Monday, April 2, 2018

सार्वजनिक वितरण जिल्हास्तरीय दक्षता समिती बैठकीत चर्चा
     शिधापत्रिका आधार जोडणीच्या कामाला गती द्यावी
                            -जिल्हाधिकारी अभिजित बांगर
अमरावती, दि. 2 : शिधापत्रिकाधारकांच्या आधार कार्ड जोडणीच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत पुरवठा अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकठिकाणी जाऊन माहिती घेवून त्या दूर कराव्यात तसेच कुणीही गरजू व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.
                    
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे एस.एच.पतंगे, अशासकीय सदस्य गंगाताई खारकर, प्रभाताई आकरे, विनोद तानवैस, शिरिष मढावी, पवनकुमार वसू आदी उपस्थित होते.
श्री. बांगर म्हणाले की, आधार पडताळणीच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर प्रत्यक्ष भेटी देऊन तात्काळ तोडगा काढावा, जेणेकरुन गरजू व्यक्ती धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये. सर्व गावांमध्ये देखरेख समित्यांची स्थापना झाली पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न करावेत व या कामाची यादी सादर करावी.  समित्यांच्या बैठका नियमित व्हाव्यात. तूरडाळ वाटपाचे परिमाण मागणी तेवढा पुरवठा असे निश्चित केले आहे. त्यामुळे तूरडाळ सर्वत्र उपलब्ध असण्याची दक्षता घ्यावी. गॅस स्टॅम्पिंगची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी. उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस जोडण्यांची वितरकनिहाय आकडेवारी सादर करावी. आवश्यक तेथे गोदामाची दुरुस्ती करुन घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएलमधे या तिन्ही गटात एफसीआयकडून 100 टक्के उचल होत असल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
श्री. टाकसाळे म्हणाले की, जिल्ह्यात 1 हजार 84 दक्षता समित्या स्थापन झाल्या असून फेब्रुवारीत 308 बैठका घेण्यात आल्या. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान केरोसिन परवानाधारकांच्या 327 तपासण्या करण्यात आल्या. 2 दोषी परवानाधारकांवर कारवाई करुन 18 हजार दंड वसूल करण्यात आला.
लोकशाही दिन सभेत 4 प्रकरणांवर सुनावणी
लोकशाही दिन सभेत 2 नवीन व 2 प्रलंबित तक्रारींची सुनावणी घेण्यात आली. दोन तक्रारी जिल्हापरिषदेशी संबंधित असल्याने त्यांच्याकडे पाठविण्याचे ठरले. नव्याने प्राप्त 10 प्रकरणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी स्वीकारली. या निवेदनांवर कार्यालय प्रमुखांनी तातडीने कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले. महसूल विभागाशी संबंधित 3 पैकी 1 प्रकरण निकाली व 2 प्रलंबित ठेवण्यात आले. नांदगाव खंडेश्वर नगर परिषद व महावितरण यांच्याशी संबंधित प्रत्येकी 1 प्रकरण निकाली काढण्यात आले.                                           
00000

कर्जमाफी योजनेला 14 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
वंचित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
- सहकार मंत्री सुभाष देशमुख
मुंबई, ‍दि. 2 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत आता 14 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी  अशा शेतकऱ्यांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.
तसेच मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही एकवेळ समझोता (वन टाईम सेंटलमेट) योजनेंतर्गतही पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्याचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.
शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत 36.95 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर 14 हजार 564 कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत.
००००
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 127 व्या जयंतीनिमीत्त
चैत्यभूमी येथे आवश्यक सेवा सुविधा दयाव्यात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई, दि. 2 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी  चैत्यभूमी येथे भेट देतात. यावर्षी  127 व्या जयंतीनिमित्तयेणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची आढावा बैठक आज मुख्यमंत्र्यांनी घेतली. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला लागणाऱ्या सोयी सुविधाबाबत सर्व संबंधित विभागांनी उचित कार्यवाही करावी. चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही यांची दक्षता घेण्यात यावी. तसेच चैत्यभूमी स्मारक संरक्षण भिंतीलगत काँक्रीट टेट्रापॅाड टाकण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले.
महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. तसेच समन्वय समितीच्यावतीने नागसेन कांबळे यांनी ही सेवा सुविधाबाबतीचे निवेदन वाचून दाखविले.
या बैठकीला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, आमदार राज पुरोहित,मुख्य सचिव सुमीत मल्लिक, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे व सदस्य तसेच विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.
००००

