Friday, August 29, 2025

DIO NEWS AMRAVATI 29.08.2025













प्राधान्य क्षेत्र ठरवून जिल्हा नियोजनमधून कामे करणार

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

*वितरीत निधी अखर्चित राहिल्यास कारवाई

*नगरपालिका सीसीटीव्ही निगराणीखाली आणणार

अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निधीमधून प्रामुख्याने स्थानिकस्तरावरील कामे करण्यात येतात. यावर्षी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षा ही प्राधान्य क्षेत्र ठरवून‍ जिल्हा नियोजनमधून कामे करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

जिल्हा नियोजन सभागृहात आज जिल्हा नियोजन व विकास निधीबाबत बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, अमर काळे, आमदार धीरज लिंगाडे, संजय खोडके, उमेश यावलकर, प्रविण तायडे, राजेश वानखेडे, केवलराम काळे, प्रताप अडसड, सुलभा खोडके, गजानन लवटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा, जिल्हा अधीक्षक पोलिस अधिकारी विशाल आनंद, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, विकसित भारताचे ध्येय ठरविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विकासाचे ध्येय आणि त्यानुसार जिल्ह्यात कामे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दौरा करून त्यांचे विकासाचे व्हीजन जाणून घेण्यात येणार आहे. यातून जिल्हा नियोजनमधून करणाऱ्या कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. या निधीतून करण्यात येणारी कामे उत्कृष्ट दर्जाची असावीत, यात हयगय केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त गौरव अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा नियोजनचा 1 टक्के निधी वृक्षलागवडीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मेळघाटातील आरोग्याचा प्रश्न हाताळण्यासाठी मेळघाट आरोग्य परिक्रमा राबविण्यात येणार आहे. यातून जिल्हाभरातील तज्ज्ञ डॉक्टरांचे शिबीर आयोजित करून उपचार करण्यात येतील. सुपर स्पेशालिटीमध्ये आयसीयू, रक्तपेढी, रेडीयेशन सेंटर उभारण्याबाबत लक्ष देण्यात येणार आहे.

मनपा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी निधी उपलब्ध करण्यात येतील. त्यासोबतच शाळांमध्ये वर्गखोल्या स्मार्ट होण्यासाठीही मदत करण्यात येतील. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. यासाठी गृह विभागाच्या मार्वल कंपनीसोबत करार करण्यात येणार आहे. सर्वांसाठी घरे उपलब्ध करण्यात येणार आहे. आवास योजनेतून 1 लाख घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांना पट्टेवाटप, गुंठेवारी कायद्यातून अनधिकृत ले आऊट नियमानुकूल करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच सर्वांना मालमत्ता कार्ड देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे. प्रामुख्याने एमडी ड्रग्जची विक्री तसेच त्यामुळे शहरात वाढलेली गुन्हेगारी यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्याच्या सुचना करण्यात आल्या. हॉटेलांना देण्यात आलेल्या परवान्यानुसार वेळ पाळण्यात यावी. परवान्याचे उल्लंघन होत असल्यास 24 तासाच्या आत परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

शहरातील रेल्वे पुलासंदर्भात तातडीने पावले उचलण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत नवीन उपाययोजना करण्यासंदर्भातही माहिती घेण्यात आली. पुलाची दुरूस्ती करून हलकी वाहने आणि पादचारी यांच्यासाठी हा मार्ग खुला करण्याची शक्यता पाहण्याच्याही सूचना करण्यात आल्या. चिखलदऱ्यातील आकर्षण ठरणारा स्कायवॉक येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच चिखलदरा महोत्सवासह चार इको टुरिझम स्पॉट निवडण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून चिखलदऱ्यातील पर्यटकांचा ओढा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना त्यांच्या मागणीनुसार निधी देण्यात येणार आहे. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत जिल्हा नियोजनचा संपूर्ण खर्च करावा लागणार आहे. निधी खर्च झाला नसल्यास संबंधित यंत्रणा प्रमुखांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दिलेला निधी परत घेऊन पुनर्विनियोजनाद्वारे इतर यंत्रणांना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे यंत्रणांनी दक्ष राहून हा निधी प्राधान्याने खर्च होण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

00000



                                 

                               राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात साजरा

अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय क्रीडा दिन' साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आज मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली.

खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार संजय खोडके यांच्या हस्ते क्रिडा दिनाचे उद्घाटन झाले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. नितीन चव्हाळ आणि जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय आळशी उपस्थित होते. डॉ. अनिल बोंडे आणि आमदार संजय खोडके यांनी मेजन ध्यानचंद यांच्या जीवनपैलू वर प्रकाश टाकला. तसेच 'फिट इंडिया’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले.

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त क्रीडा आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांमध्ये प्रथम उजेर खान, द्वितीय प्रतिक गेडाम आणि तृतीय गौरव इंगळे यांनी रोख बक्षीस पटकाविले. महिलांमध्ये प्रथम वैष्णवी वानखडे, द्वितीय पायल मगरदे आणि तृतीय गायत्री बेहरे क्रमांक पटकाविला. त्यांना रोख बक्षीस, पदके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी ‘एक घंटा खेल के मैदान मे’, ‘खेलेगा छात्र तो खेलेगा राष्ट्र’, आणि ‘खेले भी खिले भी’ असे नारे देण्यात आले. सहभागी खेळाडू, नागरिक आणि प्रशिक्षकांनी क्रीडा दिनानिमित्त शपथ घेतली. पोलीस विभागाने वाहतूक आणि पोलीस बंदोबस्त पुरवून सहकार्य केले. संदीप इंगोले आणि अतुल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. त्रिवेणी बांते यांनी आभार मानले.

खेलो इंडिया सेंटरच्या वतीने धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त दि. 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष विघ्ने, वैशाली इंगळे, स्वप्नील चांदेकर, राहुल निवडंगे, प्रफुल्ल डांगे, रितेश अनंतवार, धनंजय भारसाकडे, अकिल शेख, राजपाल इंगळे, अमोल लांडे यांनी पुढाकार घेतला.

000000

 शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 29 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश    दि. 30 ऑगस्ट ते दि. 13 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.

000000

मंगळवारी जिल्हास्तरीय लोकशाही  दिन

अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. परंतु दि. 1 सप्टेंबर रोजी ज्येष्ठागौरी पूजन निमित्त सार्वजनिक सुटी असल्यामुळे सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन, मंगळवार, दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक निलेश खटके यांनी केले आहे.

00000

 

     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 29 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता अकरावी व बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यवसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येईल. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते.

ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्जातील त्रुटी पुर्तता केलेली नाही, त्यांनी त्रुटीची पुर्तता बातमी प्रसिध्द झाल्यापासून सात दिवसाच्या आत करण्यात यावी.  याबाबत विलंब झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची राहील. विद्यार्थ्यांनी त्रुटीची पुर्तता करून आवश्यक कागदपत्र कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा.

अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती चांदुर रेल्वे रोड,   सी. पी. ऑफीसच्या मागे अमरावती  तसेच speldswo_amtrediffmail.com व दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.

000000

 वसतिगृह प्रवेशासाठी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

*इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 18 सप्टेंबर अंतिम मुदत

       अमरावती, दि.29 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांचा लाभ घेण्यासाठी 18 सप्टेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

      बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे.

            वरिल दिलेल्या दिनांकापर्यंत मुलांनी इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, अग्रवाल टॉवर जाफरीन प्लॉट आदर्श होटेल जवळ कॉटन मार्केट रोड अमरावती. तसेच मुलींनी इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक A राम लक्ष्मण संकुल तिसरा मजला रामपूरी कॅम्प जवळ, विलास नगर चौक, अमरावती या वसतिगृहामध्ये सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक गजेंद्र मालठाणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण अमरावती. सामाजिक न्याय भवन पोलीस आयुक्तालयाचे मागे, चांदुर रेल्वे रोड, अमरावती तसेच   ई-मेल आयडी dobbwoamravati@gmail.com यावर कार्यालयाशी संपर्क साधावा.

