Wednesday, June 28, 2017

वनविभागातर्फे जिल्ह्यात लावणार साडेआठ लाख झाडे
             वृक्षारोपण अभियान सायकल रॅलीला मोठा प्रतिसाद   
             
           अमरावती दि.28:  ‘चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया’, ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी’ अशा अनेक घोषणा देत विद्यार्थ्यांनी आज वृक्षारोपणाचा संदेश दिला. निमित्त होते वृक्षलागवड अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे आयोजिलेल्या सायकल फेरीचे!
वन विभागातर्फे दि. 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात 4 कोटी वृक्षलागवड होणार आहे. अमरावती जिल्ह्यात सुमारे साडेआठ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे सर्व विभागांच्या सहकार्याने सायकल रॅली काढण्यात आली. त्यात विविध क्षेत्रातील नागरिकांसह विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.  
          विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. प्रवीण चौहान, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत, सामाजिक वनीकरण उपसंचालक पी. डी. मसराम यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत सहभागी झाले होते.
मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयापासून मोठ्या उत्साहात सायकल रॅलीची सुरुवात झाली. रोपटी व फुलांनी सुशोभित चित्ररथ व त्यापाठोपाठ सायकलस्वार अधिकारी- कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी असे या रॅलीचे स्वरुप होते. पोलीस आयुक्त शहर कार्यालय – मालटेकडी- बसस्थानक- रेल्वेस्थानक- राजकमल चौक- जयस्तंभ चौक- इर्विन चौक- गर्ल्स हायस्कूल चौक या मार्गे रॅली बचतभवनात येऊन तिचा समारोप झाला. 
अनेक शाळा, महाविद्यालये, अशासकीय व सामाजिक संघटनांच्या एकत्रित सहभागातून वृक्षलागवड मोहिम यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही ही मोहिम यशस्वी करण्यात येईल, असे श्री. मीना यांनी यावेळी सांगितले.वनसंरक्षक रवींद्र वानखडे, श्री. कळसकर, सहायक वनसंरक्षक श्री. कविटकर, श्री. पडगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
                                       शुक्रवारी वृक्षदिंडी व वृक्षपूजन
       अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे शुक्रवार, दि. 30 जूनला सकाळी नऊला वृक्ष दिंडी व वृक्ष पूजनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.  वृक्षदिंडीची जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात होऊन ती इर्विन चौक- रेल्वेस्थानक चौक बसस्थानक चौक- पोलीस पेट्रोल पंप- गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जाऊन बचतभवनात समारोप होणार आहे. 
                                     000000









Monday, June 26, 2017

 उत्कृष्ट नागरी सुविधांमुळे अमरावती राज्यात अव्वल ठरेल
- पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

पालकमंत्र्यांकडून विकास कामांची पाहणी
   अमरावती दि.26: जिल्हा न्यायालय, न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा यांच्या अद्ययावत सुविधा असलेल्या प्रशस्त इमारती शहरात आकारास आल्या आहेत. शहरातील उड्डाण पूल, रस्ते आदी विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील. या उत्कृष्ट नागरी सुविधांमुळे अमरावती शहर राज्यात अव्वल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.    
शहरात उभारण्यात आलेल्या जिल्हा न्यायालय, न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा, सुपर स्पेशालिटी रुग्णालय आदी इमारती, राजापेठ उड्डाण पूल, बेलोरा विमानतळ आदी विविध विकास कामे व प्रकल्पांची पालकमंत्र्यांनी आज पाहणी केली. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, शहरात सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा व भविष्यातील विकासाच्या शक्यता पडताळण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन या कामांची पाहणी केली आहे. या पाहणीत सर्वांच्या संकल्पना जाणून घेतल्या व शक्य तिथे विकास कामांत त्यांचा समावेशही केला जाईल.  राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ज्या ज्या विभागांच्या नव्याने इमारती उभारल्या जात आहेत,  त्या विभागांच्या अधिका-यांच्या संकल्पना जाणून घेऊन इमारतींना आकार देण्यात येत आहे. ही सर्व कामे गतीने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
  विमानतळावरील एअर स्ट्रीपची लांबी 1800 मीटरहून 2200 मीटर पर्यंत वाढविल्यास मोठी विमानेही उतरू शकतील. त्यामुळे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे श्री. पोटे- पाटील यांनी यावेळी सांगितले. ही मागणी पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे खासदार श्री. अडसूळ म्हणाले. विमानतळाच्या कुंपण भिंतीला मान्यता मिळाली आहे. लवकरच ते काम सुरु होणार आहे.


