Sunday, September 1, 2019

वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन 35 हजार मेगावॅट वहनक्षमतेच्या ग्रीडची निर्मिती - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे





   'महापारेषण'च्या 'प्रकाश सरिता' इमारतीचे उद्घाटन

                                           

               अमरावती, दि. 1 : भविष्यात वीजेची वाढती मागणी लक्षात अधिक वीज निर्मिती व 35 हजार मेगावॅट वहनक्षमतेच्या ग्रीड निर्मितीचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. वीज सेवेतील गत चार वर्षांतील लोककल्याणकारी सुधारणांप्रमाणेच हे कामही यशस्वीपणे पूर्ण करू, असे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे सांगितले.
        येथील पॉवर हाऊस परिसरात महापारेषण कंपनीच्या 'प्रकाश सरिता' या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार नवनीत राणा, उपमहापौर संध्याताई टिकले, सुरेखा लुंगारे, कंपनीचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत व सतीश अणे, महावितरणचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल, मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वीज अभियंता बेरोजगारांच्या बारा आठवड्याच्या प्रशिक्षणाचा शुभारंभही यावेळी झाला. 
श्री. बावनकुळे म्हणाले की, राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वीज, रस्ते, पीकाला चांगला भाव व रोजगाराची उपलब्धता असावी या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाकडून प्रयत्न होत आहेत. त्यानुसार ऊर्जा विभागाने शेतकरी हितासाठी अनेक निर्णय घेतले. पूर्वी शेतकरी बांधवांना वीज जोडणी मिळण्यात अडथळे येत होते. ही प्रक्रिया सुलभ व जलद करण्यात आली. त्यामुळे गत चार वर्षांत राज्यात साडेसात लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली.  
अमरावती विभागाचे काम राज्यात अव्वल आहे. अमरावती विभागात महावितरणने 34 उपकेंद्रे उभी केली आहेत. सुमारे 700 कोटी रुपयांची कामे झाली. त्यामुळे वीजपुरवठ्याची प्रक्रिया भक्कम झाली व  टेक्सटाईल पार्कसह विविध उद्योगांना चालना मिळाली. मेळघाटात मध्य प्रदेशातून वीज आणली. अजून 24 गावांत वीज पोहोचायची आहे. सध्या तिथे सौर ऊर्जा यंत्रणा पुरविण्यात आली आहे. लवकरच तिथे विद्युतीकरणाचे कामही पूर्ण करण्यात येईल. गव्हाणकुंडमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असून, त्याद्वारे 18 हजार शेतक-यांना वीज मिळणार आहे. लाँड्री व्यावसायिकांसाठी वीजेचा दर 12 रूपयांहून 5 रु. 70 पैश्यांपर्यत कमी केल्याचेही त्यांनी सांगितले.  
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात 12 कोटी नागरिक असून, 25 हजार मेगावॅट वीज खर्च होते. उत्तरप्रदेशात लोकसंख्या अधिक असूनही तेथील वीजवापराचे प्रमाण कमी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जा व अपारंपरिक उर्जेला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वत्र वीजेवर चालणारी वाहने असावीत, असेही त्यांनी म्हटले आहे. उद्योगांच्या विकासासह भविष्यात वीजेची गरजही वाढणार आहे. सध्या 25 हजार मेगावॅट वहनक्षमतेचे ग्रीड आहेत. ही क्षमता 35 हजार मेगावॅटवर नेण्यात येईल.     
सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा सौर पंप केवळ 16 हजार रू. दरात शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिला. सौभाग्य योजनेत 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून कंत्राट परवाना प्रक्रिया सुलभ केली. परवाना देण्याचे अधिकार जिल्ह्यांना दिले. विदर्भ व मराठवाड्यात इलेक्ट्रिक ड्युटी माफ करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.  
पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, विदर्भ- मराठवाड्यात गत चार वर्षांत अनेक पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या. वीज खात्याचे त्यात मोठे योगदान आहे. सौर पंपाची उपयुक्तता पाहता या योजनेचा विस्तार व्हावा. वीजेच्या ओव्हरहेड लाईन्स या वस्तीच्या क्षेत्रात भूमिगत करण्यात याव्यात. वीजविषयक कामे- कंत्राट मिळवण्यासाठी लागणारी अर्हता प्रशिक्षणामुळे बेरोजगार अभियंत्यांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे ते व्यवसाय करण्यासाठी सक्षम होतील, असे खासदार श्रीमती राणा यांनी सांगितले.
            कार्यक्रमाला अधिकारी- कर्मचारी यांच्यासह वीज अभियंते व नागरिक उपस्थित होते.