         12 वी नंतरच्या व्यावसायीक अभ्यासकमास प्रवेश घेतलेल्या  पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करावयाची कालावधी 1 सप्टेंबर  ते 18 सप्टेंबर पर्यंत राहील. अर्जांची छाननी 19 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान होईल. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी 25 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत  6 ऑक्टोबर आहे. त्यानंतर उर्वरित रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड करून यादी      9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होईल. या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 17 ऑक्टोबर 2025 ठेवण्यात आली आहे.

     योजनेच्या अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक गजेंद्र मालठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

00000

              भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी इच्छुकांनी

प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 29 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता अकरावी व बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येईल. परंतु 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते.

सन 2025-26 साठी स्वाधार योजनेचा लाभ घेणेसाठी अनूसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश मिळण्यासाठी रितसर अर्ज केलेला आहे. परंतु वसतिगृहातील मर्यादित प्रवेश क्षमतेअभावी ज्या पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा स्थानिक रहिवासी नसलेल्या व शासन निर्णयातील इतर सर्व अटी व शर्तीची पुर्तता  करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. करिता अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता अकरावी व बारावी  तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यवसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांनी रितसर अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती चांदुर रेल्वे रोड, सी. पी. ऑफीसच्या मागे अमरावती  तसेच speldswo_amtrediffmail.com व दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.

000000

Thursday, August 28, 2025

DIO NEWS AMRAVATI 28.08.2025





                                       शहरातील वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करणार

- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

नवीन पूल बांधण्याच्या शक्यता पडताळणार

पूल बांधणी संदर्भात रेल्वेशीही चर्चा सुरू

      अमरावती, दि. 28 (जिमाका) : अमरावती बडनेरा रेल्वे मार्गावरील वाहतुकीसाठी असलेला पूल क्षतीग्रस्त झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून याबाबत सर्व शक्यता पडताळून पाहण्यास जात आहे. लवकरच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

 

     जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉक्टर मेघा वासनकर आदी उपस्थित होते.

 

    आमदार संजय खोडके यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत गुगल मॅपद्वारे सूचना करण्यात येत आहे. त्याचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले. तसेच गर्दी टाळण्याकरिता नेहरू मैदान येथे तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी. नेहरू मैदान या पर्यायी रस्त्यामुळे बरीचशी वाहतूक नियंत्रित करण्यास मदत होईल, असे सांगितले.

 

      आमदार सुलभा खोडके यांनी रेल्वेने सदर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक होते. सण उत्सवाच्या काळात अचानक रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. यासह मुख्य बाजारपेठेतील चौकात असलेल्या पारधी समाजामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याने याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

 

    रेल्वे मार्गावरील उडाणपूल क्षतीग्रस्त झाल्यामुळे वाहतूक नियंत्रणाची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना समस्या निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक शाखा कार्य करीत आहे. उडाणपुलाच्या कामाबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या निर्देशानुसार उडाणपूल बांधावयाचे झाल्यास यासाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करावे लागेल. तसेच पर्यायी रस्त्याची जागा कुणाला दिली असल्यास याचीही पाहणी करावी लागणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेने खातरजमा करावी. पर्यायी रस्त्याची जागा डीपी रस्त्यावर असल्याबाबत बघण्याचे महापालिकेला सूचना केल्या. सध्या शहरात गणेशोत्सव असल्यामुळे वाहतुकीची सद्यःस्थिती जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतली.

 

000000


शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत

- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

            अमरावती, दि. 28(जिमाका) : ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात विविध भागात अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

             जिल्ह्यात जून, जुलै महिन्यासह ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतपिके बाधित झालेली आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात 44 हजार 588 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यात 272 हेक्टर जमीन खरडून गेली आहे. अतिवृष्टीमुळे कापूस, तूर, सोयाबीन, धान, मका आदींचे नुकसान झाले आहे.

            ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे बाधित 53 कुटुंबातील 216 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 896 घरांची अंशतः पडझड झाली आहे, तर 14 घरांची पूर्णता पडझड झाली आहे. आठ झोपड्या, गोठ्यांची पडझड झाली असून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. तसेच 24 लहान, तर 19 मोठे जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.