महापालिकेसाठी नवीन इमारत
यावेळी पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली. ही जागा तपोवन परिसरात महामार्गालगत असून लवकरच हे काम मार्गी लावण्यात येईल. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे, असे श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी महापालिकेने निधीची तरतूद केली आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.
जिल्हा क्रीडा संकुल
 जिल्हा क्रीडा संकुलासाठी प्रस्तावित 7 एकर जागेची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. या ठिकाणी आर्चरी रेंज, बॅडमिंटन, ज्युडो हॉल, तरणतलाव आदी  सुविधा उभारण्यात येणार आहेत.  या जागेची तत्काळ मोजणी करून घ्यावी व कामाला गती द्यावी, असे निर्देश श्री. बांगर यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
                             वडाळी गार्डन तलावाचे सौंदर्यीकरण
वडाळी गार्डन येथील तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. तलावाची स्वच्छता करुन त्या भोवती चांगल्या दर्जाचे कुंपण उभारावे, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
त्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत, प्रादेशिक न्यास सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे भेट देऊन या तिन्ही इमारतींच्या प्रत्येक कक्षाची पाहणी केली. चित्रा चौक ते मालवीय पुल, राजापेठ उड्डाणपूल येथील कामांची पाहणी करुन या कामांना तत्काळ गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  या प्रकल्पांमुळे नागरी सुविधांत भर पडून विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
                                                              00000