लोकशाही दिन
मुख्यमंत्र्यांकडून सामान्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय
1459 पैकी 1456 प्रकरणे निकाली
मुंबईदि. 2 दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात होणाऱ्या ऑनलाईन लोकशाही दिनात सामान्य नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वेळोवेळी न्याय मिळवून दिला जातो. आज झालेल्या 106 व्या लोकशाही दिनात सोलापूर येथील गरीब शेतकऱ्याला ठिबक सिंचनाचे अनुदान देण्याचे निर्देश देतानाच पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील सिमेंट बंधाऱ्याची दुरुस्ती दोन महिन्यात करण्याचे सांगून सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला आहे.
यावेळी जळगावभांडसातारासोलापूरपुणेअंमळनेर येथील नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या. गेल्या तीन महिन्यात लोकशाही दिनात 21 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 18 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. आतापर्यंत लोकशाही दिनात एकूण 1 हजार 459 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1 हजार 456 निकाली काढण्यात आले आहेत.
वेल्हे जिल्हा सातारा येथील मंगल पाटील यांच्या स्वमालकीच्या प्लॉटवर अन्य व्यक्तीची बोगस नावे लावल्याबाबत तक्रार केली होती. त्यावर 7 एप्रिल पर्यंत या प्लॉटवर मंगल पाटील यांचेच नाव लावण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले. टाकळी सिकंदर जिल्हा सोलापूर येथील झुंबर गायकवाड यांना ठिबक सिंचनाचे शासकीय अनुदान न मिळल्याबाबत तक्रार केली होती. या प्रकरणाची फेर चौकशी करून अर्जदाराला लाभ मिळवून देण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. कांताराम काळेघोडेगाव जिल्हा पुणे यांनी सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाल्याने विहिरीचे नुकसान झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांची कैफियत ऐकल्यानंतर या बंधाऱ्याची दोन महिन्यात दुरुस्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
बैठकीस सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधूकृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमारसामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव महेश झगडेनगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीरमनषा म्हैसकर आदी उपस्थित होते.
००००


Sunday, April 1, 2018

संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी वन स्टॉप सेंटर कायमस्वरुपी कार्यान्वित होणार
पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

            अमरावती, दि.1 : संकटात सापडलेल्या महिलांना वैद्यकीय व कायदेशीर मदत एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे वन स्टॉप सेंटर प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा रुग्णालयात सुरू झाले. हे सेंटर कायमस्वरूपी उभे रहावे म्हणुन शासनाने निधी मंजूर केला असुन या कामासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी विशेष पाठपुरावा केला.
            अत्याचारग्रस्त महिलांना वैद्यकीय, कायदेशीर सहकार्य व समुपदेशन व गरज असल्यास आश्रयाची सुविधा मिळावी या साठी केंद्र सरकारच्या सहकार्याने ‘सखीवन स्टॉप सेंटर अमरावती सह पुणे, औरंगाबाद, नांदेड, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर, नाशिक, बीड, अकोला येथे प्रायोगिक तत्वावर सुरू आहेत. हे कायमस्वरुपी करण्यासाठी 2 कोटी 13 लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. यामुळे हे कायमस्वरुपी यंत्रणा उभी राहिल असा विश्वास पालकमंत्री श्री.पोटे-पाटील यांनी व्यक्त केला.
            शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ, कौटुंबिक छळ, अॅसिड अॅटॅक किंवा सायबर क्राइम मधील पीडित अशा कोणत्याही अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलिस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. मात्र, अत्याचाराचा सामना करावा लागल्यानंतर अशा व्यक्तींकडे जाऊन कोणत्याही प्रकारची मदत घेण्याची मानसिकता तिची उरलेली नसते. अशा महिलांना या योजनेंतर्गत एकाच छताखाली मोफत वैद्यकीय सुविधा, पोलिस मदत केंद्र, समुपदेशन केंद्र, कायदेशीर मदत अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
            वन स्टॉप सेंटरमध्ये चोवीस तास सेवा पुरवली जाणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची टीम निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकासअधिकारी राजश्री कोलखेडे यांनी दिली.
मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

