Wednesday, August 15, 2018

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात विकासाच्या वाटचालीत अमरावती जिल्हा अग्रेसर - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील






अमरावती, दि. 15 : शेतकरी बांधवांसह सर्वच घटकांसाठी दीर्घकालीन दृष्टीतून पायाभूत सुविधा आणि लोकहिताच्या विविध योजना यामुळे महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांत शाश्वत विकासाकडे वाटचाल करत आहे. या विकासप्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अमरावती जिल्हा राज्यात आघाडीवर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्यांच्या 71 व्या वर्धापनदिनोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज वंदन सोहळा पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार बच्चू कडू, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे,  जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी प्रारंभी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने देशाचा अन्नदाता म्हटल्या जाणा-या शेतक-यांसाठी शासन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार योजना, बळीराजा जलसंजीवनी, गटशेती, सर्वांसाठी घरे, वृक्ष लागवड मोहिम, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कृषी यांत्रिकीकरण अशा सर्वव्यापी योजना अंमलात आणल्या आहेत. त्याचप्रमाणे, नव्या उद्योगांची उभारणी, मोठी रोजगारनिर्मीती, सिंचन आणि आरोग्य सुविधा, कौशल्य विकास, पर्यटन यातल्या भरीव कामगिरीमुळे महाराष्ट्र देशात गुंतवणूकीचे सर्वोत्तम स्थान बनले आहे.  
            श्री. पोटे पाटील पुढे म्हणाले की, केवळ तात्कालिक उपाययोजनाच नव्हे तर दूरदृष्टी ठेवून अमरावती जिल्ह्यात खारपाणपट्टयाच्या संपूर्ण कायापालटासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंमलात आणली आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बळीराजा जलसंजीवनी योजनेमुळे भविष्यातील लोकसंख्या विचारात घेऊन सिंचन व पेयजलाची  शाश्वत सुविधा निर्माण होत आहे.
ते पुढे म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा अद्यापपर्यंत 1 लाख 30 हजारांहून अधिक कर्जदारांना सुमारे 807 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, इतरही पात्र शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यात ‘प्रतिकुटुंब’ दीड लाख ही मर्यादा वगळून ‘प्रतिव्यक्ती’ दीड लाख रुपये माफीची मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे आणखी हजारो शेतक-यांना फायदा मिळणार आहे. सुलभ पीककर्ज अभियानाच्या माध्यमातून खरीप कर्जवाटपाची प्रक्रियाही गतिमान झाली आहे. तूर- हरभ-याची मोठी खरेदी शासनाने केली आहे.   
       जलयुक्त शिवार अभियानात गत चार वर्षांत एकूण 1352 गावांची निवड होऊन तेथे 16 हजार 226 कामे पूर्ण झाली आहेत. मागेल त्याला शेततळे योजनेत सुमारे 5 हजार शेततळी, कृषी वीज पंप जोडण्या, 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेत उद्दिष्टाच्या तुलनेत 126.63 टक्के लागवड (32 लाख 86 हजार 551 वृक्षलागवड) हे लक्षणीय यश असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की,  गटशेतीला  मोठे प्रोत्साहन 12 गटांना तत्वत: मान्यता दिली असून, जिल्ह्यातून शेती उत्पादने निर्यात होऊ लागली आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा सुमारे चाळीस हजार सभासदांना लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात  12 हजार 383 शेतक-यांना  सावकारी कर्जातुन मुक्त करण्यात आले आहे.    बोंडअळी व इतर कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यासारखी साधने जिल्ह्यात सर्वत्र वितरीत करण्यात आली आहेत.