पोषण अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी योगदान द्यावे - कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे आवाहन

पोषण माह उपक्रमाचे उद्घाटन




पुढची पिढी सशक्त झाली तर देश सशक्त होईल. पोषण अभियानात अमरावती जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून यंदा तो पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज वरुड येथे केले.

 महिला व बालविकास विभागातर्फे वरुड येथील दीनदयाळ उपाध्याय सभागृहात केंद्र शासन पुरस्कृत पोषण अभियानात पोषण माह उपक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. श्रीमती वसुधाताई बोंडे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात,गजाननराव खडसे, विजयभाऊ श्रीराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, पोषण अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्वदूर जागृती व्हावी. अंगणवाडी सेविकांकडून चांगली कामगिरी होत आहे. वरूडमधील चार अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या अभियानातही सर्वांनी उत्तम योगदान द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने महिला व बालकल्याणासाठी अनेक योजनांना चालना दिली आहे. अमरावती स्त्री रुग्णालयात मिल्क बँक सुरू करण्यात आली आहे. हिरकणी कक्ष उपक्रम ठिकठिकाणी राबवण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.


श्रीमती बोंडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व नागरिकांनी पोषण जागृतीची शपथ घेतली. श्री. थोरात यांनी प्रास्ताविक केले.  साधना पांडे यांनी स्वागतगीत सादर केले. 
    ०००

दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक उपकरणे मिळणार समाजातील सर्व स्तरांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील - कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

दिव्यांगांची तपासणी व उपकरण नोंदणी शिबीर





अमरावती, दि.१ : समाजातील कुठलाही घटक वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे.  दिव्यांग बांधवांसाठी शासनाने अनेक हितकारक निर्णय घेतले आहेत, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज वरुड येथे सांगितले.

 जिल्हा परिषदेतर्फे  वरुड येथील दीनदयाळ उपाध्याय सभागृहात दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते. श्रीमती वसुधाताई बोंडे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात,गजाननराव खडसे, विजयभाऊ श्रीराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
     या शिबिरात वरुड व मोर्शी तालुक्यातील दिव्यांग बांधव सहभागी झाले. त्यांची तपासणी तज्ज्ञांकडून करण्यात आली व उपकरणासाठी मोजमाप घेण्यात आले. दिव्यांग बांधवाना 'अलिम्को'कडून आवश्यक उपकरणे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. 
पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, समाजाच्या सर्व स्तरांची दखल घेत देशभरात नव्या योजना व उपक्रमांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चालना दिली. राज्यातही अनेक निर्णय झाले. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेत मानधन वाढविण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी तीन टक्के निधो दिव्यांग कल्याणासाठी वापरण्याची तरतूद करण्यात आली आहे.
श्री. थोरात यांनी प्रास्ताविक केले.  

