Wednesday, April 24, 2019

रस्ते बांधकामामुळे वाहतुक मार्गात बदल


                       अमरावती दि. 24 : अमरावती शहरातून जाणारा रस्ता पंचवटी इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, बडनेरा या रस्त्याच्या कॉक्रीटकरणाचे काम केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत मंजूर असून ते सुरु करण्यात आलेले आहे. हे काम शहरामधून टप्याटप्याने पुढे नेण्यात येणार आहे.
 पंचवटी चौक ते रोशनी हॉटेलपर्यंत उजवी बाजू व इर्विन येथे कॉक्रीटकरणाचे काम सुरु करावयाचे आहे.  यासाठी या रस्त्याच्या उजव्या बाजुची वाहतूक दि. 24 एप्रिल ते 23 मे पर्यंत सहायक पोलीस आयुक्त वाहतूक, अमरावती  यांच्या परवानगीनुसार वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नागरिकांना सूचित करण्यात येते की, या कालावधीत एका बाजूने सावकाश काळजीपूर्वक वाहतूक करावी. खापर्डे बगीचा व रेल्वे स्टेशनकडून इर्विन चौकाकडे येणारी वाहतूक मर्चुरी टी पॉईंटकडून तात्पुरत्या स्वरुपात वळविण्यात येत आहे. असे सहायक अभियंता यांनी कळविले आहे.
00000

महाराष्ट्रदिनानिमित्त शासकीय सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

मुख्य ध्वजारोहण सोहळा नेहरू स्टेडियमला होणार







अमरावती, दि. 24 :  महाराष्ट्र दिनानिमित्त दि. 1 मे रोजी आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत आढावा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.  
मुख्य ध्वजारोहण सोहळा नेहरू स्टेडियमला होणार असून ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभाची काटेकोर तयारी करावी. प्रत्येक विभागाने त्यांना सोपवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. महाराष्ट्र दिन उत्साहपूर्वक साजरा करण्यासाठी सर्वांगिण तयारी करावी. महाराष्ट्र दिनी वाहतूक खोळंबा होणार नाही यादृष्टीने सुरळीत व्यवस्थापन करावे. तालुका स्तरावर ध्वजारोहणासह प्रभात फे-या आयोजित केल्या जाव्यात. शासकीय कार्यालयांवर रोषणाई केली जावी. आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व तरतुदी तपासून नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्रदिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वनिता समाज येथे करण्यात येणार आहे.

00000

Tuesday, April 16, 2019

मतदारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी


अमरावती, दि. 16 - ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सहाय्याने मतदान करताना करावयाच्या कार्यवाहीबाबत निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  
मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर मतदान केंद्रांवर कार्यरत असलेले अधिकारी हे मतदान यंत्रणा कार्यान्वित करतील. ईव्हीएम मशीनवरील आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील अथवा चिन्हासमोरील निळे बटन दाबावयाचे आहे. आपण मत दिलेल्या उमेदवाराच्या नावासमोरील किंवा चिन्हासमोरील लाल दिवा पेटेल. प्रिंटर एक मतपावती मुद्रित करेल. त्यावर आपण मत दिलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह असेल. मतदार ही मतपावती सात सेकंद पाहू शकेल. मुद्रित मतपावती व्हीव्हीपॅट मशिनवरील काचेच्या माध्यमातून पाहता येईल. त्यामुळे आपण दिलेले मत संबंधित उमेदवारालाच मिळाल्याची खातरजमा मतदाराला करता येणार आहे.

फसव्या व्हाटस्अप संदेशामुळे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल


* मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारकच
अमरावती, दि. 16 : मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव असणे बंधनकारक आहे. असे असतानाही नागरिकांची दिशाभूल करणारा एक व्हाटसअप संदेश व्हायरल होत असून, त्याविरुद्ध आचारसंहिता कक्षाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.  
‘मतदार यादीत नाव नसतानाही मतदान करता येते’, अशा आशयाचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘मतदानाच्या दिवशी फोटो व अन्य ओळखपत्र पुरावा घेऊन मतदान केंद्रावर गेल्यास मतदान करता येते,’  अशी दिशाभूल करणारी माहिती या संदेशात आहे. ती अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारकच आहे. लोकसभा निवडणूक दि. 18 एप्रिलला असल्याने आता मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार नाही.  
मतदान करण्यासाठी अन्य कागदपत्रांचा पर्याय हा केवळ मतदार यादीत नाव असलेल्यांसाठीच आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. असे असतानाही अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणे व निवडणुकीच्या राष्ट्रीय कार्यात बाधा आणणे ही कृती गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.
त्याचप्रमाणे, कुणीही या आशयाची अफवा फॉरवर्ड केल्यास किंवा प्रसृत केल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Sunday, April 14, 2019