सर्वांसाठी घरे या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनेत 15 हजार 597 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.  रमाई घरकुल योजनेतही शेकडो घरकुले पूर्ण झाली आहेत. कौशल्य विकास योजनेत 4760 तरुणांना प्रशिक्षण दिले असून, दोन हजारहून अधिक तरुणांना रोजगार मिळाला आहे.   बळीराजा जलसंजीवनी योजनेतून जिल्ह्यातील 24 अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी  जिल्ह्यातील 5 मध्यम आणि 19 लघु प्रकल्प यातून पूर्ण होऊन सिंचन क्षेत्र वाढून शेतक-यांचे जीवनमान आणखी उंचावणार आहे.
नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत रेमंडसारख्या नामांकित वस्त्रोद्योगांची सुरुवात होऊन 19 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून 30 हजारहून अधिक लोकांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळाला आहे.  मेळघाटात दुर्गम भागातही तत्काळ पोहोचता यावे म्हणून काटकुंभ, टेंभुरसोडा, हतरू, बैरागड आणि हरिसाल येथे मोटरबाईक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्ययावत व भक्कम रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे, असेही ते म्हणाले.
     समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, August 14, 2018

इंडिया पोस्ट पेमेंट या डिजीटल बॅंकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 21 ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन


मुंबई,  दि. 14 : महाराष्ट्रात इंडिया पोस्ट पेमेंट या डिजीटल बॅंकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील भारतीय डाक कार्यालयात, 21 ऑगस्ट रोजी उद्घाटन  होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चीफ पोस्ट जनरल ऑफ महाराष्ट्र एच.सी.अग्रवाल यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी आज भेट घेतली.
भारतात पहिल्यांदाच एकाच वेळी 3 हजार 250 डाक कार्यालय (प्रवेश केंद्र) आणि 650 शाखांमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट या डिजीटल बॅकेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 
महाराष्ट्र राज्यातील 40 शाखा आणि 200 प्रवेश केंद्राचे एकाच दिवशी उद्घाटन संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या हस्ते होणार आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील सामान्य नागरिकाला विश्वासू वाटणारी, कायम सेवेत उपलब्ध असणारी आणि परवडणारी कॅश लेस असणारी "इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक" भारतीय डाक कार्यालय नागरिकांसाठी सुरू करीत आहे.
या डिजीटल बॅकेमुळे सामान्यांना कुणाचाही हस्तक्षेप किंवा मदत न घेता आपले खाते सुरू करता येणार आहे. पोस्टमास्तर घरोघरी जाऊन याबाबत सहकार्य करणार आहेत. यामुळे कोणतेही डिजीटल आर्थिक व्यवहार, खरेदी -विक्री, लाईट बील, टेलीफोन बील आदींसारखे व्यवहार करता येणार आहे. शासकीय योजनांचे अनुदानही या बॅक खात्यातून प्राप्त होण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
हा या उप्रकमाचा पहिला टप्पा असून डिसेंबर 2018 पर्यंत 1 लाख 30 हजार डाक कार्यालयात हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. विविध टप्प्यात देशातील एकूण 1 लाख 55 हजार डाक कार्यालयात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी मुख्य डाक सेवेच्या संचालक सुमिता अयोध्या, मुंबई क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर, वरिष्ठ अधिक्षक रूपेश सोनावले उपस्थित होते.
000

रिदमीक जिमनॅस्टीकच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय संघास मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा



मुंबई, दि. 14 : मिन्स्क-बेलारूस येथे होणाऱ्या रिदमीक जिमनॅस्टीक या क्रीडा प्रकारासाठी वल्ड कप स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी होणा-या भारतीय संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
भारतीय संघ समुह सादरीकरण आणि वैयक्तिक सादरीकरण स्पर्धेत सहभागी होणार आहे. या संघात  सातही मुंबईच्या युवतींची निवड झालेली आहे. धारावी येथील शासन क्रीडा संकुलात प्रशिक्षक वर्षा उपाध्ये या त्यांना प्रशिक्षण देत आहेत. बेलारूस येथे होणारे वर्ल्ड कप स्पर्धा 16 ते 20 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेत 48 देश सहभागी होणार आहेत.