            लातूर, दि. 31 :  राठवाड्याच्या विकासाला चालना देणारा उद्योग क्षेत्रातील महत्वपूर्ण रेल्वे कोच निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते हरंगुळ एमआयडीसी क्षेत्रात झाले.
            यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, राज्याचे कामगार कल्याण, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री सभांजी पाटील-निलंगेकर, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.
            रेल्वे कोच कारखान्याच्या भूमिपूजनानंतर कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर सुरेश पवार, आमदार सर्वश्री. अमित देशमुख, त्र्यंबक भिसे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील, सुजितसिंह ठाकूर, मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर, महानगरपालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, रेल्वे मंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ. प्रविण गेडाम, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी  व इतर मान्यवर उपस्थित होते.



लातूर रेल्वे कोच फॅक्टरीच्या भूमिपूजनाचा संस्मरणीय सोहळा
तुम्ही शिक्षणातील परीक्षेचा पॅटर्न तयार केला
आम्ही लातूरच्या विकासाचा नवा पॅटर्न तयार करु
                                    ---   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            लातूर, दि. 31 :-  लातूरच्या परीक्षेचा पॅटर्न देशभर प्रसिध्द आहे. हा पॅटर्न तुम्ही तयार केला आता राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लातूरचा विकासाचा पॅटर्न तयार करुन लातूरचे नाव देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर झळकावणार. रेल्वेच्या या मेट्रो रेल्वे कोच फॅक्टरीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून काही हजार हाताना काम मिळणार आहे. युवकांचे स्थलांतर थांबणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
            लातूर शहराजवळील हरंगूळ येथील रेल्वेतर्फे उभारण्यात येणाऱ्या महत्वकांक्षी मेट्रो रेल कोच फॅक्टरीच्या भूमिपूजन समारंभानंतर शहरातील क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे तथा कोळसा मंत्री पियुष गोयल, राज्याच्या महिला व बालविकास आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्याचे कामगार, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, लातूर शहराचे महापौर सुरेश पवार, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, आमदार सर्वश्री. सुधाकर भालेराव, सुरजितसिंह ठाकूर, विनायकराव पाटील, अमित देशमुख, त्र्यंबकराव भिसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक  देवेंद्र शर्मा, सोलापूर रेल्वेचे डीआरएम हितेंद्र मल्होत्रा, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर, पोलीस  अधीक्षक   डॉ. शिवाजी राठोड, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, अभिमन्यू पवार, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.
            लातूरच्या भूमीला विकासाची भूक व तहान आहे. रेल्वेमंत्री गोयल, पालकमंत्री श्री. निलंगेकर, खासदार              डॉ. सुनिल गायकवाड, अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून रेल्वेचा हा प्रकल्प लातूर येथे आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की , अवघ्या दोन महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन या प्रकल्पाचे भूमिपूजन आज येथे होत आहे. 31 जानेवारी, 2018 रोजी रेल्वे प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर लातूरच्या या सर्व नेत्यांनी  हा प्रकल्प लातूर येथेच उभारण्यात यावा यासाठी माझ्यामागे सातत्याने मागणीचा पाठपुरावा केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मेट्रोची लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. मेट्रोचे मार्ग तयार होत आहेत. परंतु सध्या या मार्गावरुन धावणाऱ्या मेट्रो रेल्वेला विदेशात तयार होणाऱ्या डब्यांचा वापर करावा लागतो. विदेशातील रेल्वे डब्याऐवजी महाराष्ट्रातच मेट्रोचे डब्बे तयार केले तर येथील तरुणांना रोजगार मिळण्याबरोबरच विकासाला गती मिळणार असून परकीय चलनही वाचणार आहे, असेही ते म्हणाले.