जिल्ह्यात भीमजयंती उत्साहात साजरी



     


बाबासाहेबांच्या विचारांचा वसा जपूया, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया
-          जिल्हा निवडणूक प्रशासनाचे आवाहन
अमरावती, दि. 14 : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रौढ मताधिकाराचे कट्टर समर्थक होते. त्यामुळे भारतीय संविधानात एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हे तत्व समाविष्ट होऊन देशातील प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार मिळाला. बाबासाहेबांच्या विचारांचा हा वसा जपूया व आपणही मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया, असे आवाहन आज भीमजयंतीनिमित्त जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्ह्यातील मतदारांना केले आहे.
            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात आज सर्वत्र प्रशासन, विविध विभाग व कार्यालये, शाळा- महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटना, समित्या यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहरातील इर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. काल सायंकाळपासूनच या परिसरात नागरिकांनी भेट द्यायला सुरुवात केली. परिसरात काल सायंकाळी भीमगीतांचा अप्रतिम कार्यक्रम सादर करण्यात आला.  त्यालाही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
            जिल्ह्यातून, तसेच शहरातून आज सकाळीच आबालवृद्ध, महिला, युवक, युवतींचे जत्थे या परिसरात दाखल झाले.  शिक्षण, संघटन व संघर्षाचा संदेश कृतीत उतरवणा-या महामानवाच्या जीवन, कार्य व विचारांना मानवंदना देण्यासाठी आपल्या कुटुंबियांसह नागरिक जमले होते. उन्हातान्हाची पर्वा न करता मोठ्या उत्साहात नागरिक येत होते. कुणी रॅली घेऊन आले, कुणी गाणी म्हणत आले, कुणी घोषणा देत आले. महामानवाच्या जयघोषाने आसमंत निनादून गेले होते.
परिसरात बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तके, त्यांच्यावर विविध लेखकांनी लिहिलेली पुस्तके, विचारवंतांची पुस्तके उपलब्ध करून देणारी अनेक दुकाने मांडण्यात आली होती. समतेच्या विचारांच्या आजच्या उत्सवानिमित्त नागरिकांनी पुस्तकांची मोठी खरेदी केली.  येणा-या नागरिकांसाठी संस्था- संघटनांकडून पेयजल, खाद्यपदार्थांची सुविधा पुरविण्यात आली. एकता रॅली आयोजन समितीच्या वतीने दिवसभर सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीतर्फे अभिवादन कार्यक्रम झाला.
            जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आदर्श आचारसंहिता कक्षाचे प्रमुख संदीप जाधव, नायब तहसीलदार नीता लबडे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. जिल्हा माहिती कार्यालयात हर्षवर्धन पवार, विजय राऊत, सागर राणे, योगेश गावंडे, सुरेश राणे, सविता बारस्कर, गजानन परटके, राजश्री चोरपगार यांनी अभिवादन केले. स्वीप मोहिमेतही बाबासाहेबांचे लोकशाही निवडणूक प्रक्रियाविषयक संदेश प्रसारित करण्यात आले.
            ‘मतदानाचा अधिकार केवळ साक्षरांपुरता मर्यादित असू नये. तो या देशातील प्रत्येक व्यक्तीला असावा. मताधिकार हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार असावा’, असे स्पष्ट मत बाबासाहेबांनी मांडले होते. जर कायद्याचे पालन करण्याचे बंधन प्रत्येक नागरिकावर आहे, तर शासनकर्ते निवडण्याचा अधिकारही प्रत्येकाला असावा, अशी भूमिका बाबासाहेबांनी मांडली. त्यानुसार भारतीय संविधानात एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हे तत्व समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे मतदारांनीही  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करून बाबासाहेबांच्या विचारांचा वसा जोपासावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले.
                                    000     