Wednesday, May 24, 2017

खनिज विकास प्रतिष्ठान निधीतून
शिक्षण,स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य द्यावे.
                                               पालकमंत्री प्रविण पोटे –पाटील यांचे निर्देश
              अमरावती दि. 24 : जिल्हयातील खनिज विकास प्रतिष्ठानमार्फत खनिजबाधित क्षेत्रातील  विकासकामे करताना  पायाभुत सुविधेपेक्षा सामाजिक क्षेत्रातील  शिक्षण,पिण्याचे पाणी  व स्वच्छता या   कामांना  प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी आज दिले.
                जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट कार्यकारी परिषदेच्या  बैठकीत ते बोलत होते.यावेळी आमदार रमेश बुंदिले,जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.शिरीष नाईक व खनिज कार्यकारी परिषदेचे  सर्व सदस्य उपस्थित होते.
            दर्जेदार शिक्षणानेच  तळागाळातील लोकांचा विकास करता येईल .या साठी शाळेच्या इमारतींचे बांधकाम,स्वच्छतागृहे, पिण्याचे शुध्द पाणी ,अतिरिक्त वर्गखोल्यांचे बांधकाम आदी सुविधांचे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र योजनेतून प्राधान्याने काम व्हावे.शाळाच्या बांधकामासंबंधीचे प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडुन मागविण्यात यावेत,अशी सुचनाही त्यांनी केली.बरेचदा शाळामध्ये  स्वच्छतागृहे नसल्याने आरोग्याविषयक तक्रारी उदभवू शकतात.विशेषत:मुलींसाठी स्वच्छतागृहे असावीत. शाळांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवुन ती पूर्ण करावीत. शाळेतील कलावर्गात  भिंतीची कलात्मक व शैक्षणिक माहिती देणाऱ्या बाबींचा समावेश करावा .मुख्यमंत्री महोदयांच्या निर्णयानुसार डिसेंबर 2018 पर्यत राज्यातील सर्व शाळा डिजीटल करावयाचे आहेत .याच अनुषंगाने जिल्हयातील खनिज बाधित क्षेत्रातील शाळांमध्ये देखील स्मार्ट बोर्ड,ऑनलाईन शिक्षण तसेच वाचनालय,सुसज्ज्‍ा  प्रयोगशाळा असले पाहीजे.तसेच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गटशेतीचा प्रकल्प प्रायोगीक तत्वावर सुरू करुन तो यशस्वी  होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
                    जिल्हयातील 1811 गावांचा समावेश खनिज बाधीत क्षेत्रात आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली.या खनिजबाधित क्षेत्रातील गावांच्या विकासासाठीच 1 सप्टेंबर 2016च्या निर्णयानुसार जिल्हास्तरावर जिल्हा खनिज प्रतिष्ठानची स्थापना केली आहे.
              एप्रिल 2017 अखेर जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीमध्ये 1 कोटी 68 हजार रुपयांचा निधी  असुन त्यातील प्रशासकीय कामाकरीता 5 टक्के (5 लक्ष), या निधीतील दोन तृतीयांश निधी प्रत्यक्ष बाधित क्षेत्रासाठी (67 लक्ष) निधीतील पायाभुत सुविधेसाठी 27 लक्ष तर शिक्षण ,आरोग्य,महिला व बालकल्याण,पिण्याचे पाणी पुरवठा  या सामाजिक क्षेत्राकरीता 40 लक्ष अशी राखीव तरतुद आहे. तर एक तृतीयांश निधी अप्रत्यक्ष बाधीत क्षेत्रासाठी (33 लक्ष) असुन त्यातील सामाजिक क्षेत्र (20 लक्ष) तर पायाभुत सुविधेकरीता (13 लक्ष) अशी तरतुद केली आहे.
                  जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान कार्यालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जागा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी केली.यावेळी वार्षिक जिल्हास्तरीय कार्यकारी परिषदेच्या सर्व सदस्यांनी आराखडयाला मान्यता दिली.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे उदिष्ट-
·        जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत खनिज बाधीत क्षेत्राचा विकास व कल्याणासाठी कार्यक्रम राबविणे
·        खाणकाम करतांना व त्यानंतर झालेल्या कृतीमुळे तेथील जनतेवर झालेले पर्यावरण,आरोग्य ,व सामाजिक व आर्थिक परिस्थीतीवरील आघात ,परिणाम कमी करणे व त्यावर उपाययोजना करणे.




Sunday, May 21, 2017

मुसळखेडा येथे ग्राऊंडवॉटर रिचार्ज शाफ्टचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जलसंधारण व वृक्षारोपणातून दुष्काळावर मात करु
-          पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

अमरावती, दि. 19 : भूजलपातळीत सुधारणा करण्याच्या हेतूने शासनाने मोठ्या प्रमाणावर जलसंधारण व वृक्षारोपणाची कामे हाती घेतली आहेत. शासन, प्रशासन, विविध संस्था- संघटना यांचा समन्वय व लोकसहभाग याद्वारे जिल्ह्यात ही कामे पूर्ण करुन दुष्काळावर मात केली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज केले.
          भूजल सर्वेक्षण यंत्रणेतर्फे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मुसळखेडा येथील भूजल रिचार्ज शाफ्टचे उद्घाटन करताना श्री. पोटे- पाटील बोलत होते. आमदार अनिल बोंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रिचार्ज शाफ्ट ही योजना भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त असल्याने ती मोठ्या प्रमाणात राबविणे आवश्यक आहे, असे सांगून श्री. पोटे-पाटील म्हणाले की, या उपाययोजनेद्वारे पहिल्या पावसाकत भूजल पुनर्भरण सुरु होते व परिसरातील पाणी साठ्यात वाढ होते. वरुडसारख्या डार्क झोनमधील तालुक्याला ही योजना निश्चितच उपयुक्त ठरेल.


 जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासाठी प्रयत्नपूर्वक पाणी जमिनीच्या पोटात मुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी  ही योजना उपयुक्त आहे, असे श्री. बोंडे यांनी सांगितले.
वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड यांनी यावेळी रिचार्ज यंत्रणेची माहिती दिली.
000

पालकमंत्र्यांकडून वरुड तूर खरेदी केंद्राची पाहणी

            अमरावती, दि. 19 :  जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आज वरुड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाऊन तूर खरेदीची माहिती घेतली.
आमदार अनिल बोंडे यांच्यासह विविध विभागांचे  अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.                   
            यावेळी पालकमंत्र्यांनी खरेदी केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. तुरीची  आवक,  केंद्रावरील उपलब्ध सुविधा याबाबत त्यांनी तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. व  रजिस्टरही तपासले. तूर विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

0000000


 सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा

पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकारांनी केले श्रमदान

       
दुष्काळमुक्ती हेच खरे उद्दिष्ट – पालकमंत्री श्री. पोटे-पाटील



 अमरावती, दि. 19  : पानी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभागी वरुड तालुक्यातील अमडापूर व मुसळखेडा या गावांमध्ये श्रमदानासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी केलेल्या आवाहनाला पत्रकार बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी स्वत: पालकमंत्री व अनेक पत्रकार बांधवांनी श्रमदान करुन गावक-यांचा उत्साह वाढवला.  
 दुष्काळावर मात करण्यासाठी पानी फाऊंडेशन व शासनाच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभागी विविध गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. पालकमंत्री श्री. पोटे- पाटील हे पत्रकार बांधवांसह सकाळीच मुसळखेडा येथे दाखल झाले. आमदार अनिल बोंडे, अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह त्रिदीप वानखडे, विजय ओडे, संजय शेंडे, शशांक चवरे, राजेश सोनोने, संजय बनारसे, सुरेंद्र चापोरकर, प्रशांत कांबळे, अमोल खोडे, अंकुश गुडदे, मीनाक्षी कोल्हे, प्रवीण मनोहर, शशांक नागरे, स्वराज्य माहुरे, मनीष तसरे, अक्षय नागापुरे यांच्यासह अनेक वृत्तपत्र छायाचित्रकार व कॅमेरामन यांनी या कार्यात सहभाग घेतला.
पालकमंत्री व अमरावती येथून दाखल झालेले माध्यम प्रतिनिधी  स्वत: श्रमदानात सहभागी झाल्याने ग्रामस्थांमध्येही उत्साह संचारला. तलाव क्षेत्रातील माती भरावावर टाकण्यासाठी पालकमंत्र्यांसह पत्रकार व अधिका-यांची साखळी तयार करण्यात आली. ‘जल नही तो कल नही’, ‘कावळा करतो काव काव, एक तरी झाड लाव’ अशा घोषणा देत उन्हाची पर्वा न करता सर्वांनी समरसून श्रमदान केले.
मुसळखेडा येथील अनघड दगडी बांधांच्या कामातही दगड वाहून नेण्यासाठी साखळी करुन श्रमदान करण्यात आले. अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे सर्व सदस्य, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, पर्यावरण व खनिकर्म विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गावकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक या कामात सहभागी झाले होते. 




दुष्काळमुक्ती हेच खरे उद्दिष्ट – पालकमंत्री श्री. पोटे-पाटील


स्पर्धेत कुणातरी एकालाच क्रमांक मिळणार असतो. त्यामुळे वॉटर कप स्पर्धेचा हेतू हा केवळ स्पर्धा  एवढाच नसून, दुष्काळमुक्ती हेच खरे उद्दिष्ट असल्याचे मत पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.  
ते म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना आहे. दुष्काळमुक्तीसाठीच्या या योजनेचा लोकसहभाग हाच आधार राहिला आहे. श्रमदानातून होणा-या कामांमागे लोकभावनेची ताकद असते. त्यामुळे ती यशस्वी होतात. हेच लक्षात घेऊन ही पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात व राज्यातही मोठ्या प्रमाणावर कामे होत आहेत. त्यामुळे इतर राज्यांनीही महाराष्ट्राचा आदर्श घेऊन अशा योजना अमलात आणल्या आहेत.
                  