            या प्रकल्पामुळे लातूरसह मराठवाड्याच्या विकासाला गती मिळणार आहे. लातूरच्या नेत्यांच्या आग्रहामुळे रेल्वेमंत्री गोयल यांनी एकही मिनिटाचा विलंब न लावता लातूरमध्ये हा प्रकल्प आणण्यास मान्यता दिली. हा प्रकल्प जर लातूरला हवा असेल तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी काही अटी व मागण्या समोर केल्या. त्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. जमीन उपलब्ध असल्याने पहिल्या टप्प्याचे काम तातडीने सुरु करण्याच्या अनुषंगाने मॅग्नेटीक महाराष्ट्राच्या कार्यक्रमात फेब्रुवारीमध्ये रेल्वे मंत्रालयाशी  एमएयू (करार) केला . या प्रकल्पात एक ते दीड वर्षात कोचच्या निर्मितीचे काम सुरु होईल, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी  दिला आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्रातील सरकार किती गतीने काम करतेय हे यातून स्पष्ट होते, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वर्षभरात याच क्रीडा संकुलावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यपूर्तीचा या पेक्षा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
            राज्य शासनाच्या विकासाच्या अजेंड्यावर विदर्भ आणि मराठवाडा यांना प्राधान्यांने स्थान देण्यात आलेले आहे. आम्हाला ह्या प्रदेशांचा विकास करायचा आहे. युवकांच्या हातांना काम द्यावयाचं आहे. युवकांचे स्थलांतर थांबवायचे आहे. आमचा विकासाचा दृष्टिकोनही  निश्चित आहे. त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यासाठी विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजना सुरु केल्या आहेत, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले की, लातुरकरांनी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्याला आदर्श वाटावे असे प्रचंड काम केले आहे. सध्या काही जिल्ह्यात टंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा केला जात असताना लातूर जिल्ह्यात सध्या एकही टँकर सुरु नाही. मराठवाडा व विदर्भाच्या लोकांच्या मनगटात मोठी ताकद आहे. त्यामुळे या प्रदेशातील लोकांना ताकद देण्याची काम आम्ही करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून मराठवाड्याच्या वाट्याचे पळवलेले पाणी  पुन्हा मराठवाड्याला मिळवून दिले जात आहे. कृष्णा खोऱ्यातील 21 टीएमसी पाणी आम्ही पुन्हा मराठवाड्याला देत आहोत, असेही ते म्हणाले .
            राज्य शासनाने पाण्याचे महत्व ओळखून दमणगंगा पिंजाळ खोऱ्यातील मराठवाड्याच्या वाट्याचे 50 टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी केंद्रीय जलसंपदा तथा भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारतर्फे दहा हजार कोटीचा निधी मंजूर केला आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पाणी हे विकासाचे मोठे साधन आहे. मराठवाड्यातील गोदावरी खोरे पाण्याच्या बाबतीत तुटीचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. या गोदावरी खोऱ्यास सुजलाम, सुफलाम करावयाचे असेल तर हा प्रकल्प नक्की वरदान ठरेल. याशिवाय राज्यातील पहिल्या वॉटर ग्रीड प्रकल्पामुळे मराठवाड्यातील सिंचनास, पिण्यास व उद्योगासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. शेवटच्या माणसांपर्यंत या ग्रीडच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्याचा मानस आहे. या प्रकल्पासाठी इस्त्राईल सरकारशी करार करण्यात आला असून या ग्रीडच्या विकास आराखड्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मराठवाडा दुष्काळग्रस्त राहणार नाही आणि आत्महत्या होणार नाहीत, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
            रस्ते हे विकासाचे महामार्ग असतात हे ध्यानात घेऊन राज्यात समृध्दी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. वेगवेगळ्या मार्गाने बंदरांपर्यंत माल पोहोचविण्याचे काम जेवढ्या लवकर होईल तेवढा त्या भागाचा विकास होतो. मराठवाडा-विदर्भापासून समुद्र दूर असल्याने जलदगती महामार्गांच्या माध्यमातून हे आंतर कमी करता येऊ शकते. राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून पुणे, मुंबईसह बंदरापर्यंत पाच-सहा तासात पोहोचता येईल, असा समृध्दी महामार्ग येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचा राज्य शासनाने संकल्प केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती होऊन उद्योजकांना पुणे-मुंबईस जाण्याची गरज पडणार नाही, असेही त्यांनी  सांगितले .
