी परिपूर्ण प्रस्ताव, अर्ज आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने दि. 31 जुलै 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास यांनी केले आहे.

00000

आज लघुसिंचन योजनेसाठी प्रगणना प्रशिक्षण

अमरावती, दि. 21 (जिमाका) : जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाच्या वतीने लघुसिंचन योजनेंतर्गत 'सातवी प्रगणना' आणि 'जलसाठ्याची दुसरी प्रगणना' याबाबत विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण मंगळवार, 22 जुलै 2025 सकाळी 11.30 वाजता शेगाव नाका येथील अभियंता भवनात होणार आहे.

भौतिक स्तरावर काम करणाऱ्या प्रगणनांना मोजमाप प्रगणनेमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रशिक्षणासाठी तालुकास्तरीय सूची तयार करण्यात आली असून, प्रत्येक प्रगणकाने स्वतःचा लॅपटॉप आणणे बंधनकारक आहे, यामुळे त्यांना तांत्रिक सराव करता येईल. या प्रशिक्षणामुळे लघुसिंचन योजनेतील प्रगणना प्रक्रिया अधिक सुलभ आणि अचूक होण्यास मदत मिळणार आहे, असे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनील जाधव यांनी कळविले आहे.

0000


न्यूक्लिअस बजेट योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

अमरावती, दि. 21 (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या न्यूक्लिअस बजेट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

सुरुवातीला अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2025 होती. परंतु, अनेक लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत असल्याने विविध संघटनांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेऊन आदिवासी विकास विभागाने ही मुदतवाढ दिली आहे. इच्छुक अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी nbtribal.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी प्रकल्प कार्यालय विकास शाखेशी 07226-224217 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधवेत.

योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेतीच्या संरक्षणाकरिता तार जाळी, सोलर फेन्सिंग 85 टक्के अनुदान, आदिवासी युवतींना शिलाई मशीन खरेदीसाठी 85 टक्के अर्थसहाय्य, आदिवासी शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच 85 टक्के अनुदान, आदिवासी बचतगटांना मंडप डेकोरेशन, डीजे साऊंड साहित्य खरेदीसाठी 85 टक्के अर्थसहाय्य, आदिवासी महिला, पुरुष बचतगटांना दालमिल उभारण्यासाठी 85 टक्के अर्थसहाय्य, अनुसूचित जमातीच्या बचतगटांना फिरत्या फास्ट फूड सेंटरसाठी 85 टक्के अर्थसहाय्य, आदिवासी लाभार्थ्यांना विविध व्यवसाय यात नळ फिटिंग, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, सुतार काम करण्यासाठी 85 टक्के अर्थसहाय्य, आदिवासी सुशिक्षित युवकांच्या बचतगटांना स्वयंरोजगारासाठी संगणक संच, प्रिंटर, यूपीएस व तत्सम साहित्य खरेदीसाठी 85 टक्के अर्थसहाय्य, आदिवासी बेरोजगार लाभार्थ्यांना पॉपकॉर्न मशिन साहित्य खरेदीसाठी 85 टक्के अर्थसहाय्य, आदिवासी महिला, पुरुष बचतगटांना बेकरी प्रोसेसिंग मशिन खरेदीसाठी 85 टक्के अर्थसहाय्य, वैयक्तिक वनहक्क प्राप्त आदिवासी लाभार्थ्यांना तारकुंपण करण्यासाठी 85 टक्के अर्थसहाय्य, अनुसूचित जमातीच्या दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य, अनुसूचित जमातीच्या वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी 100 टक्के अर्थसहाय्य देण्यात येते.

लाभार्थी निवडताना दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, परित्यक्ता आणि निराधार महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. ऑनलाईन अर्जांनुसार संगणकीकृत यादी तयार करून कागदपत्रे तपासणी करून पात्र-अपात्र अर्जदारांच्या स्वतंत्र याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे कळविले आहे.

000000

  

अल्पसंख्याक उमेदवारांसाठी मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम

*इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 21 (जिमाका) : अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना पोलीस सेवेत भरतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी 'निवासी पोलीस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण' योजना राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना विनामूल्य पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. सन 2025-26 वर्षासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती या प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, निवड चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रूपयांपेक्षा जास्त नसावे, उमेदवार मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू अल्पसंख्याक समाजातील असावा, उमेदवार 18 ते 25 वयोगटातील असावा. मागासवर्गीय उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. पुरुषांची उंची 165 सेंमी आणि महिलांची उंची 155 सेंमी असावी. पुरुषांची छाती न फुगवता 79 सेंमी आणि फुगवून 88 सेंमी असावी, उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा.

प्रशिक्षणात महिला उमेदवारांसाठी 30 टक्के जागा आरक्षित आहेत. उमेदवारांनी यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेखाली पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले असल्यास ते या योजनेसाठी पात्र नाहीत. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना याबाबत बाँड पेपरवर स्वप्रमाणित करणे आवश्यक राहील. या योजनेत उमेदवाराने एकदा प्रशिक्षण घेतल्यानंतर पुन्हा प्रशिक्षण घेता येणार नाही.

योजनेत निवडलेल्या उमेदवारांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणामध्ये दररोज 5 तासांचे वर्ग प्रशिक्षण आणि 3 तास 30 मिनिटांचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस विद्यावेतन दिले जाणार नाही. प्रशिक्षणार्थींना गणवेश यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी दोन हाफ पॅन्ट व दोन टी-शर्ट, तर महिला उमेदवारांसाठी दोन टी-शर्ट व दोन फुलपॅन्ट, बुट 1 जोडी, मोजे 2 जोड्या, बनियन 2, दोन, तसेच प्रसिद्ध प्रकाशकांची पोलीस भरतीविषयक पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल, दोन वेळचे जेवण, चहा आणि नाश्ता आदी सुविधा प्रशिक्षण संस्थेकडून मोफत पुरविल्या जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी दि. 25 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत जोग स्टेडियम, वसंत हॉलमागे, मालटेकडी रोड, अमरावती येथे अर्ज आणि सर्व कागदपत्रांच्या छायाप्रतीसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

00000

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...