योजना शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांचे योगदान
जलयुक्त शिवार योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे सांगून श्री. पोटे- पाटील म्हणाले की, आजही पत्रकार बांधवांनी स्वत: श्रमदानात सहभागी होऊन विधायक कार्याला प्रेरणा दिली आहे. श्रमदानात सहभागी सर्व पत्रकारांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.

पालकमंत्र्यांकडून एक लाख रुपयांची मदत
यावेळी अमडापूर येथील जलयुक्त शिवार कामांसाठी पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. या कामांत यापुढे कुठलीही अडचण आल्यास शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वरुड तालुक्यातील भूजलपातळीतील घट चिंताजनक होऊन त्याचा डार्कझोनमध्ये समावेश झाला. ही स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तालुक्याची या योजनेसाठी निवड केली, असे सांगून श्री. बोंडे म्हणाले की, आता वरुड तालुका नाला खोलीकरणाच्या कामांत राज्यात आघाडीवर असून, या कामांमुळे भूजलपातळीत सुधारणा होईल. अमडापूर येथील सरपंच सारिका सोनारे, पानी फाऊंडेशनचे अतुल काळे, उज्ज्वल कराळे, गोवर्धन दापूरकर आदी यावेळी उपस्थित होते.
00000









Tuesday, May 9, 2017

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

                अमरावती दि.9 - गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना ही योजना राबविण्यासाठी जलसंपदा,प्रांतअधिकारी,तहसीलदार,कृषी या यंत्रणाची बैठक आज नियोजन भवन येथे
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुळकर्णी,कार्यकारी अभिंयता जलसंधारण तायडे,प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक खरचान,उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना ,रोहयो उपजिल्हाधिकारी रमेश  काळे उप‍स्थित हेाते.
             जलयुक्त शिवार या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमासोबतच जिल्हयात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवावी. प्रांत अधिकाऱ्यांनी  या कार्यक्रमाचे नियोजन करावे .गावे हाती  घ्यावी तसेच ग्रामपंचायतीना सहभागी करावे.या कामासाठी फक्त एक महीना हातात आहे. 31 मे पर्यत तुर खरेदी,जलयुकत शिवार या कामासोबतच गाळमुक्त धरण  व गाळयुक्ता शिवार योजनेचे काम प्राधान्याने करावे अश्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.
6 मे च्या शासननिर्णयाचा अभ्यास सर्व अमंलबजावणी करणाऱ्या यंत्रणानी करावा असे ही त्यांनी सांगीतले.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना
·        धरणात होणाऱ्या गाळाच्या संचयामुळे धरणाच्या  साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट होत आहे.हा गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुर्नस्थापीत होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ देखील होणार आहे.

*गाळ काढण्यासाठी  250 हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या व पाच वर्षापेक्षा जुन्या तलावांना प्राधान्या देण्यात येईल  .तसेच या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असतील तर ते सहभागी होऊ शकतील.
*तसेच खाजगी व सार्वजनिक भागिदारीने हे गाळ काढण्यात येईल.
*अदयावत तंत्रज्ञानाचा वापर करून कामांचे स्वतंत्रपणे त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यमापन करण्यात येणार आहे.
गाळ उपसा करण्यास परवानगी मात्र वाळू उत्खननास पुर्णत बंदी असेल.
* याबाबतीतील शासननिर्णय्‍ दि.6 मे रोजी आला आहे.जिल्हास्तरीय समीतीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समीती आहे.
00000



अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...