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीचे परिपूर्ण नियोजन १५ दिवसात सादर करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




मुंबई‍, दि. १४ : ज्या विभागांमार्फत केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी होते अशा सर्व विभागांनी त्यांच्याकडे असलेल्या केंद्र पुरस्कृत योजना, त्याचा निधी,खर्च आणि भविष्यातील  नियोजन यासंबंधीचा परिपूर्ण आराखडा तयार करून तो १५ दिवसात सादर करावा,  अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्र पुरस्कृत योजनांमधील राज्याला देय असलेला निधी प्राप्त करून घेण्यासाठी  योजनांवर आतापर्यंत झालेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे,उर्वरित निधीची मागणी करणे आणि त्यासाठी पाठपुरावा करणे ही प्रक्रिया विभागांनी वेगाने राबवावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र पुरस्कृत योजनांची ज्या विभागांमार्फत अंमलबजावणी होते त्या विभागाच्या सचिवांनी योजनेचा प्राप्त निधी, खर्च याचा नियमित आढावा घ्यावा.
शिष्यवृत्ती, मानधन यासारख्या रकमा लाभार्थ्यांच्या खात्यात त्या त्या महिन्याच्या निश्चित तारखेस जमा केल्या जाव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
०००००

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील नागरी समस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना



मुंबई, दि. 13 : गृहनिर्माण आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
 आज मंत्रालयात आयोजित मुंबई उत्तर मध्य लोकसभा क्षेत्रातील विविध नागरी प्रश्नांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी खासदार पुनम महाजन उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई विमानतळाच्या विस्तारीकरणात बाधित होणाऱ्या विमानपतन प्राधिकरणाच्या जागेवरील झोपड्यांचे पुनर्वसन, मिठी नदी रुदींकरण प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन, डिफेन्स लँडवरील घरांचे पुनर्वसन, माहुल येथील सदनिकांचा पुनर्विकास तसेच बांद्राच्या शासकीय इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी संबधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी.
सदर आढावा बैठकीत संघर्ष नगर चांदीवली येथील घरांच्या वाढीव चटई क्षेत्राचा प्रश्न, गृहनिर्माण सोसायट्यांना प्रदान केलेल्या कलेक्टर लँडवरील कलेक्टर लँड पॉलिसी नुसार प्रिमिअममध्ये बदल करणे, कुर्ला येथील बंद असलेली दुग्धशाळा चालू करणे, कुर्ला येथील रिकामी जमीन नाट्यगृह, सरकारी रुग्णालये व स्मशानभूमीसाठी उपलब्ध करुन देणे, केदारनाथ विद्या प्रसारिणी शैक्षणिक संस्थेची म्हाडा कार्यालयात प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढणे तसेच कुर्ला रेल्वे स्थानक ते बीकेसीपर्यंत स्कायवॉक करण्याबाबत चर्चा झाली. हे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी  वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
 या बैठकीला मुख्य सचिव डी.के.जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलींद म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, पदुमचे सचिव किरण कुरुंदकर आदी उपस्थित होते.