            शेतपिकांच्या नुकसानीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी शासनाकडून वेळोवेळी मदत केली जाते आहे. यासाठी शासन स्तरावर पंचनामे सादर होणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीने पंचनामे करावेत, तसेच या पंचनाम्यापोटी आवश्यक असणाऱ्या मदतीच्या रकमेची मागणी शासनाकडे नोंदवावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

00000

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

              अमरावती, दि. 28 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

            त्यांच्या दौऱ्यानुसार, दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समिती सभेला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 4 वाजता महानगरपालिका सभागृह येथे शासकीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच दुपारी 5 वाजता जिल्हा परिषद सभागृह येथे शासकीय बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजल्यापासून श्री गणेश उत्सवानिमित्त बुधवारा येथील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ आणि निलकंठ चौकातील निलकंठ गणेशोत्सव मंडळ, सायन्सकोर मैदान येथील रूख्मिणी गणेशोत्सव मंडळांना भेटी देतील. त्यानंतर रात्री 8.30 वाजता अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण करतील. 

0000

ग्रंथालय, ग्रंथमित्र पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

             अमरावती, दि. 28 (जिमाका): राज्य शासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येत आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

               शहरी व ग्रामीण विभागातील चारही वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख रूपये, 75 हजार रुपये, 50 हजार रुपये, 25 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 50 हजार रुपये, तसेच राज्यातील प्रत्येक महसूली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.

            सन 2024-25 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक ग्रंथमित्र यांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह दि. 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

00000

ओबीसी महामंडळाच्या एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 28 (जिमाका): ओबीसी महामंडळातर्फे एक रक्कमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ थकीत कर्जदारांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकित कर्ज रक्कमेचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एक रक्कमी परतावा ओटीएस योजना दि. 31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

आधारभूत दराने खरेदीसाठी ई पिक पाहणी आवश्यक

अमरावती, दि. 28 (जिमाका): येत्या हंगामापासून आधारभूत दराने खरेदीसाठी ई पिक पाहणी आवश्यक करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत ई पिक पाहणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबिया, मुग, उडिद, सोयाबिन व तूर खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दराने खरेदी करण्यासाठी ई-पिक पाहणी असलेला सातबाराचा उतारा आवश्यक आहे. तसेच सदर खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीव्दारे पार पाडली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघामार्फत करण्यात आले आहे.

000000

Tuesday, August 26, 2025

DIO NEWS AMRAVATI 26.08.2025

                                                                  राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

अमरावती, दि. 26 (जिमाका): हॉकीचे खेळाडू मेजर ध्यानंचद यांचा जन्मदिन दि. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहोचविणे, निरोगी राहण्याचा संदेश, युवक युवतीमध्ये क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जतन व्हावे. यासाठी विविध उपक्रम क्रीडा दिनाच्या निमित्याने आयोजित करण्यात येत आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे क्रीडा स्पर्धा उपक्रमाअंतर्गत दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. ही मॅरेथॉन जिल्हा क्रीडा संकुल येथून निघून बियाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, हायस्कुल चौक. गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कुल चौक येथून परत गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कुल चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, बियाणी चौक, जिल्हा क्रीडा संकुल येथे मॅरेथॉनचा समारोप होईल.

मॅरेथॉन स्पर्धा या खुला गट पुरुष व महिला स्वतंत्रप्रमाणे दोन प्रकारात होतील. पुरुष व महिला गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडुस 3 हजार, व्दितीय 2 हजार, तृतिय 1 हजार रोख पारितोषिक, तसेच सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रीडा अधिकारी त्रिवेणी बाते  मो.नं. 9975590232 यांच्याशी संपर्क साधावा, तसेच खेळाडुंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

000000

 

सण उत्सव कालावधीत शहरात कलम 36 लागू

अमरावती, दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात आगामी काळात सण उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस अधिनियमांतर्गत कलम 36 लागू झाले आहे.

शहरात श्रीशेणशोत्सव सुरू होणार असून त्यादिवशी अमरावती कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात श्रीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच मुस्लीम धर्मियांचा ईद-ए-मिलाद हा सण साजरा करण्यात येणार आहे.  या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार सर्व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना दि. 26 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत अधिकार प्रदान करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिले आहे.

रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, सर्व मिरवणूकाच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चा या ठिकाणी कोणताही रस्ता किंवा अडथळा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा न होवू देण्यासाठी याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यात, सर्व धाब्यावर आणि सार्वजनिक ठिकाणच्या कपडे धुण्याचा व उतरविण्याचा जागेच्या ठिकाणी व इतर सर्व सार्वजनिक किंवा लोकांच्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त राहण्यासाठी, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी हे आदेश देण्यात आले आहे.

0000

मोझरी आयटीआयमध्ये प्रवेशाची पहिली समुपदेशन फेरी पूर्ण

अमरावती, दि. 26 (जिमाका): मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. 25 ऑगस्ट रोजी पहिली केंद्रीय समुपदेशन प्रवेश फेरी पार पडली.

सदर प्रवेश फेरी करिता संस्थेचे प्राचार्य आनंद वाळके यांनी प्रवेशप्रक्रिया राबविली. तसेच संस्थेचे गटनिदेशक व शिल्प निदेशक यांनी सुद्धा प्रवेश प्रक्रियेत आपली कामगिरी उत्कृष्टरित्या बजावली.

सुरुवातीला समुपदेशन फेरीमध्ये 59 प्रवेश निश्चित करण्यात आले. प्रवेशार्थ्यांनी न्यूनतम  व्यवसाय सोलर टेक्निशियन तथा इतर व्यवसायामध्ये प्रवेशाकरिता उत्तम प्रतिसाद दिला. केंद्रीय समुपदेशन फेरीत प्रवेश मिळालेला नसलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशाची अंतिम संधी म्हणजेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरी दि. 28 ऑगस्ट  ते 31ऑगस्टला राहील.

सदर प्रवेश फेरी करिता प्रशिक्षणार्थ्यांनी दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत संस्थेमध्ये येऊन हजेरी लावायची आहे. त्यानंतर ठीक दुपारी 1 वाजता गुणवत्ता यादी प्रदर्शित होऊन गुणवत्ता यादीनुसारच प्रवेश दिले जातील.

प्रवेशाकरिता संस्थेमध्ये सोलर टेक्निशियन, यांत्रिक डिझेल, आरेखक यांत्रिकी, वूडवर्क टेक्निशियन, फॅशन टेक्नॉलॉजी इत्यादी व्यवसायाच्या एकूण 38 जागा रिक्त आहेत. वरील सर्व व्यवसायाकरिता शासकीय तथा निम शासकीय व खाजगी औद्योगिक आस्थापनेमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी या संस्थेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य ए. डी. वाळके यांनी केले आहे.

000000

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 26 (जिमाका): अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुल वाहतुकी योग्य नसल्याने यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे संरचनात्मक लेखपरिक्षण प्राप्त झाले आहे. त्यामुळे जुना आरबीओ तोडून नवीन आरबीओ बांधण्यासाठी या उड्डाणपुलावरून होणारी सर्व वाहतुक पादचारीसह बंद करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरंचनात्मक परिक्षण अहवालाआधारे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी आवश्यक आहे.

प्रवेश बंदी सर्व प्रकारचे वाहन पादचारीसह शहरात अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील राजकमल चौक, हमालपूरा, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक या मार्गाना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपूलावरून सर्व प्रकारचे वाहनांना सदर उड्डाणपुलावरून पुढील आदेशापर्यंत प्रवेश बंदीचे आदेश देण्यात आले आहे.

त्यामुळे पर्यायी मार्ग हमालपूराकडून येणारी प्रतिबंधित वाहने बस स्टँड मार्गे रेल्वे स्टेशन मर्च्युरी टी पॉईट असे यावे. बसस्थानककडून येणारी प्रतिबंधित वाहने बस स्टॅड मार्गे रेल्वे स्टेशन मर्च्युरी टी पॉईट असे यावे. राजकमल चौक व जयस्तंभ चौक कडून येणारी प्रतिबंधित वाहने हे राजापेठ पोलिस स्टेशन समोर राजकमल चौक-जयस्तंभ चौक-मालवीय चौक या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

सदर अधिसुचनेचे उल्ल्ंघन करणाऱ्याविरूध्द मोटार वाहन कायदा 1988 व महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी कळविले आहे.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...