Friday, April 12, 2019

उस्मानिया मस्जिद येथे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक



अमरावती, दि. 12 : खापर्डे बगिचा नजीकच्या उस्मानिया मस्जिद येथे स्वीप मोहिमेत आयोजित ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
भारतीय राज्यघटनेने भारतीयांना मतदानाचा हक्क दिला आहे. लोकशाहीला अधिक सक्षम करण्यासाठी घटनेने दिलेल्या हक्कानुसार 1952 पासून लोकसभेची निवडणूक होत आहे.  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदान करणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून सर्वांनी या राष्ट्रीय उत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि स्वीप मोहिमेच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शन व सहभागाने संपूर्ण जिल्ह्यात मतदार जागृतीची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोणताही मतदार हा मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून स्वीप मोहिमेच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे.
ही मोहिम अधिक भक्कम करण्याच्या हेतूने सर्व नागरिकांसह मुस्लिम समाजामध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी आज उस्मानिया मस्जिद ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक तेथील लोकांना दाखविण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या शंकांचे तज्ज्ञांकडून निरसन करण्यात आले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेविषयी जागृती करण्यात आली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहून त्यांनी मतदान करण्याचा संकल्प केला.
यावेळी बेरार मुस्लिम एज्युकेशनल कॉन्फरन्स व उस्मानिया मस्जिदचे अध्यक्ष एस.ए. हसन, उपशिक्षणाधिकारी एजाज खान, स्वीप मोहिमेचे डि. पी. घाटे, विरेंद्र गलफड, तुषार पावडे, संजय खारकर, समीर चौधरी, मिर्झा जुबेर बेग, प्रदीप बद्रे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे बडनेरा परिसरातील मुस्लिम बहुल वस्तीत उर्दु शाळांच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर जनजागृतीपर कार्यक्रम आज घेण्यात आले. त्यालाही नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.




Wednesday, April 10, 2019

मतदान जागृतीरथाला जिल्ह्यात ‘फ्लॅगऑफ’ जिल्हाधिका-यांकडून मतदान जागृतीरथाला हिरवी झेंडी






      
·        नागरिकांकडूनही रथाचे उत्स्फूर्त स्वागत
·        लोकराज्य’च्या निवडणूक विशेषांकाचेही प्रकाशन  
अमरावती, दि. 10 : निवडणूक प्रक्रियेत मतदार जनजागृतीसाठी भारतीय रेल्वेच्या मतदान जागृती रथाचे (हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस) बडनेरा स्थानकावर काल मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वागत केले. ‘लोकराज्य’च्या निवडणूक विशेषांकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
हावडा ते अहमदाबाद असा दोन हजार 87 कि. मी. चा आणि 37 तास 35 मिनीटांचा प्रवास करणारा हा मतदान जागृती रथ काल साडेदहा वाजताच्या सुमारास बडनेरा स्थानकात दाखल झाला. मतदान जागृतीच्या विविध संदेशांनी रथाचे डबे सुशोभित करण्यात आले होते. प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी मतदान जागृतीरथाचे चालक  यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्री. नवाल यांनी रेल्वेतून प्रवास करणा-या प्रवाश्यांशी हितगुज करत त्यांना मतदान करुन राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित कलापथकाकडून मतदान संदेश देणा-या बहारदार नाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला व गीतसंगीताने प्रवाश्यांचे स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या.  करमणूकीसह प्रबोधन घडविणारा कलापथकाचा प्रयोग उपस्थितांना खिळवून ठरला. या कार्यक्रमाला शहरातूनही नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.   जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी रथाला हिरवी झेंडी दाखवली. त्यानंतर रथ अकोल्याकडे मार्गस्थ झाला. यावेळी स्थानकावर व्हीव्हीपॅट व ईव्हीएम यंत्रणेच्या प्रात्यक्षिकातही नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी, रेल्वेचे  निसार सय्यद, पी. जी. पूर्जेकर, महापालिकेचे सहायक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, स्वीप मोहिमेचे अधिकारी ज्ञानेश्वर घाटे, वीरेंद्र गलफट, प्रवीण वासनिक, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते. स्थानकप्रमुख पूर्णेंदू सिन्हा यांनी सहकार्य केले.
प. बंगाल, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र व गुजरात सहा राज्यांतून प्रचार करणार आहे. त्यावर एकूण 64 थांबे आहेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक 26 थांबे आहेत. प्रत्येक ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून फ्लॅग ऑफ करण्यात येत आहे.   
                                    लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन
अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार हे लोकराज्यच्या निवडणूक विशेषांकाचे अतिथी संपादक आहेत. मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध गोष्टींची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे. हा अंक मतदारांसह उमेदवार, कार्यकर्ते, अधिकारी- कर्मचारी, अभ्यासक, पत्रकारांना उपयुक्त ठरेल, असे श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले. 
 महिला व तृतीयपंथीय मतदारांचा वाढता सहभाग,  मतदार जनजागृती, मतदान प्रक्रिया, निवडणूक अधिकारी-कर्मचा-यांचे प्रशिक्षण, पेड न्यूज, समाज माध्यमांबाबत निवडणूक काळात घ्यावयाची खबरदारी,निवडणुकांचे बदलते तंत्र, निवडणुकीतील परिवर्तन युग, निवडणूक खर्चावर नियंत्रण आदींबाबत लेखांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. या अंकाची किंमत 10 रुपये असून अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...