पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 72 उमेदवारांची प्राथमिक निवड
अमरावती, दि. 4 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ३ नोव्हेंबर रोजी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात ७२ नोकरी इच्छुक उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती येथे ३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या मेळाव्याला जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने एकूण १३२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९० उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या. प्रत्यक्ष मुलाखतींपूर्वी उमेदवारांना ‘व्होरा टेक्नॉलॉजीस, नागपूर’ कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर उमेदवारांचे १०-१० चे गट करून गटचर्चा घेण्यात आली आणि शेवटी प्रत्यक्ष मुलाखतींद्वारे ७२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, तसेच व्होरा टेक्नॉलॉजीस कंपनीचे प्रतिनिधी आनंद कुमार आणि एच.आर. मॅनेजर प्रणुती कोटांगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृपा अरगुलेवार यांनी केले, तर पंकज कचरे यांनी आभार मानले.
00000
जिल्ह्यात 12 डिसेंबरला ‘राष्ट्रीय लोकअदालत; प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने मिटवण्याची संधी
अमरावती, दि.4 (जिमाका): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नालसा), दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार, शनिवार, १२ डिसेंबर २०२६ रोजी अमरावती जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोकअदालत’ आयोजित करण्यात आली आहे. या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने आणि कायदेशीर तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि पक्षकारांनी तडजोडपात्र प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यासाठी या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावतीच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्ज्वला एम. नंदेश्वर, आणि प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी केले आहे.
या लोकअदालतीमध्ये सहभागी होण्यासाठी पक्षकारांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क किंवा फी भरावी लागणार नाही. तडजोड झालेल्या प्रकरणांचा अंतिम निकाल त्याच दिवशी लावला जाईल. कोर्टाच्या फेऱ्यांमधून सुटका होऊन दोन्ही पक्षांचे वाद संपुष्टात येतील.
प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित न्यायालयात त्वरित अर्ज करावा किंवा जवळच्या जिल्हा अथवा तालुका न्यायालय विधी सेवा समितीकडे संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रात सांगण्यात आले आहे.
०००००००


No comments:
Post a Comment