Thursday, November 5, 2026

मोझरी,कौंडण्यपूर आणि वलगाव विकास आराखडयांतर्गत होणार दुरुस्ती कामे

 


तिर्थक्षेत्र विकास आरखडयातील २० कोटींहून अधिक दूरुस्ती कामांना मंजुरी

मोझरी,कौंडण्यपूर आणि वलगाव विकास आराखडयांतर्गत होणार दुरुस्ती कामे

 

अमरावती,दि.५ (जिमाका) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी,श्री.क्षेत्र कौंडण्यपूर आणि श्री.संत गाडगेबाबा वलगाव तिर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत २० कोटी १९ लाख ८५ हजार रुपयांच्या अत्यावश्यक दुरुस्ती कामांच्या प्रस्तावास राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे.

 

         मोझरी,कौंडण्यपूर आणि वलगाव येथील  तिर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चाधिकार समितीची बैठक पार पडली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, नियोजन विभागाच्या सह सचिव गीतांजली बाविस्कर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सचिन चिवटे बैठकीत उपस्थित होते.

 

            या बैठकीत तीनही तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील काम पूर्ण झालेल्या इमारतींच्या दुरुस्ती कामांचे व हस्तांतरणाबाबत  अमरावती विभागीय आयुक्तांना सुधारीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.  त्यानुसार सादर प्रस्तावानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी तिर्थक्षेत्र विकास आरखडयांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यात्मिक संकुल, ग्राम विकास प्रबोधिनीसाठी,भक्त निवास, अति महत्वाच्या व्यक्तींकरिता विश्रामगृहाच्या १२ इमारतींची दुरुस्ती आणि या सर्व इमारतींना कायमस्वरुपी पाणी पुरवठयाची सोय करण्यासाठी एकूण १६ कोटी ५५ लाखाच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

 

            श्री. क्षेत्र कौंडण्यपूर तिर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत प्रसाधनगृह इमारत,पर्यटक विसावा इमारत, उपहारगृह इमारत, विश्रामगृह इमारत आणि पोहोच मार्गासाठी एकूण १ कोटी ८४ लाख २० हजार रुपयांच्या दुरुस्तीकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

 

            संत गाडगेबाबा वलगाव तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील अस्तीत्वातील इमारतींमध्ये सुविधा देण्यासाठी मुख्यत्वे आतील  व बाहेरील रंगरंगोटी,परिसराची साफसफाई,आवश्यक फ्लोरींग तसेच इतर दुरस्ती, रेन वॉटर हार्वेस्टींग,पाणी पुरवठा,विद्युतीकरण अशा कामांसाठी १ कोटी ८० लाख ६५ हजारांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.   

                                                

        ०००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 05.11.2026

निवृत्तीवेतनधारकांसाठी आज 'डिजिटल जीवन प्रमाणपत्र' मार्गदर्शन सत्राचे आयोजन   अमरावती, दि.5 (जिमाका): वरिष्ठ कोषागार कार्यालय, अमराव...