सिडकोच्या 14 हजार 838 घरांच्या सोडतीस प्रारंभ
‘सिडको’ची वर्षाअखेरपर्यंत आणखी 25 हजार घरांची योजना - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 13 : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) तर्फे ‘सर्वांसाठी घरे’ धोरणाअंतर्गत आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ‘महागृहनिर्माण योजनेत’ साकारण्यात येणाऱ्या 14 हजार 838 परवडणाऱ्या घरांच्या ऑनलाईन सोडतीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. पुढच्या टप्प्यात आणखी 25 हजार घरांची सोडत वर्षाअखेरीस जाहीर करण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देऊन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोने एक लाख घरे बांधण्यांचे उद्दिष्ट ठेवावे, असे यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. 
यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, खासदार पूनम महाजन, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, आमदार मंदा म्हात्रे, बाळाराम पाटील, मनोहर भोईर, नरेंद्र पाटील, मुख्य सचिव डी. के. जैन, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, उपव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद म्हैसकर आदी यावेळी उपस्थित होते.
                मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची महत्त्वाकांक्षी घोषणा केली. सन 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या या योजनेत महाराष्ट्र राज्याने 6.50 लाख घरे बांधून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. राज्यात मुंबई व मुंबई महानगर परिसरात सर्वात जास्त घरांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. म्हाडाला पीपीपी योजनेतून 1 लाख घरे मिळणार आहेत. तसेच घरांसाठी संयुक्त भागीदारी मंजूर केली आहे. घरांच्या या योजनेत सिडकोसुद्धा सहभागी झाली असून नवी मुंबई परिसरात त्यांनी आता ही 14 हजार घरांची योजना सुरू केली आहे. यामुळे गरिबांना चांगल्या किंमतीत व चांगल्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह घरे मिळणार आहेत.
                यंदाच्या घरांच्या योजनेत प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा समावेश केला आहे. या लॉटरीतील अर्जांची योग्य प्रकारे छाननी करून गरजू नागरिकांनाच घरे मिळतील, याची दक्षता घ्यावी. सामान्य माणसांना या योजनेत सहभागी करून घ्यावे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी  श्री. चंद्रा यांनी महागृहनिर्माण योजनेची वैशिष्ट्ये सांगितली.
महागृहनिर्माण योजनेची वैशिष्ट्ये
·         सिडकोच्या योजनेत प्रथमच ऑनलाईन अर्ज नोंदणीचा समावेश
·         https://lottery.cidcoindia.com/ या संकेतस्थळावरून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ
·         सिडकोतर्फे नवी मुंबईतील तळोजा, द्रोणगिरी, खारघर, घणसोली, कळंबोली या पाच नोडमधील 11 ठिकाणच्या घरांचा समावेश आहे.
·         एकूण 14 हजार 838 घरांपैकी 5 हजार 262 घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर 9 हजार 576 घरे ही अल्प उत्पन्न घटकांतील नागरिकांसाठी आहेत.
·         प्रत्यक्ष अर्ज नोंदणीस 15 ऑगस्टपासून सुरुवात तर 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकृती
·         2 ऑक्टोंबर रोजी सोडतीची लॉटरी काढण्यात येणार आहे.
·         प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्याला 2.5 लाख रुपयांचे अनुदान मिळणार
अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यास सी.एल.एस.एस.च्या माध्यमातून 2.67 लाख रुपयांचे अनुदान मिळणार


महाराष्ट्रातील शहरे उत्तम राहण्यायोग्य मानांकनात देशात अव्वल नागरिकांसह संस्था-यंत्रणांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन



मुंबई, दि. 13 : देशातील उत्तम राहण्यायोग्य शहरांच्या निर्देशांकात महाराष्ट्रातील शहरांनी बजावलेल्या चमकदार कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून या शहरांमधील नागरिकांसह संबंधित संस्था-यंत्रणांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील या मानांकनात पुणे अव्वल ठरले असून नवी मुंबई दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
देशातील १११ शहरांची राहण्यायोग्य उत्तम शहर या मानांकनासाठी विचार करण्यात आला होता. नागरिकांसाठी उत्तम राहण्यायोग्य शहरांच्या निर्देशांकात (Ease of Living Index - 2018) राज्यातील १२ शहरांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या यादीतील पहिल्या दहांमध्ये राज्यातील एकूण ४ शहरांचा समावेश असून पहिले तिन्ही क्रमांक राज्यातील शहरांनी पटकावले आहेत. तसेच पहिल्या पंचवीसमध्ये ८ शहरांनी स्थान मिळवले आहे. त्यात पहिल्या तीन क्रमांकासह ठाणे (सहा), अमरावती (सोळा), वसई- विरार (वीस), नाशिक (एकवीस), सोलापूर (बावीस) या शहरांचा समावेश आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने देशातील उत्तम राहण्यायोग्य असलेल्या शहरांची ही यादी जाहीर केली आहे. संस्था आणि प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य, त्याचबरोबर आर्थिक घटक आदी मानकांचा विचार करून ही यादी तयार करण्यात आली आहे.

DIO NEWS AMRAVATI 05.11.2026

निवृत्तीवेतनधारकांसाठी आज 'डिजिटल जीवन प्रमाणपत्र' मार्गदर्शन सत्राचे आयोजन   अमरावती, दि.5 (जिमाका): वरिष्ठ कोषागार कार्यालय, अमराव...