Saturday, August 31, 2019

मेळघाटात भक्कम संपर्कयंत्रणेसाठी ‘स्पेशल कनेक्टिव्हिटी प्लॅन’

  दोन आठवड्यात कामाला गती देण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश  

अमरावती, दि. 31 : दुर्गम मेळघाटात रस्ते, वीज व नेटवर्क कनेक्टिव्हिटीचे भक्कम जाळे निर्माण करण्यासाठी ‘मेळघाट स्पेशल कनेक्टिव्हिटी प्लॅन’ जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. भक्कम संपर्कयंत्रणेसाठी आवश्यक परवानग्या व इतर कार्यवाही दोन आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश आज येथे दिले.
बांधकाम विभाग, महावितरण व विविध नेटवर्क कंपन्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. महावितरणचे अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे, रिलायन्सचे योगेश ठाकरे, समीर केणे यांच्यासह विविध विभागांचे व कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
 जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, मेळघाटात भक्कम संपर्कयंत्रणा उभारण्यासाठी वीज, रस्ते व नेटवर्क कनेक्टिव्हिटी या सेवांची सुरळीत उपलब्धता असणे आवश्यक आहे.  त्यामुळे स्पेशल कनेक्टिव्हिटी प्लॅननुसारनुसार समन्वयाने व गतीने काम करण्यात येईल. सर्व आवश्यक सेवांच्या एकसंध परिणामातूनच दुर्गम परिसरातही भक्कम संपर्क निर्माण होईल व विकासाला चालना मिळेल. धारणी तालुक्यातील 8 व चिखलदरा तालुक्यातील 16 गावांत वीज पोहोचविण्यासाठी 36 कोटी 92 लक्ष रुपये निधीचा महावितरणचा प्रस्ताव आहे. त्यापैकी 12 गावांबाबतचा प्रस्ताव वनविभागाच्या परवानग्यांसाठी पाठविण्यात आला. उर्वरित गावांचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात यावा.
‘बीएसएनएल’कडून काही ठिकाणी टॉवर सुरु आहेत. मात्र, नियोजनानुसार सर्व टॉवर कार्यान्वित झाले नाहीत. ते काम दोन आठवड्यात पूर्ण करावे. ‘रिलायन्स जिओ’कडून 12 टॉवर उभारण्यात आले व 36 टॉवर निर्माण होत आहेत. वनविभागाकडून आवश्यक परवानग्या लवकरात लवकर मिळवण्यात याव्यात. गावांना जोडणा-या रस्त्यांची भक्कम बांधणी व वेळोवेळी दुरुस्ती करावी. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव आदी कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.  
एकताई, भांडुम, सलिता, लाखेवाडी या गावांत विद्युतीकरणाची कार्यवाही होत आहे, असे श्री. खानंदे यांनी सांगितले.

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक शेतीची गरज - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे

 कृषी मंत्र्यांचा श्रीलंकेतील शेतक-यांशी संवाद
                   




अमरावती, दि. 31 :  रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापराने जमिनीचा पोत घसरून उत्पादनक्षमता कमी होत आहे. त्यामुळे जैविक शेतीचा अवलंब होण्याची गरज आहे, असे पालकमंत्री तथा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी हातुर्णा येथे सांगितले.
  महर्षी अरविंद फौंडेशन व इथिक सायन्स फौंडेशनतर्फे हातुर्णा येथे श्रीलंकेतील 27 शेतकरी बांधवांसाठी पारंपरिक व जैविक शेतीपद्धती कार्यशाळा आयोजिण्यात आली होती. त्याला उपस्थित राहून कृषी मंत्र्यांनी श्रीलंकेतील शेतक-यांशी संवाद साधला. श्रीलंकेतील कृषी विद्यापीठातील प्राध्यापक श्रीमती सुजीवा, फौंडेशनचे अध्यक्ष गज अरविंदजी, श्रीमती वसुधाताई बोंडे, उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक कीटकनाशके, बियाण्याचा मोठा वापर झाला. त्याची परिणती जमिनीचा पोत घसरण्यात झाली. त्यामुळे उत्पादनक्षमताही कमी झाली. ही स्थिती सुधारण्यासाठी जैविक शेती हा पर्याय आहे. पारंपरिक शेतीपद्धतीत पीक काढल्यानंतर घरी बियाणे काढून ठेवले जायचे. भारतासारख्या कृषी प्रधान देशातही अनेक ठिकाणी अजूनही घरी उत्पादित  बियाणे वापरले जाते. जमिनीची उत्पादनक्षमता वाढवणे व निसर्गाला अनुकूल पीकपद्धतीसाठी जैविक शेतीचा अवलंब व्हावा.
प्रा. सुजीवा म्हणाल्या की, भारत व श्रीलंकेतील सौहार्दपूर्ण संबंध प्राचीन आहेत. दोन्ही संस्कृतींत मोठे साम्य आहे. हे संबंध दृढ करण्याठी दोन्ही देशांनी जैविक शेतीसाठी संयुक्त शेतीविषयक कार्यशाळा घ्यावी. पृथ्वीतलावरील समस्त सजीवांसाठी जैविक शेतीचा अवलंब आवश्यक आहे.
यावेळी परिसरातूनही अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

फळपीकासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले वाणच लावावे - कृषी विभागाचे आवाहन




अमरावती, दि. 31 : फळपीकाची लागवड करताना कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या वाणाचीच लागवड व्हावी. अन्य वाण लावल्यास फळधारणा न होण्याचा धोका होऊ शकतो, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
चांगल्या उत्पन्नाचा स्त्रेात म्हणू राज्यात शेतकरी बांधव फळबाग लागवडीकडे मोठया प्रमाणावरवळत आहेत. तथापि, सुरुवातीच्या 3-5 वर्षाच्या फळधारणापूर्व कालावधीत मोठया प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागत असुन जोपर्यंत फळधारणा होत नाही तोपर्यंत वाणाच्या गुणवत्तेबाबत खात्री नसते.
        राज्यात अनधिकृत रोपवाटिकांमधुन कृषि विद्यापीठांनी शिफारस  केलेल्या सिताफळ वाणांची कलमे/रोपे उपलब्ध करुन दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत अवास्तव स्वरुपाचीप्रचार प्रसिद्धी करुन खरेदीची भुरळ घातली जात आहे.   कृषि विदयापीठांनी शिफारस केली नसल्यास अशावाणांच्या गुणवत्तेबाबत साशंकता असल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागूशकते.
        या पार्श्वभुमीवर, सीताफळ तसेच इतर सर्व फळपिकाकरिता कृषि विदयापीठांनी शिफारस केलेल्यावाणांचाच वापर करावा. द्य:स्थितीत बाजारात उपलब्ध असलेल्या ज्या फळपिक वाणाची कृषिविदयापीठांनी शिफारस केलेली नाही अशा वाणांचा शेतकरी बांधवानी वापर करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                000

प्रशिक्षणाबरोबर कर्जपुरवठा व विपणनासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

 ‘महाबँके’तर्फे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम

               





अमरावती, दि. 31 : जिल्ह्यात स्वयंरोजगारनिर्मितीसाठी शासन व बँकांच्या समन्वयातून कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांना चालना देण्यात आली आहे. हे काम केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्याद्वारे उद्योग-व्यवसायाला कर्जपुरवठा व विपणनासाठी साह्य करण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज वरूड येथे केले.
            बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे शासनाच्या सहकार्याने रोशनखेडा येथे मोटर रिवाइंडिंग व इतर कौशल्य प्रशिक्षण घेण्यात आला. त्यानिमित्त वरुडमध्ये दीनदयाळ उपाध्याय सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमती वसुधाताई बोंडे, मोर्शीचे नगराध्यक्ष अप्पासाहेब गेडाम, माजी नगराध्यक्ष पिंटुभाऊ सावरकर, विशाल सावरकर, अजय येते, क्षेत्रीय व्यवस्थापक नीतिन घारड आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, स्वयंरोजगार निर्मितीसाठी  केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकास कार्यक्रमांना चालना दिली आहे. यात प्रशिक्षित झालेल्या नागरिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याला कर्जपुरवठा करणे, त्याच्या मालाचे मार्केटिंग करण्यासाठी साह्य करणे ही कामेही झाली पाहिजेत. त्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बँकेतर्फे व्यवसायासाठी मंजूर प्रकरणांच्या धनादेशांचे वाटपही करण्यात आले.  अरुणकुमार आठवले यांनी सूत्रसंचालन केले.
                                                000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...