            लातूर येथील रेल्वे प्रकल्पांमुळे नवा महाराष्ट्र घडणार आहे. हा प्रकल्प म्हणजे लातूरच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरु शकतो. पालकमंत्री, खासदार, अभिमन्यू पवार यांनी खूप मोठा पाठपुरावा केला. त्यामुळे हा प्रकल्प लातूरला येऊ शकला. आरजेएमएल या बोगी निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्नीहोत्री यांनीही सहमती देऊन या कामी महत्वाचे योगदान दिले आहे, असे सांगून श्री. गोयल म्हणाले की, 70 वर्षात प्रथमच एवढा मोठा प्रकल्प मराठवाड्यात होऊ घातला आहे, ही महत्वाची बाब आहे. या प्रकल्पामुळे लातूर शहराला औद्योगिक शहर म्हणून ओळख मिळेल. सध्या मेट्रोसाठी विदेशातील कोच वापरले जातात. यापुढे लातूरमध्ये बनणारे कोच संबंध देशात जातील. ही बाब जितकी महत्वाची आहे. त्याबरोबरच छोटे, लघु आणि मध्यम प्रकल्प हे या प्रकल्पामुळे सुरु होतील. त्यामुळे उद्योग तयार होऊन वेगवेगळ्या संधी निर्माण होतील. प्रधानमंत्र्यांच्या वंचित प्रदेशाच्या विकासाच्या संकल्पनेला या प्रकल्पामुळे हातभार लागणार आहे. इतर प्रदेशासाठी लातूरमधील हा प्रकल्प प्रेरणादायी ठरणार आहे. या बरोबरच इतर सेवांचे जाळे निर्माण होऊन रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. डॉक्टर-इंजिनिअर बनविणारे शहर आता उद्योजकीय शहर होणार आहे, असे ते म्हणाले.
            माझ्या आयुष्यातील हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत होणाऱ्या युवकांना संधीचं मोठे दालन उघडले होणार आहे. आता रोजगारासाठी कोणालाही गाव सोडावे लागणार नाही. एवढी मोठी संधी लातुरकरांना मिळाली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. निलंगेकर म्हणाले की, मुख्यमंत्रयांनी गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील विविध संकटाच्यावेळी संकटमोचकाचे काम केले व जनतेनेही त्यांना मोठी साथ दिली. प्रथमच या प्रकल्पातून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्यांचे स्वागत करण्याची संधी दिली. कोचिंग क्लासेससाठी प्रसिध्द असेलेले शहर आता कोचेससाठी प्रसिध्द होईल. लातूर रोड ते गुलबर्गा रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करावे. त्यामुळे दक्षिण भारत मराठवाड्याशी  जोडला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी श्रीमती मुंडे यांचेही भाषण झाले. त्यांनी लातूरशी असलेले संबंध, लातूरची  मैत्री व या प्रकल्पांमुळे लातूरसह मराठवाड्याचा होणारा विकास याबद्दल आनंद व्यक्त केला.
            या प्रकल्पामुळे आगळा-वेगळा पॅटर्न तयार होणार आहे. जिल्ह्यातील जनतेचे भविष्य घडविले जाणार आहे. विकासाची नवी गुढी उभारली जात आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रासह मराठवाड्याचे भवितव्य घडणार आहे, असे सांगून खासदार गायकवाड यांनी प्रधानमंत्री व रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले.
            प्रारंभी रेल्वे मंत्रालयातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधीतर्फे तुळसी व पुदीनाचा विशेष हार घालून सत्कार केला. तर मुख्यमंत्री व रेल्वे मंत्र्यांना लातूर येथील जलयुक्त शिवारच्या पाण्याने भरलेला चांदीचा कलश भेट म्हणून देण्यात आला.
            या कार्यक्रमापूर्वी हरंगुळ शिवारातील एमआयडीसीमध्ये ह्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या सभेसाठी संपूर्ण क्रीडा संकुल नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. आनंदाने तरुण व नागरिक जल्लोष करत होते. या प्रकल्पाचे स्वागत करत होते. संस्मरणीय ठरलेल्या या सोहळ्याला जिल्हाभरातील नागरिकांनी हजेरी लावली होती.
            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. के. शर्मा यांनी केले. शैलेश गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डीआरएम हितेंद्र मल्होत्रा यांनी मानले .



अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...